अवघड नातेसंबंध हाताळताना

आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी, नातेसंबंधात अडथळे निर्माण करणाऱ्या आपल्या अवास्तव धारणांना दूर ठेवून दयाभाव विकसित करण्याची आवश्यकता असते.
Meditation difficult relationships nik shuliahin unsplash

स्पष्टीकरण

बौद्ध ध्यानधारणा समस्यांवर मात करण्यावर भर देतात. त्यामुळे बुद्धाने समस्या चांगल्या रितीने हाताळण्यासाठी चार आर्य सत्यं शिकवली. आपल्या सर्वांना जीवनात समस्यांना सामोरं जावं लागतं. यातील काही समस्या अधिक गंभीर असतात. इतरांसोबतच्या नातेसंबंधांशी निगडित समस्या मात्र आपल्यापैकी बहुतेकांना सामोऱ्या येतात.

यातील काही नातेसंबंध बऱ्यापैकी अवघड व आव्हानात्मक असतात. पण या समस्या अधिक चांगल्या तऱ्हेने हाताळण्यासाठी आपण काही ना काही करू शकतो, हे बुद्धाने आपल्याला शिकवलं आहे. या समस्यांची कारणं शोधण्यासाठी आपल्याला स्वतःच्या आत शोध घेण्याची गरज असते. कारण, इतरांनी आपल्या समस्यांमध्ये कितीही मोठी भर घातली असली, तरी आपल्याला केवळ स्वतःचा या समस्यांना दिला जाणारा प्रतिसादच खऱ्या अर्थाने नियंत्रित करता येतो. म्हणजे आपण कोणत्या मनोवृत्तीने आणि वर्तनाने प्रतिसाद देतो, तेवढंच आपल्या हातात असतं.

आपल्या वर्तनाला आपली मनोवृत्ती आकार देते, त्यामुळे आपण स्वतःची मनोवृत्ती सुधारण्यासाठीच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करायला हवं. आपण संकटकारक मनोवृत्तींऐवजी वास्तव व करुण यांवर आधारलेल्या अधिक एकसंध मनोवृत्ती स्वीकारल्या, तर आपण अवघड नातेसंबंधांमधून अनुभवाला येणारं दुःख पूर्णतः नष्ट करता येत नसेल तरी ते कमी करू शकतो.

ध्यानधारणा

 • श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून शांतचित्त व्हा.
 • पहिल्या आर्य सत्याचा- खऱ्या दुःखाचा- दाखला म्हणून तुमचे ज्या व्यक्तीशी अवघड नातेसंबंध आहेत अशा व्यक्तीवर लक्ष केंद्रित करा.
 • त्रस्ततेची भावना येऊ दे.
 • दुसऱ्या आर्य सत्याचा दाखला म्हणून- दुःखाची खरी कारणं- तुम्हाला असं का वाटतंय याची तपासणी करा. कदाचित त्या व्यक्तीसोबत असणं अवघड असेल किंवा ती व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल किंवा आपल्याला त्या व्यक्तीविषयीचं काहीतरी आवडत नसेल किंवा आपल्या इच्छेनुसार ती कायम उपलब्ध होत नसेल किंवा ती कायम चांगल्या मनस्थितीत नसेल, त्यामुळे हे नातेसंबंध अवघड असण्याची शक्यता आहे.
 • अधिक खोलात गेल्यावर आपण त्या व्यक्तीला केवळ त्या विशिष्ट पैलूच्या संदर्भात ओळखू लागतो आणि त्या व्यक्तीला इतर अनेक जगणाऱ्या लोकांप्रमाणे मानव मानत नाही. त्या व्यक्तीवर आपल्या व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींचा परिणाम होत असेल, आणि आपल्याप्रमाणे तिलाही भावना असतील, तिलाही आपल्याप्रमाणे स्वतः इतरांना प्रिय व्हावं असं वाटत असेल.
 • प्रत्येकाला तिच्याविषयी असं वाटणं शक्य नाही, त्यामुळे अखेरीस तिच्यात त्रस्ततेची भावना उद्भवली असेल आणि त्या व्यक्तीसोबत असताना अनुभवायला येणारी अस्वस्थता हा तिसऱ्या आर्य सत्याचा- दुःख निवारणाचं सत्य- दाखला असू शकतो.
 • अस्वस्थता दूर करण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवं की, चौथ्या आर्य सत्याचा- अचूक आकलनासाठी मनाचा खरा मार्ग- दाखला म्हणून ती व्यक्ती खरोखरच त्रस्त करणारी व्यक्ती म्हणून अस्तित्वात असेल, तर जन्मल्यापासून तिचा प्रत्येकालाचा त्रास होईल. पण हे अशक्य आहे.
 • त्यामुळे मग ती व्यक्ती खरोखरच त्रास देणारी आहे, ही आपल्या मनातली प्रतिमा आपण दूर सारतो
 • मग आपण त्या व्यक्तीकडे त्रस्ततेशिवाय बघतो. ती व्यक्ती आपल्याला त्रस्त करणारी वाटते, पण तो केवळ भ्रम असतो.
 • मग आपण त्या व्यक्तीविषयी काळजी करणारी मनोवृत्ती विकसित करतो- ती व्यक्तीही माणूस आहे आणि तिला स्वतः प्रिय व्हावं, सुखी व्हावं असं वाटतं, आपण कोणाचे नावडते व्हावंसं तिला वाटत नाही. मी डासासारखी त्रास देणारी व्यक्ती आहे असं तिला माझ्याबद्दल वाटू नये, असं मला वाटत असतं. त्याचा माझ्या भावनांवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे तिलाही असं आवडणार नाही आणि त्याचा तिच्या भावनांवर परिणाम होईल.
 • त्या व्यक्तीकडे काळजीवाहू मनोवृत्तीने पाहा.

सारांश

अवघड लोकांना सामोरं जाताना पहिल्यांदा आपण त्यांना भेटल्यावर शांतचित्त होणं आवश्यक आहे किंवा संधी असेल तर त्यांना भेटण्यापूर्वी शांतचित्त व्हावं. त्यानंतर त्या लोकांसोबत असताना आपण त्यांना आपल्यासारख्याच भावना असलेली माणसं म्हणून वागवावं आणि त्यांच्याबद्दल काळजीची मनोवृत्ती विकसित करावी. अशी मनोवृत्ती विकसित करण्यामधील एक अडथळा म्हणजे त्या व्यक्तीकडे तिच्या जीवनवास्तवाच्या व्यापक संदर्भात पाहता न येणं. आपण स्वतःच्या मनातील खोट्या प्रतिमा पुसल्या आणि त्या लोकांकडे अधिक वास्तववादी पद्धतीने पाहिलं, खुल्या व काळजीवाहू मनोवृत्तीने पाहिलं, तर आपल्याला त्या लोकांशी असलेले नातेसंबंध यशस्वीरित्या हाताळता येतील.

Top