अनित्यतेचा आदर राखणं

सदासर्वकाळ आयुष्यात परिवर्तन होत असते, या वस्तुस्थितीचा आपण आदर राखायला शिकलो की इतरांशी विशिष्ट मार्गाने गुंतले जाण्याच्या आडकाठीतून मोकळे होतो.
Meditation impermanence

स्पष्टीकरण

अनित्यता म्हणजे बदल: कार्यकारणभावनाने प्रभावित झालेल्या गोष्टी कधीही स्थितिशील वाटत नाहीत, त्या क्षणोक्षणी बदलतात. काही गोष्टी एकदा निर्माण झाल्यावर संथपणे त्यांचा ऱ्हास होतो आणि संगणकाप्रमाणे, कारप्रमाणे व आपल्या शरीराप्रमाणे त्या संपुष्टात आल्यावर मोडून पडतात. इतर गोष्टी क्षणोक्षणी बदलतात, पण त्यांचं कायम नूतनीकरण होत असल्यामुळे त्यांची झीज होत नाही. बाळ म्हणून, सक्रिय प्रौढ व्यक्ती म्हणून किंवा अल्झायमर्सने आजारी असलेला वृद्ध रुग्ण म्हणून आपल्या प्राथमिक मानसिक क्रियाशीलतेची मात्र झीज होते. काही गोष्ट वर जातात व खाली येतात, तापमानाप्रमाणे किंवा तुमच्या ध्यानधारणेच्या गुणवत्तेप्रमाणे हे घडतं; तर, विमानातील लोकांप्रमाणे काही गोष्टी एकत्र येतात व मग विखरून जातात. काही गोष्टींचं चक्र पुनरावृत्त होत असतं- ऋतू किंवा दिवस-रात्रीचं चक्र, अशा गोष्टी यात येतात. इतर काही गोष्टी पुन्हापुन्हा उगवतात, टिकतात व संपुष्टात येतात- बौद्ध मतानुसार विश्वांचं असं होतं. अनित्यतेचे अनेकविध प्रकार आहेत.

दुर्दैवाने आपल्या मनाला काळाच्या सर्व स्तरांचं एकाच क्षणामध्ये आकलन होत नसल्यामुळे आपण गोंधळतो आमि काही वेळा गोष्टी स्थिर असल्याचं व कधीच बदलत नसल्याचं आपल्याला वाटतं- आपले नातेसंबंध, आपलं तारुण्य, आपली मनस्थिती, इत्यादी. अशा रितीने आपण विचार करतो तेव्हा आपण दुःख निर्माण करतो व समस्या निर्माण करतो. उदाहरणार्थ, आपण कोणाच्या तरी प्रेमात असतो. विशिष्ट कार्यकारणसंबंधांमुळे हे नातं निर्माण झालेलं असतं- आपण दोघंही एकाच ठिकाणी असतो, आपण दोघंही जोडीदार शोधत असतो, आपल्या दोघांच्याही जीवनात इतर काही विशिष्ट गोष्टी घडत असतात. पण कालांतराने ही परिस्थिती बदलते. अशा वेळी आपण सुरुवातीच्याच प्रकारातील व आरंभिक टप्प्यांमधील नात्याला चिकटून राहिलो, तर आपल्या जोडीदाराने नोकरी बदलली, किंवा ती दुसऱ्या शहरात गेली, किंवा तिला भेटायला कोणी पाहुणा आला, किंवा तिचे नवीन मित्रमैत्रिणी झाले, किंवा आपल्या जीवनात अशा प्रकारचं काही घडलं, तर आपलं नातं त्यानुसार जुळवून घेणं आपल्याला शक्य होत नाही. आपलं नातं आधी जसं कसं होतं त्याला आपण कवटाळून राहतो, त्यामुळे वास्तवाशी आपला संपर्क तुटतो, आणि आपल्याला दुःख होतं.

आपल्या ध्यानधारणेसाठी जीवनातील विविध अनित्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं आणि त्या गोष्टी बदलल्या आहेत व सरत्या कारानुसार त्या बदलतच जाणार आहे, आणि अखेरीस संपुष्टात येणार आहेत, हे लक्षात घेऊन आपण त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा.

ध्यानधारणा

  • श्वसनावर लक्ष केंद्रित करून शांतचित्त व्हावं.
  • तुमच्या आईसोबतच्या नात्यावर लक्ष केंद्रित करा.
  • ते कसं सुरू झालं- तुम्ही बालक होतात तेव्हापासूनच्या या नात्यावर विशिष्ट रितीने कसे प्रभाव पडले, हे लक्षात घ्या.
  • मग तुम्ही व तुमची आई मोठे झालात, तुम्ही लहान मूल होतात, मग पौगंडावस्थेत आलात, मग प्रौढ झाला, मग आई वृद्ध झाली, याने तुमचं नातं बदललं- हो ना?
  • ती मरण पावली किंवा ती आधीच मरण पावली असेल, तर तुमचं संवादी नातं संपुष्टात आलं असलं, तरी तुमचा तिच्याविषयीचा दृष्टिकोन व स्मृती यांमध्येही बदल होत असतो व होत राहतो, हेही लक्षात घ्या.
  • तुमच्या वडिलांसोबतच्या नात्यावरही अशाच रितीने लक्ष केंद्रित करा.
  • तुम्ही प्रेम करत असलेल्या किंवा खूप प्रेम केलंत अशा जोडीदारासोबतच्या नात्यावर लक्ष केंद्रित करा.
  • तुमच्या व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करा.

सारांश

अनित्यता ही जीवनाची वस्तुस्थिती आहे. आपल्याला ती आवडेल अथवा नाही आवडणार, पण सदासर्वकाळ सर्व काही बदलत असतं, आणि काहीच चिरकाल एकसारखं राहत नाही. आपण हे वास्तव स्वीकारतो, तेव्हा आपल्याला कोणतीही गोष्ट कायम एकसारखी राहील असं समजून तिला कवटाळून राहणं निष्फळ असल्याचं लक्षात येतं. आपल्या जीवनातील परिस्थिती, आपले नातेसंबंध, आपलं शरीर, इत्यादींमधील बदलांशी जुळवून घेणं आपल्याला शक्य झालं, तर त्यातून बरंच दुःख व समस्या टाळता येतात.

Top