डार्विनचा सिद्धांत नैसर्गिक निवडीची प्रक्रिया आणि प्रजातींच्या जैविक शरीरांमधील कालसापेक्ष बदल मांडतो. त्याच्या ‘ओरिजिन ऑफ द स्पिसिज’ ग्रंथातील मजकूर तत्कालीन काळात धर्मविरोधी मानला गेला होता कारण त्याचा सिद्धांत, संपूर्ण स्थिर जगाची आणि त्यातील अचल प्राणीमात्रांची निर्मिती ईश्वराने केली असल्याच्या कल्पनेच्या विरोधात होता. अगदी आजही उत्क्रांतीचा सिद्धांत काही धर्मांना सुसंगत वाटत नाही, पण बौद्ध शिकवणींमध्ये या सिद्धांताला विरोधाभासी ठरेल, असे काहीच नाही. उलट, हा सिद्धांत बुद्धांच्या शिकवणीतील परस्परावलंबनाचे तत्त्व, निर्मिती विरोध आणि धम्माच्या चार वैशिष्ट्यांपैकी पहिले वैशिष्ट्य असलेल्या नश्वरतेशी सुसंगत आहे. असंख्य कारणं आणि परिस्थितींमुळे सातत्यानं उद्भवणाऱ्या आणि उत्क्रांत होत असलेल्या घटनाक्रमाचा आणि अस्थैर्याच्या या भव्य प्रवाहाचा माणूस आणि प्राणी घटक नसतील, तर ते आश्चर्यकारक ठरेल.
इथे असं म्हणायचं नाहीये की काळ आणि उत्क्रांतीबाबतची बौद्ध कल्पना अगदी डार्विनसारखी आहे. डार्विनचा सिद्धांत जैविक आणि शारीरिक आधारांवर बेतलेला आहे, ज्या अनुषंगाने सचेतनता जागृत होते. यात जरी जिवांच्या व्यामिश्र उत्क्रांतीतून वृद्धिंगत होत जाणाऱ्या शहाणीवेची कल्पना मांडलेली असली, तरी ती बुद्धाने मांडलेल्या शुद्र जीव ते मुक्तीप्राप्त बुद्धत्वाच्या जागरूकतेच्या उत्क्रांतीपर्यंतच्या शिकवणीइतकी सखोल नाही. शिवाय डार्विनचा उत्क्रांतीचा विचार हा एखाद्या संपूर्ण प्रजातीविषयीचा आहे, तर बौद्ध धर्म व्यक्तिगत जिवांच्या शहाणीवेच्या उत्क्रांतीविषयीही बोलतो.
याउपर, डार्विनची उत्क्रांती संयत आणि सततच्या सुधारणेशी जोडलेली आहे – अर्थात जिवमात्र त्यांच्या अस्तित्वासाठी आणि पुनर्निमितीच्या क्षमतेसाठी अधिक उत्क्रांत जिवांमध्ये प्रागतिक आणि सकारात्मकरीत्या विकसित होत असतात. तर बौद्ध शिकवण सांगते की कोणताही संवेदनक्षम जीव विविध व्यापक जैव घटकांमध्ये पुनर्जन्म घेऊ शकतो आणि ही एकरेषीय प्रगतीची प्रक्रिया नसते. व्यक्तिगत जीव किंवा संपूर्ण प्रजातीची कर्मं, कारणं आणि परिस्थितीनुसार अधोगतीही होऊ शकते. अशा प्रकारे, तपशील भिन्न असले तरी दोन्ही व्यवस्थांमध्ये उत्क्रांतीचं तत्त्व आढळतं.
विश्वाची उत्क्रांती आणि विघटन
शास्त्रज्ञांच्या मतानुसार, १४ अब्ज वर्षांपूर्वी झालेली जगाच्या वेगवान विस्ताराची प्रक्रिया अर्थात बिन बॅंग ही काळाची सुरुवात होती आणि ४ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या आपल्या ग्रहाच्या निर्मितीचा आधारही होती. कालओघात अनेक तारे आणि ग्रहांवर हायड्रोजन गॅस विकसित झाला, आणि आज ज्याला आपण पृथ्वी म्हणतो त्या विशिष्ट ग्रहावर पहिला स्वतंत्र जीव निर्माण झाला. जे आज आपण आपल्या भोवताली विभिन्न व्यामिश्र प्रगत जिवांमध्ये विकसित झालेले पाहतो. शास्त्रज्ञ असंही म्हणतात की, काही अब्ज वर्षांनी विश्वाच्या विस्तार आणि उत्क्रांतीत विश्वाचा अंत होईल. आणि हे कशा रीतीनं घडेल, यासाठी विविध गृहितकं मांडण्यात आली आहेत.
बुद्धांनी पालीतील अगाना सुत्तामध्ये विश्वाची उत्क्रांती आणि कालानुरूप विघटनाची चर्चा केली आहे. ज्यात ते आपल्या ग्रहावरील पर्यावरणाची जडणघडण आणि कालानुरूप विघटनाची नोंद करतात, शिवाय विविध प्रकारच्या जिवांची उत्क्रांती व त्यांचा कालानुरूप अंत आणि विविध समाजांचा विकास आणि कालानुरूप अंताचीही ते मांडणी करतात. तरीही आधुनिक शास्त्र आणि बौद्ध धर्मातील एक विशेष फरक म्हणजे, बुद्ध सांगतात की विश्वाची निर्मिती, विकास आणि अंत हा केवळ विविध चक्रांमधील एका चक्राचा भाग आहे आणि काळाला आरंभ आणि अंतही नसून तो अनंत आहे. सूत्र सांगतेः
आज ना उद्या, काळाचा मोठा टप्पा ओलांडल्यानंतर, वशिष्ठा, हे जग संपेल...पण नंतर लगेच किंवा कालांतराने, काळाचा मोठा टप्पा ओलांडल्यानंतर, जग उत्क्रांत होईल...त्या काळी, वशिष्ठा, फक्त थोडा पाणीसाठा असेल, आणि बाकी सर्व अंधार असेल, फक्त अंधार. चंद्र आणि सूर्य काही प्रकट झालेले ग्रह नाहीत, तारे प्रकट झालेले नाहीत, रात्र आणि दिवस प्रकट झालेले नाहीत, महिने आणि पंधरावडे प्रकटलेले नाहीत. ऋतू आणि संवत्सर प्रकटलेले नाहीत, स्त्री आणि पुरुष प्रकटलेले नाहीत. जीव हे फक्त वर्गीकृत जीव आहेत...
इथे आपण पाहू शकतो की, बुदध अगदी स्पष्टपणे जिवमात्रांच्या उल्लेखासह जागतिक व्यवस्थेच्या चक्राविषयी बोलत आहेत. या सूत्रात पुढे लिंग उत्पत्ती, समाज उत्पत्ती आणि समाजातील विविध जातींच्या उत्पत्तीविषयी उल्लेख येतो. त्यानंतर पर्यावरण आणि त्यातील जिवांची अधोगती आणि विनाशाची वर्णने येतात.
या सूत्रानुसार आणि परस्परावलंबी उत्पत्ती व नश्वरतेविषयक बौद्ध तत्त्वानुसार, बिग बॅंग सिद्धांत किंवा विश्वाच्या अंताविषयीच्या इतर अनेक सिद्धांतांच्या स्वीकारामध्ये कोणताही विरोधाभास नसल्याचे आपण पाहू शकतो.
शरीरांची उत्क्रांती
आता जैव शरीरांच्या उत्क्रांतीकडे पाहू. आपण सर्व एका स्वतंत्र जीव पेशीपासून उत्क्रांत झालो असल्याचं उत्क्रांतीचा सिद्धांत स्पष्ट करतो. डार्विनचा सिद्धांत प्रागतिक उत्क्रांती प्रस्तावित करतो, ज्यात जिवांची प्रगत उत्क्रांती होते, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, इथे सुधारित मार्गानं उत्क्रांत होण्याची नैसर्गिक प्रवृत्ती दिसते. इथे आपण फक्त शारीरिक आधारावर चर्चा करत आहोत, कारण बौद्ध धर्म म्हणतो की या ग्रहावरील शारीरिक जीव प्रकार आणि पुनर्जन्म घेणाऱ्या जिवांचं मानसिक सातत्य यात फार मोठी तफावत आहे.
पूर्वी या ग्रहावर डायनासोर फिरत होते, पण ते आता अस्तित्वात नाहीत. आपण डायनासोर म्हणून पुनर्जन्म का घेऊ शकत नाही? शास्त्रीय सिद्धांतानुसार, ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी एका प्रलयंकारी घटनेत डायनासोर नष्ट झाले, पण माणसांसारखे सस्तन प्राणी बचावले, जे नंतर वाढत गेले. डार्विनचा सिद्धांत सांगेल की, सक्षम असणाराच जगेल, या स्पर्धेत डायनासोर जगले नाहीत आणि त्यांचा नाश झाला.
बौद्ध दृष्टिकोनानुसार, कार्मिक ऊर्जा आणि क्षमता फलरूप होण्यासाठी सुयोग्य परिस्थिती असणं आवश्यक असतं. या ग्रहावर या क्षणी डायनासोर म्हणून पुनर्जन्म होण्यासाठीची परिस्थिती अस्तित्वात नाही. उलट पुनर्जन्मासाठी अनेक प्रकारचे इतर शारीरिक आधार उपलब्ध आहेत. ते सुद्धा कालसापेक्ष आहेत. अर्थात, आपल्या विश्वाच्या एखाद्या दुसऱ्या कोपऱ्यात किंवा दुसऱ्या एका ग्रहावर डायनासोर अस्तित्वात असतील, तर आपला डायनासोर रूपात पुनर्जन्म होऊ शकतो, हे बौद्ध धर्मास स्वीकारार्ह असेल.
परमपूज्य दलाई लामांच्या शास्त्रज्ञांसोबतच्या एका चर्चासत्रात, त्यांना विचारण्यात आलं की, संगणक संवेदनक्षम जीव होऊ शकतात काः संगणकांना एक दिवस मन असू शकेल का? त्यांनी फार रंजक पद्धतीने उत्तर दिलं. ते म्हणाले की, जर संगणक किंवा यंत्रमानव एका अशा बिंदूवर पोहचले, जिथे ते मानसिक सातत्याचा आधार होण्याजोगे विद्वान ठरले, तर मानसिक सातत्य त्याच्या जीवनासाठी पूर्णतः अजैविक मशिनला शारीरिक आधार म्हणून जोडले न जाऊ शकण्याचे काही कारणच असणार नाही.
याचा अर्थ संगणकाला मन आहे असा नाही. आपण तांत्रिकरीत्या संगणकाला मन तयार करू शकतो, असाही याचा अर्थ नाही. तर त्याचा अर्थ संगणक जर पुरेसे विद्वान असतील, तर त्यासोबत मानसिक सातत्य जोडले जाऊ शकते आणि त्याचा शारीरिक आधार म्हणून वापर केला जाऊ शकतो. हे डार्विनच्या सिद्धांतापेक्षाही फार पुढचे आहे.
बुद्धांनी उत्क्रांतीविषयी अधिक विस्ताराने का सांगितले नाही?
बौद्ध दृष्टिकोनातून, संपूर्ण ज्ञानप्राप्ती झालेला सर्वज्ञ म्हणून बुद्धांकडे पाहताना आपल्याला कदाचित प्रश्न पडू शकतो की, त्यांनी वैश्विक कार्यकारणभाव आणि जिवांच्या उत्क्रांतीबद्दल अधिक विस्ताराने का सांगितलेले नाही?
सर्वसाधारणपणे, बुद्धांच्या प्रत्येक शिकवणीमागे आपल्याला मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर मार्गस्थ करण्याचा उद्देश आहे. अशा रीतीने, विश्व आणि त्यातील जिवमात्र ज्या चक्रातून जातात, त्यांच्या वर्णनामागे बुद्धांचा उद्देश हा, लोकांना आत्ता उपलब्ध असलेला मनुष्य जन्म किती दुर्मिळ आहे, याची जाणीव करून देण्याचा आहे. दुर्मिळ मनुष्यजन्म आणि तो पुनर्प्राप्त करण्यातील अडथळ्यांची कदर केल्यास, लोकांना आध्यात्मिक उद्दिष्टांवरती काम करण्यासाठी सद्यस्थितीचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी प्रेरित करता येईल. बुद्ध आपल्याला विश्वउत्पत्तिशास्त्र किंवा खगोलभौतिकी शिकवण्यासाठी या जगात अवतरले नव्हते.
त्या उद्दिष्टाशी संबंधित नसलेल्या विषयांचे चिंतन हा वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे. विशेषतः आपल्या गैरसमजुतीच्या आधारावर, आपण गोंधळलेल्या मनस्थितीत आणि अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली असताना विश्वाविषयी आणि त्यातील जिवमात्रांविषयी चिंतन करण्यानं, आपण आपल्या मुक्तीच्या ध्येयापासून आणि इतरांना मदत करण्यायोग बनण्याच्या ध्येयापासून दूर फेकले जाऊ शकतो. अखेर आपण अधिकच गोंधळलेल्या स्थितीत पोहचू शकतो.
बुद्धांच्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून हा मुद्दा प्रतिबिंबीत होतो. उदाहरणार्थ, बुद्धांना विचारण्यात आलं होतं की विश्व शाश्वत आहे की नाही किंवा मृत्युनंतर ‘स्व’ अस्तित्वात राहतो की नाही. अशा सर्व प्रश्नांवेळी बुद्धांनी शांत बसणं पसंत केलं आणि उत्तर दिलं नाही. शेवटी बुद्ध म्हणाले की, जेव्हा लोक गोंधळलेल्या मनस्थितीत असतात आणि अपरिवर्तनीय, निर्मित आत्म्यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांना दिलेल्या कोणत्याही उत्तरानं त्यांचा गोंधळ वाढूच शकतो. जर अपरिवर्तनीय, निर्मित आत्म्यासारखी गोष्ट अस्तित्वातच नसेल, तर असे आत्मे परिमीत आहेत की अनंत, अशा प्रश्नानं काय फरक पडतो.
ही स्वतःतच एक महान शिकवण आहे. शेवटी विश्वाचं आकारमान आणि त्यातील जिवमात्रांची संख्या माहीत करून घेऊन आणि जरी त्यांच्या अस्तित्वाविषयी अचूक माहिती उपलब्ध असली, तरी त्याची आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि वेदनेतून मुक्ती मिळवण्यासाठी मदत होणार आहे का? दुसऱ्या जिवांच्या लाभाने आपल्याला साहाय्य मिळणार आहे का? बुद्धांनी सांगितले आहे की, आपण यातला कोणताही प्रश्न सोडवण्यापूर्वी आपले अनमोल जीवन व्यर्थ घालवून मरून जाऊ. असल्या अनुमानातून मौज मिळत असली तरी, ते आपल्यासाठी उपयुक्त नसतात. आपल्या सद्यस्थितीचं वास्तव ओळखणं आणि उपलब्ध दुर्मिळ संधींचा वापर करणं महत्त्वाचं आहे. आपण वास्तव संसारात असलो तरी आपल्याकडे असलेल्या अनमोल मानवी शरीर आणि मनाची जाणीव करून घेऊन त्याचा आपल्या समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि इतरांना मदतगार ठरण्यासाठी वापर करणं शक्य आहे. आपल्याला संपूर्ण ज्ञानप्राप्तीच्या दिशेनं नेणाऱ्या पद्धतींची साधना करणं शक्य आहे. आणि एकदा का, आपण त्या पातळीवर पोहचलो, तर कदाचित आपल्याकडे त्या सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे असतील.