स्वप्रेमाच्या प्रवृत्तीवर मात करण्याबाबत सल्ला

तुम्ही स्वतःचे नियम, कायदे व संविधान तयार करता. इतरांनी तुमचे कायदे मोडले तर तुम्ही त्यांना पकडून दंड करता. पण तुम्हीच हे नियम मोडले, तर तुम्ही स्वतःला मात्र सूट देता. गेशे शर्मवा म्हणाले होते, “तुम्ही स्वतःच्या कमतरता पाहत नाही आणि स्वतःकडे शत्रू म्हणून पाहत नाही, तोवर तुम्ही कोणत्याही मदतीचा स्वीकार करू शकणार नाही.” स्वतःच्याच भावना सर्वांत महत्त्वाच्या आहेत, असे तुम्हाला वाटत असेल, तर कोणीच तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही. अगदी अतिशय सक्षम असलेले लामादेखील ‘स्व’ने पछाडलेल्या व्यक्तीला मदत करू शकत नाहीत, कारण लामांनी दिलेला सल्ला व स्वप्रेमाची वृत्ती यांच्यात संघर्ष होतो. गुरूंनी आपल्या वाटेवर मार्गदर्शन करायला हवं असेल, तर स्वप्रेमाची वृत्ती बाळगण्यातील चूक आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवी. स्वप्रेमातून आपल्याला वाईट गोष्टी करण्यासाठी कारणं मिळत जातात, त्यामुळे आपण आपल्या कृतींमागील कारणांचं मूल्यमापन करायला हवं. स्वप्रेमाची प्रवृत्ती बाळगली तर गुरू तुम्हाला मदत करू शकणार नाहीतच, शिवाय तुमचे सर्वसामान्य मित्रमैत्रिणीही तुमची मदत करू शकणार नाहीत, कारण तुम्ही सल्ल्यासाठी स्वागतशील नसता.

आपण स्वप्रेमात असतो, हे आपण सगळ्यांनीच मान्य करायला हवं- केवळ बुद्धामध्ये ही प्रवृत्ती नव्हती. स्वतःमधील ही उणीव आपण ओळखायला हवी आणि ती दूर व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्यामध्ये स्वप्रेमाची प्रवृत्ती आहे हे आपण किमान लक्षात घेतलं, तरी ती मोठीच प्रगती असेल. तुमच्यावर टीका होते, तेव्हा तुमचं स्वप्रेमच त्याला कारणीभूत ठरल्याचं तुम्हाला वाटायला हवं. तुम्हाला काटा बोचला, तर तुम्ही चिडता आणि त्यावर तडाखा मारता, अशा वेळी तोटा कोणाचा होतो? आपल्याला छोटीमोठी टीका व अप्रियता आत्ता सहन होणार नसेल, तर आपण कनिष्ठ पातळीवरील पुनर्जन्मांचं दुःख कसं सहन करू?

आपण लक्ष्य-सदृश संयम विकसित करायला हवा, असं गेशे चेंगवा म्हणतात. आपल्यावर टीका होत असेल, तर आपण लक्ष्य ठरलो आहोत असं आपल्याला वाटतं. मुळात लक्ष्यच नसेल, तर त्यावर बाण मारलेच गेले नसते. एक म्हण आहे, “फासात अडकण्यासाठीच तुम्ही मान पुढे काढलेली असते.” तुम्ही काहीही चूक केलेली नसताना तुमच्यावर टीका होते, तेव्हा गतजन्मांमध्ये तुम्ही इतरांना हीन लेखल्याचा तो परिणाम असतो. उदाहरणार्थ, बुद्धाचा एक अरहत झालेला शिष्य होता, त्याने स्वतःला तीन प्रतिज्ञासंचाद्वारे अस्वस्थकारक भावनांपासून आणि प्रवृत्तींपासून स्वतःला मुक्त केलं होतं. परंतु, अरहतने स्वतःच्या प्रतिज्ञा मोडल्याचा आरोप काही लोकांनी केला आणि त्याच्या विरोधात खोटा साक्षीदारही उभा केला. बुद्ध नाराज झाला आणि अरहतने प्रतिज्ञा मोडल्या असणं शक्य नाही असं सांगितलं. पुढे बुद्ध म्हणाला की, उच्च साक्षात्कारी शिष्याने प्रतिज्ञा मोडल्याचा आरोप करणाऱ्याला आपण बुद्ध मानणार नाही, तर बौध धर्माला ते लांच्छन आहेत असं मानू, असंही बुद्ध म्हणाला. अरहतवर टीका का केली गेली, असं इतरांनी विचारलं. त्यावर बुद्धाने प्रत्युत्तर दिलं की, गतजन्मामध्ये अरहत कंड्या पिकवणारा व निंदा करणारा होता आणि त्याच्यामुळे एका राजाने त्याच्या राणीला दूर लोटलं होतं. त्याचा हा परिणाम आहे.

टीका करणं, कंड्या पिकवणं व इतरांवर आरोप करणं हे अतिशय विध्वंसक वर्तनाचे प्रकार आहेत. त्याने आपल्या आचरणाला कोणताही फायदा होत नाहीच, शिवाय इतरांची हानी होते व गोंधळ निर्माण होतो. केवळ दोन प्रबुद्ध जीव एकमेकांचा निवाडा करू शकतात, असं म्हटलं जातं. योग्य किंवा अयोग्य उणिवांवर टीका करून आपण नकारात्मक कर्म साठवतो. किंवा, चांगल्या कारणासाठी काहीतरी विचित्र केल्याबद्दल बोधिसत्वावर टीका करून त्याचाही नकारात्मक परिणाम होतो.

सदासर्वकाळ इतरांवर टीका करण्याची सवय असलेल्या लोकांची खोलवरची प्रवृत्ती स्वप्रेमाची असते. काही भिक्खू अनेक शिकवणुकी ऐकतीलही कदाचित, पण ते स्वतःच्या आचरणामध्ये या शिकवणुकींचं उपयोजन करत नाहीत, कारण गतजन्मांमध्ये त्यांची प्रवृत्ती स्वप्रेमाची राहिलेली असते, असं मानलं जातं. आपल्या शत्रूला इजा पोचवणं हेदेखील स्वप्रेमाचा परिणाम मानलं जातं.

एकदा, बुद्धाच्या काळात, एक भिक्खू स्वतःच्या कफनीला रंग लावत होता, आणि तो ते करत असताना कोणाचं तरी माकड हरवलं. भिक्खूने भांड्यातून त्याची कफनी बाहेर काढली तेव्हा ती माकडाच्या मांसामध्ये रूपांतरित झाल्याचं दिसलं. त्या भिक्खूने माकड चोरून शिजवल्याचा आरोप लोकांनी केला. भिक्खूला न्यायालयात नेऊन शिक्षा करण्यात आली. काही काळाने ते माकड पुन्हा अवतरलं आणि तो भिक्खू निरपराध असल्याचं सिद्ध झालं. हे असं का घडलं, असं त्या भिक्खूने बुद्धाला विचारलं, आणि बुद्धाने प्रत्युत्तर दिलं की, गतजन्मामध्ये त्या भिक्खूने दुसऱ्या एका भिक्खूवर माकड चोरल्याचा आरोप केल्यामुळे आत्ता हे घडलं.

आपण सुखी व निवांत राहण्याबाबत इतकी आस्था बाळगतो, आणि पैसा साठवण्यासाठी खूप कष्ट करतो, पण त्यातूनच आपण स्वतःला चोर म्हणून लक्ष्यस्थानी ठेवू लागतो. एक गोष्ट आहे- एका व्यक्तीने त्याच्याकडील सर्व नाणी एका पिशवीत ठेवली आणि नाणी हरवतील या भीतीने ती पिशवी छताला लटकावली. एके दिवशी, ती पिशवी त्या माणसाच्या डोक्यात पडली आणि त्याला इजा झाली. या गोष्टीचं तात्पर्य इतकंच की, स्वप्रेमामुळे आपण तात्कालिक सुखालाही मुकतो आणि अंतिम सुखालाही मुकतो. आपल्या सर्व गतजन्मांमध्ये आपण स्वप्रेमाचीच प्रवृत्ती बाळगल्यामुळे, आत्ता आपल्याला लक्षात आलं तरी आपण तत्काळ त्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही, ही आपली सर्वांत मोठी समस्या आहे.

तर, कोणत्याही टीकेला उत्तर न देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा आणि अशी टीका होणं हा इतरांच्या व आपल्याही स्वप्रेमाच्या प्रवृत्तीचा परिणाम आहे हे समजून घ्यावं. संयम विकसित करण्यासाठी स्वप्रेमाच्या प्रवृत्तीबाबत पुरेसा विचार करणं उपयोगी ठरतं. “आग गरम आहे” हे बोलणं स्वाभाविक आहे. यात काही विचित्र नाही. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती टीका करत असेल आणि तुम्हाला ती करत असलेली टीका तुम्हा दोघांच्याही स्वप्रेमाच्या प्रवृत्तींमधून उगवल्याचं तुमच्या लक्षात येत असेल- तर हेदेखील स्वाभाविकच आहे. अशी समज संताप व वेडेपणा निर्माण करत नाही, कारण दुसरी व्यक्ती चुकीची आहे किंवा पूर्णतः गैर वागते आहे असं सिद्ध करायची गरजच उरत नाही. फिलिग्री ऑफ द महायान सूत्राज्मध्ये म्हटल्याप्रमाणे, “स्वप्रेमातून स्व व इतर उद्ध्वस्त होतात, आणि नैतिकताही उद्ध्वस्त होते.” आपण स्वप्रेमातून ज्या काही कृती करतो त्या कनिष्ठ अवकाशांचा किंवा नरकाचा रस्ता तयार करत असतात. स्वप्रेमातून बरीच कटुता निर्माण होते, आणि संबंधित व्यक्ती स्वातंत्र्य गमावलेल्या कनिष्ठ अवकाशात पुन्हा जन्म घेते, म्हणूनच बुद्ध व बोधिसत्व यांना स्वप्रेमाचा तिटकारा वाटतो.

स्वप्रेमामुळे आपले आधीचे सर्व प्रयत्न वाया जातात आणि आपल्या प्रगतीला अडथळा निर्माण होतो. आपल्याला जीवनाच्या सारतत्त्वापासून वंचित ठेवणारं विष म्हणून स्वप्रेमाकडे पाहायला हवं. ही स्वप्रेमाची वृत्ती संपुष्टात आणण्यासाठी सतत प्रयत्न करावेत. आपलं आचरण कसंही असलं, तरी ते स्वप्रेमाची प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी असावं. कदम्प गेशे म्हणाले होते की, ते कोणतीही संहिता वाचतात तेव्हा त्यात वर्णिलेले सर्व वाईट गुण स्वतःचे आहेत असं मानतात आणि सर्व चांगले गुण इतरांचे आहेत असे मानतात- म्हणजे अशा प्रकारे ते स्वप्रेमाविरोधात लढा देतात. स्वप्रेमाची प्रवृत्ती कमी केल्याशिवाय बोधिचित्त प्राप्त होत नाही. बोधिचित्त व करुणा यांद्वारे स्वप्रेमाला असलेला विरोध बळकट होतो, आणि करुणा वरचढ ठरते, आपल्या आतमध्ये इच्छापूर्तीचा वृक्ष रुजवते. करुणेचं आचरण केलं, तम स्वप्रेमाच्या अविनाशी नकारात्मक परिणामांवर करुणेचे सकारात्मक परिणाम मात करतील.

गेशे पोटोवा म्हणाले होते की, “पेन्पोमधील एका भागात कोणीच गेशे खामलुंग्पा यांच्याहून अधिक सुखी नव्हतं, आणि गेशे छान्गवा यांच्याबाबतीतही असंच होतं. त्यांनी स्वप्रेम नष्ट केल्यामुळे हे घडलं.” गेशे छान्गवा इतके गरीब होते की ते क्वचितच खात असत आणि ठिगळं जोडलेला चामड्याचा झगा ते घालत. पण त्यांना श्रीमंत वाटायचं, “आता मी संपूर्ण विश्वाला प्रायोजकत्व देऊ शकतो,” असं ते म्हणायचे. खरोखरच्या प्रस्थापित अस्तित्वाला पकडण्याच्या नादात स्वप्रेमाची प्रवृत्ती निर्माण होते, आणि बोधिचित्ताच्या विकासामधील हा सर्वांत मोठा अडथळा असतो. एका संहितेमध्ये असं म्हटलं आहे की, “सर्व संज्ञाशील जीवांबद्दल प्रेम मानणं, हे इच्छापूर्तीसाठी कळीचं असतं. हे कधीच लक्षात न घेता आपण स्वतःचं लक्ष विचलित करतो. स्वप्रेम व अहंकार यांबद्दल आकस राखण्याऐवजी आपण संज्ञाशील जीवांना आपले शत्रू मानून त्यांच्या विरोधात आकस धरतो, आणि आपल्या खऱ्या शत्रूंना आपले मित्र मानतो.” दुसऱ्या एका संहितेत असं म्हटलं आहे, “सर्वांत मोठं भूत व सैतान बाहेर सापडत नाही, तर शरीराच्या पछाडलेल्या घरामध्ये स्वप्रेमाच्या रूपात सापडतात.”

बोधिचित्ताद्वारे आपण स्वप्रेमाची प्रवृत्ती नष्ट करू शकतो. स्वप्रेमामुळे आपल्याला दुष्टात्म्यांकडून हानी सहन करावी लागते- आपण टीका व छळ यांबाबतीत बचावात्मक पवित्रा घेतो आणि अनैतिक होतो. स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने आपण स्वप्रेमाने कृती करतो आणि स्वतःला संतुष्ट करणं हाच आपला मुख्य आस्थेचा प्रकल्प होऊन जातो.

इतरांबद्दल नावड वाटण्याला आपण काही वेळा रोखू शकत नाही, पण स्वप्रेमाने आपण दुसऱ्यांना कमी लेखतो आणि स्वतःला संतुष्ट करण्यासाठी मोठी कृती म्हणून इतरांना इजा पोचवतो. स्वप्रेमातून अभिमान व असूया निर्माण होतात. दुसऱ्या कोणाला काही मिळालं तर आपण ‘अभिनंदन’ असं म्हणतोही, पण आपल्याला ते मिळालं नाही याबद्दल आपल्याला असूया वाटते. स्वप्रेमाची प्रवृत्ती नसेल, तर आपण असूया वाटून घेण्याऐवजी इतरांच्या लाभाचा आनंद वाटून घेऊन सकारात्मक सामर्थ्य साठवू. आयुष्यातील मतभेदांचं कारण स्वप्रेम हे आहे. आपल्यामध्ये स्वप्रेमाची प्रवृत्ती बळकट असेल, तर आपण अतिशय बचावात्मक होतो, इतरांशी आपला संघर्ष होतो, आपला संयम कमी होतो, आणि इतर सर्व जण आपल्याला त्रास देत आहेत, असं आपल्याला वाटतं आणि आपण तणावाखाली येतो. पती व पत्नी, पालक व मुलं यांच्यामध्ये मतभेद असतात, कारण असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतलेला असतो.

कदम गेशे चाळीस वर्षांचे होईपर्यंत चोर होते. त्यांच्याकडे लागवडीसाठी कित्येक एकर जमीन होती, पण तरीही ते दरोडेखोर झाले. दिवसाच्या वेळी ते वाटसरूंना लुटत, आणि रात्री घरांवर दरोडे घालत. एके दिवशी त्यांनी त्यांचा मार्ग बदलला आणि ते आध्यात्मिक झाले, त्यांनी स्वप्रेमाची प्रवृत्ती नष्ट केली. ते म्हणाले, “आधी मला अन्न मिळत नव्हतं, पण आता मला इतकं दान केलं जातं की अन्नाला तोंड मिळत नाही.”

बोधिचित्त प्राप्त करताना या सर्व गोष्टी विचारात घेणं उपयोगी ठरतं. स्वप्रेमाच्या प्रवृत्तीने स्वतःला मेरू शिखराच्या आकारातील गुहेत बंदिस्त करणं निरुपयोगी ठरतं. पण तुम्ही स्वतःची स्वप्रेमाची प्रवृत्ती कमी केली, तर एकांतात राहणं अतिशय लाभदायक ठरू शकतं.

Top