व्यवसाय चालविण्यासाठी ५ बौद्ध तत्त्वे

How to 5 tips business

बौद्ध धर्माचा संबंध कायम ध्यानधारणेशी जोडला जातो. पण बौद्ध धर्म विचार करण्याच्या पद्धतींची विविधांगी अंतर्दृष्टी बहाल करतो जी कोणत्याही क्षेत्रात लागू करता येऊ शकते. आपला व्यवसाय किंवा प्रकल्प चालविण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी काही बौद्ध तत्त्वे पाहुयात.

उद्दिष्टांची व्याख्या ठरवा

बौद्ध साधनेला सुरुवात करण्यापूर्वी तुमची उद्दिष्टे आणि दिशांचे तुम्हाला नेमके आकलन असण्यावर बौद्ध धर्माचा भर आहे. अस्वस्थ करणाऱ्या भावनांपासून पूर्ण मुक्ती आणि स्वतःच्या मन व हृदयाच्या क्षमतांची परिपूर्ण जाणीव म्हणजेच उद्दिष्ट. या अंतिम टप्प्यालाच ‘ज्ञानप्राप्ती’ संबोधलं जातं.  

त्याच धर्तीवर जेव्हा आपण एखादा प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करतो, तेव्हा उद्दिष्ट ठरविणे अत्यंत महत्त्वाचे असते. नफा मिळविणे हेच उद्दिष्ट आहे का? की तुम्हाला ग्राहकांसाठी काही मूल्ये विकसित करायची आहेत, की तुम्हाला त्यांच्या काही समस्या सोडवायच्या आहेत? नेमकेपणानं सांगायचं तर तुमचं उद्दिष्ट पक्कं असायला हवं. ते ठरवणं जेवढं सोपं असेल तेवढंच त्यासाठीचा योग्य मार्ग अवलंबणं सोपं असेल आणि त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याची शक्यताही अधिक असेल.

कारण आणि परिणामांच्या तत्त्वांचे पालन करा

एकदा उद्दिष्ट पक्के झाले की आपण ती उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या कारणांचा शोध घेणे गरजेचे असते. जसे ज्ञानप्राप्तीसाठी आपला विघातक स्वभाव बदलून मनाच्या चांगल्या सवयी अंगीकारणे आणि जगाशी व्यवहार करताना विवेकी आणि विधायक मार्गांचा अवलंब करण्याच्या दृष्टीने स्वतःला प्रशिक्षित करावे लागते.

व्यावसायिक प्रकल्पामध्ये आपण तर्कबुद्धी वापरून उद्दिष्टपूर्तीकडे नेणाऱ्या कारणांचा शोध घ्यायला हवा. ही रिव्हर्स इंजिनिअरिंगसारखी प्रक्रिया आहे. आपण उद्दिष्टांकडे नेणाऱ्या कृतींच्या तर्कक्रमांचा माग घ्यायला लागतो. ही प्रक्रिया उद्दिष्टपूर्तीसाठी उचलावी लागणारी आवश्यक पावले समजून घेण्यासाठी साहाय्यक ठरते आणि आपल्या प्रकल्पासाठी भक्कम मार्गदर्शिका तयार करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

करुणाः ग्राहकांच्या समस्या सोडवा

करुणा हे अतिशय महत्त्वाचे बौद्ध तत्त्व आहे. बुद्धाच्या शिकवणीप्रमाणेः

करुणा म्हणजे इतरांची वेदनेपासून मुक्ती व्हावी अशी इच्छा.

याचा व्यवसायाशी काय संबंध? कारण व्यवसाय ग्राहकांच्या समस्यांवर उपाय शोधतो. जर एखाद्या व्यावसायिकाने आधीच्या व्यावसायिकापेक्षा योग्य उपाय दिला, तर तो स्पर्धा जिंकतो. त्यामुळे आपल्या संभाव्य ग्राहकांच्या समस्या ओळखणे आणि त्याबाबत संवेदनशील दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. आपल्या संभाव्य ग्राहकांच्या जीवनातील समस्या ओळखून मनात त्याची कायम जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आणि त्या आधारे त्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक मार्गांचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यामुळे करुणा हा ग्राहक केंद्री व्यवसायाचा पाया आहे.

परिवर्तनशीलताः बदलत्या जगाचा स्वीकार

बौद्ध चिकित्सेने आपल्याला आणखी एका वास्तवाबाबत अंतर्दृष्टी दिली आहेः प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील असते – आपण स्वतः, पर्यावरण, आणि आपल्या भोवतीचे सर्व लोकही. तरीही आपण चिरस्थायित्वाच्या कल्पनेत अडकून राहणे सहज शक्य आहे. पण वेगाने बदलत्या वास्तवात असा विचार संकुचित मनोवृत्ती, हट्टीपणा आणि ताठरपणाचे कारण ठरू शकतो.

नेटफ्लिक्सचेच उदाहरण घ्या. त्यांनी ओळखले की इंटरनेटमुळे माध्यमांच्या उपभोगाचे आकृतीबंध बदलत चालले आहेत. जुन्या विचारधारेजवळ व्हिडीओ पाहण्यासाठी केवळ डीव्हीडी हे एकमेव माध्यम होते. पण नेटफ्लिक्सच्या लक्षात आले की हे व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या माध्यमातून अधिक सोप्या पद्धतीने करणे शक्य आहे. संपूर्ण माध्यम उद्योग ग्राहकांच्या सवयी आणि बाजारपेठेची परिवर्तनशीलता समजू शकला नाही. पण नेटफ्लिक्सने सर्वप्रथम ते ओळखले. आणि संपूर्ण बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलला.   

नैतिकताः स्वतःचा, स्वतःच्या टीमचा आणि ग्राहकांचा आदर राखा

बौद्ध धर्मातील नैतिकता अहिंसेच्या तत्त्वावर आधारलेली आहे. आम्ही ओळखलं की प्रत्येकाला सुखी व्हायचे आहे आणि कोणालाही दुःखी व्हायचे नाही. या जाणिवेच्या आधारावर आपण आपली कार्यपद्धती ठरवली आणि इतरांना नुकसान पोहोचवण्यापासून स्वतःला रोखले, तर आपण इतरांचा आदर आणि विश्वास प्राप्त करतो.

जर आपण आपल्या सहकाऱ्यांचा आदर ठेवला, तर त्यातून आपल्या टीमचा विश्वास वाढीस लागतो. आपण आपला व्यवहार पारदर्शी ठेवतो आणि लोकांच्या पाठीमागे किंवा तोंडावरही उलटसुलट बोलणे टाळतो. पुढे जाऊन आपण आपल्या ग्राहकांचा जितका अधिक आदर करतो, तितक्याच विश्वासास आपणही पात्र होतो. झॅप्पो सारख्या महान कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप   ग्राहकांच्या गरजांप्रति आदर आणि कर्मचाऱ्यांप्रति पारदर्शी आणि समतेची भावना या मूल्यांवर आधारित ठेवले आहे.

सारांश

आपला व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आपण ५ बौद्ध तत्त्वांचा वापर करू शकतो. ती तत्त्वे खालीलप्रमाणे आहेतः

  • उद्दिष्टांची व्याख्या करा
  • कारण आणि परिणामांवर अवलंबून राहा
  • ग्राहकांप्रति संवेदनशीलता आणि करुणा बाळगा
  • परिवर्तनशीलतेबद्दल सजग असा आणि लवचिक आणि नाविन्यपूर्ण असा
  • नैतिक तत्त्वांचा अवलंब करा आणि सहकारी व ग्राहकाचा आदर ठेवा.
Top