अपराधभाव दूर करणं

जेव्हा आपण आपल्या संपूर्ण जीवनाच्या परिपेक्ष्यातून एखाद्या चुकीकडे पाहतो, तेव्हा त्याबद्दलचा पश्चाताप थांबवतो. दोषारोपाऐवजी करुणाभावाने स्वतःला माफ करतो आणि ती चूक पुन्हा होणार नाही, यासाठी दक्ष राहतो.

स्पष्टीकरण

क्षमाशीलता म्हणजे एखाद्या गुन्ह्याविषयी, त्रुटीविषयी किंवा चुकीविषयी संताप न येणं आणि मनात अढी न ठेवणं. इतरांनी केलेल्या हानिकारक गोष्टींबाबत व त्यांनी केलेल्या चुकांबाबत प्रतिसाद म्हणून ही सकारात्मक मनस्थिती विकसित करणं गरजेचं आहेच, शिवाय आपल्या स्वतःच्या नकारात्मक कृती व चुकींबाबतही असा प्रतिसाद असायला हवा. हे करण्यासाठी आपण स्वतःला व्यक्ती म्हणून त्या विशिष्ट कृतीपासून व आपण केलेल्या चुकीपासून वेगळं करायला हवं. आपण स्वतःविषयी विचार करतो, तेव्हा आपण आपल्या संपूर्ण आयुष्याच्या संदर्भात विचार करायला हवा- आणि आपण पुनर्जन्माविषयीची बौद्ध शिकवण स्वीकारणार असू, तर आपल्या गतजन्माविषयी व भावी जन्माविषयीही विचार करायला हवा. या व्यापक संदर्भात आपण स्वतःचा विचार करून आपलं मन खुलं केलं , तर आपल्याला स्वतःची कोणतीही कृती किंवा चूक केवळ एक घटना म्हणून पाहता येते. आपण आपल्या आयुष्यात इतर अनेक गोष्टी केलेल्या असतात, आणि आपण बुद्ध होत नाही तोवर आपण अपरिहार्यपणे चुका करतोच. आपण स्वतःच्या केवळ एका चुकीशी किंवा गैरकृत्याशीच स्वतःची ओळख जखडून ठेवली, आणि तीच आपली खरी ओळख मानू लागलो, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अपराधी वाटतं. जितका अधिक काळ आपण तीच गोष्ट पकडून ठेवू, तितका अधिक काळ आपल्याला अपराधी वाटत राहतं आणि त्यापेक्षाही वाईट वाटत राहतं.

स्वतःला क्षमा करणं याचा अर्थ आपण जे काही केलं ते निरर्थक असल्याप्रमाणे विसरून जाणं नव्हे. आपण केलेला अपाय किंवा आपण केलेली चूक यांची जबाबदारी आपण घ्यावी. पण अपराधभावाने ती गोष्ट धरून ठेवू नका आणि स्वतःवर संतापू नका. स्वतःचं गैरकृत्य व चुका आपण कबूल कराव्यात, स्वतःची ओळख केवळ त्याच गोष्टींवरून करून घेऊ नये- आपण “वाईट व्यक्ती” आहोत किंवा “मूर्ख” आहोत असा विचार करू नये- आणि चार विरोधी शक्तींचं उपयोजन करावं-

 • पश्चात्ताप करावा.
 • अपायकारक कृती किंवा चूक पुन्हा होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार करा.
 • आपण जीवनाला जी सकारात्मक दिशा देऊ पाहतो आहोत त्याचा पुनरुच्चार करा. 
 • आपल्या चुका दुरुस्त करा, आणि शक्य असल्यास आपण केलेल्या अपायावरील उपाय म्हणून दिलगिरी व्यक्त करा. त्याचप्रमाणे शक्य असेल तर समतोल साधण्यासाठी काही सकारात्मक कृती करा.

ध्यानधारणा

 • श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करत चित्त स्थिर करा.
 • तुम्ही केलेली कोणतीतरी अपायकारक कृती आठवावी- कदाचित तुम्ही तुमच्या कृतीने किंवा उक्तीने कोणाला तरी दुखावलं असेल- आणि त्यानंतर तुम्ही काय केलं किंवा काय बोललात याबद्दल विचार करत राहता आणि त्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटतं व तुम्हाला स्वतःचा राग येतो.
 • तुमची व्याप्ती वाढवा आणि संपूर्ण जीवनाच्या संदर्भात स्वतःचा विचार करा, घटना नक्की काय होती ते ओळखा आणि ती पुन्हा घडली असेल, तरी तुमच्या जीवनात त्या व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी घडलेल्या आहेत व घडतील.
 • स्वतःची ओळख केवळ या कृतीपुरती मर्यादित ठेवून तम्ही स्वतःला केवळ त्यातच जखडून ठेवलं, तर त्यातून तुम्हाला अपराधी वाटतं व वाईट वाटतं. तुम्ही स्वतःचा विचार खूप मर्यादित अर्थाने करत असता.
 • ही ओळख सोडून द्या, तुमच्या एकूण ओळखीशी हे जुळणारं नाही याचा विचार करा.
 • मग पुन्हा एकदा तुमच्याकडे संपूर्ण जीवनाच्या संदर्भात पाहा आणि तुम्ही केलेल्या सर्व सकारात्मक व रचनात्मक गोष्टींचा आनंद माना.
 • तुम्ही केलेली गोष्ट विध्वंसक व अपायकारक होती, हे कबूल करा. तुम्ही अजून मुक्त झालेले नाही आहात आणि काही वेळा तुम्ही अपायकारक गोष्टी करता.
 • तुम्ही ती गोष्ट केलीत ही वस्तुस्थिती बदलता येत नसली, तरी तुम्हाला त्याचा पश्चात्ताप होतो आहे. याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट करायला नको होती अशी तुमची इच्छा आहे.
 • ती अपायकारक कृती पुन्हा होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. तुम्ही कशी कृती करता व कशी उक्ती करता याबद्दल सजग राहण्याचा प्रयत्न करा, आणि काहीतरी विध्वंसक करावंसं किंवा बोलावंसं वाटेल तेव्हा संयम राखायचा प्रयत्न करा. 
 • तुम्ही जीवनाला देत असलेल्या सकारात्मक दिशेचा विचार करा- तुम्ही स्वतःच्या उणिवांवर व समस्याग्रस्त भागांवर मात करण्यासाठी कार्यरत आहात, आणि स्वतःचं पूर्ण सामर्थ्य वापरण्यासाठी प्रयत्नशील आहात.
 • तुम्ही दुखावलेल्या व्यक्तीची किंवा व्यक्तींची किमान स्वतःच्या मनामध्ये तरी माफी मागा, आणि त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करता आहात अशी कल्पना करा, जेणेकरून तुमच्या आधीच्या कृतीच्या संदर्भात समतोल साधला जाईल. तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा भेटलात तर तुम्ही या कल्पनेप्रमाणे वागाल, असा निर्धार करा.

तुम्ही केलेल्या चुकीसंदर्भातही अशाच पद्धतीच्या टप्प्यांनी विचार करा-

 • तुम्ही केलेल्या काही चुका पुन्हा आठवा- कदाचित तुमच्या कम्प्युटरवरची एखादी महत्त्वाची फाइल चुकून डिलीट होण्यासारखी चूक असेल- आणि मग तुम्हाला स्वतःचा खूप राग आला आणि तुम्ही खूप नाराज झाला, कदाचित तुम्ही स्वतःला मूर्खही समजू लागला असाल.
 • तुमची व्याप्ती वाढवा आणि संपूर्ण जीवनाच्या संदर्भात स्वतःचा विचार करा, घटना नक्की काय होती ते ओळखा आणि ती पुन्हा घडली असेल, तरी तुमच्या जीवनात त्या व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी घडलेल्या आहेत व घडतील. तुम्ही बहुतेकदा गोष्टी योग्यरित्या करता.
 • स्वतःची ओळख या चुकीपुरतीच मर्यादित ठेवून आणि स्वतःला केवळ त्यातच जखडून ठेवून तुम्हाला भयंकर वाटतं व नाराज वाटतं, हे लक्षात घ्या. तुम्ही स्वतःचा विचार खूप मर्यादित पातळीवर करत आहात.
 • ती ओळख सोडून द्या, तुमच्या एकूण ओळखीही हे जुळणारं नाही याचा विचार करा.
 • त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण जीवनाच्या संदर्भात स्वतःकडे पाहा आणि तुम्ही योग्यरित्या व चांगल्या केलेल्या सर्व गोष्टींचा आनंद माना
 • तुम्ही केलेली गोष्ट चुकीची होती हे कबूल करा आणि काही वेळा चुका होतात- त्यात काही विशेष नाही, हे समजून घ्या.
 • तुम्ही ती चूक केलीत ही वस्तुस्थिती बदलता येत नाही, तरी तुम्हाला तिचा पश्चात्ताप वाटतो आहे. याचा अर्थ तुम्ही ती चूक करायला नको होती, अशी तुमची इच्छा आहे.
 • तशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा निर्धार करा. तुम्ही कम्प्युटरवर काम करत असाल तेव्हा सजग व सतर्क राहायचा प्रयत्न करा, अशा रितीने तुम्ही कायम काळजीपूर्वक वागाल.
 • तुम्ही जीवनाला देत असलेल्या सकारात्मक दिशेचा विचार करा- तुम्ही स्वतःच्या उणिवांवर व चुकांवर मात करण्यासाठी कार्यरत आहात, ‘आपण काय करतो आहोत याकडे लक्ष न देणं’ यांसारख्या उणिवांवर मात करत आहात आणि स्वतःचं पूर्ण सामर्थ्य वापरण्यासाठी प्रयत्नशील आहात.
 • त्या फाइलमधे काय होतं हे आठवायचा प्रयत्न शांतचित्ताने करून ते पुन्हा टाइप करा. मग प्रत्यक्षात ते करा.

सारांश

आपण केलेल्या अपायाबद्दल किंवा आपण केलेल्या चुकीबद्दल स्वतःला माफ करणं, याचा अर्थ स्वतःवर न संतापणं किंवा स्वतःला वाईट व्यक्ती न मानणं व अपराधी न वाटून घेणं आणि स्वतःला मूर्ख म्हणून शिव्या न देणं. आपण स्वतःची ओळख केवळ त्या गैरकृत्यापुरती किंवा चुकीपुरती मर्यादित ठेवणं थांबवावं, आपल्या जीवनाच्या एकूण ओळखीशी हे जुळणारं नाही, हे समजून घ्यावं. आपल्या कृतींची जबाबदारी आपण घ्यावी आणि त्यांना सामोरं जावं. आपण जे काही केलं ते चुकीचं होतं, हे कबूल करून आपल्याला पश्चात्ताप वाटतो, अशी कृती पुन्हा होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचं आश्वासन स्वतःला द्यावं, आपण जीवनात स्वीकारलेल्या सकारात्मक दिशेचा पुनरुच्चार करावा आणि एकतर आपण केलेल्या अपायाबद्दल माफी मागावी किंवा समतोल साधण्यासाठी काहीतरी चांगली कृती करावी किंवा चूक दुरुस्त करावी.

Top