अन्य धर्मांबाबत बौद्ध दृष्टिकोन

या पृथ्वीवर अब्जावधी लोक आहेत, तेवढीच अब्जावधी प्रकारची स्वभावभिन्नता आणि विभिन्न असे कल दिसून येतात. बौद्ध दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास अनेक प्रकारच्या लोकांच्या वेगवेगळ्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारच्या धर्मांचे पर्याय असणे गरजेचे आहे. मानवाचे कल्याण या समान उद्दिष्टाचाच संदेश सर्व धर्म देत असतात असे बौद्ध धर्मात मानले जाते. या समान धारणेशी प्रामाणिक राहून परस्पर सहकार्य आणि आदराची भावना बाळगून बौद्ध आणि ख्रिश्चन यांनी परस्परांच्या विचारांचे आदानप्रदान करण्याचे प्रयत्न सुरू केले.

कारण सर्वांचे स्वभाव आणि आवडीनिवडी समान असू शकत नाहीत, त्यामुळे विविध प्रकारच्या लोकांना सुयोग्य ठरतील अशा अनेक पद्धती बुद्धाने शिकवलेल्या आहेत. याच विचारधारेचा आदर करून परमपूज्य दलाई लामा म्हणतात, ‘‘जगात अनेक प्रकारचे धर्म अस्तित्वात आहेत हे खरोखर चांगले आहे. ज्याप्रमाणे एकाच प्रकारचे अन्न सरसकटपणे सगळ्यांनाच लागू होणार नाही. त्याचप्रमाणे एकच धर्म किंवा काही विशिष्ट धारणा सर्वांचेच समाधान करू शकणार नाहीत हे तितकेच खरे आहे. वस्तुस्थिती हीच आहे की विविध प्रकारचे धर्म असणे हे निश्चितपणे फायद्याचे आहे. ही निश्चितच स्वागतार्ह आणि आनंदाची बाब म्हणायला हवी.’’ 

आंतरधर्मीय संवाद 

परस्परांविषयी आदर असावा या विचाधारेतून आता बौद्ध संत आणि इतर धर्माचे नेते यांच्यात संवाद वाढू लागला आहे. दलाई लामा यांनी पोप जॉन पॉल दुसरे यांची अलीकडेच भेट घेतली होती आणि १९८६ मध्ये पोप यांनी जगभरातील विविध धर्मांच्या प्रतिनिधींना इटलीतील असिसि येथे झालेल्या एका मोठ्या परिषदेसाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी विविध धर्मांचे १५० प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. त्यावेळी दलाई लामा हे पोप यांच्या शेजारी बसले होते. सर्वप्रथम भाषण करण्याचा मानही त्यांना प्रदान करण्यात आला होता. या परिषदेत सर्व धर्मांमध्ये मूल्ये, प्रेम आणि सहवेदना या गोष्टी समान आहेत अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. 

विविध धर्माच्या नेत्यांमध्ये दिसून आलेले सहकार्य, सौहार्द आणि परस्परांविषयीचा आदर यामुळे ही सर्वसामान्यांनाही प्रोत्साहन देणारी ही बाब ठरली.

अर्थातच, प्रत्येक धर्म वेगळा आहे. प्रत्येक धर्मातील तत्त्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान यांचा विचार करता त्यामध्ये मात्र मतभिन्नता असू शकते. परंतु त्यासाठी आपण वादविवाद करीत बसावे असे नाही. ‘‘माझ्या श्रद्धा या तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या आहेत.’’ असा दृष्टिकोन असल्यास काहीही उपयोग होणार नाही. त्याऐवजी सर्व धर्मांमध्ये काय समान आहे याचा शोध घेणे अधिक चांगले ठरू शकते. मानवतेचा विकास व्हावा आणि मूल्याधारित वागणूक, प्रेमाचा मार्ग, सहवेदना आणि क्षमाशीलता यांचे अनुसरण करून प्रत्येकाने आपले आयुष्य अधिकाधिक चांगले करावे असेच सर्व धर्मांच्या शिकवणुकीचे सार आहे. आयुष्यातील भौतिक बाबींमध्ये लोकांनी अडकून राहू नये असे सारेच धर्म शिकवतात. भौतिक जगणे आणि आध्यात्मिक प्रगती यांच्यामध्ये संतुलन शोधण्याचा किमान प्रयत्न करावा असेच सर्व धर्म सांगतात. 

अवघ्या जगाचे कल्याण व्हावे म्हणून सर्व धर्मांनी एकत्र येऊन काम केले तर ते खरोखर उपयुक्त ठरेल. भौतिक प्रगती ही आवश्यक असते, परंतु आध्यात्मिक प्रगतीसुद्धा तितकीच गरजेची आहे ही गोष्ट आता अधिकाधिक स्पष्ट होते आहे. जेव्हा आपण जीवनातील केवळ भौतिक बाबींवर भर देतो तेव्हा प्रत्येकाला नष्ट करण्याची क्षमता असलेला जणू एखादा बॉम्ब तयार करण्याची इच्छा बाळगू लागतो. दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण मानवतावादी किंवा आध्यात्मिक पद्धतीने  विचार करू लागतो तेव्हा मोठ्या विध्वसांची क्षमता राखून असणाऱ्या शस्त्रांविषयी आपण जागरूक होऊ लागतो. अर्थात आपण केवळ आध्यात्मिकतेचा विकास केला आणि भौतिक बाजूंकडे पूर्णत: दुर्लक्ष केले तर प्रत्येकजण फक्त भुकेला राहील. त्यामुळे हेसुद्धा एकतर्फी असणे चांगले नाही. संतुलन हीच गुरूकिल्ली आहे. 

परस्परांकडून ज्ञानप्राप्ती  

जगभरातील धर्मांमधील परस्परसंवादाचा एक पैलू असाही आहे तो म्हणजे प्रत्येक धर्माची काही वैशिष्ट्ये अन्य धर्मांतही आढळून येतात. उदाहरणार्थ,  ख्रिश्चन धर्मामध्ये एकाग्रता आणि ध्यानपद्धती यांच्याविषयीची रुची बौद्ध धर्मातून आलेली असावी. त्यामुळे अनेक कॅथलिक धर्मगुरू, मठाधीश, साधू आणि नन्स यांनी भारतातील धर्मशाला येथे भेट दिली असून ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ते आले होते. त्यांच्या स्वत:च्या परंपरेत त्यांना याचा समावेश करायचा होता. 

ध्यान कसे करावे, एकाग्रता कशी साध्य करावी?, प्रेमाची व्याप्ती कशी वाढवावी? या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी मलाही निमंत्रित करण्यात आले होते. 

ख्रिश्चन धर्म आपल्याला सर्वांवर प्रेम करायला शिकवतो, परंतु प्रत्यक्षात ते कसे करायचे याविषयी मात्र विस्ताराने काही सांगत नाही. परंतु बौद्ध धर्मात मात्र प्रेम विकसित करण्याच्या अनेक पद्धती आहेत. बौद्ध धर्माकडून या सगळ्या गोष्टी शिकण्याची तयारी ठेवण्यात ख्रिश्चन धर्म सर्वांत आघाडीवर आहे. याचा अर्थ ते सारे बौद्ध होत आहेत असा अजिबात नाही. इथे कुणीही कुणाचे धर्मांतर करू पाहत नाही. अधिक चांगले ख्रिश्चन धर्मीय बनण्यासाठी त्यांच्या धर्मामध्ये ज्या बाबींचा अंगीकार करता येऊ शकतो त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

त्याचप्रमाणे अनेक बौद्ध धर्मीयांना ख्रिश्चन धर्मातील सामाजिक सेवाभाव शिकण्याची इच्छा आहे. ख्रिश्चन धर्माच्या अनेक परंपरांमध्ये त्यांचे साधू आणि सेविका हे प्रामुख्याने लहान मुलांना शिकवणे, रुग्णालयात सेवा करणे, वयोवृद्धांची, अनाथांची काळजी घेणे या गोष्टींवर भर देतात. जरी काही बौद्ध देशांनी या सामाजिक सेवांचा स्वीकार अगोदरच केलेला असला तरीही सर्व प्रकारच्या सामाजिक सेवा करतात असे नाही. त्यामागे काही सामाजिक आणि भौगोलिक कारणेही आहेत. त्यामुळेच सामाजिक सेवांच्या बाबतीत ख्रिश्चनांकडून बौद्धांना शिकता येतील, अशा अनेक गोष्टी आहेत. विशेषत: ख्रिश्चन धर्मीय आणि त्यांचे पवित्र गुरू हे देखील त्याकडे खुल्या मनाने पाहतात. एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडून आणि स्वतःच्या चांगल्या अनुभवातूनही शिकता येते, ही खरोखरच चांगली बाब आहे. अशा पद्धतीने जगभरातील धर्मांसाठी एक मुक्त व्यासपीठ साकारले जाऊ शकते. ते परस्परांविषयीच्या आदरावर आधारित असू शकेल. 

सारांश 

विविध धर्मांतील परस्परांतील हा संवाद धर्मातील उच्चकोटीच्या स्तरावरील प्रमुखांमध्ये झाला. तिथे ते अधिक मोकळ्या मनाने व्यक्त झाले आणि कमीत कमी पूर्वग्रहदूषितपणा आढळून आला. खालच्या पातळीवर मात्र लोक अधिक असुरक्षित असल्याची भावना बाळगून असतात. त्यातूनच ते मनामध्ये एक फूटबॉल टीमच जणू विकसित करतात. तिथे स्पर्धा सुरू होते आणि लढणे हाच निकष बनतो. अशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगून असणे खचितच खेदजनक असते. मग ते बौद्ध परंपरांमध्ये असो वा अन्य कुठल्याही धर्मामध्ये. खूप मोठ्या संख्येने एकत्र असलेले लोक सुसंवादाने एकत्रित काम करू शकतील अशा अनेक पद्धती बुद्धाने सांगितलेल्या आहेत. त्यामुळेच सर्वच परंपरांचा आपण आदर करायला हवा. मग त्या बौद्ध धर्मातील असोत वा मग जगभरातील कुठल्याही धर्मातील. 

Top