समभावाच्या तत्त्वावर इतरांचा मानवी जीव म्हणून विचार केल्यास, आपण आपले वर्तन आणि वाणीचा इतरांवर काय परिणाम होतो, याबाबतची काळजी आणि विवेक विकसित करतो.
Meditation generating care matheus ferrero

स्पष्टीकरण

आपण श्वसनावर लक्ष केंद्रित करून शांतचित्त व्हावं, ही कोणत्याही प्रकारच्या ध्यानधारणेची पूर्वअट आहे. ते झाल्यानंतर आपण सकारात्मक, रचनात्मक मनस्थिती विकसित करण्यासाठी तयार होतो. इतरांशी संवाद साधताना त्यांच्याबाबत प्रामाणिक काळजी व आस्था वाटणं सर्वांत महत्त्वाचं आहे. याचा अर्थ त्यांना माणूस म्हणून गांभीर्याने घेणं, आपल्याप्रमाणेच त्यांच्याही भावना आहेत हे लक्षात घेणं. परंतु, ही वस्तुस्थिती नजरेआड होण्याची शक्यता असते आणि आपण व्यग्र असताना, तणावग्रस्त असताना किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःत मग्न असताना असंवेदनशीलतेने वागण्याची शक्यता असते.पण आपण स्वतःवर आणि आपल्याच समस्यांवर व भावनांवर जितकं संकुचितपणे लक्ष केंद्रित करू, तितके आपण दुःखी होतो. आपल्या भोवतीच्या व्यापक वास्तवाशी असलेला आपला संपर्क तुटतो. 

माणूस म्हणून आपण सामाजिक प्राणी आहोत; आपण स्वतःच्या कल्याणासाठी व स्वास्थ्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतो. आपल्याला त्यांच्याशी संपर्क ठेवावा लागतो. त्यामुळे इतरांशी वास्तविक व निरोगी रितीने संपर्क ठेवण्यासाठी, आपल्याला त्यांच्या कल्याणाबद्दल व स्वास्य्थ्याबद्दल प्रामाणिकपणे आस्था असावी लागते. विशेषतः आपण त्यांच्या परिस्थितीच्या व त्यांच्या भावनांच्या वास्तवाविषयी संवेदनशील असणं गरजेचं असतं. मुख्यत्वे आपण त्यांच्याशी ज्या रितीने संवाद साधतो त्यातील प्रतिसादावेळी ही संवेदनशीलता आवश्यक असते.

आपण कोणालातरी भेटतो, तेव्हा दिवसात आधी काही घडलेलं असेल त्याचा आपल्या मनस्थितीवर परिणाम झालेला असतो, तसंच त्यांच्याबाबतीतही घडलेलं असतं. ते आपल्याला भेटतात तेव्हा काही अचानक उपटल्यासारखे समोर आलेले नसतात. आपल्या व त्यांच्याबाबतीत हे सत्य व वास्तव असतं, हे आपण संवेदनशीलतेने समजून घेतलं नाही, तर आपला संवाद हवा त्याहून खूपच वेगळा होण्याची शक्यता असे. शिवाय, आपण त्यांच्याशी कसं बोलतं, त्यांना कसं वागवतो, याचा त्यांच्या भावनांवर परिणाम होतो, जसा त्यांच्या बोलण्याचा व वागण्याचा आपल्यावर परिणाम होतो.

या वस्तुस्थितीची आठवण आपण स्वतःला करून देतो व आपण इतरांसोबत- मित्रमैत्रिणी, अनोळखी लोक किंवा आपल्याला न आवडणारे लोक- असतो तेव्हा याबद्दल सजग राहावं, म्हणजे मग आपले संवाद अधिक फलदायी व समाधानकारक होतील, आपल्यासाठीही व त्यांच्यासाठीही.

ध्यानधारणा

  • श्वसनावर लक्ष केंद्रित करून शांतचित्त व्हावं.
  • शांत मनाने, मूल्यनिवाडा न करता, तुमच्या जवळच्या व तुम्हाला सोबत हवीशी वाटते अशा व्यक्तीचा विचार करावा.
  • तुम्ही मानव आहात, तुम्हाला भावना आहेत, त्याचप्रमाणे त्यांनाही भावना आहेत, हे समजून घ्या.
  • तुम्ही ज्या मनस्थितीत असाल त्याचा आपल्या संवादावर परिणाम होईल, जसा माझ्या मनस्थितीचाही आपल्या संवादावर परिणाम होईल.
  • मी तुला कसं वागवतो व मी काय बोलतो याचा तुझ्या भावनांवर परिणाम होतो.
  • त्यामुळे आपल्या संवादादरम्यान तू माझी व माझ्या भावनांची काळजी घ्यावीस अशी माझी आशा असते, तसंच मीही तुझी काळजी घेईन. तुझ्या भावनांची मी काळजी घेईन.
  • तुमची केवळ औपचारिक ओळख असलेल्या किंवा अनोळखी व्यक्तीवर, तुम्हाला विशेष भावना नसतील अशा कोणावर तरी, उदाहरणार्थ चित्रपटगृहामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीकडून तिकीट घेता त्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करून हा क्रम पुन्हा पार पाडा.
  • तुम्हाला न आवडणाऱ्या किंवा तुम्हाला सोबत नकोशी वाटते अशा व्यक्तीवर लक्ष केंद्रित करून हा संपूर्ण क्रम पुन्हा पार पाडा.

सारांश

या ध्यानध्यारणेचे अनेक परिणाम होतात व त्याचा व्यापक विस्तार शक्य असतो. आपण भिन्न वयांमधील, भिन्न लिंगभाव असलेल्या, भिन्न वंशांच्या व या तीन कोटींपलीकडच्या अनेक लोकांवर लक्ष केंद्रित करू शकतो. आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करूनही ध्यानधारणा करू शकतो. आपणही माणूसच आहोत व आपल्यालाही भावना आहेत; आणि आपण स्वतःला ज्या तऱ्हेने वागवतो व आपल्याविषयी मनात ज्या तऱ्हेने बोलतो, त्याचा परिणाम आपल्या भावनांवर निश्चितपणे होतो. यातून आपण स्वतःविषयीही काळजी घेणारी वृत्ती विकसित करू शकतो.

Top