‘सी’ शिक्षण: आपल्या भावनांचं आकलन

सामाजिक, भावनिक व नैतिक शिक्षण, एमोरी विद्यापीठ, संक्षिप्त चौकट

सामाजिक, भावनिक व नैतिक (Social, Emotional and Ethical: SEE / सी) शिक्षणाचा कार्यक्रम एमोरी विद्यापीठातील ‘सेंटर फॉर कन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्स’ने विकसित केला आहे. भावनिकदृष्ट्या सुदृढ व नैतिकदृष्ट्या जबाबदार व्यक्ती, सामाजिक समूह व व्यापक समुदायांचं संगोपन करणं, हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. “‘सी’ शिक्षण: आपल्या भावनांचं आकलन” या पहिल्या भागामध्ये आपण स्वतःच्या भावनांमधून मार्ग कसा काढायचा व भावना कशा हाताळायच्या हे शिकून घेऊ.

प्रस्तावना

आपल्या जीवनातील वैयक्तिक, सामाजिक व जागतिक अशा तीन क्षेत्रांमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी “‘सी’ शिक्षण” या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. या तीन अवकाशांकडे स्वतंत्रपणे किंवा कोणत्याही क्रमाने जाता येतं; परंतु, इतरांच्या व व्यापक समुदायांच्या- अगदी संपूर्ण जगाच्या गरजांकडे लक्ष देणं शिकायचं असेल, तर आपण आधी स्वतःच्या गरजांकडे व अंतर्गत जीवनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

“भावनिक साक्षरता” विकसित करून आपण हे साधतो. भावना ओळखणं आणि स्वतःवर व इतरांवर त्यांचा कोणता परिणाम होतो ते समजून घेणं, याचा या साक्षरतेमध्ये समावेश होतो. हे समजून घेतल्यावर आपल्याला आपल्या भावनांना यशस्वीरित्या दिशा देता येते. अखेरीस, इतरांना व आपल्याला हानिकारक ठरेल असं आवेगपूर्ण वर्तन टाळणं आपल्याला भावनिक साक्षरतेमुळे शक्य होतं. आपल्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने योग्य ठरतील असे निर्णय घेण्यासाठी मनाची शांतता गरजेची असते, तीही यातून साधता येते. तर, आपल्या भरभराटीसाठी भावनिक साक्षरता हे महत्त्वाचं कौशल्य असतं.

वैयक्तिक अवकाशातील जागरूकता, करुणा व प्रतिबद्धता

जागरूकता, करुणा व प्रतिबद्धता या ‘आयाम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन कार्यक्षमतांची जोपासना करणं हा “‘सी’ शिक्षणा”मागील उद्देश आहे. आपल्याला वैयक्तिक प्रश्न हाताळण्यासाठी, अधिकाधिक व्यामिश्र होत जाणाऱ्या जगाला सामोरं जाण्यासाठी आणि जबाबदार जागतिक नागरिक होण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान, कौशल्यं व प्रेरणा पुरवण्यासाठी हे आयाम एकत्र येतात. वैयक्तिक अवकाशामध्ये या तीन आयामांकडे तीन भिन्न परिप्रेक्ष्यांतून बघितलं जातं:

 • लक्ष देणं व स्व-जागरूकता
 • स्व-करुणा
 • स्व-नियमन

लक्ष देणं व स्व-जागरूकता म्हणजे आपलं लक्ष उचित ठिकाणी वळवणं, जेणेकरून आपण स्वतःच्या मानसिक व शारीरिक अवस्थांविषयी अधिक जागरूक होऊ. “मनाच्या नकाशा”च्या मार्गदर्शनानुसार आपल्या भावनांविषयी शिकण्याचा यात समावेश होतो. त्यानंतर स्व-करुणेद्वारे आपण स्वतःच्या भावभावनांची तपासणी करायला शिकतो, आणि व्यापक संदर्भात त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आपण भावना कोणत्या कारणांमधून व परिस्थितींमधून उद्भवल्या त्याचा तपास करतो, त्यातून आपण स्वतःचा अधिक स्वीकार करू लागतो. अखेरीस, पहिल्या दोन परिप्रेक्ष्यांतून मिळालेल्या मर्मदृष्टींद्वारे आपण स्व-नियमनाशी प्रतिबद्ध होतो, त्यातून उत्तेजकतेवर नियंत्रण मिळवू पाहतो, जीवनातील दैनंदिन आव्हानांना रचनात्मक प्रतिसाद देण्याची आपली क्षमता सुधारतो. 

एकंदरित विचार करता वैयक्तिक अवकाशातील हे विषय भावनिक साक्षरता जोपासणारे ठरू शकतात. आपल्या मनाच्या व भावनांच्या व्यामिश्र अंतर्गत प्रांताबाबत वाटाघाटी करण्याची क्षमता नसेल, तर आपल्या खोलवर रुजलेल्या, आत्मघातकी सवयींच्या आकृतिबंधावर मात करणं अशक्य होऊन जातं. यातून आपल्या स्व-नियंत्रणाच्या क्षमतेला आणि अगदी आपल्या स्वातंत्र्यालाही मर्यादा पडतात. स्वार्थी न होता आपण स्वतःची जोपासना करताना विकसित केलेली विशिष्ट साधने व कौशल्यं वापरून मानसिक अपहरण टाळता येतं आणि आपल्याला स्वतःची भरभराट होण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी आवश्यक कृती करणं शक्य होतं. या तीन परिप्रेक्ष्यांकडे अधिक सखोलरित्या पाहू.

लक्ष देणं व स्व-जागरूकता

आपल्या शरीरात व मनामध्ये काय घडतं आहे याबद्दलची प्रत्यक्ष जागरूकता आणि शरीर व मन याबद्दलची उपलब्ध माहिती यांच्यात संयोग घडवायचा, हे वैयक्तिक अवकाशाचं उद्दिष्ट असतं. उदाहरणार्थ, आपल्या भावभावनांकडे लक्ष देऊन आपण आपल्या अनुभवातील संतापाची दखल घ्यायला शिकतो, तर संताप म्हणजे काय, तो का उद्भवतो आणि तो शांत कसा करता येतो, याचं बौद्धिक आकलनही करून घेतो. थेट अनुभव आणि शिकून मिळलेलं ज्ञान यांच्यातील संयोग ही भावनिक साक्षरतेची पहिली पायरी आहे.

लक्ष देणं व स्व-जागरूकता यांसाठी तीन कार्यक्षमता आवश्यक आहेत:

 • स्वतःच्या शरीराकडे व संवेदनांकडे लक्ष देणं
 • आपल्या भावभावनांकडे लक्ष देणं
 • मनाचा नकाशा अनुसरणं

आपल्या शरीराकडे व संवेदनांकडे लक्ष देणं

आपल्या शरीरामध्ये संवेदनांच्या पातळीवर काय घडतं, याकडे लक्ष द्यायला आपण सुरुवात करतो. आपल्या मज्जासंस्थेच्या अवस्थेची माहिती पुरवणारा शरीर हा सततचा स्रोत असतो, कारण मानसिक अवस्थांमध्ये शरीरात सर्वत्र बदल होतात: हृदयाचे ठोके, स्नायू घट्ट वा शिथील होणं, उष्ण वा थंड वाटणं, इत्यादी. शरीरात काय घडतं आहे याकडे लक्ष दिलं तर सर्वसाधारणतः आपल्याला आपल्या मानसिक अवस्थेविषयी माहिती मिळते, एखाद्या अभवाच्या केवळ मानसिक पैलूंचा विचार करण्यापेक्षा ही माहिती अधिक वेगाने मिळते.

आपल्या शरीरातील संवेदनांबद्दल जागरूक राहून आपल्या मज्जासंस्थेकडे लक्ष दिल्याने आपण हळूहळू ताणाच्या व चांगल्या आरोग्याच्या खुणा ओळखू लागतो. आपण अति-उत्तेजित (चिंताग्रस्तता, अवाजवी संताप, त्रस्तता) किंवा कमी-उत्तेजित (आळस, निराशा वाटणं) अवस्थेत आहोत का, हे आपण अधिक चटकन ओळखायला लागतो. ही जागरूकता म्हणजे शरीराचा समतोल राखायला शिकण्यामधील आणि शारीरिक चांगल्या आरोग्याच्या अवस्थेकडे परत जाण्यासाठीचं पहिलं पाऊल असतं. स्वतःच्या व इतरांच्या सर्वोत्तम हितासाठी कृती करण्यासाठीच्या या पूर्वअटी आहेत.

आपल्या भावभावनांकडे लक्ष देणं

शरीराकडे लक्ष द्यायला व त्याचं नियमन करायला शिकलं, तर भावभावनांकडे लक्ष देण्याचा पाया घालता येतो. शरीर जितकं शांत व स्थिर असेल, तितकं मन अधिक सहजतेने एकाग्र होतं.

भावना अतिशय चटकन निर्माण होऊ शकतात, सर्वसाधारणतः त्यांची सुरुवात ठिणगीच्या रूपात होते, आणि मग त्यातून वणवा पेटतो. आपण स्वतःच्या नकारात्मक भावना ठिणगीच्या टप्प्यातच ओळखल्या, तर आपण त्या अधिक सहजतेने हाताळू शकतो. पण हे करण्यासाठी आपल्याला भावभावना सद्य क्षणामध्ये कशा उद्भवल्या हे जाणून घेण्याची क्षमता विकसित करणं गरजेचं असतं. सजगतेसारख्या उपासनांनी ही क्षमता शिकून घेता येते व वेळ देऊन सुधारताही येते.

मनाचा नकाशा अनुसरणं

आपल्या भावभावना ओळखताना मनाच्या नकाशाचं खूप सहाय्य होतं. आपल्या भावनिक प्रदेशातून वाट शोधताना हे एक महत्त्वाचं संसाधन ठरतं. मनाच्या नकाशाद्वारे मिळालेली माहिती आपल्याला भावनांच्या भिन्न कुटुंबांची, त्यांच्या सामायिक वैशिष्ट्यांची ओळख करून देते, आणि या भावना कशामुळे उद्भवतात व त्यांना का चालना मिळते हे ओळखण्यासाठीही सक्षम करते. सर्व भावना अंगभूतरित्या विध्वंसक नसतात, तर विशिष्ट संदर्भात व परिस्थितीत त्या अनुचित असल्यामुळे विध्वंसक होतात, हे आपल्या लक्षात येतं. उदाहरणार्थ, विषारी सापाच्या जवळ जाऊ नये असा इशारा देत असेल तेव्हा भीती रचनात्मक ठरते, पण सततच्या चिंतेमध्ये ती रूपांतरित झाली तर ती विपरित परिणाम करणारी ठरते.

मनाच्या नकाशाचं मार्गदर्शन घेऊन भावनिक सजगतेची जोपासना केली, तर आपल्या लक्षात येतं की, त्रस्तता ही सौम्य भावनिक अवस्था आहे, त्यातून संताप निर्माण होऊ शकतो, आणि अनिर्बंध संतापातून रोषाचा स्फोट होऊ शकतो. भावना अनियंत्रित भावनिक अवस्थांमध्ये रूपांतरित होण्यापूर्वी त्यांची सूक्ष्म रूपं ओळखण्याची क्षमता हे समतोल मानसिक आरोग्यासाठीचं एक महत्त्वाचं कौशल्य आहे.

स्व-करुणा

स्व-करुणा म्हणजे स्वानुकंपा, फाजील आत्मसंतुष्टता किंवा केवळ अति स्वाभिमान नव्हे. स्व-करुणा म्हणजे खरोखर स्वतःची काळजी घेणं असतं, विशेषतः आपल्या अंतर्गत जीवनासंदर्भातील ही काळजी असते. आपल्या भावना आपल्या गरजांशी कशा संबंधित असतात, हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. भावनिक साक्षरतेच्या या स्तरामुळे स्वतःचा अधिक स्वीकार करता येतो, कारण आपल्या भावना का व कशा उद्भवतात हे समजून घेतल्यावर आपण स्वतःविषयी काही ठोस निवाडा न करता त्या भावनांशी जोडून घेऊ शकतो. त्यानंतर भावना क्षणभंगुर असल्याचं आपल्या लक्षात येतं, त्या विशिष्ट संदर्भांमध्ये उद्भवतात आणि आपल्या मनाचा अपरिवर्तनीय भाग नसतात, हे आपल्याला कळतं, यातून आपला आत्मविश्वास वाढतो आणि स्वतः काम करण्याची प्रेरणा मिळते.

ही दोन वैशिष्ट्यं आहेत- स्वतःचा स्वीकार व आत्मविश्वास. यातून आपल्याला टीका स्वीकारण्याचा व अपयश रचनात्मकदृष्ट्या व चिकाटीने हाताळण्याचा पाया लाभतो. निराशेमुळे अतिरिक्त आत्मटीका किंवा आत्ममूल्य गमावणं असा परिणाम होऊ नये याची काळजी याद्वारे घेतली जाते. स्व-करुणेचे दोन पैलू आहेत:

 • भावना संदर्भासह समजून घेणं
 • स्वतःचा स्वीकार

स्व-करुणा आपल्या कार्यक्षमतांच्या वास्तववातील मूल्यमापनावर आधारलेली असते. आपण स्वतःबाबत दयाळू नसलो, तर आपल्याला शक्य नसलेल्या गोष्टीही आपण करू शकतो असं वाटण्याची शक्यता असते, त्यातून निराशा व अक्षमीकरण होतं. ऐहिसक यशानुसार स्वतःचं मूल्यमापन करण्याऐवजी आपण स्वतःच्या कमतरता प्रामाणिकपणे, समजुतीने व संयमाने कबूल कराव्यात.

भावना संदर्भासहित समजून घेणं

आपल्या भावना संदर्भासह समजून घेणं- त्या आपल्या मूल्यांशी, गरजांशी व अपेक्षांशी कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेणं, यांसाठी चिकित्सक विचारप्रक्रिया आवश्यक आहे. आपल्या अंतर्गत जगाकडे लक्ष देण्याचे आपण आधी शिकलो आहोत, त्यामुळे इथे आपण हे समजून घेऊ की, कोणत्याही परिस्थितीला दिली जाणारी भावनिक प्रतिक्रिया बाह्य निमित्ताने आलेली नसते, तर आपल्या परिप्रेक्ष्यांमुळे व मनोवृत्तीमुळे आलेली असते. आपल्या स्वतःच्या गरजांविषयीच्या वस्तुनिष्ठ आकलनामध्ये ही परिप्रेक्ष्यं व मनोवृत्ती रुजलेल्या असतात. उदाहरणार्थ, एखाद्या परिस्थितीत स्थैर्य शक्य नसतानाही आपण त्याची इच्छा ठेवतो, त्यातून चिंताग्रस्तता निर्माण होऊ शकते. स्वतःचा आदर केला जावा या गरजेतून संताप उद्भवू शकतो. वेळ व संयम आवश्यक असणाऱ्या परिस्थितीत तत्काळ बदल व्हावा या इच्छेमधून निराशा येऊ शकते. या सर्व प्रसंगांमध्ये मुख्यत्वे आपल्या मनोवृत्ती व अपेक्षा यांमुळे भावना उद्भवलेल्या असतात.

ही मर्मदृष्टी आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपण अधिक योग्य पातळीवरून स्वतःचं मूल्य ओळखतो व आपल्या स्व-मूल्याची दखल घेतो आणि स्व-मूल्याची व आत्मविश्वासाची भावना जोपासतो, त्याचसोबत स्वतःविषयी रोगट निवाडा केला जाईल अशा अवास्तव अपेक्षाही ओळखायला शिकतो. भावनिक प्रतिक्रिया अनेकदा गरजांमधून उद्भवलेल्या असतात, हे ओळखल्याने आपण त्या गरजांचं चिकित्सक मूल्यमापन करायला सुरुवात करतो, आणि सर्व गरजा समान नसतात हेही समजून घेतो. गरजा कोणत्या आणि आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी कोणत्या, यातील भेद समजून घेण्याचाही समावेश यात होतो, त्यातून आपण स्वतःच्या मूल्याची खल घेतो आणि मग ही मूल्यं प्रदर्शित करणाऱ्या जीवनाच्या दिशेने जातो. अल्पकालीन दृष्टीने हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी दीर्घकालीन कल्याण साधतातच असं नाही, हे यातून स्पष्ट होतं.

स्वतःचा स्वीकार

स्वतःचा स्वीकार अतिशय महत्त्वाचा असतो, कारण आपल्या समाजातील संताप अधिकाधिक आतल्या बाजूला वळतो आहे. अवाजवी आत्म-टीका, स्वतःचा तिरस्कार व स्वतःचा तिटकारा, या गोष्टी व्यक्तीच्या आरोग्याचं व सुखाचं अतिशय नुकसान करणाऱ्या आहेत आणि त्यातून इतरांचंही प्रचंड नुकसान होऊ शकतं. स्वप्रतिष्ठेची पुनर्स्थापना करणं हा यावरचा सर्वोत्तम उपाय नसेलही, कारण इतरांशी तुलना करून स्वप्रतिष्ठा उभी असते आणि व्यक्तीच्या उच्च स्वप्रतिष्ठेला धोका निर्माण झाला की त्यातून आक्रमकतेचा आविष्कार होतो. त्यापेक्षा आपलं भावनिक जीवन व गरजा अधिक चांगल्या समजून घेऊन मनोधैर्य, चिकाटी, नम्रता व धाडस जोपासणं, हा चांगला पर्याय आहे. असं केल्याने आपल्याला परिपूर्णतावादी आदर्श शिथील करता येतात आणि स्वतःविषयी व इतरांविषयी वास्तववादी अपेक्षांच्या दिशेने जाता येतं.

समाजमाध्यमं, दूरचित्रवाणी, चित्रपट, इत्यादींद्वारे अनेक अवास्तविक कल्पना अचाट परिणामकारकतेने आपल्याला शिकवायचं काम आधुनिक संस्कृती करते आहे. अनेकदा आपण स्वतःची तुलना आदर्श रूप दिलेल्या तारेतारकांशी करतो किंवा आपण ‘सुपरमॅन’ किंवा ‘वंडर वूमन’सारखं काम करायला हवं असं मानतो, यात अपुरेपणा व मर्यादा बाजूला सारलेल्या असतात. अशा अशक्यप्राय प्रमाणकांमुळे अनावश्यक मानसिक व्यथा निर्माण होते. यातून उद्भवणाऱ्या त्रस्ततेतून अखेरीस निराशा व स्वतःला दोष देणं सुरू होतं, अगदी स्वतःला शारीरिक इजा पोचवणं किंवा बाहेरच्या जगाविषयी वैरभाव व हिंसाचार असेही प्रकार यातून घडतात.

स्वतःच्या भावनिक जीवनाची आपली समजूत मर्यादित असते, तेव्हा आपल्याला आव्हानं, अडचणी व अपयश पेलण्यामध्ये जास्त अडचण येते, आणि आपण बदलाच्या व रचनात्मक कृतीच्या संधी शोधण्याची शक्यताही कमी होते. हे विषारी चक्र टाळण्यासाठी स्वतःच्या मर्यादांविषयीचं वास्तववादी परिप्रेक्ष्य गरजेचं असतं. स्वतःच्या अडचणींविषयी, त्यांचं स्वरूप व उगम यांविषयी संयम व समजूत विकसित करून आपण या हानिकारक मनोवस्थांपासून व वर्तनापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी प्रेरित होतो. त्याच वेळी आपण स्वतः व इतरांनी निर्धारित केलेल्या यादृच्छिक प्रमाणकांची पूर्तता करण्यासाठी लागणारी क्षमता व कामगिरी यांच्या अलाहिदा आपलं असं काही स्वमूल्य आहे, हेही आपण शिकतो. ही स्व-मूल्याची जाणीव बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसते आणि चिवटपणाला हा ताकदीचा आधार लाभतो.

काही प्रमाणात निराशा व व्यथा अनिवार्य आहे, या वस्तुस्थितीचा विचार करून आपण स्वतःचा स्वीकार करायला शिकतो. सगळ्यात सर्वोत्तम असणं, सतत जिंकणं, सर्वज्ञ असणं, किंवा कधीही चूक न करणं अशक्य आहे. केवळ आपणच याला सामोरं जात असतो असं नाही. प्रत्येकाच्या जीवनाची ही वस्तुस्थिती आहे.

स्व-नियमन

आधीच्या छेदकामध्ये नमूद केलेले विषय व उपासना यांमुळे स्व-नियमनासाठीची पार्श्वभूमी तयार होते. शरीर, मन व भावना यांच्या संदर्भात प्राप्त केलेल्या मर्मदृष्टी व जागरूकता बळकट करणाऱ्या उपासना व वर्तन यांचा संदर्भ स्व-नियमनाला असतो. आपल्या भावनांमुळे आपल्याला व इतरांना समस्यांना सामोरं जावं लागू नये, यासाठी आपण भावनांना यशस्वीरित्या दिशा द्यावी, हे इथलं उद्दिष्ट आहे: आपल्या भावना आपले मित्र होतात, अडथळे राहत नाहीत. स्व-नियमनामध्ये तीन घटक आहेत:

 • शरीराचा समतोल साधणं
 • बोधात्मक व आवेगावर नियंत्रण
 • भावनांना दिशा देणं

शरीराचा समतोल साधणं

आपण तणावाखाली असू किंवा अति अथवा कमी उत्तेजित अवस्थेत असलो, तर आपल्या भावनांना दिशा देण्यासाठी आवश्यक असलेलं बोधात्मक व आवेगावरील नियंत्रण जोपासणं सोपं नसतं. शरीराचं काहीएक नियमन केल्याशिवाय मनाचं स्थैर्य व स्पष्टता जवळपास अशक्य असतं. तर, शरीराचा समतोल साधण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपासना उपकारक ठरतात. आरंभिक बालपणामध्ये आपण ताण अथवा विपरित अनुभव सहन केले असतील, किंवा आपण अनिष्टकारक परिस्थितींमध्ये राहत असू, तर ही पायरी विशेष महत्त्वाची असते.

शरीराचा समतोल राखणं आणि शरीराला निव्वळ विश्रांती देणं किंवा झोपी जाणं यांच्यात फरक करणं गरजेचं आहे. लक्ष देण्यासाठी व शिकण्यासाठी पूरक ठरेल अशी शारीरिक व मानसिक नियमनाची अवस्था आणणं, हे इथले उद्दिष्ट आहे. ही सक्रिय, चिवट व समतोल अवस्था आहे, मरगळलेली, झोपाळू वा आळशी अवस्था नाही.

शरीराचा समतोल साधण्यासाठीची पहिली पायरी म्हणून सुरक्षित अवकाश निर्माण करायला हवा. विश्वास व सुरक्षिततेची भावना नसेल, तर आपण अति सतर्कतेच्या अवस्थेमध्ये राहतो. परंतु, आपल्याला सुरक्षित वाटल्यावर आपण कुतूहलाद्वारे स्वतःचे विचार व भावना यांचा शोध घेतो. अंदाज बांधता येण्यातून सुरक्षितता निर्माण होते आणि सातत्यपूर्ण वर्तनातून अंदाज बांधण्याची क्षमता विकसित होते. इथे सातत्य म्हणजे स्वतःविषयीचा कठोरपणा नव्हे, तर स्वतःशी समजुतीने व करुणेने वागण्यातील सातत्य इथे अभिप्रेत आहे.

शरीराचा समतोल साधणं व सुरक्षिततेची भावना विकसित करणं, यांना खालील गोष्टींचं सहाय्य होऊ शकतं:

 • “संसाधनां”पर्यंत जाण्याचा सराव आपण करावा लागतो, संसाधनं बाहेरची असू शकतात वा आतली असू शकतात. बाह्य संसाधनं म्हणजे मित्र, आवडती जागा, सुखद स्मृती, आवडता पाळीव प्राणी, इत्यादी. अंतर्गत संसाधनं म्हणजे आपलं एखादं कौशल्यं किंवा आपल्यामधील विनोदबुद्धीसारखा एखादा सकारात्मक पैलू किंवा आपल्याला सक्षम व कार्यक्षम वाटणारा एखादा अवयव. संसाधनांचा विचार केल्याने आपल्याला चिकाटी, सुरक्षितता व निवांतपणापर्यंत जाण्यासाठी मदत होते. त्यानंतर आपण आपल्या संसाधनाबद्दल विचार करताना संवेदनांचा माग ठेवू शकतो आणि आपण ताणाखाली असताना किंवा चिंताग्रस्त असताना आपल्या शरीराला कसं वाटतं याच्याशी त्याची तुलना करू शकतो.
 • ठोस आधार घेणं म्हणजे आपल्याला आधार देणाऱ्या वस्तूला स्पर्श करणं अथवा ती धरून ठेवणं, किंवा शरीराला आधार वाटेल अशी गोष्ट धरून ठेवणं. अशी वस्तू किंवा आधार घेतल्यावर कसं वाटतं आणि ढब बदलल्यावर कसं वाटतं याकडे लक्ष दिल्यावर आपल्याला कळतं की, यानुसार आपल्या भावनाही बदलत असतात. 
 • योग, ताई-चाई करणं, संगीत ऐकणं, चित्र काढणं व रोजनिशी लिहिणं यांसारख्या उपक्रमांमुळे आपल्याला शरीराचा समतोल साधण्याच्या अधिक औपचारिक पद्धतींपर्यंतचं स्थित्यंतर साधता येतं. शिवाय बहुधा सर्वांत जुन्या व सर्वांत सोप्या पद्धतीचाही उपयोग आपल्याला करता येतो, त्यात आपण आपले श्वास मोजता किंवा खोल श्वासोच्छवास करतो.

बोधात्मक व आवेगावर नियंत्रण

जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण सतत विचलित न होता आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. केवळ महत्त्वाच्या बैठकींवेळी लक्ष देण्यापुरतं हे मर्यादित नाही, तर विपरित परिणाम करणारे विचार व वर्तन यांच्याकडे लक्ष देण्याची क्षमताही यात अपेक्षित आहे. स्वतःच्या आवेगांवर नियंत्रण ठेवणं आणि त्यांचा कृतीवर परिणाम होऊ न देणं, यासाठी आपण लक्ष देण्याची क्षमता जोपासायला हवी. ही क्षमता टिकवून ठेवून लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इथे लक्ष देण्याचा अर्थ, आतल्या बाजूला लक्ष केंद्रित करणं, आपल्या शरीरातील व मनातील बदलांचा माग ठेवणं, असा होतो. आपल्या लक्ष देण्याच्या कृतीबाबत प्रशिक्षण घेतल्याने प्रेरणा व प्रतिसाद यांमध्ये अवकाश निर्माण होतो: या अवकाशामुळे आपण अधिक विचारपूर्वक प्रतिसाद देऊ शकतो.

दीर्घकालीन उद्दिष्टांचा ध्यास घ्यायचा असेल, आपण आपल्या समोर येणाऱ्या आव्हानांवर यशस्वी मात करायची असेल, तर ही क्षमता गरजेची आहे. आपल्या लक्ष देण्याच्या कृतीवर आपलं चांगलं नियंत्रण असेल, तर आपण केवळ स्वतःच्या शिक्षकाकडे किंवा वरिष्ठांकडे लक्ष देण्यापलीकडे जात, स्वतःच्या बोधात्मक प्रक्रिया व भावना यांवरही नियंत्रण ठेवतो, आणि स्वतःच्या कृतींचा अधिक चांगला विचार करतो. अशा प्रकारे आपण जीवनात आनंद मिळवतो व पुढे जातो.

आपल्याला लक्ष देण्याची क्षमता सुधारण्यासाठी मदत करणाऱ्या काही व्यूहरचना आहेत. विशिष्ट वस्तूंवर लक्ष केंद्रित करून आपण ‘पूर्णतः उपस्थित’ असणं शिकू शकतो, आपल्या शरीरामध्ये व मनामध्ये काय घडतंय याबद्दल जागरूक राहू शकतो, आणि आपल्या विचारांची व भावनांची दखल घेऊ शकतो.

भावनांना दिशा देणं

आपल्या भावनांना दिशा देण्यासाठी शरीराचा समतोल साधणं व बोधात्मक नियंत्रणाची जोपासना करणं, यातून प्राप्त झालेली कौशल्यं आपण वापरतो. या शेवटच्या टप्प्यात आपण हे ज्ञान आचरणात आणतो आणि आपल्या भावनिक साक्षरतेची ही शेवटची पायरी असते.

इथे आपण भावनिक सारासार विचार विकसित करतो. भावना आपल्यासाठी व इतरांसाठी कधी उपकारक व सहायक असतात आणि कधी आपल्यासाठी व इतरांसाठी विषारी अथवा नुकसानकारक असतात हे ओळखण्याची ही क्षमता आहे. स्वतःच्या अनुभवांवर विचार करून आणि आपल्या मनाचा नकाशा वापरून आपण हे करू शकतो. गतकाळात भावना कशा कार्यरत झाल्या आणि त्यातून काय निष्पन्न झालं, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न आपण करतो, तेव्हा स्वाभाविकपणे आपण रचनात्मक व विध्वंसक भावनांविषयीची समजूत विकसित करतो. यामुळे आपण आपल्याला व इतरांना मानसिक इजा करणाऱ्या मनोवस्थांबाबत सावध होतो. आपल्याला स्वतःच्या कोणत्या मनोवृत्तींना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि कोणत्या मनोवृत्ती बदलायच्या आहेत, हेही आपण ठरवू शकतो. भावना ओळखून त्यांच्या नियमनाची क्षमता आपण विकसित करतो तेव्हा आपल्याला उत्साह, धैर्य यांची भावना अनुभवता येते आणि आपल्या आत्मविश्वासालाही उत्तेजना मिळते.

सारांश

भावनिक साक्षरता- आपलं मन, भावभावना यांच्याविषयीची समजूत- विकसित करणं, हे स्वाभिमानाच्या सुदृढ जाणीवेच्या मार्गावरील पहिलं पाऊल असतं. त्यातूनच भावनांची संपूर्ण व्याप्ती हाताळण्याची क्षमता येते. आपल्या भावना आपला अंगभूत भाग नाहीत, हे लक्षात आल्यावर आपण स्वतःच्या भावना यशस्वीरित्या हाताळू शकतो आणि स्वतःचा स्वीकारही करतो. संतापल्याबद्दल अपराधी वाटण्याचं कारण नाही किंवा निराश वाटल्याबद्दल नाराजही होऊ नये. आपल्याकडे मनाचा नकाशा असेल आणि विविध भावनांचे कार्यकारणसंबंध आपण समजून घेतले की आपल्याला कशामुळे मनःशांती मिळते व कशाने व्यथित व्हायला होतं हेही आपल्याला शोधता येतं. नकारात्मक भावनांसंदर्भात त्या ओळखण्यासाठीची कौशल्य आपल्याकडे असतील तर आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजू शकतो. यामध्ये प्रशिक्षण घेतल्याने आपल्यामध्ये आत्मविश्वास येतो आणि आपलं सामर्थ्य लक्षात येऊन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी याचं सहाय्य होतं.

याहून सखोल जायची इच्छा असल्यास ‘सी’ शिक्षणाच्या चौकटीचा पूर्ण परिचय वाचावा आणि ‘सेंटर फॉर कन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्स’च्या इतर कार्यक्रमांबद्दलही माहिती घ्यावी.

Top