ज्ञानप्राप्ती म्हणजे काय?

What is enligtment abhijeet gourav

ज्ञानप्राप्ती म्हणजे बुद्धं होणे – मानवी विकास आणि क्षमतेची परिसीमा – आणि हे बौद्ध धर्मातील अंतिम उद्दिष्ट आहे. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवमात्रात हे साध्य करण्याची क्षमता आहे.

या घडीला आपण बुद्ध नाही – उलट, आपण असंख्य तणाव आणि चढउतारांनी भरलेले आयुष्य अनुभवतो. आपण तिथेच अडकून पडलो असण्याचे कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीसंदर्भात कपोलकल्पना रचत तेच वास्तव असल्याचे समजण्याची आपली मनोवृत्ती होय. आपल्याला ज्यातून आनंद मिळेल असे वाटते, तशी कृती आपण करतो, पण अंततः परिस्थिती आणखी बिकट होते.

सामान्यतः आपण इतरांवर काय परिणाम होईल, याचा विचार न करता आपल्याला जे हवे आहे, तेच करतो, त्यामागे आपण विश्वाच्या केंद्रस्थानी असल्याची आपली भावना असते. आणि केवळ तेच महत्त्वाचे असल्याचे आपण मानतो. अशी विचारधारा वास्तवाशी सयुक्तिक नसतेः ती स्वार्थी असते आणि आपल्यासोबत इतरांसाठीही केवळ दुःख घेऊन येते. ज्ञानप्राप्तीसाठी आपण खालील गोष्टी अंगीकारायला हव्या.

  • आपल्या कृतीचा आपल्यावर आणि इतरांवर होणाऱ्या परिणामाचा विचार करावा, आणि विघातक कृती करण्यापासून स्वतःला रोखायला हवे.
  •  प्रत्येकाच्या अस्तित्वाबद्दलची जाणीव जागृत करायला हवी, आणि आपल्या कपोलकल्पना आपल्याला मूर्ख बनवणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.

जेव्हा आपण आपल्या कपोलकल्पनांवर विश्वास ठेवणे थांबवू, आपण गोंधळलेल्या अवस्थेतून निर्माण होणाऱ्या आणि तणावाचे कारण असलेल्या क्रोध, तिरस्कार, लोभ आणि असुयेसारख्या भावनांवरही नियंत्रण मिळवू. आपण आपल्या नकारात्मक भावनांना वश असल्यासारखा बंधनकारक व्यवहार करणार नाही. यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहेः

  • नैतिक आत्मसंतुलन, ज्यातून गैरवर्तणुकीपासून दूर राहता येईल.
  •  ध्यान केंद्रीकरण, ज्यामुळे चित्त विचलित होणार नाही आणि नीरसता जाणवणार नाही.
  • शहाणीव, ज्यातून विधायक आणि विघातक गोष्टींमधील व खऱ्याखोट्यातील फरक समजेल.
  •  मानसिक संतुलन, जे करुणा आणि प्रेमासारख्या सकारात्मक भावनांच्या मशागतीतून निर्माण झालेले असेल.

या गोष्टींमधून आपल्याला मनःशांती लाभली तरी ते पुरेसे नाहीः तरीही आपण प्रत्येक गोष्टीमधील परस्परसंबंध आणि परस्परावलंबन पाहू शकणार नाही. त्यामुळे इतरांना मदत करण्याच्या सर्वोत्तम मार्गांबाबत आपल्याला खात्रीशीर माहिती असणार नाही.

 हे साध्य करण्यासाठी आपण पूर्ण ज्ञानप्राप्ती झालेला बुद्ध होणे आवश्यक आहे, जिथे आपले मन कसल्याही कपोलकल्पना करणार नाही. प्रत्येक जीवमात्रामधील परस्परावलंबन आपण पाहू शकू आणि इतरांना मदत करण्याचे नेमके मार्ग शोधू शकू. आपल्या शरीरात अमर्याद ऊर्जा असेल, आपण प्रत्येकाशी नेमका संवाद साधू आणि आपल्या मनाला सर्वाची सर्वोत्तम जाणही असेल. आपले इतरांप्रति प्रेम आणि करुणा इतकी प्रभावी असेल की आपण प्रत्येकाला आपले एकमात्र अपत्य असल्यासारखे प्रेम करू. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता आपण इतरांच्या भल्यासाठी कार्य करू. जेव्हा आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, तेव्हा स्वतःवरील नियंत्रण हरवणे वा क्रोधीत होणे, इतरांशी अती लगट करत राहणे किंवा थकल्याची किंवा व्यग्र असल्याची कारणे देत इतरांना टाळणे अशा गोष्टी होणे शक्यच नसते.

बुद्धाच्या रूपात आपण सर्वज्ञ असतो, पण सर्वशक्तिमान नसतो. आपण इतरांच्या दुःखाचा नाश करू शकत नाही, पण आपण त्यांना शिकवण देऊन किंवा स्वतःच्या उदाहरणातून दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवू शकतो. ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर प्रवास करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टींची गरज आहेः

  •  सकारात्मक उर्जेचे अद्भूत भांडार निर्माण करायला हवेः निस्वार्थीपणे इतरांच्या भल्यासाठी कार्यरत असायला हवे.
  •  वास्तव समजून घेण्यासाठी प्रयत्नशील असायला हवेः जगाबद्दलच्या कपोलकल्पना बंद करणे.

आपल्या सर्वांजवळ कार्य संचालन सामुग्री आहे- आपले शरीर आणि मूलभूत मानवी बुद्धी – ज्यातून ज्ञानप्राप्तीची कारणे तयार होऊ शकतात. आकाशाप्रमाणे आपले मन भावनिक वादळांनी आणि तणावदायी विचारांनी प्रदूषित झालेले नाही. फक्त आपल्याला विकसित करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्यातील पूर्ण क्षमतांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.  

ज्ञानप्राप्ती अगदी असाध्य उद्दिष्ट वाटू शकते. आणि ते साध्य करायला फार अवघडही आहे – आत्तापर्यंत कोणीच ते सहजसाध्य असल्याचा दावा केलेला नाही. पण त्या दिशेने जाण्याचे उद्दिष्ट ठेवणेही आयुष्याला अनोखा अर्थ प्राप्त करून देते. प्रत्येकासोबतचा परस्परसंबंध समजून घेतल्याने स्वतःला तणाव आणि चिंतेपासून दूर ठेवणे शक्य होते. या सर्वोच्च अनुभवाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने आपले जीवन परिपूर्ण होतेः अर्थात इतरांच्या भल्यासाठी ज्ञानप्राप्ती.

Top