मृत्युविषयी वास्तववादी दृष्टिकोन बाळगणं

जीवन क्षणभंगूर आहे आणि ते केव्हाही संपू शकते, या वस्तुस्थितीचा स्वीकार केल्यास आपण अर्थपूर्ण गोष्टी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी वाया घालवणे थांबवतो
Meditation being realistic about death 1

स्पष्टीकरण

मृत्यू असा विषय आहे, ज्याविषयी विचार करायला अनेकांना आवडत नाही. पण मृत्यू जीवनाचं वास्तव आहे आणि प्रत्येकाला त्याला सामोरं जावं लागतं. जे टाळणं अशक्य आहे, त्यासाठी आपण स्वतःला तयार नाही केलं, तर कदाचित मृत्युसमयी आपण प्रचंड भीती आणि पश्चाताप अनुभवू. यासाठीच मृत्युविषयक ध्यानधारणा अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे. 

आपण मृत्युविषयक अनेक प्रकारच्या ध्यानधारणा करू शकतो. जसे आपण कल्पना करू शकतो की आपल्याला उपचार करता न येण्याजोगा दुर्दर रोग झाला असल्याचं सांगितलं गेलं, तर आपण ते कसं हाताळू. या क्षणी अद्याप आपल्या हाती संधी उपलब्ध असताना, आपला दृष्टिकोन आणि वर्तन सुधारण्याच्या दृष्टीनं खालील ध्यानधारणा आदर्श आहे. या ध्यानधारणेत श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करत चित्त स्थिर केल्यानंतर आपण खालील मुद्द्यांचा विचार करतो:

ध्यानधारणा

मृत्यू अपरिहार्य आहे, कारण:  

  • मृत्यू येणार हे निश्चित आहे, आणि कोणतीही स्थिती आपला मृत्युपासून बचाव करू शकत नाही- आजवरच्या इतिहासात जन्माला आलेली एकही व्यक्ती मृत्यू टाळू शकलेली नाही, त्यामुळे आपल्यात असं काय खास आहे की आपल्याला मृत्यू येणार नाही? 
  • आपली मृत्युची वेळ झाली की आपला जीवनकाळ वाढवला जाऊ शकत नाही. आणि आपला जीवनकाळ अवितरतपणे कमी होत चालला आहे, याचीही जाणीव ठेवायला हवी- आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपण म्हातारे होत चाललो आहोत आणि मृत्युच्या नजीक चाललो आहोत, तरुण राहिलेलो नाही आणि मृत्युपासून दूरही नाही. हे एखाद्या फिरत्या कन्वेयर बेल्टसारखं आहे, न थांबता अविरतपणे अनिवार्य मृत्युच्या दिशेनं जाणं.  
  • आपल्याला जीवंतपणीच शांत आणि कुठल्याही पश्चातापाविना मृत्युचा स्वीकार करता यावा, यासाठीची उपाययोजना करण्यासाठी वेळ काढण्यापूर्वीच आपल्याला मृत्यु येऊ शकतो- हद्यविकाराच्या झटक्यानं किंवा कार अपघातात आपण कल्पनाही केली नसेल इतक्या अचानक आपल्याला मृत्यू येऊ शकतो. 

आपल्याला केव्हा मृत्यू येईल, हे निश्चित नाही, कारण:  

  • सर्वसाधारणपणे, आपला जीवनकाळ निश्चित नसतो- मृत्यू येण्यासाठी आपण म्हातारेच व्हायला हवं असं काही नसतं. 
  • इथे मृत्युच्या शक्यता अधिक आहेत आणि जीवंत राहण्याच्या कमी – ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असोत किंवा साथीचे आजार; नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास आणि आर्थिक विषमतेमुळे वाढत चाललेली गुन्हेगारी असो, वा वाढत्या निराशाजनक अवस्थेतून वाढलेलं अमली पदार्थांचं व्यसन, ही आणि अशी अनेक कारणं आहेत.   
  • आपलं शरीर प्रचंड नाजूक आहे- थोड्याशा आजारानं किंवा अपघातानं आपला मृत्यू ओढवू शकतो. 

आपला दृष्टिकोन आणि आपले वर्तन सुधारण्यासाठीच्या सावधगिरीच्या उपाययोजनांशिवाय इतर कोणतीही गोष्ट आपल्याला शांत आणि पश्चातापविरहीत मनानं मृत्यू स्वीकारण्यासाठी मदतगार ठरू शकत नाही. आत्ता या क्षणी आपल्याला मृत्युला सामोरे जायचे असेल तर:

  • आपली संपती काहीच उपयोगाची असणार नाही – आपला पैसा केवळ संगणकाच्या पडद्यावरचा एखादा नंबर ठरेल. 
  • मित्र आणि नातेवाईक काहीच उपयोगाचे राहणार नाहीत – आपल्याला त्यांना मागे सोडून निघावं लागेल आणि ते आपल्याभोवती रडत राहिले, तर त्यानं केवळ आपल्या दुःखात भर पडेल. 
  • आपलं शरीरही आपल्या उपयोगाचं राहणार नाही – त्या स्थितीत आपलं अतिरिक्त वजन कमी झाल्याचं समाधान तरी आपण कसं मानू?  

त्यामुळे, आपण ठरवतो की भीती आणि पश्चातापासह मरण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी जीवनात सावध उपाययोजनांशिवाय दुसरं काहीच उपयोगाचं नाही. 

सारांश

मृत्युच्या अपरिहार्यतेविषयीची जागृती करणं हे आपल्याला निराश करण्यासाठी किंवा भय दाखवण्यासाठी नाही. जेव्हा आपल्याला जाणीव होते की या जीवनातला आपला वेळ मर्यादित आहे आणि जीवन केव्हा संपेल याची कोणीच खात्री देऊ शकत नाही, तेव्हा आपण उपलब्ध संधी आणि वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी प्रेरित होतो. मृत्युची जाणीव झाल्यानं, भविष्यातील वाईट स्थिती टाळण्यासाठीची सकारात्मक पावलं उचलण्यापासून आपल्याला रोखणारा आळस आणि चालढकलपणा कमी होऊ शकतो. 

Top