Image%201

सोप्या भाषेत, बोधिसत्व ही एक ज्ञानी आणि दयाळू व्यक्ती असते जी इतर सर्वांची काळजी घेते. अर्थात, येथे बरेच हुशार, दयाळू लोक आहेत, मग बोधिसत्वात असे काय वेगळेपण असते? प्रारंभालाच सांगायचं तर,  बोधिसत्व केवळ इतरांच्या कल्याणाची इच्छा धरत नाहीत, तर त्यांना अनेक कुशल पद्धती माहीत असतात ज्या प्रत्यक्षात इतरांचे दुःख संपवण्यास मदत करतात आणि ते सर्व प्राणीमात्रांना मदत करण्यासाठी अथक परिश्रम करतात. बोधिसत्वांना सर्व समस्यांचे सर्वात खोल मूळ समजलेले असते आणि त्यांना खात्री असते की हे मूळ नष्ट करणे शक्य आहे जेणेकरून प्राणीमात्रांना पुन्हा कधीही समस्या उद्भवू नये. हे ज्ञान आणि उद्दिष्ट बोधिसत्वाची करुणा अधिक शक्तिशाली बनवते.

बोधिसत्व हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून आला आहे: “बोधी,” म्हणजे “ज्ञान” आणि “सत्त्व” म्हणजे “अस्तित्व.” सुरुवातीच्या बौद्ध शिकवणींमध्ये, ज्ञानप्राप्ती होण्याआधीच्या बुद्ध शाक्यमुनींच्या वर्णनासाठी  "बोधिसत्व" हा शब्द वापरला गेला होता. उदाहरणार्थ, बुद्धांच्या भूतकाळातील कथांमध्ये त्यांचे वर्णन बोधिसत्व म्हणून केले जाते. अशारीतीने, बुद्धांप्रमाणेच, ज्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी अगणित जीवन अविश्वसनीय प्रयत्न आणि शक्ती खर्च केली तेच बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे अशी व्यक्ती जी सर्व जीवांच्या कल्याणासाठी ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर प्रवास करतात. ते असे करतात कारण त्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव असते. जरी त्यांना इतरांच्या कल्याणाचे अनेक मार्ग माहीत असले तरी, व्यक्तीपरत्वे कोणती पद्धत योग्य ठरेल, हे ते पूर्णपणे पाहू शकत नाहीत. हे फक्त बुद्धच जाणू शकतात. म्हणून, इतरांना शक्य तितकी मदत करत असताना, ते बुद्ध बनण्यासाठी स्वतःवर आणखी काम करत असतात.

बोधिसत्व सर्व जीवांच्या मुक्तीसाठी कार्य करण्याचे व्रत घेतात. मग, त्यांचे अंतिम ध्येय केवळ स्वत:साठी आत्मज्ञान मिळवण्यापुरते मर्यादीत राहत नाही, तर सर्व प्राणिमात्रांनाही आत्मज्ञान प्राप्त करण्यास मदत करण्याचे असते. त्यांच्यातील महान करुणेमुळे, ते इतरांना मदत करण्यासाठी त्यांची स्वतःची ज्ञानप्राप्ती पुढे ढकलतात आणि आध्यात्मिक मार्गदर्शक आणि संरक्षक म्हणून त्यांचा आदर केला जातो.

बोधिसत्वाचा सराव आणि वैशिष्ट्ये 

एका मर्यादेपर्यंत बोधिसत्वांमध्ये बुद्धांच्या संपूर्ण गुणातील अनेक गुण असतात. ज्ञानप्राप्तीच्या नजीक जाण्यासाठी आणि इतर जीवांनाही त्याचा लाभ व्हावा यासाठी ते त्या गुणांचे अधिक पोषण करतात. बोधिसत्वांचे काही गुण खालीलप्रमाणे आहेतः 

  • करुणा - बोधिसत्व इतर सर्व जीवांच्या कल्याणासाठी काम करतात. आपल्यापैकी अनेकांची स्वतःला प्राथमिकता असते, परंतु बोधिसत्वांचे स्वतःआधी इतरांना प्राधान्य असते. ते एखाद्या आईसारखे असतात जी सर्व प्राणीमात्रांना तिचा सर्वात प्रिय मुलगा म्हणून पाहते. जेव्हा ते मूल आजारी पडते, तेव्हा आई आपल्या मुलाचे दुःख सहन करू शकत नाही आणि मदत करण्यासाठी काहीही करू शकते. त्याचप्रमाणे, बोधिसत्व आपल्यापैकी कोणाचेही दुःख सहन करू शकत नाहीत, ते फक्त सर्वांची समान काळजीच घेत नाहीत, तर ते शक्य असेल तेव्हा आणि तशी मदत करतात.
  • शहाणीव - बोधिसत्व उपयुक्त आणि हानिकारक गोष्टींमधील भेद पारखू शकतात. ते कल्पना आणि वास्तव यातील भेदही ओळखू शकतात. ही सखोल समज त्यांना इतरांना मुक्तीसाठी मार्गदर्शन करण्यास साहाय्यक ठरते. 
  • कौशल्यपूर्ण साधने - बोधिसत्व हे इतरांना कशी मदत करावी हे जाणून घेण्यात आणि त्यासाठी विविध पद्धती वापरण्यात कुशल असतात.
  • औदार्य - बोधिसत्व भौतिक संपत्ती आणि वेळ व शक्ती या दोन्ही बाबतीत उदार असतात. ते इतरांना मदत करण्यासाठी सर्वस्व देण्यास तयार असतात आणि त्यांना संपत्ती किंवा कर्तृत्वाची आसक्ती नसते. 
  • संयम - बोधिसत्व स्वतःसोबत इतरांबाबतीतही संयमी असतात. ज्ञानप्राप्तीचा मार्ग खूप लांब असल्याची त्यांना जाणीव असते आणि ते ज्या वेगाने जाऊ शकतील त्या वेगाने इतरांना मदत करण्यासाठी ते वेळ काढण्यास तयार असतात.
  • नैतिक आचरण - बोधिसत्व नैतिक आचरणासाठी वचनबद्ध असतात, याचा अर्थ ते इतरांना हानी पोहोचवणाऱ्या कृती टाळतात आणि सर्व प्राणीमात्रांसाठी फायदेशीर कृती जोपासतात.
  • धैर्य - बोधिसत्व हे धाडसी आणि धैर्यवान असतात, इतरांना मदत करण्यासाठी अडथळे आणि आव्हानांना सामोरे जाण्यास तत्पर असतात. ते आव्हानात्मक परिस्थितीत किंवा इतरांच्या फायद्यासाठी जोखीम घेण्यास घाबरत नाहीत.

चीनमधील चौथ्या शतकातील मेजिशन ग्राटोस येथील बोधिसत्वाचा पुतळा

सद्याच्या काळातील कार्यशील बोधिसत्व 

बोधिसत्वाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे परमपूज्य चौदावे दलाई लामा. परमपूज्य पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अथकपणे, न थांबता कार्य करतात. दररोज पहाटे ३ वाजता त्यांच्या दिवसाची सुरुवात होते.  अनेक तास ध्यान करून ते नंतर उरलेला दिवस इतरांना भेटण्यासाठी आणि मदत करण्यात घालवतात.

एकदा, परमपूज्य दीर्घ प्रवासानंतर स्पितीला आले. तेव्हा, ते आधीच बरेच दिवस शिकवत होते आणि खूप बोलल्यामुळे त्यांचा आवाज गेला होता. त्यांना आणखी थकू न देता, मी त्यांना बसण्याची विनंती केली आणि श्रोत्यांना ओम मणि पद्मे हम मंत्र सांगण्यास विनविले. त्यांनी ती विनंती मान्य केली. पण एकदा शिकवण सुरू झाल्यावर ते म्हणाले की मी त्यांना दमाने घ्यायला सांगितले असले तरी त्यांची चांगली झोप झालेली आहे आणि ते कोणाचाही वेळ वाया घालवू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांनी शिकवण सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांनी सर्व सद्गुणांचा पाया (फाऊंडेशन ऑफ ऑल गुड क्वॉलिटीज) या विषयावर जवळजवळ 3 तास सतत शिकवले, या दरम्यान त्यांचा आवाज सुधारला.

व्याख्यानानंतर, मी त्यांना त्याच्या खोलीत घेऊन गेलो. तिथे त्यांनी त्यांचा वरचा झगा काढला आणि ते सोफ्यावर आडवे झाले. आणि म्हणाले, मी आता जाऊ शकतो कारण ते खूप थकले आहेत. पण मला त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नव्हता; किंबहुना, मला फक्त प्रचंड उर्जेने भरलेला चेहराच दिसत होता. मला असे वाटले की 80 वर्षांचा कोणताही सामान्य माणूस असे काम करू शकत नाही. परमपूज्य दलाई लामा खरोखरच अद्भुत आहेत!

यामागचे रहस्य काय असा प्रश्न मला पडला. ते करुणेशिवाय दुसरे काही नाही. इतरांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी ते कायमस्वरूपी अथक परिश्रम करतात. आपण ४ किंवा ५ तास व्हिडीओ गेम्स खेळू शकतो आणि थकून जात नाही, परंतु त्यांना फक्त एकाच गोष्टीचा ध्यास असतो, ती म्हणजे इतरांच्या मदतीस उतरणे ज्यामुळे ते थकत नाहीत. बोधिसत्वाच्या करुणा, शहाणपण, धैर्य आणि इतर गुणांकडे पाहिल्यास आपण स्पष्टपणे समजू शकतो की परमपूज्य बोधिसत्वच आहेत. 

निष्कर्ष

बोधिसत्व हे शक्तिशाली आणि दयाळू मार्गदर्शक असतात जे त्यांच्या अनुयायांना ज्ञानाच्या मार्गावर मदत करतात. त्यांच्या निःस्वार्थ कृतींद्वारे आणि शिकवणींद्वारे ते बौद्धांसाठी आदर्श आहेत आणि तेच गुण स्वतःमध्ये जोपासण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात. अशाप्रकारे, बोधिसत्व जगभरातील कोट्यवधी बौद्धांच्या आध्यात्मिक जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, स्वत:च्या जीवनात अधिक शहाणीव आणि करुणा प्राप्त करू इच्छिणाऱ्यांसाठी ते प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा स्रोत प्रदान करतात.

बाह्य लक्षणांवरून कोणीतरी बोधिसत्व आहे की नाही हे सांगण्याचा कोणताही मार्ग नाही आणि खरं तर, आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतः बोधिसत्व बनू शकतो. आपण सर्व प्राणीमात्रांना मदत करू शकण्याच्या उद्देशाने बुद्ध बनण्याचा प्रयत्न करत असू, तर आपण बोधिसत्व आहोत. आपल्यामध्ये केवळ इच्छाच नाही तर इतरांना मदत करण्याची क्षमता असेल आणि आपला वेळ आणि शक्ती सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी खर्च करण्याची तयारी असेल, तर ते किती महान ठरेल.  जर आपल्याला खरोखरच इतरांचे भले करायचे असेल, तर आपण प्रथम बोधिसत्व बनले पाहिजे आणि नंतर आपण बुद्ध बनण्यासाठी कार्यशील होऊ शकतो. जीवन अर्थपूर्ण होईल यासाठी याहून अधिक असे काहीही नसते. 

Top