सुमेरियन मंदिरातील स्त्रोतांपासून ते प्राचीन इजिप्तमध्ये ईश्वराला उद्देशून केल्या जाणाऱ्या मंत्रपठणांपर्यंत मानवी सभ्यतेतील सर्वांत जुनं व अजून टिकून असलेलं काही वाङ्मय प्रार्थनेशी संबंधित आहे. आज जगातील सर्व प्रमुख धर्मांमध्ये प्रार्थनेचा काहीएक भाग असतो. ख्रिस्ती, मुस्लीम व ज्यू ईश्वराची प्रार्थना करतात, तर हिंदूंमध्ये विविध देवदेवतांमधून निवड करून प्रार्थना करता येते. बाहेरच्या पातळीवर बौद्ध धर्म याहून वेगळा वाटत नाही. कोणत्याही बौद्ध देशातील मंदिराला किंवा मठाला भेट द्या, आणि तिथे तुम्हाला अनेक लोक भेट द्यायला आलेले दिसतील, ते बुद्धमूर्तीसमोर हात जोडून काही शब्दोच्चार करत असतात. तिबेटी बौद्ध धर्माशी परिचित असलेले लोक प्रार्थनेचे मणी, प्रार्थनाचक्र व प्रार्थनेचे ध्वज वापरतात.
प्रार्थनेच्या कृतीमध्ये तीन घटक असतात: प्रार्थना करणारी व्यक्ती, प्रार्थना ज्या समोर केली जाते ती वस्तू आणि ज्यासाठी प्रार्थना केली जाते ती वस्तू. तर, बौद्ध धर्मातील प्रार्थनेचा प्रश्न काहीसा व्यामिश्र आहे. शेवटी, अशा निरीश्वरवादी धर्मामध्ये बौद्धांना प्रार्थना करण्यासाठी समोर कोणी निर्मिक नसतो. मग आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी कोणी नसेल, तर प्रार्थना करायची कशाला? बौद्धांसाठीचा आवश्यक प्रश्न असा: “आपलं दुःख व समस्या दूर करणं दुसऱ्या कोणाला शक्य आहे क?”
केवळ बदलासाठी प्रार्थना करणं पुरेसं नाही. काहीएक कृती असायला हवी- परम पूजनीय चौथे दलाई लामा
कोणीही, अगदी स्वतः बुद्धदेखील त्याच्या प्रज्ञानाने व क्षमतेने आपल्या सर्व समस्या नष्ट करू शकत नाही, असं बुद्धानेच म्हटलं आहे. आपल्याला स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागले. आपल्याला समस्या व दुःख नको असतील, तर आपण त्यांची कारणं टाळणं गरजेचं आहे. आपल्याला सुख अनुभवायचं असेल, तर आपल्यालाच सुखाची कारणं निर्माण करावी लागतात. बौद्ध दृष्टिकोनातून आपल्याला निखळ सदाचार व नीतिमत्ता यांना अनुसरून हे साध्य करता येतं. स्वतःचं वर्तन व मनोवृत्ती बदलणं आपल्याला हवं त्या प्रकारचं जीवन निर्माण करणं पूर्णतः आपल्या हातात असतं.
बौद्ध कोणाची प्रार्थना करतात?
लोक मूर्तींसमोर साष्टांग नमस्कार करतात, मंदिरांमध्ये उदबत्त्या लावतात आणि सभागृहांमध्ये श्लोक म्हणतात, तेव्हा ते काय मागत असतात आणि कोणाची प्रार्थना करत असतात? “शाक्यमुनी बुद्ध, मला मर्सिडिझ मिळू दे प्लीज!” किंवा “औषधरूपी बुद्ध, प्लीज माझा आजार बरा करा” असा विचार करणारेही लोक असणं शक्य आहे, पण अशा प्रकारच्या प्रार्थनांचा फारसा लाभ होत नाही, असं बहुतांश बौद्ध गुरू म्हणतील.
बौद्ध धर्मात आपण बुद्धाची व बोधिसत्वांची प्रार्थना करतो तेव्हा इतरांसाठी शक्य तितकी सुखाची कारणं निर्माण करण्यासाठी व त्यांना उपकारक ठरण्यासाठी स्वतःवर काम करण्याची प्रेरणा व सामर्थ्य लाभावं हा त्यामागचा हेतू असतो. ते जादूची छडी फिरवतात आणि क्षणार्थात आपल्यामध्ये काही विशेष ताकद येते असं नाही, पण त्यांच्या दाखल्याचा विचार करून- ते आपले आदर्श म्हणून अस्तित्वात राहतात- आपल्याला आत्मविश्वास येतो- “मी हे करू शकतो!”
सूत्रपठण, मंत्रपठण, त्याचप्रमाणे देवतांचं चित्र डोळ्यांसमोर आणणं, यांसारख्या प्रार्थनेच्या कृती आपल्याला स्वतःच्या आंतरिक क्षमतेशी जोडून घ्यायला मदत करतात आणि करुणा, उत्साह, इत्यादींसारख्या रचनात्मक भावना विकसित करायला व इतरांना मदत करण्याकरिता रचनात्मक की करण्यासाठी याचा उपयोग होतो.
सप्तांग प्रार्थना
सप्तांग प्रार्थना ही विख्यात उपासनापद्धती आहे. यात संपूर्ण बौद्ध मार्गाचं सार सामावलेलं आहे. एकंदरित सात भाग आहेत, त्यातील प्रत्येकाचा विशिष्ट परिणाम होतो:
- तीन वेळा कृपा केलेल्या बुद्धांना, धर्माना व सर्वोच्च सभेला मी साष्टांग वंदन करतो, जगातील सर्व अणूंइतक्या शरीरांसह लीन होतो.
- हे विजेत्या, मंजुश्री व इतरांनी तुमच्या समोर दान दिलं, त्याचप्रमाणे मीही तुमच्यासमोर, गतपालकांसमोर, व तुमच्या आध्यात्मिक वंशजांसमोर दान देतो आहे.
- माझ्या आरंभहीन सांसारिक अस्तित्वामध्ये, या व इतर जीवनांमध्ये, मी अजाणतेपणी नकारात्मक कृती केल्या आहेत, किंवा इतरांना करायला लावल्या आहेत, आणि भाबडेपणाच्या गोंधळलेपणामुळे या कृतींमधून आनंदही घेतला आहे- मी काहीही केलं असेल, तरी त्याकडे आता मी चुका म्हणून पाहतो आणि तुमच्यासमोर, माझ्या पालकांसमोर ते खुलेपणाने, अंतःकरणपूर्वक जाहीर करतो.
- प्रत्येक मर्यादित जीवाला आनंद मिळावा या हेतूने तुम्ही बोधिचित्त विकसित केलंत आणि तुमच्या कृतींमुळे मर्यादित जीवांना सहकार्य झालं आहे, त्यामुळे मी सकारात्मक शक्तीच्या महासागरात आनंदाने डुंबतो.
- हे सर्व दिशांच्या बुद्धा, मी हात जोडून तुम्हाला विनवणी करतो: दुःखी असलेल्या व अंधारात चाचपडणाऱ्या मर्यादित जीवांसाठी कृपया धर्माचा दिवा उजळू द्या.
- हे दुःखापलीकडे जाणाऱ्या विजेत्या, मी हात जोडून तुम्हाला विनवणी करतो: अगणित युगं तुम्ही टिकून राहा, जेणेकरून हे भटकते जीव दृष्टिहीन राहणार नाहीत.
- या सर्वांतून मी जी काही सकारात्मक शक्ती विकसित केली आहे, ती अशा रितीने आहे, सर्व मर्यादित जीवांचं प्रत्येक दुःख मी दूर करू शकतो का.
- प्रार्थनेचा पहिला भाग साष्टांग वंदन करणं हा आहे. करुणा, प्रेम, व प्रज्ञान यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बुद्धांप्रति आदराची खूण म्हणून आम्ही त्यांना साष्टांग वंदन करतो. साष्टांग वंदनामध्ये आपण आपल्या शरीराचा सर्वोच्च भाग- म्हणजे मस्तक- जमिनीला लावतो, त्यातून आपल्याला अभिमानावर मात करायला व नम्रता विकसित करायलाही मदत होते.
- त्यानंतर आपण दान देतो. अनेक बौद्ध लोक पाण्याचे वाडगे अर्पण करतात, पण ती वस्तू फारशी महत्त्वाची नसते. देण्याची प्रेरणा- आपला वेळ, प्रयत्न, ऊर्जा व मालमत्ता- महत्त्वाची असते, त्यातून आपल्याला ओढीवर मात करायला मदत होते.
- तीन, आपण स्वतःच्या उणिवा व चुका मान्य करतो. काही वेळा आपण आळशी किंवा स्वार्थी असतो, आणि काही वेळा आपण अतिशय विध्वंसक रितीने कृती करतो. हे आपण मान्य करतो, त्याबद्दल पश्चात्ताप करतो, आणि त्याच चुका पुन्हा करायच्या नाहीत या तीव्र निर्धारासह पुढे जातो. नकारात्मक कर्मजन्य प्रेरणांच्या प्रभावाखालील जीवावर मात करण्याचा हा प्रकार असतो.
- मग आपल्याला आनंद होतो. आपण साध्य केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल व इतरांनी केलेल्या सर्व अविश्वसनीय रचनात्मक कामांबद्दल आपण विचार करतो. बुद्धांनी केलेल्या सर्व महान गोष्टींचाही आपण विचार करतो. यामुळे ईर्षा बदलण्यासाठी मदत होते.
- त्यानंतर आपण शिकवणुकीसाठी विनंती करतो. त्यातून आपली ग्रहणशील मनोवस्था निर्माण होते. आपण म्हणतो, “आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला स्वतःसाठी व इतरांसाठी सुख निर्माण करायचं आहे!”
- गुरूंनी दूर जाऊ नये यासाठी आपण विनवणी करतो. या आधीच्या भागात आपण शिकवणुकीसाठी खुले असतो आणि गुरूंनी दूर जाऊ नये, तर आपल्याला पूर्ण साक्षात्कार होईपर्यंत त्यांनी आपल्याला शिकवावं, असं आपल्याला वाटतं.
- अखेरीस, सर्वांत महतत्वाची पायरी म्हणजे समर्पण. आपण स्वतःला सकारात्मक शक्तीपाशी समर्पित करतो, जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला व इतर सर्व जीवांना होईल.
या प्रार्थनेवरून आपल्या लक्षात येईल की, कोणा बाहेरच्या जीवाने खाली येऊन आपला सर्व संकटांपासून बचाव करावा, असं बौद्ध धर्माचं उद्दिष्ट नाही. “घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी प्यायला लावता येत नाही,” अशी एक म्हण आहे. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, बुद्ध आपल्याला मार्ग दाखवू शकतो, पण ओढ व अजाणपणा यावर मात करण्यासाठी आणि आपल्या सर्वांमध्ये असलेलं अमर्याद रचनात्मक सामर्थ्य विकसित करण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न करणं गरजेचं असतं.
सारांश
बाह्य बाजूने बौद्ध धर्मात प्रार्थनेचे पोशाख व विधी असले, तरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बाह्य जीवाला सहकार्यासाठी विनवणी करणं ही त्यामागची संकल्पना नाही. बुद्ध व बोधिसत्व हे परिपूर्ण आदर्श आहेत आणि आत्ता आपण आहोत तिथून ते आपल्याला साक्षात्कारापर्यंत जाण्याची वाट दाखवतात. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो आणि आपल्या स्वतःच्या आंतरिक क्षमता जागृत करतो: अमर्याद करुणा, प्रेम व प्रज्ञा यांसाठीचं सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये असतं.