अनिवार्यतेवर मात करणं

बंधनकारक वर्तन, कृती किंवा संभाषण करण्यापूर्वी परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी आणि वाईट सवयींची गुलामगिरी थांबवण्यासाठी वाव असतो.
Meditations conquering compulsiveness

स्पष्टीकरण

कर्माचा संबंध आपल्या अनिवार इच्छेशी / अनिवार्यतेशी आहे. कोणत्यातरी अस्वस्थकारक भावनेमुळे किंवा अस्वस्थकारक मनोवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या अनिवार इच्छा किंवा मानसिक उत्तेजना आपल्याला लोहचुंबकाप्रमाणे काहीतरी करायला, काहीतरी बोलायला किंवा काहीतरी विचार करायला उद्युक्त करतात.

या अनिवार्य प्रेरणांच्या सक्तीने कृती करण्याने एक विशिष्ट वृत्ती निर्माण होते, त्यामुळे संबंधित शारीरिक, शाब्दिक अथवा मानसिक कृती वारंवार केली जाते. विविध परिस्थिती उद्भवतात- आंतरिक पातळीवर अस्वस्थकारक भावना उद्भवतात किंवा बाह्य पातळीवर आपण असतो ती स्थिती किंवा आपल्यासोबतचे लोक-, तेव्हा या वृत्तींमुळे आपल्याला ती कृती वारंवार करावीशी वाटते. आणि सर्वसाधारणतः कृतीच्या परिणामांबद्दल विचार न करता आपण केवळ अनिवार इच्छेनुसार तिची पुनरावृत्ती करत राहतो. या अनिवार्यतेनुसार होणाऱ्या वर्तनामुळे आपल्याला दुःख होतं किंवा त्यातून अशा प्रकारचा आनंद मिळतो की ज्यात कधीच समाधान होत नाही. कर्म ही अनिवार इच्छा असते आणि त्यातूनच असं अनिवार्य वर्तन घडतं.

या आकृतिबंधातील वर्तनाला अस्वस्थकारक भावना चालना देत असल्यामुळे यातून समस्या उद्भवतात-

  • अनिवार इच्छेमुळे होणाऱ्या वर्तनाचे आकृतिबंध- काही गमावलं जाऊ नये या ओढीपायी आपण अनिवार्यपणे आपले संदेश तपासतो व फोनवर फेसबुक-वॉल तपासत राहतो; किंवा इतरांच्या भावनांबद्दल भाबडेपणा व अविचार दाखवतो आणि आपल्या पालकांसोबत जेवत असतानाही संदेशांची देवाणघेवाण करत राहतो; किंवा वाहतूककोंडीत अडकलेलं असताना संतापामुळे आपण अनिवार्यतेने हॉर्न वाजवत राहतो आणि इतरांपुढे जायचा प्रयत्न करतो.
  • अनिवार इच्छेमुळे होणाऱ्या उक्तीचे आकृतिबंध- असमाधानापायी अनिवार्यपणे स्वतःला महत्त्व देत तक्रारी केल्या जातात आणि अनिवार्यपणे टीका केली जाते, दबाव आणणाऱ्या माणसाप्रमाणे आक्रमकतेने बोललं जातं; भिडस्तपणा किंवा आत्मविश्वासाचा अभाव यांमुळे अतिशय मृदू बोललं जातं.
  • अनिवार इच्छेमुळे उद्भवणाऱ्या विचारांचे आकृतिबंध- असुरक्षिततेमुळे अनिवार्य चिंता उद्भवते; वास्तवाविषयीचा भाबडेपणा किंववा वास्तव टाळण्याची इच्छा यामुळे अनिवार्यतेने दिवास्वप्नं पाहिली जातात.

वरील उदाहरणं आत्मघातकी अनिवार्यतेपोटी होणाऱ्या वर्तनाच्या आकृतिबंधांची आहेत, त्यातून दुःख निर्माण होतं. पण काही रचनात्मक आकृतिबंधही असतात, तेही चेतापेशीय असतात- उदाहरणार्थ, परिपूर्णतेचा ध्यास घेतल्याने अऩिवार्यपणे इतरांच्या तर्कामध्ये दुरुस्ती सुचवली जाते, प्रबळ इच्छेपायी चांगलं वागणारे लोक कधीच नकार देऊ शकत नाहीत, काहींना काम करण्यानेच झपाटलेलं असतं, इत्यादी. यांमागे सकारात्मक भावनेचा घटक असू शकतो- इतरांना मदत करण्याची किंवा त्यांचं भलं करण्याची इच्छा त्यामागे असू शकते, ते व्यग्र आहेत किंवा “मी”पणाचा फुगवटा त्यांच्या मनात आहे- “मी” चांगलं असायला हवं, “मी” गरजेचं असायला हवं, “मी” परिपूर्ण असायला हवं- आपण काहीतरी चांगल्या रितीने करतो तेव्हा ते आपल्याला तात्पुरतं सुखी करण्याचीही शक्यता आहे, पण हे सुख टिकत नाही आणि हीच समस्या आहे. उदाहरणार्थ, आपल्या भावना काय आहेत हे कधीच पुरेसं चांगलं ठरत नाही, किंवा आपल्याला आपलं मूल्य सिद्ध करण्यासाठी पुढे जाऊन चांगलं कृत्य करावं लागतं.

पहिल्यांदा आपण शांतचित्त होण्याची व वेग कमी करण्याची गरज आहे. आपल्याला काहीतरी करण्याची किंवा बोलण्याची भावना खरोखरच कधी जाणवते आणि आपण प्रबळ इच्छेपोटी ते कधी करून टाकतो, यातील भेद करण्यासाठी हे गरजेचं आहे. या दरम्यानच्या अवकाशात आपण मूल्यमापन करू शकतो- यामागे काही अस्वस्थकारक भावना आहे का, मी स्वतःला काहीतरी अशक्य गोष्ट (उदाहरणार्थ, कायम परिपूर्ण असणं) करण्यासाठी केवळ अनिवार इच्छेपोटी भाग पाडतो आहे का, हे करण्यासाठी काही शारीरिक आवश्यकता आहे का (उदाहरणार्थ, काही खाजवणं), हे उपकारक ठरेल की अपायकारक ठरेल? तर भेदक्षम जागरूकतेद्वारे मूल्यमापन करावं आणि मग कृती करण्यासाठी योग्य कारण दिसत नसेल, किंवा त्यामागे केवळ काही चेतापेशीय कारण असेल, तर स्वनियंत्रण वापरून या भावनेद्वारे कृती करणं टाळायचं, किंवा बोलणं टाळायचं. यासाठी आपण कशी कृती करतो, कसे बोलतो व कसा विचार करतो याबद्दल सजगता गरजेची असते, आणि दिवसभर आत्मचिंतन करून व स्वनियंत्रण राखून हे साधता येतं.

भेदक्षम जागरूकता वापरणं आणि शक्यतोवर अनिवार्यतेवर आधारित कृती न करणं, आपल्या वर्तनामागे सकारात्मक भावना राखणं आणि शक्यतोवर स्वतःविषयी कमीतकमी संभ्रम ठेवणं व वास्तववादी राहणं, हे उद्दिष्ट असतं.

ध्यानधारणा

  • श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून शांतचित्त व्हावं.
  • कृती, वाचा व विचार यांच्यातील तुमचा अनिवार्य आकृतिबंध ओळखायचा प्रयत्न करा.
  • त्यातील एकाची निवड करा आणि विश्लेषण करा- त्यामागे काही अस्वस्थकारक भावना आहे का की काहीतरी अशक्य गोष्ट कवेत घेण्याचा प्रयत्न आहे- कधीच चूक करायची नाही, अशा पद्धतीचं काही गाठण्याचा प्रयत्न आहे का.
  • तुम्ही अनिवार्यतेने कृती करता, तेव्हा त्यातून काही प्रकारची समस्या तुम्हाला सहन करावी लागते किंवा इतरांना सहन करावी लागते, हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. त्यातून एकतर दुःखी भावना उद्भवतात किंवा अल्पजीवी असमाधानकारक आनंद उद्भवतो.
  • तुम्हाला काय बोलावंसं किंवा करावंसं वाटतं आहे, याचं मूल्यमापन करण्यासाठी भेदक्षमतेचा वापर करायचा निर्धार करा. शांतिदेव यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, एखादी भावना आत्मघातकी असेल किंवा तुमच्या अहंकाराला दृढ करणारी असेल, तर स्वनियंत्रण वापरा आणि ओंडक्याप्रमाणे होऊन जा.
  • तुम्ही ध्यानधारणेला बसले असताना, तुम्हाला खाज उठली किंवा पाय हलवावा वाटला, तर तुम्ही प्रत्यक्षात खाजवेपर्यंतच्या वेळेत तुम्ही ठरवा की, जे वाटतंय ते करायचं की करायचं नाही. ती कृती करण्याच्या लाभापेक्षा न करण्याचे लाभ जास्त असतील, असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही स्वनियंत्रण वापरा आणि लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे होऊन जा.
  • तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अनिवार्य वर्तनाच्या संदर्भात तुम्ही एखादी कृती करावीशी वाटणं व प्रत्यक्ष ती कृती करणं यांदरम्यानचा अवकाश सजगपणे वापरायचा निर्धार करा, आणि ती कृती न करण्याचा लाभ कृती करण्याहून अधिक असेल, तेव्हा लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करा. 

सारांश

अस्वस्थकारक भावनांमुळे उद्भवणारं स्वतःचं अनिवार्य आत्मविध्वंसक वर्तन आपण पाहिलं आहे, त्यातून दुःख व समस्याच निर्माण होतात. आणि आपण रचनात्मक, सकारात्मक मार्गांनी अनिवार्य कृती करतो, तेव्हाही तिला असुरक्षितता व स्वतःविषयीच्या अवास्तव विचारांनीच चालना दिलेली असते, त्यातून अल्पजीवी सुख मिळू शकतं- उदाहरणार्थ, एखादं कार्य चांगल्या रितीने पार पाडल्यावर किंवा कोणाची मदत केल्यावर मिळणारं सुख असं असतं, पण आपल्याला मग अनिवार्यतेने स्वतःला सिद्ध करावंसं वाटतं.

आपण शांत होणं गरजेचं असतं. आपल्याला काही करावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं किंवा विचार करावासा वाटतो, त्यानंतर ती गोष्ट अनिवार्यपणे होईपर्यंतचा अवकाश आपण वापरायला हवा. आपण आत्मचिंतन करायला हवं, सजग राहायला हवं आणि भेदक्षमता वापरायला हवी. अतिश यांनी ‘बोधिसत्त्व गार्लन्ड ऑफ जेम्स’ (२८) यामध्ये लिहिल्यानुसार:

अनेकांमध्ये असताना मला स्वतःच्या वाचेवर ताबा ठेवता येऊ दे; मी एकटा असतो तेव्हा मला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता येऊ दे.

पण याचंही टोक गाठून कठोर किंवा यांत्रिक होऊ नये, कारण आपण कायम ताबा ठेवत असतो. परंतु अशा पद्धतीने वागलं तर आपण उत्स्फूर्तपणे वागत नाही, असा आक्षेप तुम्ही घेऊ शकता. पण उत्स्फूर्तता म्हणजे डोक्यात येईल त्या गोष्टीच्या उपकारकतेचं किंवा योग्यतेचं मूल्यमापन न करता ती गोष्ट करून टाकणं असा अर्थ होत असेल, तर मध्यरात्री बाळ रडत असताना आपल्याला उठावंसं वाटत नाही, मग आपण उठणार नाही. किंवा आपल्याला त्या बाळाला शांत करण्यासाठी फटके द्यावेसे वाटले तर आपण तसंही करू. तर, अशा अनिवार्य वर्तनाच्या समस्या हाताळण्यासाठी- कर्माविषयीच्या आपल्या समस्या हाताळण्यासाठी- आपण ध्यानधारणा करणं गरजेचं आहे, वारंवार ध्यानधारणा करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण स्वतःशीच पोलिसांसारखे कठोर वागणार नाही, तर आपल्या जे काही करावंसं वाटतंय ते आपोआप व स्वाभाविकपणे होईल याबद्दल सजग राहू.

Top