नातेसंबंधातील असुयेचा कसा सामना कराल

How to jealousy ben blennerhassett unsplash

असूया आपल्याला असुरक्षित आणि शंकेखोर करते की आपले मित्र आणि सहकारी आपल्याला धोका देतील. ज्यामुळे आपले संबंध खराब होऊन आपण मानसिक संतुलन हरवून बसू शकतो. आपल्यात जितकी अधिक असूया किंवा मालकीची भावना असते, तितकेच आपण इतरांना आपल्यापासून दूर करत जातो. आपल्यात अगणित लोकांवर प्रेम करण्याची क्षमता आहे, ही जाणीव आपल्याला असूया दूर करण्यास लाभदायी ठरू शकते. आपले मित्र, व्यवसाय आणि खेळासारख्या गोष्टींवरील प्रेम आपल्या सहचरावरील प्रेमाला बाधक ठरत नाही, तर ते प्रेम अधिक समृद्ध करते.

असूया विरुद्ध मत्सर

असुयेची अनेक रूपं असू शकतात. जर आपण एकटे असू आणि आपल्याला इतर जोडप्यांबद्दल असूया वाटत असेल किंवा दुसऱ्यासोबत नात्यात असणाऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटत असेल, तर तो वास्तविक मत्सर असतो. आपल्याला वाटत असते की आपल्याला त्या व्यक्तीचे प्रेम मिळावे, त्या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष द्यावे किंवा आपल्याला असेही वाटते की आपल्याकडेही असे प्रेमळ नाते असावे. दोन्ही बाबतीत आपल्याकडच्या अभावामुळे आलेला मत्सर असतो. त्यातून आपल्यामधील अभावाची जाणीव तीव्र होऊ शकते आणि आत्म-सन्मान हरवण्यासारखी समस्याही उद्भवू शकते.

नातेसंबंधातली असूया

नातेसंबंधातील असूया आणखी धोकादायक असू शकते. समोरच्या व्यक्तीकडे काय आहे, यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण आपला सहचर, मित्र किंवा तिऱ्हाइत व्यक्तीवर लक्ष केंद्रित करतो; सामान्यतः आपल्याला भीती असते की तिऱ्हाइत व्यक्तीमुळे आपण आपले खास संबंध हरवून बसू. आपण कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा विश्वासघाताच्या शक्यतेविषयीही असहिष्णु होतो. उदाहरणार्थ, आपला सहचर त्याच्या किंवा तिच्या मित्र/मैत्रिणींसोबत खूप वेळ घालवत असेल किंवा आपल्याशिवाय एखाद्या कार्यक्रमाला जात असेल, तर आपल्याला असूया जाणवू लागते. अगदी घरात नवं पिल्लू आल्यास कुत्र्यालाही अशी असूया जाणवते. अशा प्रकारच्या असुयेत अविश्वास आणि असुरक्षिततेसोबत संताप आणि द्वेषाची भावनाही असते.

जर आपल्यात असुरक्षिततेची भावना असेल, तर आपला सहचर जेव्हा जेव्हा इतर व्यक्तींसोबत असेल, आपल्याला असूया जाणवायला लागेल. कारण आपणच स्वतःचे मोल ओळखू शकत नाही, आणि इतरांच्या आपल्यावर असलेल्या प्रेमाबाबत आपण असुरक्षित असतो, ज्यातून सहचराबद्दलही अविश्वास निर्माण होतो. आपल्याला भीती असते की आपल्याला फसवले जाईल. आपला सहचर किंवा मित्र इतर कुणासोबत वेळ घालवत नसेल, तेव्हाही अशी भीती वाटत राहणे शक्य आहे. टोकाच्या स्वामित्व भावनेमुळे, समोरची व्यक्ती केव्हाही आपल्याला सोडून जाईल, या भीतीने आपण ग्रस्त होतो.  

असुयेतून मुक्तता

असुयेशी लढताना, आपण असा विचार करणं आवश्यक आहे की आपल्या हृदयात प्रत्येकावर प्रेम करण्याची क्षमता आहे – हा आपल्या बौद्ध प्रकृतीचा एक घटक आहे. जेव्हा आपण या वस्तुस्थितीचा स्वीकार करतो तेव्हा, एका व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे दुसऱ्या लोकांना सोडून देणं नव्हे, याची जाणीव होऊन असुयेशी लढण्यास मदत मिळते. जरा स्वतःचाच विचार करून पाहा आणि आपण कसे इतक्या साऱ्या लोकांसाठी आणि गोष्टींसाठी आपले हृदय खुले ठेवू शकतो याचाही विचार करा.(पाहाः प्रेम म्हणजे काय?) हृदय खुले ठेवल्यास आपण, आपला सहचर, मित्र, मुले, पाळीव प्राणी, पालक, देश, निसर्ग, देव, छंद आणि अशा अनेक गोष्टींप्रति प्रेम बाळगू शकतो. आपल्या हृदयात या प्रत्येकासाठी जागा असते कारण प्रेमाला विशिष्ट चौकट नसते. आपण अगदी योग्य प्रकारे या सर्व घटकांप्रति सुसंगतपणे प्रेम व्यक्त करण्यासाठी सक्षम असतो. अर्थात आपण आपली पत्नी, पती किंवा पालकांप्रति ज्या प्रकारे प्रेम व्यक्त करतो, त्याच प्रकारे आपल्या कुत्र्याप्रति प्रेम व्यक्त करत नाही.

जर आपल्याजवळ मुक्त हृदय असेल, तर आपल्या सहचर आणि मित्राकडेही असेल. प्रत्येकाची अगणित लोक आणि गोष्टींवर प्रेम करण्याची क्षमता समान असते – अगदी संपूर्ण जगावर प्रेम करण्याची. त्यांनी फक्त आपल्यावरच प्रेम करावे आणि इतर प्रेममय मैत्रीपूर्ण संबंध ठेवू नयेत, ही अपेक्षा चुकीची आणि अवास्तव आहे. आपण त्यांना इतके कमी लेखतो का की त्यांच्या हृदयात आपल्यासोबत इतरांसाठी जागा असू नये? त्यांनी त्यांच्या प्रेमाच्या पूर्ण क्षमतेनी भरलेल्या बौद्ध प्रकृतीपासून आणि त्या अनुषंगे सर्वोच्च जीवनानुभवाच्या जाणिवेपासून खरेच दूर राहावे, असे आपल्याला वाटते का?

इथे आपण लैंगिक संबंधातील विश्वासघाताच्या संबंधातून बोलत नाही. एक पत्निव्रत किंवा एक पतिव्रत आणि लैंगिक प्रतारणा अत्यंत गुंतागुंतीची असते आणि इतर अनेक समस्यांना जन्म देते. काहीही झालं तरी, जर आपला जोडीदार, विशेषतः वैवाहिक जोडीदार विश्वासघात करत असेल किंवा इतर कुणासोबत महत्त्वपूर्ण वेळ घालवत असेल – विशेषतः जेव्हा आपल्याला मूल  असते – अशा परिस्थितीत असूया, राग आणि मालकी भावनेतून आलेल्या भावनिक प्रतिक्रिया उपयोगी नसतात. आपण परिस्थिती समंजसपणे हाताळणे आवश्यक असते. कारण आपल्या जोडीदारावर ओरडण्याने किंवा त्यांना दोषी वाटायला लावल्याने आपण त्यांचं प्रेम मिळवण्यात यशस्वी होऊ शकत नाही.    

प्रेमासाठी आपल्या हृदयाची दारे खुली करणे

 जेव्हा आपल्याला वाटते की प्रेमयुक्त मैत्री फक्त एका व्यक्तीसोबतच शक्य आहे, तेव्हा आपण विचार करतो की फक्त एकच व्यक्ती असते – आपला जोडीदार किंवा मित्र – ज्याचे प्रेम आपल्यासाठी महत्त्वाचे असते. आपल्या अवतीभोवती आपल्यावर प्रेम करणारे इतर लोकही असतात, पण आपण त्यांच्याकडे ‘त्यांचे प्रेम फार महत्त्वाचे नाही’ अशा भावनेतून दुर्लक्ष करतो. पण सातत्याने आपण अधिकाधिक लोकांच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी हृदय खुले केले आणि आपले मित्र, नातलग, पाळीव प्राणी आणि इतरांच्या आपल्यावर सदासर्वकाळ असणाऱ्या प्रेमाबाबत कृतज्ञ राहिलो तर आपल्याला भावनिक दृष्ट्या अधिक सुरक्षित वाटेल. त्यामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्तीबाबतच गुंतल्याच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठीही याची मदत होईल.      

सर्वज्ञता किंवा सर्वांवर प्रेम करा हे सूत्र प्रत्येकाला मनात आणि हृदयात स्थान देण्याविषयी सूचित करते. शिवाय जेव्हा बुद्ध एका विशिष्ट व्यक्तीवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्याचे किंवा तिचे चित्त १०० टक्के त्या व्यक्तीवर केंद्रित झालेले असते. त्यामुळे प्रत्येकाप्रति प्रेम बाळगण्याचा अर्थ व्यक्तिगत प्रेम कमी होत जाते, असा होत नाही. इतरांसाठी हृदय खुले ठेवल्याने आपल्या व्यक्तिगत संबंधांची तीव्रता कमी होईल, अशी भीती बाळगण्याची गरज नाही. आपण एकाच व्यक्तीवर कमी अवलंबून राहू किंवा कमी बिलगून राहू, आपण कदाचित त्यांच्यासोबत कमी वेळ घालवू पण प्रत्येकासोबतची भावनिक गुंतवणूक परिपूर्ण असेल. हेच इतरांच्या आपल्यावर असणाऱ्या प्रेमाबाबतही लागू होईल, त्यांच्याही आयुष्यात अशी प्रेममय मैत्री असू शकते, या जाणिवेमुळे आपल्यातील असुयेची भावना कमी होऊ शकते.

एखादी विशिष्ट व्यक्तीच सर्वार्थाने आपला योग्य जोडीदार आहे आणि आपण आयुष्यातील सर्व घटक केवळ त्याच्यासोबतच वाटून घेऊ शकतो, हा विचार अवास्तव आहे. अशा कल्पना प्लेटोच्या पौराणिक ग्रीक मिथकांवर आधारलेल्या असतात. मूलतः आपण एक होतो, पण नंतर विभागले गेलो आणि जगाच्या पाठीवर ‘कोठेतरी’ आपली अर्धांगिनी किंवा जोडीदार आहे; आणि त्यांचा शोध घेऊन त्यांच्याशी जोडले जाणे हेच खरे प्रेम आहे. हे मिथक पाश्चिमात्त्य सौंदर्यशास्त्राचा आधार ठरले असले तरी ते वास्तवाला धरून नाही. यावर विश्वास ठेवणे म्हणजे एखादा सुंदर राजकुमार पांढऱ्या घोड्यावर बसून आपल्या बचावाला येईल, अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यासारखे आहे. आपल्या सर्व रूची आणि गरजा वाटून घेण्यासाठी आपल्याला एकाच वेळी अनेक प्रेमळ मैत्रीची गरज असते. आणि हे आपल्यासाठी खरे असेल तर ते आपल्या मित्र किंवा सहचरासाठी तितकेच खरे असते. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणे आपल्याला शक्य नसते, त्यामुळे त्यांना इतर मित्रांची गरज असते.

सारांश

जेव्हा एखादी नवी व्यक्ती आपल्या जीवनात येते, तेव्हा एखादा सुंदर जंगली पक्षी आपल्या खिडकीत आल्यासारखे समजावे. तो पक्षी इतरांच्या खिडकीतही जातो, या विचाराने आपण त्याला पकडून पिंजऱ्यात कैद केले तर ते फारच दुःखद होईल. तो त्याची चमक हरवून बसेल आणि कदाचित मरूनही जाईल. पण आपण मालकीची भावना न ठेवता, त्याला मुक्त विहरू दिले, तर आपण त्याच्यासोबतचा सुंदर काळ मनसोक्त अनुभवू शकू. उडून जाण्याचा हक्कच असल्याने तो पक्षी उडून गेला, तरी आपल्याकडे सुरक्षित वाटत असल्यास तो परत येईल. आपण स्वतःसह प्रत्येकाच्या अनेकांशी प्रेममय मैत्रीसंबंध ठेवण्याच्या हक्काचा आदर राखला तर आपले संबंध अधिक निकोप आणि दीर्घकालीन ठरतील.

Top