भावनिक साक्षरता व स्वनियमनाची जी कौशल्यं आपण वैयक्तिक अवकाशात शिकतो ती जीवनात पुढे जाताना आपल्याला निश्चितपणे अतिशय लाभदायक असतात. परंतु, मानव प्राणी स्वभावतः सामाजिक असल्यामुळे आपण इतरांशी जोडून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सामाजिक गुण जन्मजात असतात व ते अक्षय असतात असं आधी मानलं जात असे, पण अलीकडच्या वैज्ञानिक संशोधनामधून असं पुढे येऊ लागलं आहे की, शिक्षण, चिंतन व सहेतूक सरावाद्वारे सामाजिक गुणांची जोपासना करता येते. “सामाजिक” म्हणजे आपल्या आंतरवैयक्तिक अन्योन्यक्रीडा, त्याचप्रमाणे शाळा, कार्यालय, कुटुंब व शेजार अशा छोट्या समुदायातील अन्योन्यक्रीडा. शहर, गाव किंवा एकंदर जग अशा व्यापक समुदायांचा समावेश तिसऱ्या अंतिम अवकाशात, जागतिक, केला आहे.
सामाजिक संदर्भात जागरूकता, करुणा व सहभाग
सामाजिक अवकाश अनेक अर्थांनी वैयक्तिक अवकाशासारखाच आहे. फक्त इथे आपलं लक्ष स्वतःपेक्षा इतरांवर केंद्रित झालेलं असतं. इथेही आपण जागरूकता, करुणा व सहभाग अशा तीन आयामांद्वारे पुढे जातो. इतरांविषयीची प्राथमिक जागरूकता, त्याचप्रमाणे आपण सामाजिक जीव आहोत ही जागरूकता- म्हणजे इतरांच्या संदर्भात आपण अस्तित्वात असतो, आपल्याला इतरांची गरज असते, आणि आपल्या कृतींचा इतरांवर परिणाम होतो, याची समज, असा जागरूकता या शब्दाचा इथला अर्थ आहे. मानव म्हणून आपल्यामध्ये सामायिक काय आहे आणि आपल्याला इतरांपासून वेगळं करणारं काय असतं, याची समजही या जागरूकतेमध्ये समाविष्ट आहे. वैयक्तिक अवकाशामध्ये मिळवलेलं ज्ञान आता इतरांना व त्यांच्या भावनांना समजून घेण्यासाठी वापरणं म्हणजे करुणा. आपण कमी प्रतिक्रियावादी होण्यासाठी व तत्काळ निवाडा करण्याची सवय कमी होण्यासाठी हे गरजेचं आहे. कृतज्ञता, क्षमाशीलता, औदार्य व नम्रता यांसारखे इतर सामाजिक गुण विकसित करण्यासाठीदेखील आपण या मर्मदृष्टीचा उपयोग करतो. शेवटी, सहभाग म्हणजे ही जागरूकता व मर्मदृष्टी वापरून इतरांशी सकारात्मकरित्या व रचनात्मकरित्या जोडून घेणं. तर, सामाजिक अवकाशाचे तीन घटक अशा प्रकारे विचारात घेता येतात:
- आंतरवैयक्तिक जागरूकता
- इतरांविषयी करुणा
- संबंधांविषयीची कौशल्यं
आंतरवैयक्तिक जागरूकता
स्वतःच्या संकुचित स्वहितावर लक्ष केंद्रित करण्याची आपली सर्वांची नैसर्गिक प्रवृत्ती असते, पण इतरांचं सर्वोत्तम हित डोक्यात ठेवून त्यांच्याशी जोडून घेण्याचं कौशल्य प्रशिक्षणातून कमावता येऊ शकतं. हे इतरांसोबतच आपल्यासाठीही उपकारक ठरतं. उदाहरणार्थ, इतरांची दखल घेण्याची समज निर्माण झाल्याने कल्याणाची भावना वाढते, त्याचप्रमाणे आंतरवैयक्तिक संबंधांच्या भावनाही वाढतात. आंतरवैयक्तिक जागरूकतेमध्ये तीन प्रमुख मुद्दे येतात:
- आपल्या सामाजिक वास्तवाकडे लक्ष देणं
- आपल्या इतरांसोबतच्या सामायिक वास्तवाकडे लक्ष देणं
- वैविध्य व भेद यांची दखल घेणं
आपलं अंगभूत सामाजिक स्वरूप, इतरांचं महत्त्व आणि आपल्या जीवनात इतरांची भूमिका काय असते, हे समजून घेण्याची क्षमता म्हणजे आपल्या सामाजिक वास्तवाकडे लक्ष देणं. सुखाची इच्छा व दुःख टाळावंसं वाटणं, यासारखं मूलभूत पातळीवर इतरांसोबत आपलं सामायिक काय आहे, याची दखल घेणं म्हणजे आपल्या सामायिक वास्तवाकडे लक्ष देणं. अखेरीस, वैविध्य व भेद यांची दखल घेणं म्हणजे व्यक्ती व समूह यांचं वैविध्य, अनन्यत्व व भेद यांचा आदर ठेवणं आणि त्यातून आपल्या सामूहिक जीवनाला पूरकता कशी लाभते हे लक्षात घेणं.
आपल्या सामाजिक वास्तवाकडे लक्ष देणं
“कोणीही माणूस बेटासारखा नसतो,” अशी एक म्हण आहे. आपण मानव सामाजिक जीव आहोत आणि अगणित लोक आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, ते आपल्या लक्षात येवो अथवा न येवो. इतर लोक अस्तित्वात असतात आणि आपल्याप्रमाणेच ते जगाचा अनुभव घेतात, ही प्राथमिक वस्तुस्थिती काही वेळा आपल्या विचारांमधून निसटून जाऊ शकते. केवळ आपल्यालाच गरज आहे, आपलीच काळजी घेतली जायला हवी, अशा विचाराच्या सापळ्यात आपण सहज अडकण्याची शक्यता असते.
आपल्या जडणघडणीला आकार दिलेल्या, आपल्या अस्तित्वात परिणाम करत राहिलेल्या, आणि भविष्यातही आपल्यावर परिणाम करत राहतील, अशा लोकांचा आपण सुरुवातीला विचार करू. उदाहरणार्थ, आपल्या प्राथमिक गरजा ज्यांनी भागवल्या व अजूनही भागवतात आणि ज्यांनी आपल्याला संरक्षण दिलं व अजूनही देतात, त्या पालकांचा विचार आपण करू शकतो. इतर लोक आपल्याला सोबत देतात. व्यापक पातळीवर, आपण खातो ते अन्न अगणित लोक पिकवत असतात आणि आपण घालतो ते कपडेही अगणित लोकांनी तयार केलेले असतात. या वस्तुस्थितीचं चिंतन केल्यावर इतरांची दखल घेण्यासाठी व त्यांच्याविषयी सहानुभूती व करुणा वाटावी यासाठीची पार्श्वभूमी तयार होते.
इतरांसोबतच्या आपल्या सामायिक वास्तवाकडे लक्ष देणं
इतर लोक अस्तित्वात असतात आणि आपल्याला ते काही ना काही देत असतात, या वस्तुस्थितीपलीकडे आपण हेही लक्षात घ्यायला हवं की, या लोकांचंही भावनिक जीवन असतं. आपलं मूलभूत सारखेपण लक्षात घेणं आणि काही भेद असतील तरी आपण त्यांची दखल घ्यायला हरकत नाही, ही समज आपलं इतरांविषयीचं प्राथमिक परिप्रेक्ष्य वृद्धिंगत करते. आपण ज्या सारखेपणावर लक्ष केंद्रित करतो, ते आपले प्राथमिक मानवी अनुभव आहेत. हे सर्व मानवांमध्ये सारखे असतात. इतर लोक आपल्यासारखेच आहेत आणि त्यांनाही कल्याणाचीच इच्छा असते आणि अडचणी व दुःख त्यांनाही नको असतं. गरजा, भीती, आशा, इत्यादींचा समावेश असलेलं त्यांचंही भावनिक जीवन असतं. तेही आजारी पडतात, त्यांच्याही मर्यादा असतात, त्यांनाही अडचणींना सामोरं जावं लागतं, आनंद व अपयशांचा अनुभव घ्यावा लागतो. या सामायिकतांची दखल घेण्याचं कौशल्य जोपासता येतं व त्याची सवय लावून घेता येते.
विशिष्ट प्रमाणात भावनिक साक्षरता विकसित केली, मनाचा नकाशा व प्रत्यक्ष भावनिक जागरूकता निर्माण झाली, की इतरांसोबतच्या आपल्या सारखेपणाची दखल घेणं सोपं जातं. त्याच वेळी, इतर लोक आपल्यासारखे कसे नाहीत, याचाही शोध घेणं गरजेचं असतं. प्रत्येकाला गरजा, भीती, आशा इत्यादी असलं, तरी आपल्याला ज्या गोष्टींची गरज असते, ज्या गोष्टींची भीती वाटते व ज्या गोष्टींची आशा असते, त्याच गोष्टींबद्दल त्याच भावना त्यांना वाटतील असं नाही. ही वस्तुस्थिती मान्य करून तिचा आदर ठेवायला हवा. शिवाय, इतरांचे जीवनानुभव, परिप्रेक्ष्यं व ज्ञान वेगळं असतं, या सगळ्याचीच दखल घ्यायला हवी. आपल्यामधील भेद जाणून घेणं, त्याचबरोबर सारखेपणाचीही दखल घेणं, यातून स्वतःविषयीची व इतरांविषयीची समज वाढते आणि त्यातून संबंधविषयक कौशल्याचा एक महत्त्वाचा पैलू समोर येतो.
वैविध्य व भेद यांची दखल घेणं
आपण सर्व अनन्य आहोत व वेगळे आहोत, स्वतःची भिन्न वैशिष्ट्यं असलेल्या व इतर समूहांपासून भिन्न असलेल्या सामाजिक समूहांमध्ये आपण राहतो, हा इतरांसोबतच्या आपल्या सामायिक वास्तवाचा एक भाग आहे. आपल्या प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते, आपलं कौटुंबिक पर्यावरण वेगळं असतं, आणि आपल्या अनुभवांनी आपल्या परिप्रेक्ष्याला, मनोवृत्तीला व महत्त्वाकांक्षांना आकार मिळतो.
त्यामुळे वैविध्य हा आपल्या सामायिक वास्तवाचा भाग आहे आणि त्याची तशीच दखल घेता येते- ते आपल्याला दूर न ढकलता एकत्र आणू शकतं. भेदांचा आदर करणं आणि आपल्या सामूहिक जीवनाला वैविध्याद्वारे कोणतं योगदान दिलं जातं हे समजून घेणं, ही जागरूकता आपल्यासारख्या वाढती बहुविधता असलेल्या, जागतिकीकरणोत्तर जगामध्ये विशेष महत्त्वाची ठरते. यातून अस्सल सहानुभूती व करुणा यांना पाया मिळतो.
इतरांविषयीची करुणा
सर्व सामाजिक गुण इतरांविषयीच्या करुणेतून उद्भवलेले असल्याचे दिसते व त्यातून करुणेतच वाढ होते. आंतरवैयक्तिक जागरूकतेमुळे विविध प्रकारच्या सामाजिक गुणांची जोपासना करण्यासाठी मार्ग तयार होतो, तर करुणेमुळे आपल्याला हे गुण नैतिक संदर्भात पाहायला मदत होते. इतरांविषयी करुणा विकसित करण्याचे तीन मार्ग असतात:
- इतरांच्या भावभावना संदर्भामध्ये समजून घेणं
- दयाभाव व करुणा यांची दखल घेणं व जोपासना करणं
- इतर नैतिक वृत्तींची दखल घेणं व जोपासना करणं
इतरांच्या भावभावना संदर्भांमध्ये समजून घेणं
आपल्या भावना समजून न घेतल्याने आपण स्वतःविषयी सतत निवाडा करत राहतो; त्याचप्रमाणे आपल्याला न कळणाऱ्या किंवा मंजूर नसलेल्या मार्गांनी लोक कृती करताना दिसतात, तेव्हाही आपण असाच तत्काळ निवाडा करण्याची स्वाभाविक शक्यता असते. तर, आपल्या भावना गरजांमधून उद्भवतात ही समज असेल तर आपण स्वतःचा स्वीकार करतो व स्वतःविषयी करुणा राखतो, त्याच प्रक्रियेद्वारे आपण इतरांकडेही पाहावं.
लोकांच्या कृती भावनांनी प्रेरित आहेत आणि त्यांच्या भावना एखाद्या संदर्भातून आलेल्या आहेत, त्यात काही एक अंतर्गत गरज आहे, हे लक्षात घेतलं, तर आपल्याला राग येण्याऐवजी किंवा आपण तत्काळ निवाडा करण्याऐवजी सहानुभूती व करुणा राखू शकतो. अयोग्य वर्तनाकडे काणाडोळा करावा, हा यामागचा उद्देश नाही, तर इतरांना व त्यांच्या भावनांना मानवी पातळीवर समजून घेणं, हा उद्देश आहे.
दयाभाव व करुणा यांची दखल घेणं व जोपासना करणं
आपण क्रौर्यापेक्षा करुणेला मूल्यवान मानतो, हे स्वाभाविक वाटत असलं तरी, या प्राथमिक वस्तुस्थितीचाही सहज विसर पडू शकतो. आपल्या स्वतःच्या अनुभवावरून व ऐतिहासिक उदाहरणांवरून आपल्याला कळतं की आपण कायम करुणेला मूल्यवान मानलेलं नाही. मानवांनी इतरांचं क्रौर्य स्वीकार केल्याची किंवा स्वतःच्या क्रूर कृत्यांना सरळ नजरेआड केल्याची अगणित उदाहरणं इतिहासामध्ये आहेत.
करुणा हे शक्तिशाली तत्त्व आहे आणि ते आपल्याला अतिशय उपकारक ठरू शकतं, पण आपल्या मनांनी करुणामय असावं असा केवळ आदेश काढून भागत नाही. करुणा म्हणजे काय असतं व काय नसतं, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला करुणेची जोपासना करायची इच्छा असते याचं मूल्य जाणून घ्यायला हवं. दयाभावाने सुरुवात करणं सर्वसाधारणतः सोपं जातं- इतरांविषयी काळजी वाटणारी, समजूतदार मनोवृत्ती विकसित करणं-, त्यानंतर करुणेकडे जावं.
इतरांचं दुःख दूर करण्याची इच्छा म्हणजे करुणा. अनेकांना करुणा हा मानवी अस्तित्वाचा मध्यवर्ती पैलू वाटत नाही, पण आपली जैविक मुळं करुणेमध्ये असल्याचं संशोधनातून सूचित होताना दिसतं. सर्व सस्तन प्राण्यांना व पक्ष्यांना जगण्यासाठी मातृत्वसेवेची गरज असते. जन्मानंतर काही काळ ते स्वतःच्या बळावर जगू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मानवांसह विविध प्रजातींमधील परोपरकारी वर्तन परस्परांमध्ये अनुबंध निर्माण करतं, त्यातून व्यक्तिगत व सामूहिक अशा दोन्ही पातळ्यांवर जगून राहण्यासाठी व भरभराटीसाठी हातभार लागतो. तर, अनेक अर्थांनी करुणा हा जगण्याचा आधार आहे. अगदी लहान वयापासूनच माणसं दयाभावाला पसंती का देतात, आणि करुणेला आपण अगदी शारीर पातळीवरही सकारात्मकतेने प्रतिसाद का देतो, हे यातून स्पष्ट होतं.
इतर नैतिक वृत्तींची दखल घेणं व जोपासना करणं
करुणेसोबतच कृतज्ञता, क्षमाशीलता, समाधान, नम्रता, संयम इत्यादी वृत्तींची जोपासना आपण करू शकतो. या सर्व वृत्ती अंतर्गत गुणांशी संबंधित आहेत, भौतिक संपत्ती किंवा यश यांच्याशी नव्हे. आपल्या जीवनाला उपकारक व सुखकारक अशा या वृत्ती आहेत. पुढे-पुढे करत राहणं किंवा संपत्ती कमावत राहणं, याऐवजी लोकांना मूल्यवान मानणं आणि त्यांच्यामुळे आपलं जीवन कसं संपन्न होतं याची दखल घेणं, यातून दीर्घकालीन समाधन व सुख लाभतं. हे अंतर्गत गुण किती महत्त्वाचे आहेत, याची दखल आपण घेण्याची गरज आहे. विशिष्ट पातळीपर्यंत भौतिक कल्याण साधल्यानंतर जीवनातील समाधान घटतं, तर कृतज्ञता व सुख हे मुलांमधील व प्रौढांमधील घट्ट दुवे असतात, असं संशोधनातून दिसतं. कृतज्ञतेमुळे केवळ जीवनातील समाधान वाढतं असं नव्हे, तर समाजमाध्यमं, जाहिराती व दूरचित्रवाणी यातून दिल्या जाणाऱ्या भौतिकतावादी संदेशावरचा हा शक्तिशाली उतारादेखील आहे.
इतर लोक अनेक मार्गांनी आपल्याला उपकारक ठरत असतात आणि हे लाभ आपण सहेतूकरित्या अनुभवत असतोच असंही नाही. इतरांनी काय केलं नाही- इतरांनी चोरी केली नाही, इजा केली नाही किंवा आपला अपमान केला नाही- याचीही आपण दखल घ्यायला हवी. अधिक प्रगत पातळीवर, इतर लोक इजा पोचवण्यासाठी कृती करतात त्यातूनही आपला लाभ कसा होतो याची दखल आपल्याला घेता येते. आत्यंतिक अडचणी अनुभवूनही त्यातून तग धरलेल्या, स्वतःच्या परिप्रेक्ष्यांमध्ये रूपांतर घडवून आनंदी व संपन्न आयुष्य जगणाऱ्या लोकांची उदाहरणं आपण अभ्यासू शकतो. इतरांच्या गैरवर्तनाकडे आपण दुर्लक्ष करायला नको, पण या नवीन परिप्रेक्ष्याद्वारे आपण राग, रोष व तिरस्कार बाहेर काढू शकतो. इतरांच्या कृती आपल्याला कशा उपकारक ठरतात याचा शोध घेतला की कृतज्ञतेची अस्सल व टिकाऊ जाणीव जोपासली जाते, त्यातून इतरांसोबत सक्षम अनुबंध निर्माण होतो.
आत्मकेंद्री प्रवृत्तीच्या तोट्यांवर आपण विचार करतो, आणि आपलं सुख व कल्याण इतरांच्या अगणित दयाभावी कृतींवर अवलंबून असल्याचं लक्षात घेतो, तेव्हा आपल्याला स्वाभाविकपणे कृतज्ञता वाटते.
आपण सहानुभूतीची जोपासना करण्याचीही गरज असते. इतरांचे अनुभव- त्यांचे आनंद व दुःख- लक्षात घेऊन त्याबद्दल संवेदनशील राहण्याची क्षमता म्हणजे सहानुभूती. आपले मित्रमैत्रिणी व प्रियजन यांच्याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना आपोआप सहानुभूती वाटते, पण व्यापक प्रकारे निःपक्षपातीपणे सहानुभूतीचा विस्तार करणंही शक्य असतं. सहानुभूती आणि आपल्या मूलभूत सामायिक सारखेपणाविषयीचं ज्ञान यांच्यात संयोग घडतो, तेव्हा अस्सल सहानुभूती निर्माण होते, त्याला आपल्या पूर्वग्रहाची फारशी मर्यादा नसते. इतरांशी सहानुभूतीने जोडून घेताना त्यांचा दृष्टिकोन व परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. उदाहरणार्थ, “ती व्यक्ती स्वार्थी आहे” असं म्हणण्याऐवजी आपण असं म्हणू शकतो की, “त्या व्यक्तीचं वर्तन स्वार्थी मानता येईल.” यातून आपण त्या व्यक्तीला कायमस्वरूपी स्वार्थी मानणं टाळू शकतो आणि ती व्यक्ती निःस्वार्थीपणे वागत असेल ते प्रसंग लक्षात घेण्याइतका खुलेपणा आपल्यामध्ये टिकून राहतो.
इतरांसोबतच्या आपल्या सारखेपणाचा शोध घेताना आणि कृतज्ञता व सहानुभूती विकसित करताना आपण स्वाभाविकपणे क्षमाशीलताही कमावू लागतो. आपण स्वतःच्या अवास्तववादी अपेक्षा सोडून देतो आणि स्वतःचा स्वीकार करू लागतो, तेव्हा इतरांविषयीचा राग व रोष सोडून देणं सोपं होतं. अशा प्रकारे आपण इतरांना क्षमाशीलतेची भेट देऊ शकतो.
संबंधांविषयीची कौशल्यं
आपल्याला नियमितपणे गुंतागुंतीच्या सामाजिक अन्योन्यक्रीडांमधून मार्गक्रमणा करायची असते- यात मैत्रीपासून ते कौटुंबिक नाट्यापर्यंत व कार्यालयीन कामकाजापर्यंत अनेक घडामोडींचा समावेश असतो. सुखी व यशस्वी होण्यासाठी व्यापक सामाजिक परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक आहे. अर्थपूर्ण व सकारात्मक संबंध विकसित करून टिकवून ठेवण्याच्या क्षमतेशी, आणि हानिकारक संबंध ओळखून तोडून टाकण्याशी दीर्घकालीन कल्याण घट्ट जोडलेलं असतं.
या मार्गक्रमणेचे आधीचे दोन घटक- आपल्या सामाजिक स्वभावाविषयीची जागरूकता, त्याचप्रमाणे संदर्भासहित इतरांच्या भावना समजून घेण्याशी घातलेली या जागरूकतेची सांगड- पाया तयार करतात. या पायावर आपण स्वतःच्या व इतरांच्या कल्याणाशी सुसंगत असतील अशी प्रत्यक्षातील कौशल्यं, वर्तन व आचार उभारू शकतो. आपलं वर्तन सहानुभूती व करुणा यांच्यात रुजलेलं असेल, तरी काही वेळा आपल्या कृती विपरित परिणाम करणाऱ्याही ठरू शकतात. आपले हेतू चांगले असले, तरी आपल्याला व इतरांना त्यातून अजाणतेपणी अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. अधिक अनुभव घेऊन आपण या शक्यता कमी करू शकतो. कोणतीही कौशल्यं मूर्तरूपात होत नाहीत व स्वाभाविक होत नाहीत, तोवर आपण त्यांचा सक्रिय सराव करू शकतो. आपण चार पैलूंचं प्रशिक्षण करू शकतो:
- सहानुभूतीने ऐकणं
- कुशल संदेशन
- इतरांना मदत करणं
- संघर्षांमध्ये बदल
सहानुभूतीने ऐकणं
इतरांचं खुल्या मनाने ऐकून घेणं आणि भावनिक प्रतिक्रियेने स्वतःचं मन बंद न करणं, म्हणजे सहानुभूतीने ऐकणं होय. दुसऱ्या व्यक्तीची मतं आपल्याहून भिन्न असली तरी त्या व्यक्तीविषयीचा आदर व दखल घेण्याची सवय यांमध्ये हा पैलू रुजलेला असतो. “सखोल ऐकण्या”च्या उपक्रमाने आपण सहानुभूतीने ऐकण्याचा सराव करू शकतो. यात आपण सलग काही मिनिटं स्वतःची काही टिप्पणी न करता किंवा निवाडा न देता इतरांचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो. किंवा, आपण कदाचित असहमत होऊ अशा गोष्टी बोलणाऱ्या लोकांना पाहावं किंवा त्यांचं ऐकावं, आणि आपण भावनिक प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडं थांबून त्यांचं बोलणं निराळ्या शब्दांत पुन्हा मांडावं.
केवळ पृष्ठस्तरावरील आशयाकडेच नव्हे, तर अंतःस्थ गरजा व आकांक्षा यांच्याकडे लक्ष देऊन ऐकणं म्हणजे सहानुभूतीने ऐकणं. यामुळे लोक काय बोलतायंत यातील आशयाची समजूत संदर्भासह आकळते.
कुशल संदेशन
ऐकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहेच, पण समजूतदार, उत्पादन आणि आपल्याला व इतरांना सबळ करेल अशा रितीने बोलण्याची संदेशनक्षमताही आपल्यात असणं गरजेचं आहे. केवळ स्वतःशीच बोलण्यापुरतं नव्हे, तर स्वतःचं बोलण्याची क्षमता नसलेल्यांच्या वतीने आदराने व सुस्पष्ट रितीने बोलण्याची क्षमता म्हणजे “सबलीकरण करणारं संदेशन” होय. वादचर्चा हे अतिशय शक्तिशाली साधन असू शकतं. उदाहरणार्थ, आपण मित्रांशी वादचर्चा करू शकतो आणि आपण सर्वसाधारणतः असहमत होऊ असा पक्ष त्या वेळी घेऊ शकतो. आपल्या मतांना विरोध करणाऱ्यांना अवैध ठरवणं किंवा अगदी त्यांचं अमानवीकरण करणं, अशी आपली माणूस म्हणून प्रवृत्ती असते, अशा वेळी वादचर्चेसारख्या उपक्रमांमुळे नम्रता, बौद्धिक जिज्ञासा व सामायिक मानवतेची भावना जोपासायला मदत होऊ शकते.
इतरांना मदत करणं
ऐकून घेणं व संदेशन या मूलभूत गोष्टी आहेत, पण इतरांना मदत करण्याचे इतर असंख्य मार्ग असतात. इतरांना आपण करत असलेली मदत कायम त्यांच्या गरजांशी सुसंगत असायला हवी, आणि आपल्या स्वतःच्या क्षमतेच्या प्रमाणात असायला हवी. स्वतः मदत स्वीकारण्यापेक्षा समुदायाची सेवा करण्यापासून ते स्वेच्छेने केलेल्या कार्यापर्यंत व “दयाळूपणाच्या यादृच्छिक कृतीं”पर्यंत कोणत्याही मार्गाने इतरांना मदत केली, तर आपलं अधिक कल्याण होतं, असं संशोधनातून दिसतं.
इतरांना मदत करण्याच्या प्रक्रियेवर विचार करण्यासाठी आपण थोडा वेळ घ्यावा: आपण मदत करतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं, आपण त्यातून काय शिकतो, आपण ते कसं वाढवू शकतो, आणि आपण ज्यांना मदत करतोय त्यांच्यावर याचा कोणता परिणाम होतो. अखेरीस, वरकरणी दिसतं त्याहून खोल जाऊन इतरांना दीर्घकालीन कल्याणाच्या दृष्टीने कोणत्या मदतीची खरोखरची गरज आहे, त्याचाही शोध घ्यावा.
संघर्षांमध्ये बदल
जगताना आपल्याला अपरिहार्यतेने संघर्षाला सामोरं जावं लागतं. संघर्ष मूलतः वाईटच असतो असं नाही; पण संघर्षातून स्वतःसाठी व इतरांसाठी वाट काढणं हे एक मूल्यवान कौशल्य आहे. संघर्षाचं निवारण करणं हा परिस्थितीमध्ये व संबंधांमध्ये बदल घडवण्याचा केवळ एक मार्ग आहे, आणि त्यातून दोन्ही पक्षांचं कल्याण साधतं. त्यासाठी संघर्षाला रचनात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता आपल्या अंगी असावी लागते, त्याचप्रमाणे सहकार्य, समेट व शांततापूर्ण संबंधांना वाव देण्याचीही क्षमता असायला हवी.
अंतर्गत शांततेमुळे बाहेरच्या शांततेचा पाया रचला जातो. त्याचप्रमाणे अंतर्गत समेटातून बाहेरचा समेट साधला जातो. अंतर्गत विश्व हाताळण्यातून संघर्षात यशस्वीरित्या बदल करण्याच्या शक्यता वाढतात. नम्रता, सहानुभूती, करुणा, क्षमाशीलता, निःपक्षपातीपणा व आपली सामायिक मानवता मान्य करणं, यांची जोपासना केल्याशिवाय संघर्षांमध्ये बदल करणं व संघर्षांचं निवारण अवघड असतं, किंबहुना अशक्य असतं. ही कौशल्यं उपस्थित असतील, तिथे संघर्ष निवाराणाचं कार्य अधिक सखोल व सर्व संबंधितांना खरोखरचा परिवर्तनकारी अनुभव देणारं ठरू शकतं.
सारांश
या अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागात आपण स्वतःला चांगल्या तऱ्हेने समजून घेण्यासाठी भावनिक साक्षरता विकसित करतो. दुसऱ्या भागामध्ये आपण आपले कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, सहकारी व अनोळखी लोक यांना सामोरं जाताना हे आकलन वापरतो. संबंधविषयक कौशल्यांचा विकास दयाभाव व करुणा या तत्त्वांशी जोडलेला आहे. या तत्त्वांचा पुरेसा सराव आपण केला की सामाजिक कौशल्यं केवळ तंत्रसंचाच्या रूपात राहत नाहीत, तर इतरांची दखल घेण्याच्या व त्यांच्याविषयी आस्था राखण्याच्या आपल्या भावनेची ती एक स्वाभाविक निष्पत्ती होऊन जाते. आपण सकारात्मक व्यूहरचना स्वीकारतो व त्यांचा सराव करतो तेव्हा सामाजिक संदर्भांमध्ये आपल्याला अधिक सौहार्दपूर्ण संबंधांचा अनुभव मिळतो, एवढंच नव्हे तर आपण अधिक सुखी व अधिक संतुष्ट होतो.
याहून सखोल जायची इच्छा असल्यास ‘सी’ शिक्षणाच्या चौकटीचा पूर्ण परिचय वाचावा आणि ‘सेंटर फॉर कन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्स’च्या इतर कार्यक्रमांबद्दलही माहिती घ्यावी.