सुख ही स्वतःच्या आयुष्याचे हित, मनःशांती आणि समाधानाची दीर्घकालीन अनुभूती आहे- आपण सर्वच जण सदासर्वकाळ याचीच मनोकामना करत असतो. याची अगदी लहानशी अनुभूती घेतली की आपल्याला ते कायमस्वरूपी हवे असते.
लोक याची नेहमी क्षणिक आनंदाशी गल्लत करतात. आपण साधारणतः विचार करतो की आपण चांगले अन्न सेवन केले, महागडे कपडे घातले आणि कायम मजेत राहिलो तर आपण सुखी होऊ. पण तसे घडत नाही. आपण अशाही पद्धतीने विचार करत असतो की आपण आपल्या सर्व गरजा आणि मागण्या पूर्ण केल्या तर आपण सुखी होऊ. पण वास्तवात फक्त स्वहिताचा विचार आपल्याला एकटेपणा आणि तणावाच्या स्थितीकडे घेऊन जातो.
कधीकधी आपण आपल्याच विचारात आणि भावनात गुरफटलेले असणे त्रासदायक ठरू शकते, म्हणून आपण संगीत, संगणकीय खेळ, भोजन, लैंगिक संबंध आणि करियर यासारख्या गोष्टींकडे आपले मन वळवू शकतो. पण तेही आपल्याला इतरांशी जोडत नाही, किंवा सुखाची जाणीवही देत नाही.
सुखी होण्याच्या आणि इतरांशी जोडले जाण्याच्या अपेक्षेने आपण कायम सोशल मीडियाकडे वळतो. आपल्या सेल्फीला मिळणारे लाइक्स आणि मित्रांच्या मेसेजमुळे आपल्याला क्षणिक आनंद मिळू शकतो, पण त्यातून आपल्यात अधिक आनंदाची हाव निर्माण होते. आपण आपल्या पुढील नशेसाठी चिंतातुरपणे वारंवार आपले फोन तपासू लागतो, पण कितीही लाइक मिळोत किंवा मेसेज येवोत, आपल्याला इतरांशी जोडले गेल्याची पुरेशी अनुभूती मिळत नाहीच.
बुद्धाने सांगितले आहे की इतरांना आपल्या हृदयात स्थान देणे, हा खऱ्या आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहेः आपण इतरांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी आपले हृदय खुले करतो तेव्हा आपण ऊबदारपण अनुभवतो, इतरांशी जोडले गेल्याची भावना अनुभवतो आणि त्यातूनच आपण स्वतःच्याच कल्याणाच्या भावनेचा अनुभवही घेतो. अगदी शारीर पातळीवरही आपल्याला चांगले वाटू लागते. इतरांच्या सुखाचा विचार करताना आपण त्यांना शक्य तेवढी मदत करण्यावर भर देतो आणि ते दुखावले जातील, अशी कृती करण्यापासून स्वतःला रोखतो. त्यातून जीवन अर्थपूर्ण करणारे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होतात. कुटुंबीय आणि मित्रांच्या भावनिक आधारामुळे संकटकाळी आपल्याला धैर्य मिळते.
आपण इतरांच्या सुखाची काळजी करण्यासाठी पात्र होण्यापूर्वी आपण स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे. आपण जर स्वतःसाठी सुखाची कामना करू शकलो नाही, तर दुसऱ्यांच्या सुखाची इच्छा कशी व्यक्त करू शकू? बौद्ध धर्मातील सुखाची इच्छा सर्वव्यापी आहे.
सुख आंतरिक शांतीवर अवलंबून असते, तर आंतरिक शांती स्नेहशील मनावर अवंलबून असते.- चौदावे दलाई लामा
आजच्या जगावर कोणताही प्रभाव पाडण्यासाठी आपण असमर्थ आहोत, असे वाटणे स्वाभाविक आहे, त्यामुळे आपण “काही असो. आपला काय संबंध?” अशा प्रकारचा विचार करण्याची शक्यता असते. पण वास्तव हे आहे की आपण इतरांच्या भल्याचा विचार करत असू आणि इतरांना मदत करण्यास प्रयत्नशील असू तर आपण अगदी अनोळखी माणसावरही प्रभाव पाडू शकतो. अगदी एखाद्याकडे पाहून स्मितहास्य केल्याने किंवा वर्दळीच्या किंवा वाहतूक जाम झालेल्या ठिकाणी एखाद्याला आपल्या पुढे जाऊन दिल्यासही आपल्याला आपण सकारात्मक बदल घडवू शकतो, याची जाणीव होते. यातून आपल्याला आत्मगौरवाची भावना जाणवते- आपल्याकडे काहीतरी देण्यायोग्य आहे, या जाणिवेतून आपल्याला छान वाटते. आपल्याला स्वतःबद्दल आणि आपल्या जीवनाबद्दल छान वाटू लागते.
इतरांच्या आनंदाचा विचार करणे आणि त्यांना आपण कशी मदत करू शकतो, अशा पद्धतीचा विचारच आपल्याला इतरांशी जोडतो. उलट इतरांकडे पाहून आपल्याला आपले मूल्य आणि आपल्या जीवनातील आनंद गवसू शकतो. शेवटी आपण आत्ममग्नता विरुद्ध इतरांच्या भल्याचा विचार या मुद्द्यापाशीच पोहोचतो.
आपण माणसे सामाजिक प्राणी आहोतः इतरांशी जोडले जाण्यातूनच आपला उत्कर्ष शक्य आहे. त्यामुळेच आपले जीवन सुखी करण्यासाठी इतरांप्रति दया, काळजी आणि करुणेच्या भावनांची मशागत आवश्यक आहे.