आपले आयुष्य निरर्थक आणि दिशाहीन असल्याची जाणीव झाली की, आपण स्वतःच्या कमतरतांवर काम करून आणि आपल्या क्षमतांची जाणीव करून घेऊन अर्थपूर्ण दिशा मिळवतो.
Meditation a meaning in life

स्पष्टीकरण

आपलं जीवन दिशाहीन आहे, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. आपल्याला आपली नोकरी निरर्थक वाटू शकते, किंवा आपण बेरोजगार असू शकतो आणि यात सुधारणेच्या काही संभाव्यता नाहीत असं असू शकतं. आपण शाळेत असू, तर आपल्या शिक्षणाचं मूल्य व अर्थ यांबाबत आपल्याला प्रश्न पडू शकतात. गोष्टी आणखी बिघडतील आणि आपण नैराश्यात जाण्याचा धोका आहे, अशी भीती आपल्याला वाटत असते. त्याचप्रमाणे आपल्याला काहीतरी अर्थपूर्ण करायचं असतं, जगात काहीतरी सकारात्मक बदल घडवणारं काहीतरी करायचं असतं आणि ते इतरांसोबत वाटून घेण्याची आपली इच्छा असते. खूप पैसा कमावून व खूप गोष्टी असून आपली अर्थाची गरज पूर्ण होत नाही, हे आपल्यातील अनेकांच्या लक्षात येतं.

बौद्ध धर्म या प्रश्नावर सुरक्षित दिशेच्या संदर्भात उत्तर देतो, त्याचं भाषांतर सर्वसाधारणतः आश्रय असं केलं जातं. आपल्याला मिळालेलं मूल्यवान मानवी जीवन निश्चितपणे मृत्यूत समाप्त होणार आहे व आपण आत्ताच आपल्या जीवनाबाबत काही सकारात्मक केलं नाही, तर पुढे आणखी वाईट पुनर्जन्म असू शकतात, हे आपल्या लक्षात आल्यावर आपण हे थोपवायचं कसं याचा विचार करतो. त्याचप्रमाणे आपण पुनर्जन्म स्वीकारत नसू, तर आपण आत्ता असलेल्या मूल्यवान जीवनाची दखल घेतो, आपलं जीवन किती निरर्थक होतं याबद्दल पश्चात्ताप करत मरणं किती भयंकर असेल हे आपल्याला कळतं, या जीवनकाळात गोष्टी आणखी वाईट होण्याची आपल्याला भीती वाटते.

बौद्ध धर्म जी सुरक्षित दिशा सुचवतो, ती तीन अमूल्य रत्नांची आहे. यातील पहिलं रत्न आहे धर्म- मनाचे खरे थांबे व खऱ्या वाटा. त्यामुळे आपल्या उणिवांवर मात करण्यासाठी स्वतःवर काम करणं आणि सर्व चांगले गुण विकसित करून आपल्या सर्व क्षमतांचा वापर करणं. अस्वस्थकारक भावना, एकाग्रतेचा अभाव, स्वमग्नता, परिणामकारक संवादामध्ये अडचणी येणं, इत्यादींना उणिवा म्हणता येतं. चांगले गुण म्हणजे दयाभाव, करुणा, संयम, समजूत, क्षमाशीलता, प्रामाणिकपणा, इत्यादींसारखी प्राथमिक मानवी मूल्यं, त्याचप्रमाणे नीतिमत्ता, एकाग्रता व मर्मदृष्टी यांची जाणीव, यांचा समावेश गुणांमध्ये होतो. हे प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे आपल्याला स्पष्ट अर्थ देणं- बुद्धाने हे पूर्णत्वाने केलं व अत्यंत सजग गुरूंनी हे अंशतः केलं आहे.

आपल्याला इतरांसोबत गोष्टी वाटून घ्यायला आवडत असल्या, तरी आपण केवळ समाजमाध्यमांवर स्वतःच्या यशाची प्रसिद्धी करणं असा याचा अर्थ नव्हे. वाढत्या आत्मविश्वासाद्वारे आपण आपला विकास इतरांसोबत वाटून घेतो, त्यांना लहान-मोठ्या मार्गांनी शक्य असेल तशी मदत करतो. तर, गोष्टी आणखी बिघडतील या भीतीने आपण आपल्या जीवनाला सुरक्षित दिशा द्यायचा प्रयत्न करतो. आपलं जीवन आणखी बिघडू नये यासाठी स्वतःला सुरक्षित दिशेने नेणं आवश्यक आहे, या वस्तुस्थितीतून आपल्याला आत्मविश्वास मिळतो. आपलं यश वाटून घेऊन इतरांबाबत आस्था व करुणा राखणं, आणि मदत करणं.

ध्यानधारणा

  • श्वसनावर लक्ष केंद्रित करून शांतचित्त व्हावं.
  • तुमच्या जीवनाविषयी विचार करा आणि तुम्हाला जीवन अर्थपूर्ण वाटतं की नाही याचं मूल्यमापन करा.
  • तुमच्या जीवनाविषयीच्या गोष्टी तुम्हाला इतरांसोबत कशा रितीने वाटून घ्याव्या वाटतात याचा विचार करा.
  • तुमच्या उणिवांवर मात करण्यासाठी कसं काम करायचं याचा विचार करा आणि तुमच्या जीवनाला अर्थ देण्यासाठी क्षमतांचा वापर कसा करायचा आणि इतरांसोबत काहीतरी अर्थपूर्ण कसं वाटून घ्यायचं, केवळ क्षुल्लक गोष्टी नव्हेत, आणि केवळ ऑनलाइन मंचांवर नव्हे, तर वैयक्तिक संवादांमध्ये आपण हे वाटून घेणं किती सुंदर असेल, यातून इतरांना किती मदत होईल, याचा विचार करावा.
  • तुमच्या जीवनाला अर्थपूर्ण दिशा नसल्यामुळे एका कड्यावरून खोल दरीत कोसळत असल्याची कल्पना करा.
  • स्वतःवर काम केल्याने तुम्ही या दरीत पडण्यापासून स्वतःला वाचवू शकता आणि ही सुंदर भेट तुम्ही इतरांसोबत वाटून घेऊ शकता.
  • तुमच्या जीवनाला ही दिशा देण्याचा निर्धार करा.
  • पुन्हा तीच कल्पना करा, पण आता तुम्ही त्या कड्यावरून पडण्याच्या बेतात आहात, अशी कल्पना करा.
  • पुन्हा तीच कल्पना करा, पण तुम्ही त्या कड्यापासून थोडे दूर आहात, पण हळूहळू जवळ जात आहात, अशी कल्पना करा.

सारांश

आपलं जगणं नित्यक्रमाचं, कंटाळवाणं व वरकरणी निरर्थक झाल्यासारखं आपल्याला वाटतं तेव्हा आपण सक्रिय भूमिका घेणं गरजेचं असतं. आपल्या जीवनाला आपण सकारात्मक दिशा देणं गरजेचं असतं- ही दिशा केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर इतरांसाठीही अर्थपूर्ण असायला हवी. आपल्या उणिवांवर मात करून व आपल्या सकारात्मक क्षमता जाणून घेऊन स्वतःवर काम करण्याची ही दिशा असते. बुद्धाप्रमाणे हे पूर्णतः साध्य करायचं किंवा साक्षात्कारी जीवांप्रमाणे अंशतः हे साध्य करायचं, याचा विचार करून अंतिम ध्येय आपण ठरावावं- पण हा प्रवास करणं निश्चितपणे आपल्या जीवनाची गुणवत्ता बऱ्याच प्रमाणात सुधारतो.

Top