कर्म संकल्पनेचा संबंध ज्या स्थितीच्या प्रभावाखाली आपण वागतो, बोलतो आणि विचार करतो, त्या आपल्या पूर्व स्वभावाच्या नमुन्यांवर आधारलेल्या मानसिक आवेगाशी आहे. आपल्या सवयी आपल्या मेंदुत नवे तांत्रिक मार्ग निर्माण करतात, ज्यामुळे आवश्यक परिस्थिती निर्माण झाल्यास आपण मूळ स्वभावानुसार वर्तन करतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपल्याला एखादी विशिष्ट कृती करायची इच्छा होते, आणि आपण ती अनिवार्यपणे करतोही.
कर्माला नेहमी गफलतीने नशीब किंवा दैववादाशी जोडले जाते. जेव्हा एखाद्याला दुखापत होते किंवा कुणी खूप पैसा गमावून बसते, तेव्हा लोक म्हणू शकतात की, ‘अरेरे..खूप वाईट नशीब आहे, ही त्याच्या कर्माचीच फळे आहेत.’ ही तर देवेच्छेसारखी कल्पना झाली- जे आपल्या समजण्यापलिकडचे आहे किंवा ज्याच्यावर आपले नियंत्रण नाही. बौद्ध धर्मातील कर्माची संकल्पना बिलकूल अशी नाही. त्याचा संबंध अशा मानसिक आवेगांशी आहे, जो आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीवर चिडण्याची प्रेरणा देतो किंवा ती समस्या हाताळण्याजोगी परिस्थिती निर्माण होईपर्यंत चित्त स्थिर ठेवण्याची प्रेरणा देतो. कर्माचा संबंध अशा आवेगांशीही आहे, ज्यात आपल्या स्वभावानुसार आपण जीना उतरताना पाय मुरगाळेल किंवा स्वाभाविकतः आपण काळजीपूर्वक जीना उतरू.
धूम्रपान कर्माचं चांगलं उदाहरण आहे. कारण जेव्हा आपण एक सिगारेट ओढतो, तेव्हाच दुसरी सिगारेट ओढली जाण्याची शक्यता निर्माण होते. आपण जसजसे अधिक सिगारेट ओढू लागतो, तसतशी धूम्रपानाची सवय बळावत जाते. त्यामुळे कर्म सिगारेट ओढण्याची प्रेरणा कोठून येते हे स्पष्ट करते- अर्थात आपल्या पूर्व सवयीतून. धूम्रपानामुळे आपल्यात सिगारेट ओढण्याची अनिवार्य सवय निर्माण होतेच, पण ते शारीर स्थितीवरही प्रभाव टाकते, जसे सिगारेट ओढण्याने होणारे कर्करोगासारखे आजार. इथे सिगारेट ओढण्याची प्रेरणा आणि कर्करोग होण्याची शक्यता दोन्ही आपल्या पूर्व सवयींच्या परिणामस्वरूप निर्माण होतात, त्यालाच ‘कर्माची फळे’ संबोधले जाते.
आपल्या सवयी बदलणे
कर्माच्या संकल्पनेत तथ्य आहे कारण ते आपल्या भावना आणि मानसिक आवेगांबाबत, जसे आपण कधी कधी आनंदी असतो तर कधी कधी दुःखी, अशा अवस्थेबाबत स्पष्टीकरण देते. हे सर्व आपल्या स्वभावाच्या नमुन्यातून उत्पन्न होते. त्यामुळे आपण जसे वागतो किंवा आपल्याबाबतीत जे काही घडते ते पूर्वसंचित नसते. नशीब आणि प्रारब्ध असे काही नसतेच.
‘कर्म’ ही अशी सक्रिय शक्ती आहे, जी भविष्यातील घटना नियंत्रित करणे तुमच्याच हाती असल्याचे सूचित करते- चौदावे दलाई लामा
अनेकदा आपण अनुभवतो की आपण आपल्या सवयींचे गुलाम आहोत- अर्थात आपल्या स्वाभाविक सवयी प्रस्थापित तांत्रिक मार्गावर अवलंबून असतात- बौद्ध धर्म सांगतो की त्यातून मुक्ती मिळवणे शक्य आहे. पूर्ण आयुष्यभर आपल्यात बदल घडवण्याची आणि नवे तांत्रिक मार्ग निर्माण करण्याची आपल्यात क्षमता आहे.
जेव्हा एखादी विशिष्ट कृती करण्याचे आपल्या मनात येते, तेव्हा कर्माच्या आवेगाने आपल्याला कृती करण्याची प्रेरणा होण्यापूर्वी आपल्याला एक अवकाश उपलब्ध असतो. भावना उत्पन्न झाली म्हणून आपण तात्काळ कृती करत नाही- आपण अगदी शौचालय प्रशिक्षणही घेतलेले असते. त्याच पद्धतीने एखादी नुकसानदायक कृती करण्याची भावना उत्पन्न होते, तेव्हा आपण निवड करू शकतो की, ‘मी हे करावे की नाही?’ कदाचित एखाद्यावर रागावून आपल्याला क्षणिक विसावा मिळू शकतो, पण दुसऱ्यांवर रागावण्याची सवय ही असमाधानकारक मनःस्थितीचे लक्षण आहे. आपल्या सर्वांनाच जाणीव आहे की संवादाच्या माध्यमातून तंटे सोडवणे अधिक आनंददायी आणि शांततादायी आहे. ही विघातक आणि विधायक गोष्टींमध्ये फरक समजण्याची क्षमताच माणसाला प्राण्यांहून वेगळे ठरवते. आपल्या माणूस असण्यातली ती सर्वात लाभदायक गोष्ट आहे.
तरीही स्वतःला विघातक काम करण्यापासून परावृत्त करणे सोपे नसते. हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांप्रति सचेतन राहण्याच्या शक्यता उपलब्ध असतात, तेव्हा परिस्थिती तुलनेने सोपी असते. त्यामुळेच बौद्ध शिकवणीत सचेतनता विकसित करण्यावर भर दिला गेला आहे [पाहाः ध्यानधारणा म्हणजे काय?]. जसजसे आपण शांत होत जातो, तसतसे आपण काय विचार करत आहोत, काय बोलणार आहोत किंवा कसे वागणार आहोत, याबाबत अधिक सजग होत जातो. आपण निरीक्षण करू लागतो, “मला असे काही तरी बोलावे वाटते आहे की त्यामुळे एखाद्याला त्रास होऊ शकतो. मी जर ते बोललो, तर त्यातून समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे मी न बोलणेच उचित आहे.” अशा प्रकारे आपण निवड करू शकतो. पण आपण सचेतन नसू, तर आपल्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो, ज्यातून आपण अनिवार्यपणे कृती करतो. ज्यामुळे आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आपल्या भविष्याचा अंदाज घ्या
आपल्या वर्तमानातील आणि भूतकाळातील कर्मकृतींमुळे आपल्याला भविष्यात काय अनुभवावे लागू शकते, याचा आपण अंदाज बांधू शकतो. दीर्घकालीन टप्प्यात विधायक कृती समाधान घेऊन येतात, तर विघातक कृती नकोशी परिस्थिती निर्माण करतात.
कर्माची फळे कशी मिळतील हे अनेक घटकांवर आणि परिस्थितींवर अवलंबून आहे. आपण हवेत झेंडू भिरकावला की अंदाज बांधू शकतो की तो जमिनीवरच पडणार आहे. पण जर तो चेंडू आपण झेलला, तर तो जमिनीवर पडणार नाही. तसेच आपण पूर्वकृतींनुसार भविष्यातील परिणामांचा अंदाज बांधू शकतो. ते काही अपरिवर्तनशील, विधिलिखित किंवा दगडावर कोरलेले नसते. इतर प्रवृत्ती, कृत्ये आणि घटना कर्माच्या फळावर प्रभाव पाडतात. जर आपण लठ्ठपणाचे शिकार असू आणि तरी आरोग्याला हानिकारक पदार्थ खात असू तर आपण भविष्यात मधुमेहाचे शिकार होण्याच्या शक्यतेचा अंदाज बांधू शकतो, पण तेच जर आपण संतुलित आहार घेऊन वजन नियंत्रणात आणले, तर कदाचित आपण आजारी पडणार नाही.
आपण पाय आपटतो, तेव्हा होणाऱ्या वेदनांसाठी कर्माच्या कारणांचा विचार करण्याची गरज नसते- त्या वेदना स्वाभाविक असतात. पण आपण आपल्या सवयी बदलल्या आणि उपकारक सवयी स्वीकारल्या, तर आपल्या श्रद्धा काही असल्या तरी परिणाम स्वरूप आपल्याला सकारात्मक अनुभवच मिळतील.