प्रेमाची व्यापकता वाढवणं

आपल्याला सर्वांसोबतचे अंतर्संबंध आणि परस्परावलंबनाची जाणीव झाली की आपण स्वतःला सकल मानवतावादाचा घटक मानायला लागतो आणि प्रेमाच्या सार्वत्रिक तत्त्वाच्या आधारे सर्वांच्या सुखाची कामना करतो.
Meditations broadening love 1

स्पष्टीकरण

बौद्ध धर्मातील प्रेमाची व्याख्या इतरांनी आनंदी व्हावं आणि त्यांच्याजवळ आनंद निर्माण करणारी कारणं असावीत, या कामनेशी संबंधित आहे. यात नुसतंच बसून राहून इतर कोणीतरी आनंद निर्मितीसाठी त्यांना मदत करेल असा विचार करण्यापेक्षा आपणास शक्य असल्यास त्यांच्या जीवनात आनंद निर्मितीसाठी मदत करण्याचाही समावेश आहे. हे सर्वसमावेशक वैश्विक प्रेम आहे, हे फक्त जे आपल्याला आवडतात किंवा आपल्या जवळचे आहेत, त्यांच्यापुरतं मर्यादित नाही, तर अनोळखी आणि जे आपल्याला आवडत नाहीत, त्यांचाही या प्रेमात समावेश आहे. या प्रकारचं वैश्विक प्रेम निरपेक्ष असतं: ते आसक्ती, तिटकारा आणि भेदमुक्त असतं. कारण प्रत्येकाला आनंदी असण्याचा आणि दुःखी नसण्याचा एकसमान अधिकार असल्याच्या जाणिवेवर ते आधारलेलं असतं. ते कदाचित दुःखाला कारणीभूत ठरणारं विघातक वर्तन किंवा विचार करतीलही, पण त्यामागे त्यांची गोंधळलेली मनोवस्था आणि आनंद कसा निर्माण करता येईल, याबाबतच्या ज्ञानाचा अभाव असेल. 

त्यामुळे आपण इतरही आपल्याप्रमाणेच आनंदी होण्याची इच्छा बाळगणारे लोक आहेत, या विचारावर आपलं प्रेम निर्धारित करतो. सर्वसाधारणपणे लोक काय करतात किंवा ते आपल्याशी चांगलं वागतात की नाही आणि आपल्या प्रेमाला प्रतिसाद देतात की नाही, असल्या विचारांवर आपलं प्रेम ठरत नाही. कारण आपण अपेक्षा बाळगत नाही आणि पक्षपातीही नसतो. आपलं निरपेक्ष प्रेम ही शांत मनोवस्था असते. ती आसक्तीवर आधारलेलं वर्तन किंवा कोणत्याही अविवेकी विचारांच्या मळभानं आपलं मन व्यापू देत नाही. 

आपल्या प्रेमाचा भावनिक स्वर हा सर्वांसोबत जोडले असण्याच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेत असतो. आपण वापरत असलेल्या सर्व गोष्टी या इतरांच्या कष्टातून निर्माण झाल्या असल्याच्या जाणिवेतून जोडले असण्याची आणि कृतज्ञतेची भावना जन्मास येते. इतरांनी कष्ट घेतले नसते तर, आपण वापरत असलेल्या गोष्टी कोठून मिळाल्या असत्या, उत्पादनासाठीचा कच्चा माल, आपले अन्न, कपडे, घरातील वीज आणि पाणी, इंटरनेटवरील माहिती आणि अशा कितीतरी गोष्टी कोठून मिळाल्या असत्या? आपण खरेदी करीत असलेल्या वस्तुंच्या उत्पादनासाठी बाजारपेठ उत्पन्न करूनही लोक अप्रत्यक्षपणे आपल्याला मदत करत असतात.   

ही जोडलेपणाची आणि कृतज्ञतेची भावना जितकी तीव्र असेल तितकेच आपल्याला अधिक सुरक्षित आणि आनंदी वाटत राहतं. हे ऑक्सिटोसिन हार्मोनशी संबंधित आहे – जे हार्मोन आई आणि बाळामधल्या भावबंधात समाविष्ट असतं. एकदा का आपण ही उबदार आणि आनंदी भावना विकसित केली की आपण ती आपल्या ध्यानधारणेतही समाविष्ट करतो, प्रथम स्वतःसाठी, कारण आपण स्वतःसाठी आनंदाची अपेक्षा ठेवली नाही, तर आपण इतरांसाठी आनंदाची अपेक्षा कशी ठेवू शकू. त्यानंतर आपण ती प्रचंड व्यापक गटासाठी विस्तारत नेतो, जोपर्यंत ती प्रत्येकापर्यंत पोहचत नाही. 

प्रत्येक पातळीवर, आपल्या प्रेमात तीन विचारांचा समावेश असतोः

  • इतर लोक आनंदी असतील आणि त्यांच्याकडे आनंद निर्माण करणारी कारणे असतील, तर किती छान होईल. 
  • ते आनंदी असू देत, याचा अर्थ, “माझी खरोखर इच्छा आहे की ते आनंदी असावेत.”
  • “कदाचित मी त्यांना आनंदी करू शकेन.” 

जेव्हा आपण इतरांसाठी आनंदाची कारणं निर्माण करण्याचा विचार करतो, तेव्हा प्रथम आपल्याला त्यांच्या दुःखाची कारणं ओळखायला लागतील. जर ते भुकेले असतील, तर आपण केवळ त्यांना पुरेसं अन्न मिळावं अशी इच्छा बाळगत नाही; तर आपल्याला जाणीव असते की जेवणानंतर त्यांना आनंदी वाटलं तरी ते कदाचित जंकफुड खाऊन जाड होऊ शकतात. त्यामुळे आपण त्यांच्या खाण्याच्या सवयींबाबत भावनिक संतुलन, सकसता आणि आत्मसंतुलनाचीही इच्छा बाळगतो. हेच पैसा, भौतिक वस्तू आणि इतर गोष्टींनाही लागू होतं. क्षणिक भौतिक गरजांपेक्षा आपण दीर्घकालीन शाश्वत आनंदाचा विचार करतो.

ध्यानधारणा

  • श्वासांवर लक्ष केंद्रित करत शांत व्हा. 
  • तुम्ही उपभोग घेत असलेल्या आणि वापरत असलेल्या गोष्टी कशा इतरांवर अवलंबून आहेत, याचा विचार करा. 
  • सर्वांसोबत जोडलेपणाच्या आणि कृतज्ञतेच्या सखोल जाणिवेवर लक्ष केंद्रित करा.
  • त्या भावनेनं तुम्हाला किती उबदार, सुरक्षित आणि आनंदी वाटतं, त्याची नोंद घ्या.
  • स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही कितीदा दुःखी असता याची नोंद घ्या. 
  • विचार कराः मी आनंदी असतो आणि माझ्याकडे आनंद निर्माण करणारी कारणं असती, तर किती छान झाले असते; मी आनंदी होऊ शकतो का; मला अधिक आनंद देणारी कारणं मी निर्माण करू शकतो का; वरवरचा अल्पकालीन आनंद नव्हे, तर दीर्घकालीन आनंद. तुम्हाला आनंदी व्यक्ती बनविणाऱ्या विशिष्ट गोष्टीचाही तुम्ही विचार करू शकता – भावनिक संतुलन आणि स्थैर्य, नितळ शांत मन, शहाणीव, इतरांना समजून घेणारी समज, इत्यादी.  
  • [ऐच्छिकः तुमच्या भोवती उबदार आनंदाचं प्रतिक असणारी मंद पिवळ्या प्रकाशाची आभा कल्पित करा.]
  • हेच तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीबाबत करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या काही व्यक्तींपर्यंत हे पोहचवा. 
  • [ऐच्छिकः कल्पना करा तुमच्या भोवतीची मंद पिवळ्या प्रकाशाची आभा तुमच्यातून निघून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सामावत आहे.]
  • नंतर तुमचा जास्त संबंध नसलेल्या किंवा नुकतंच तुमच्या समोर आलेल्या व्यक्तींची कल्पना करा, जसे दुकानातला क्लार्क किंवा बस ड्रायव्हर. 
  • त्यानंतर तुम्हाला आवडत नसलेल्या व्यक्तींबाबत विचार करा. 
  • त्यानंतर तिन्ही गट एकत्रित. 
  • नंतर तुमचे प्रेम तुमच्या शहरातील, देशातील, जगातील प्रत्येकापर्यंत विस्तारित करा. 

सारांश 

निरपेक्ष वैश्विक प्रेम ही सर्वांसोबतची जोडलेपणाची भावना आणि जीवनातील प्रत्येकाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदानाबद्दलचे कृतज्ञताभाव यांचं मिश्रण असणारी एक व्यामिश्र भावना आहे. ही आसक्ती, तिटकारा, भेदभाव विरहीत आणि कोणाही प्रति पक्षपातीपणा नसलेली शांत, उबदार मनोवस्था आहे. प्रत्येकाला आनंद प्राप्तीचा आणि दुःख नाकारण्याचा समान अधिकार असल्याच्या जाणिवेवर हे आधारलेलं असल्यानं ते बिनशर्त आणि प्रत्येकाला सामावून घेणारं आहे. ते मोबदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवत नाही. ते निष्क्रिय नाही, तर ते भौतिक सुखाच्या अल्पकालीन आनंदापेक्षा अस्वस्थकारक भावना आणि गोंधळात टाकणाऱ्या विचारांपासून मुक्त करणाऱ्या शाश्वत दीर्घकालीन आनंद प्राप्तीसाठी इतरांना शक्य ती मदत करण्यासाठी प्रोत्साहित करणारं आहे. 

Top