स्पष्टीकरण
कोणाचा काही गुन्हा झाला, उणीव राहिली किंवा चूक झाली, तरी त्याबद्दल न संतापणं किंवा रोष न धरणं, हा forgiveness (क्षमाशीलता) या शब्दाचा अर्थ ऑक्सफर्डच्या शब्दकोशात दिलेला आहे. काही लोकांसाठी या शब्दाला वाढीव अर्थछटा आहे- एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केलेला असतो, आणि कोणीतरी वरिष्ठ अधिसंस्था त्या गुन्हेगाराला माफ करते, त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणतीही शिक्षा देत नाही, असा एक रूढ अर्थ आहे.
मानसिक घटकांच्या बौद्धविचारातील विश्लेषणामध्ये क्षमाशीलतेसाठी उघड अशी काही संज्ञा नाही, पण संताप, रोष (कोणाविरोधात अढी राखणं) आणि त्या विरुद्धार्थी शब्द- म्हणजे न संतापणं किंवा क्रूर न वागणं, अशा शब्दप्रयोगांचा समावेश होतो.
- न संतापणं म्हणजे प्रत्युत्तर देण्याची इच्छा न राखणं आणि इतरांना वा स्वतःला प्रतिसाद देताना हानी न करणं, कारण आपण आपल्या कृत्यांनीच दुःख सहन करत असतो.
- क्रूर न वागणं हा विचार या प्रक्रियेत करुणेची भर घालतो, त्यांनी त्यांच्या दुःखापासून व दुःखाच्या कारणांपासून मुक्त व्हावं अशी इच्छा यात समाविष्ट असते.
तर, बौद्ध दृष्टिकोनातून, आपण इतरांना किंवा स्वतःला अपायकारक कृत्यांतून उद्भवणाऱ्या कोणत्याही दुःखापासून मुक्त करण्याची इच्छा राखतो. पण गैरकृत्यांमुळे सहन कराव्या लागणाऱ्या कर्मजन्य परिणामांपासून एखाद्याला माफ करण्याची ताकद कोणातही नसते, त्यामुळे गुन्हेगाराला माफी देणारा धर्मगुरू किंवा न्यायाधीश यांच्याप्रमाणे श्रेष्ठ स्थानाची भावना जोपासण्याचा धोका इथे नसतो.
व्यक्तीला- इतर कोणी किंवा आपण स्वतः – त्यांच्या अपायकारक किंवा विध्वंसक कृतींपासून किंवा त्यांच्या चुकींपासून वेगळं करणं, हा क्षमाशीलतेविषयीचा कळीचा बौद्ध दृष्टिकोन आहे. आपण वाईट असतो म्हणून विध्वंसकरित्या कृती करतो व चुका करतो, असं नाही, तर वर्तनविषयक कार्यकारणभावाबाबत आणि वास्तवाबाबत आपण गोंधळेले असतो, शिवाय आपली समज मर्यादित असते, त्यामुळे आपण चुका करतो. आपण मर्यादित संसारी जीव असतो, आपल्याला अनियंत्रित स्वरूपाचा गोंधळ व समस्या यांना वारंवार सामोरं जावं लागतं, त्यामुळे करुणेची उचित उद्दिष्टे आपल्या रूपात समोर असतात. आपण स्वतःची पुरेशी हानी करतो व स्वतःला दुःखही देतो, त्यात आणखी भर टाकायची गरज नाही.
तर, बौद्ध संदर्भामध्ये क्षमाशीलता म्हणजे-
- व्यक्तीला कृतीपासून वेगळं करणं- इतर कोणी असेल किंवा आपण स्वतः असू.
- त्यांच्यावर किवा स्वतःवर न संतापता किंवा क्रौर्याने न वागता-
- आपल्याला कोणत्या कारणाने विध्वंसक किंवा चुकीची कृती करावी लागली, त्या कारणापासून आपली अथवा त्यांची मुक्ती करण्याची इच्छा राखून करुणेने वागावं.
पण अपायकारक वर्तणूक किंवा चूक या संदर्भात आपण केवळ हातावर हात ठेवून निष्क्रिय बसत नाही. अधिक विध्वंसक वर्तणूक थांबवण्यासाठी किंवा चुका दुरुस्त करण्यासाठी आपण शक्य ती पावलं उचलतो, पण संताप किंवा अढी न राखता, किंवा आपण कोणालातरी माफ करतो आहोत अशी बढाईखोर भावना न राखता हे करावं.
ध्यानधारणा
इतरांविषयी व स्वतःविषयी आपण क्षमाशीलता विकसित करायला हवी, हे खरं असलं, तरी आज आपण केवळ इतरांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पुढच्या वेळी आपण आपल्यावर लक्ष केंद्रित करू.
- श्वसनावर लक्ष केंद्रित करून शांतचित्त व्हावं.
- एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं असेल किंवा त्रास दिला असेल, त्यातून आपल्याला संताप आला असेल व रोष वाटला असेल किंवा अगदी मनात अढी बसली असेल, आणि नंतर त्या व्यक्तीच्या कृतीचा विचार करून आपण संतापत राहिलो असू व नाराज झालो असू, तर अशा व्यक्तीची आठवण काढावी.
- तेव्हा काय वाटत होतं, ते आठवायचा प्रयत्न करा आणि ती भावना सुखाची नव्हती किंवा ती सुखकारक मनस्थिती नव्हती हे लक्षात घ्या.
- आता मनामध्ये ती व्यक्ती व तिची कृती यांच्यात भेद करायचा प्रयत्न करा. हा केवळ एक प्रसंग आहे, तसं अनेकदा घडलं असेल तरी, तरी त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याच्या संदर्भात तो केवळ एक प्रसंग आहे.
- त्या व्यक्तीला, सर्वांप्रमाणे, माझ्याप्रमाणे सुखी व्हायचं होतं, दुःखी व्हायचं नव्हतं, पण कशामुळे सुख मिळेल याबद्दल त्यांचा गोंधळ होता, त्यामुळे दुःखी राहिल्याने अजाणपणे व अडाणीपणे ते विध्वंसकरित्या वागले, त्यांनी तुम्हाला दुखावलं किंवा तुम्हाला त्रस्त वाटेल असं काहीतरी केलं.
- या समजुतीवर तुम्ही जितकं अधिक लक्ष केंद्रित कराल, तितका तुमचा संताप व रोष ओसरतो, हे लक्षात घ्या.
- त्यांच्याविषयी करुणा विकसित करा, गोंधळल्यामुळे व दुःखामुळे त्यांनी तुम्हाला दुखावलं व त्रस्त केलं, तर त्या गोंधळापासून व दुःखापासून त्यांनी मुक्त व्हावं अशी इच्छा राखा.
- कधीतरी उचित वेळी, तुम्ही शांत असाल व ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतील, तेव्हा त्यांनी तुम्हाला दुखावल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून द्या आणि ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
चूक केलेल्या कोणाबाबत तरी पुन्हा असंच वागा:
- त्यांनी केलेली चूक आठवा आणि तुम्ही त्यांच्यावर कसे संतापलात ते आठवा.
- तुम्हाला कसं वाटलं ते आठवायचा प्रयत्न करा आणि ही काही सुखकारक किंवा स्वस्थ मनस्थिती नव्हती हे लक्षात घ्या.
- आता ती व्यक्ती आणि तिने केलेली चुकीची कृती यांच्यात भेद करायचा प्रयत्न करा.
- त्या व्यक्तीला, सर्वांप्रमाणे, माझ्याप्रमाणे मदत करायची होती, चूक करायची नव्हती, पण एखादी गोष्ट कशी करावी किंवा कृती कशी करावी याच्या सर्वोत्तम मार्गाबाबत ती गोंधळली होती, किंवा तिचं लक्ष नव्हतं, किंवा ती आळशी होती, किंवा काहीही असेल, तर अजाणतेपणाने व अस्वस्थकारक भावनांमुळे त्यांनी चूक केली. ते मर्यादित संसारी जीव आहेत, त्यामुळे ते कायम परिपूर्ण असतील व कधीही चूक करणार नाहीत, अशी अपेक्षा अवास्तव ठरेल.
- तुम्ही या समजुतीवर जितकं अधिक लक्ष केंद्रित कराल, तितका तुमचा संताप ओसरतो, हे लक्षात घ्या.
- त्यांच्यासाठी करुणा विकसित करा, त्यांना चूक करण्यास प्रवृत्त करणारा गोंधळ, अजाणतेपणा व अस्वस्थकारक भावना यांपासून ते मुक्त व्हावेत अशी इच्छा राखा.
- कधीतरी उचित वेळी, तुम्ही शांत असाल व ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतील, तेव्हा तुम्ही त्यांची चूक निदर्शनास आणून द्या व त्यांना चूक दुरुस्त करायला मदत करा.
सारांश
क्षमाशीलता म्हणजे आपण अधिक श्रेष्ठ आहोत किंवा परिपूर्ण आहोत, अशा भावनेतून कोणाला तरी त्यांच्या विध्वंसक वर्तनाबद्दल किंवा त्यांच्या चुकीबद्दल माफ करणं नसतं. आपल्यापेक्षा ते वाईट आहेत, म्हणून त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला नसतानाही आपण अहंकारी अधिसत्तेद्वारे त्यांना माफ करतो किंवा क्षमा करतो, असा याचा अर्थ नाही. क्षमाशीलता म्हणजे न संतापणं, रोष न वाटणं व अढी न धरणं आणि प्रत्युत्तर देण्याची इच्छा न होणं. आपण त्या व्यक्तीला तिच्या कृतीपासून किंवा चुकीपासून वेगळं काढतो, त्या व्यक्तीबद्दल करुणा विकसित करतो आणि तिची कृती दुरुस्त करण्यासाठी पावलं उचलतो किंवा चूक पुन्हा होऊ नये यासाठी तिला मदत करतो. अशा प्रकारे आपण संतापातून उद्भवणारे खड्डे व दुःख टाळतो, विशेषतः संतापामुळे आपण संतप्त विचार, आक्रमक, वैरभावी उक्ती व रोषपूर्ण, आवेशी वर्तन करण्याची शक्यता असते, तेव्हा ही पद्धत अवलंबली जाते.