आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करत आणि त्याची आवर्तने मोजत आपण स्वतःला शांत करतो, जेणेकरून आपण सकारात्मक मनोवस्था विकसित करू शकू.
Meditation calming down cesar couto unsplash

स्पष्टीकरण 

ध्यानधारणा ही वारंवारतेतून सकारात्मक सवयी विकसित करण्याची पद्धती आहे, जसे एखादी जुनी बौद्धिक मार्गिका कमकुवत करून नवी मार्गिका तयार करणे. हे साध्य करण्यासाठी आपले सतत धावणारे मन शांत करणे आवश्यक आहे, जेणेकरून नवी अधिक लाभकारक जाणीव आणि दृष्टिकोन विकसित करण्यासाठी पैस उपलब्ध होईल. शांत होणं ही स्वतःतच एक लाभकारक सवय आहे, पण तटस्थता किंवा मानसिक स्थैर्य हे सकारात्मक किंवा विघातक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीचा आधार ठरू शकते. आपणास ही शांत मनोवस्था रचनात्मक मनोवस्थेच्या विकासासाठीचा पैस म्हणून वापरावयाची आहे आणि हे एक अपरिहार्य प्रारंभिक पाऊल आहे.   

शांत होण्याने आपल्या जीवनातील कठीण गोष्टींशी सामना करताना मदत मिळते. अनेकदा आपले संभ्रमित मन, जे तणावामुळे भरकटलेल्या मनोवस्थेत असते, ते अशा गोष्टींशी नीट सामना करण्यात अडथळा निर्माण करते. उदाहरणार्थ, आपला दिवस प्रचंड कामाच्या तणावाखाली गेलेला आहे, आपल्याला अजूनही तासभर काम करावे लागणार आहे, पण तरीही आणखी भरपूर काम शिल्लक असणार आहे. अशावेळी श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणे आपल्याला शांत होण्यास साहाय्यक ठरू शकते, जेणेकरून आपण नितळ, स्पष्ट मनोवस्थेतून या कठीण परिस्थितीचा सामना करू शकू. 

ध्यानधारणा

  • ताठ बसा, तुमचे हात मांडीवर असू देत, डोळे अर्धे खुले, नजर खाली जमिनीवर आणि दात घट्ट न आवळलेल्या अवस्थेत. 
  • तुमच्या शरीरातील तणाव नितळू द्या, विशेषतः तुमचे खांदे, तोंड आणि कपाळ. जोवर शरीरातील तणाव निवळत नाही, तोवर आपण मन शांत करू शकत नाही. 
  • नाकातून नेहमीप्रमाणे साधारण श्वास घ्या. 
  • मनात, नाकातून होणाऱ्या श्वास-उच्छवासाच्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करत, ११ श्वासोच्छवासांचे चक्र पुन्हापुन्हा मोजा. 
  • श्वासोच्छवासाची संवेदना आणि मोजणीबाबत सचेतन राहा (मानसिक गेंदाचा वापर करा).
  • नीरसता आणि मानसिक भरकटीमुळे तुमचे लक्ष विचलित झाल्यास त्याची तत्काळ जाणीव होण्यासाठी सतर्क राहा. 
  • तुमचे लक्ष विचलित झाल्याचे लक्षात आल्यात पुन्हा श्वास आणि मोजणीवर लक्ष केंद्रित करा. 
  • मानसिक भरकट लक्षात आल्यास हळूवारपणे तो विचार सोडून द्या, कल्पना करा की तो विचार तुमच्या मनातून बाहेर पडत आहे आणि पुन्हा श्वास आणि मोजणीवर लक्ष केंद्रित करा.
  • जर तुमचे खांदे आणि चेहऱ्यावर तणाव जाणवत असेल, तर तो तणाव पुन्हा मोकळा करा. 
  • शेवटी, ध्यानधारणेतील अवस्थांतराचा भाग म्हणून पुन्हा एकवार चित्त शांत करत शांत व्हा.  

सारांश 

जेव्हा आपण थकलेले असतो किंवा तणावात असतो आणि आपल्याला परिस्थितीचा सामना करण्यासाठी मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन आवश्यक असते, अशा स्थितीत आपल्याला चित्त शांत करत आपले मानसिक आणि भावनिक स्थैर्य पुनर्प्राप्त करण्याची आवश्यकता असते. जसे संगणक रिबूट करतात, तसे मन रिबूट करण्याची आवश्यकता असते. हे साध्य करण्यासाठी श्वासोच्छवासाची आवर्तने मोजत असतानाच शरीराला तणावमुक्त करून श्वासांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. घरी ध्यानधारणा करताना या पद्धतीचा सराव केल्यास, त्यातून बौद्धिक मार्गिका आणि सवय विकसित होते, ज्यातून दैनंदिन जीवनात ज्या ज्या क्षणी आपणांस गरज भासेल, तेव्हा त्याचा अवलंब करण्याची आठवण होईल आणि त्यांचा अवलंब आणि सातत्य कायम राहील. 

Top