माझी जीवन गाथा

बौद्ध धर्माचे विद्वत्तापूर्ण अध्ययन आणि बौद्ध शिकवणींचा दैनंदिन जीवनातील अंगीकार या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. असे अनेकदा म्हटले जाते की बौद्ध धर्माच्या केवळ बौद्धिक दृष्टीने केलेल्या अध्ययनातून तुमच्या प्रत्यक्ष जीवनात लाभ मिळत नाही. डॉ. अलेक्झांडर बर्झिन विद्वत्तापूर्ण अभ्यासक आणि धर्मोपासक, अशा दोन्ही भुमिकेतून आपला अनुभव स्पष्ट करतात.

स्पुटनिक पिढी 

१९४४ साली अमेरिकेतील एका सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. माझे कुटुंब सधन नव्हते, ते कष्टकरी लोक होते आणि ते शिक्षितही नव्हते. पण फार लहान वयापासून मला आशियाई गोष्टींमध्ये विशेष रस होता. माझ्या कुटुंबातील लोक मला यासाठी प्रोत्साहन देत नसत, पण ते त्याबाबत ते परावृत्तही करत नसत. असेही त्या काळात आशियाबद्दल पुरेशी माहितीही उपलब्ध नव्हती. मी १३ वर्षांचा होतो, तेव्हा एका मित्रासोबत योगा करण्यास सुरुवात केली आणि तेव्हा बौद्ध धर्म, भारतीय दर्शन, चीनी दर्शन याबाबत जे काही उपलब्ध असेल, ते वाचून काढले. 

अमेरिकेत ज्याला ‘स्पुटनिक पिढी’ संबोधले जाते, मी त्या पिढीचा होतो. स्पुटनिक यान अंतरिक्षात सोडले गेले, तेव्हा अमेरिका फार अस्वस्थ झाली कारण तेव्हा आपण रशियाच्या फार फार मागे आहोत, अशी भावना निर्माण झाली. तेव्हा सर्व शाळकरी मुलांना विज्ञान विषयातील अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यात आले, जेणेकरून आम्ही रशियाशी बरोबरी करू शकू. त्यामुळे वयाच्या १६व्या वर्षी मी रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी रट्गर्स विद्यापीठात प्रवेश घेतला. रट्गर्स विश्वविद्यापीठ न्यु जर्सी येथे आहे, जिथे मी लहानाचा मोठा झाले आणि काल्मिक मंगोल बौद्ध गुरू गेशे वांग्याल तिथूनच ५० किलोमीटर अंतरावर राहत होते, ज्याची मला त्यावेळी कल्पना नव्हती. 

माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून मी आशियाई अध्ययनाचा एक अतिरिक्त कोर्स निवडला, ज्यात बौद्ध धर्माचा एका सभ्यतेमधून दुसऱ्या सभ्यतेतील प्रवास आणि प्रत्येक सभ्यतेची त्याला स्वीकारण्याची पद्धत याविषयीचे विवेचन होते. मी १७ वर्षांचाच असलो तरी त्याचा माझ्यावर तीव्र प्रभाव पडला आणि मी म्हणालो, ‘हेच ते कार्य आहे, ज्याच्याशी मला जोडले जायचे आहे, बौद्ध धर्माच्या एका सभ्यतेतून दुसऱ्या सभ्यतेतील प्रवासाशी मला जोडले जायचे आहे.’ आणि माझ्या उर्वरित आयुष्यात कोणत्याही बदलाशिवाय मी हेच करत राहिलो आहे. 

प्रिंसटनः रसायनशास्त्राकडून चीनी भाषा, चिंतन आणि दर्शनाच्या दिशेने

प्रिंसटन विद्यापीठात आशियाई अध्ययन विभागात अधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आणखी एक नवा अभ्यासक्रम सुरू झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी होती, ही व्हिएतनाम युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांदरम्यानची गोष्ट आहे, जेव्हा फार थोड्या अमेरिकी लोकांना एखादी आशियाई भाषा अवगत होती. मी चीनी भाषा शिकायला मिळणार म्हणून फार उत्साहित होतो, त्यामुळे मी लगेच अर्ज भरला आणि प्राप्तही ठरलो. वयाच्या १८व्या वर्षी मी प्रिंसटन विद्यापीठात चीनी भाषा शिकायला सुरुवात केली आणि आपल्या स्नातक पदवीची शेवटची दोन वर्ष तिथे पूर्ण केली. 

बौद्ध धर्म चीनमध्ये आल्यानंतर, चीनी दर्शनावर त्यांनी कसा प्रभाव पाडला, हे समजून घेण्यात मला नेहमीच रस होता. त्यासाठी मी चीनी चिंतन, दर्शन, इतिहास आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केला. मला उन्हाळी दिवसात गहन भाषा विद्यालयात पाठवण्यात आले, एक वर्ष हार्वर्ड मध्ये, तर एक वर्ष अभिजात चीनी भाषा शिकण्यासाठी स्टॅनफोर्डमध्ये पाठवण्यात आले आणि माझी पदवी पूर्ण झाल्यानंतरचे एक वर्ष तैवानला पाठवण्यात आले. माझ्या पदवी अभ्यासासाठी मी परत हार्वर्डला आलो. तोवर मी चीनी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जपानी भाषा शिकायला सुरुवात केली होती आणि तोपर्यंत मला सुदूर पूर्व भाषांमधील पदव्युत्तर पदवी मिळाली होती. तोपर्यंत मी चीनी भाषेचा विस्तृत अभ्यास केला होता.  

चीनी, संस्कृत आणि तिबेटीः तुलनात्मक अभ्यास 

मी भारतीय बाजुही तितकीच चांगल्या रीतीने समजून घेऊ इच्छित होतो, जशी मी चीनी बाजू समजून घेतली होती. बौद्ध धर्माच्या विकासावरील प्रभाव समजून घेण्यासाठी मी संस्कृतचा अभ्यास सुरू केला. मी संस्कृत आणि भारतीय अभ्यास व सुदूर पूर्वीय भाषा विभाग या दोन्ही विभागातून संयुक्त डॉक्टरेट मिळवली. संस्कृत आणि भारतीय अभ्यास करतेवेळीच मी तिबेटी भाषा अभ्यासाकडे पोहचलो आणि बौद्ध धर्म दर्शन आणि इतिहासाच्या अभ्यासावर भर देऊ लागलो. 

तुम्ही जाणताच, मला ज्ञानग्रहनाची तीव्र तहान आहे, त्यामुळे मी तत्त्वज्ञान आणि मनोविज्ञानासाठी अतिरिक्त कोर्स घेतले आणि या दरम्यान यासंबंधीच्या विज्ञानातही रस कायम ठेवला. अशा रीतीने मी माझा अभ्यास पूर्ण केला आणि अनुवादांच्या तुलनात्मक अभ्यासाची बौद्ध पद्धती समजून घेतली. आम्ही संस्कृतमधील बौद्ध ग्रंथ अभ्यासत असू आणि त्यांचा चीनी व तिबेटी भाषेत कसा अनुवाद झाला आहे, हे पाहत असू. तसेच कल्पनांच्या विकासांचा इतिहास आणि त्यांचा सर्वसामान्य इतिहासाशी संबंध अभ्यासत असू. अशा पद्धतीचे प्रशिक्षण माझ्या संपूर्ण कारकिर्दीत उपयुक्त ठरले. 

हार्वर्ड ते जीवित परंपरेचा प्रवास 

या दरम्यान, नेहमी माझा रस या गोष्टींमध्ये असायचा की मी अभ्यासत असलेली आशियातील ही सर्व दर्शनं आणि धर्म – बौद्ध आणि हिंदू धर्माचे विभिन्न प्रकार, ताओ आणि कन्फुशियस, या सर्व विचारधारांच्या दृष्टिकोनातील विचारप्रक्रिया नक्की कशी असेल. पण यातील एकाही जीवित परंपरेच्या संपर्कात येण्याची कोणतीही प्रत्यक्ष संधी उपलब्ध नव्हती, जणू मी इजिप्तच्या अतिप्राचीन धर्मांचा अभ्यास करत होतो. तरीही या विषयातील माझी रूची तीव्र होती. 

पण जेव्हा मी 1967 साली तिबेटी भाषेचा अभ्यास सुरू केला, रॉबर्ट थर्मन हार्वर्डला परत आले आणि आम्ही दोघे सहाध्यायी होतो. थर्मन गेशे वांग्याल यांच्या प्रिय शिष्यांपैकी एक होते आणि त्यांच्यासोबत त्यांनी काही वर्षे व्यतीत केली होती. ते जवळपास एक वर्षभर भिक्षुही झाले होते आणि धरमशाला येथे अध्ययनासाठी भारतात जाऊन आले होते. तेच होते, ज्यांनी मला गेशे वांग्यालविषयी सांगितले आणि जिथे परमपूज्य दलाई लामा व तिबेटी लोक राहत होते, त्या धरमशाला येथील अध्ययनाच्या संधीची शक्यता दाखवून दिली. मी जेव्हा जेव्हा सुटीला घरी जात असे, तेव्हा गेशे वांग्याल यांच्या न्यु जर्सीतील मठाला भेट देऊ लागलो आणि एक जीवित परंपरा म्हणून बौद्ध धर्माचे स्वरूप समजून घेऊ लागलो. मी जरी गेशे वांग्याल यांच्याकडे वारंवार जात असलो, तरी त्यांच्यासोबत राहण्याची आणि अध्ययनाची मला कधीच संधी मिळाली नाही. तरीही त्यांनी मला भारतात जाऊन आपले अध्ययन सुरू ठेवण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळे मी फुलब्राइट शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला, जेणेकरून मला भारतात तिबेटी लोकांसोबत राहून आपल्या शोधनिबंधांचे कार्य सुरू ठेवता येईल.    

मी १९६९ साली वयाच्या २४व्या वर्षी भारतात दाखल झालो, तिथे माझी परमपूज्य दलाई लामांशी भेट झाली आणि मी तिबेटी समाजात पूर्णतः मिसळून गेलो. तिथे पोहचल्यानंतर मला असे वाटले की आत्तापर्यंत माझे आयुष्य एखाद्या कन्वेयर बेल्टवर बसल्याप्रमाणे होते, ज्याने मला न्यु जर्सीतील माझ्या सर्वसामान्य कुटुंबापासून, प्रिंसटन व हार्वर्डमधल्या शिष्यवृत्तीपर्यंत, आणि दलाई लामांपासून तिबेटमधील महान गुरूंपर्यंत पोहचवले होते. मी अनुभवले की मी आजपर्यंत तिबेटी बौद्ध धर्माबाबत जे अभ्यासले होते, ते सर्व जीवंत होते आणि इथे असे लोक होते, ज्यांना बौद्ध शिकवणींमध्ये सांगितल्या गेलेल्या सर्व गोष्टींचा अर्थ वास्तवात माहीत होता. इथेच या महान गुरूंकडून शिकण्याची सुवर्णसंधी होती. 

डलहौशी येथे तिबेटी भाषेचे धडे गिरवताना

जेव्हा मी भारतात गेलो, तेव्हा मला तिबेटी भाषा बोलता येत नव्हती. माझे हार्वर्डमधले प्राध्यापक नागातोमी यांना त्या भाषेतील उच्चारही समजत नव्हते. ते जपानी होते आणि आम्ही जपानी व्याकरणाच्या संदर्भातून तिबेटी भाषेचा अभ्यास केला होता कारण त्यावेळी उपलब्ध असलेल्या एकमात्र पाठ्यपुस्तकात तिबेटी व्याकरण लॅटीनच्या तुलनात्मक दृष्टीतून स्पष्ट करण्यात आले होते. वस्तुतः लॅटिन आणि तिबेटी भाषेत कसलेही साधर्म्य नाही, तर जपानी व्याकरण तिबेटी भाषेच्या जवळपास जाणारे आहे. 

मला बोलीभाषा शिकायची होती, पण त्यासाठी पाठ्यपुस्तके किंवा कोणतेही साहित्य उपलब्ध नव्हते. माझ्या गेशे वांग्याल यांच्याशी झालेल्या संपर्कामुळे मला शारपा आणि खामलुंग रिंपोछे या दोन तुल्कुंशी (गतजन्मातील लामा) संपर्क करता आला. या दोघांनी गेशे यांच्या मठात काही वर्षे अभ्यास केला होता आणि त्यांना चांगले इंग्रजी येत होते. अनेक तिबेटी निर्वासित जिथे स्थायिक झाले होते, अशा डलहौशी येथे ते राहत होते. तिथे त्यांनी प्रेमळपणे डोंगरपायथ्याशी असणाऱ्या छोट्या घरात राहणाऱ्या तिबेटी भिक्षु सोनम नोर्बू यांच्यासोबत माझी राहण्याची सोय केली. त्यांना इंग्रजी येत नव्हते आणि मला तिबेटी येत नव्हते, तरीही आम्ही एकत्र राहत होतो आणि कसातरी संवाद साधणे गरजेचे होते. इथे मला असे वाटत होते की मी बोर्निया किंवा अफ्रिकेत राहणारा मानववंशशास्त्रज्ञ आहे आणि जो दुसरी भाषा शिकावयचा प्रयत्न करत आहे.

मी ज्या ज्या आशियाई भाषा शिकलो होतो, त्यांची माझ्या तिबेटी भाषेतील उच्चारांचे श्रवण आणि त्या भाषेतील प्रगतीसाठी खूप मदत झाली. मला जेव्हा सोनम यांना एखादी गोष्ट सांगायची असेल तेव्हा मी ती लिहून देत असे (कारण मला तिबेटी लिहिता येत होतं) आणि ते मला त्याचा उच्चार सांगत असत. आम्ही अशा रीतीने एकत्र काम केलं आणि मी इतर एका व्यक्तीकडूनही भाषाविषयक धडे घेतले. कालांतराने दोन्ही तरुण रिंपोछेंनी मला सुचवले की त्यांचे शिक्षक गेशे न्गवांग धारग्ये यांच्याकडून मी शिक्षा घ्यावी. 

गाईच्या गोठ्यात लाम-रिमचा अभ्यास

मी माझा शोधनिबंध लिहिण्यासाठी भारतात आलो होतो आणि गुह्यसमाजाच्या तंत्रपद्धतीवर शोधनिबंध लिहिण्याची माझी योजना होती, पण या विषयासंदर्भात सल्ला घेण्यासाठी मी परमपूज्य दलाई लामांच्या गुरूंपैकी एक सरकॅंग रिंपोछे यांना भेटलो, तर त्यांनी मला समजावले की असे करणे फारच विचित्र होईल, कारण मी त्यासाठी अजून तयार नाही. परमपूज्य दलाई लामांचे कनिष्ठ गुरू त्रिजांग रिंपोछे यांनी मला त्यावेळी प्रथम श्रेणीबद्ध मार्गांच्या लाम-रिमचा अभ्यास करावा, असे सुचविले. तोपर्यंत या विषयावर कोणताच अनुवाद उपलब्ध नव्हता, त्यामुळे हे सर्व माझ्यासाठी पूर्णतः नवीन होते. त्यावेळी तिबेटी बौद्ध धर्माबाबत उपलब्ध असलेल्या पुस्तकात केवळ अलेक्झांड्रा डेव्हिड-नील, इवांस-वेंत्झ, लामा गोविंद आणि आणखी काही लेखकांचीच पुस्तके उपलब्ध होती. मी गेशे न्गवांग धारग्ये यांच्याकडून लाम-रिमच्या मौखिक परंपरेची शिकवण घेतली आणि नंतर त्या आधारावर माझा शोधनिबंध पूर्ण केला. 

डलहौसी येथील माझे जीवन फारच सर्वसाधारण होते, तिथे माझ्या घरात पाण्याची आणि शौचालयाचीही व्यवस्था नव्हती. गेशे धारग्ये तर त्याहूनही सामान्य परिस्थितीत राहत होते, ते एका झोपडीत राहत होते, ते तिथे राहायला येण्यापूर्वी तो एक गाईचा गोठा होता. तिथे फक्त त्यांच्या बिछान्यापुरती जागा होती आणि पुढे अगदी थोडीशी जागा होती. जिथे त्यांचे तीन तरुण रिंपोछे आणि मी जमिनीवर बसून अध्ययन करत असू. शारपा आणि खामलुंग रिंपोछे आणि माझ्या गटात झाडपा रिंपोछेसुद्धा सामील झाले होते. नंतर ते परमपूज्य दलाई लामांचा मठ नामग्याल मठाचे मठाधिश झाले. तो गोठा माश्या आणि इतर किड्यामुंग्यांनी भरलेला होता, जिथे आमचे अध्ययन सुरू होते. 

तो काळ फार उल्हसित करणारी काळ होता. परमपूज्य दलाई लामा आमच्या अभ्यासात रूची दाखवत होते आणि त्यांनी आम्हाला काही छोटे छोटे ग्रंथही अनुवादासाठी दिले होते. जेव्हा परमपूज्य दलाई लामांनी धरमशाला येथे तिबेटी ग्रंथ आणि अभिलेखांसाठी ग्रंथालय उभे केले, तेव्हा त्यांनी गेशे धारग्ये यांना पाश्चिमात्त्य लोकांसाठी शिक्षक म्हणून नियुक्त केले आणि माझी मदत करणाऱ्या शारपा आणि खामलुंग रिंपोछे यांना अनुवादाचे काम सोपवण्यात आले. जेव्हा मी त्यांना विचारले की माझी काही मदत होऊ शकते का, तेव्हा परमपूज्य म्हणाले, ‘हो. पण आधी तू अमेरिकेला परत जा. आपला शोधनिबंध पूर्ण कर. आपली पदवी घे आणि मग परत ये.’

तिबेटी समाजासोबत समरस होणेः अनुवादक म्हणून जबाबदारी

भारतातील या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिथल्या तिबेटी समाजासोबत जुळवून घेताना मी ती पारंपरिक भूमिका स्वीकारली, ज्याच्याशी लोक जोडले जातील. आणि अशा रीतीने मी अनुवादक झालो. माझी तीव्र इच्छा होती की मी स्वतः बौद्ध साधना सुरू करावी आणि म्हणून १९७० सालच्या सुरुवातीलाच मी विधिवत बौद्ध धर्म स्वीकारून ध्यानधारणेला सुरुवात केली. तेव्हापासून मी प्रत्येक दिवशी ध्यानधारणा करतो आहे. 

अनुवादकाची भूमिका पार पाडण्यासाठी फक्त भाषिक कौशल्ये पुरेशी नसतात, तर तुम्हाला बौद्ध धर्माचे सखोल ज्ञान, अर्थात ध्यानधारणा आणि शिकवणींना प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचीही गरज असते. विभिन्न मनोवस्थांबाबतच्या ध्यानधारणेचे निरनिराळे अनुभव व्यक्त करणाऱ्या तांत्रिक संज्ञांना स्वतः वास्तविक जीवनात अनुभवल्याशिवाय त्याचा अनुवाद करता येणे अशक्य आहे. अनुवादासाठी वापरण्यात आलेल्या संज्ञांचा वापर हा मुख्यतः धर्मप्रसारकांकडून करण्यात आला होता, ज्यांचा रस मुख्यतः बायबलचा तिबेटी भाषेत अनुवाद करण्यासंदर्भात होता आणि त्यांना बौद्ध धर्मातील त्या शब्दांच्या गर्भितार्थाशी फार देणेघेणे नव्हते. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच आपल्या बौद्ध साधनेला बौद्ध धर्माबाबतच्या अध्ययनाशी जोडले. 

मी १९७१च्या उत्तरार्धात हार्वर्डला परत गेलो. काही महिन्यात मी माझा शोधनिबंध सादर केला आणि १९७२च्या वसंत ऋतूत मला माझी डॉक्टरेट पदवी मिळाली. माझी विद्यापीठात प्राध्यापक होण्याची कायम इच्छा असल्याने माझ्या प्राध्यापकांनी दुसऱ्या एका विद्यापीठात माझ्यासाठी फार छान प्राध्यापकाच्या नोकरीची व्यवस्था केली होती. पण मी प्रस्ताव नाकारला. मला आपले उर्वरित आयुष्य अशा लोकांसोबत घालवायचे नव्हते, जे बौद्ध धर्म कसा असेल, याचा फक्त अंदाज बांधत राहतात. मला अशा लोकांमध्ये राहायचं होतं, ज्यांना बौद्ध धर्म काय आहे, याचं स्पष्ट आकलन आहे आणि मी प्रमाण परंपरेतून शिकवण घेऊ इच्छित घेत होतो आणि बौद्ध धर्माबाबतच्या माझ्या अध्ययनाच्या आधारे एक निष्पक्ष दृष्टिकोन राखू इच्छित होतो. अर्थात, माझ्या प्राध्यापकांना वाटले की, मला वेड लागले आहे, पण तरीही मी भारतात परतलो. तिथे राहण्याचा फार खर्च नसल्याने तसे करणे शक्य झाले. 

माझे नवे भारतीय जीवन 

मी धरमशालाला परत आलो आणि न्गवांग धारग्ये आणि शारपा व खामलुंग रिंपोछें, जे आधीपासूनच ग्रंथालयाचं काम करत होते, त्यांच्यासोबत काम करू लागलो. तिथे मी डलहौसीपेक्षाही छोट्या झोप़डीत राहत होतो, ज्यात पाण्याचीही व्यवस्था नव्हती आणि शौचालयाचीही व्यवस्था नव्हती. तिथल्या एकमेव खिडकीला काचही नव्हती. सोनम नोब्रू नावाच्या ज्या तिबेटी गुरूंसोबत मी पूर्वी राहत होतो, तेही माझ्यासोबत तिथे राहायला आले. भारतातील वास्तव्या दरम्यानची २९ वर्षे मी त्या छोट्याशा झोपडीत काढली. 

त्या काळात, मी ग्रंथालयात परमपूज्य दलाई लामांच्या अनुवाद ब्युरोच्या स्थापनेत मदत केली आणि माझे अध्ययनही सुरू ठेवले. माझ्या लक्षात आले की बौद्ध अध्ययनातील माझी पार्श्वभूमी बौद्ध शिकवणींचा आणखी अभ्यास करण्यात मला साहाय्यक ठरत होती. मला इतिहासाची आणि विविध ग्रंथांची माहिती होती. माझ्याजवळ अधिकृत शिकवण देणारे गुरू होते. त्यामुळेच मी गोष्टी सहज समजू शकत होतो. परमपूज्य दलाई लामांनी मला चारही तिबेटी परंपरांच्या अध्ययनासाठी प्रेरित केले. तरी मी मुख्यतः गेलुगाचे अध्ययन केले, जेणेकरून मी तिबेटी बौद्ध धर्माचे व्यापक विषय-क्षेत्र समजून घेऊ शकेन. तो फार रोमांचक काळ होता कारण त्या काळात लोकांना तिबेटी बौद्ध शिकवणींमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, याची जाणीवच नव्हती. 

सरकॉंग रिंपोछे यांच्याकडून स्मृती आणि विनम्रतेची शिकवण 

१९७४ साली मी परमपूज्य दलाई लामांचे गुरू सरकॉंग रिंपोछे यांच्याकडे शिक्षा घेण्यास सुरुवात केली, ज्यांची १९६९ मध्ये माझी संक्षिप्त भेट झाली होती. धर्मशाळेतील आमच्या सुरुवातीच्या संपर्कावेळीच त्यांनी ओळखले होते की माझा त्यांच्यासोबत असा कार्मिक संबंध आहे की मी त्यांचा आणि कालांतराने परमपूज्य दलाई लामांचा अनुवादक होईन. त्यामुळे त्यांनी मला तसे प्रशिक्षण दिले. मी पुस्तकांचा अनुवाद आधीपासूनच करत असलो, तरी हे प्रशिक्षण मौखिक अनुवाद आणि शिकवणींसंदर्भात होते. ते मला त्यांच्याजवळ बसवून घेत, जेणेकरून ते निरनिराळ्या व्यक्तींशी कसा व्यवहार करतात, ते माझ्या लक्षात यावे. ते माझा स्मृती अभ्यासही घेतः मी त्यांच्यासोबत असायचो तेव्हा ते अचानक गप्प बसत आणि म्हणत, ‘मी आत्ता जे काही सांगितले, ते शब्दशः पुन्हा म्हणून दाखव’ किंवा ‘तू आत्ता जे म्हणालास, ते शब्दशः पुन्हा म्हणून दाखव.’

पुढील वर्षी ते जेव्हा पाश्चिमात्त्य लोकांना शिकवण देत असत, मी त्यांच्यासाठी अनुवादाचे काम सुरू केले. ते मला कधीच स्वतंत्रपणे शिकवण देत नसत, माझी शिकवण ही कायम दुसऱ्यासाठी त्यांच्या शिकवणीचा अनुवाद करतेवेळी पूर्ण होत असे- कालचक्राचा अपवाद सोडून. कालचक्राची शिकवण ते मला स्वतंत्रपणे देत असत, त्यांनी ओळखलं होतं की माझं त्यांच्यासोबत काहीतरी सखोल नातं आहे. माझ्या कोणत्याही शिकवणीवेळी मला टीपा नोंद करून घेण्याची परवानगी नव्हती, पण प्रत्येक गोष्ट स्मरणात ठेवावी लागायची आणि ती नंतर लिहून ठेवता यायची. काही दिवसांनी उपदेश संपल्यानंतरही त्यांनी लिहण्याची परवानगी नाकारली. ते मला दुसरेच एखादे काम सांगत असत आणि त्यामुळे केवळ रात्री उशिरा मला शिकवण लिहून ठेवण्याची संधी मिळत असे.  

जसे गेशे वांग्याल आपल्या घनिष्ट शिष्यांसोबत वागायचे, तसेच सरकॉंग रिंपोछेही माझ्यावर ओरडायचे. मला आठवतं आहे की एकदा मी त्यांच्यासाठी अनुवाद करत होतो, तेव्हा त्यांनी उच्चारलेल्या एका शब्दाचा त्यांना मी अर्थ विचारला, कारण मला तो शब्द नीट समजला नव्हता. ते माझ्यावर एकदम ओरडले आणि म्हणाले, ‘मला चांगलं आठवतं आहे, मी तुला सात वर्षांपूर्वी तो शब्द समजून सांगितला होता, तुला तो लक्षात का राहिला नाही?’

माझ्यासाठी त्यांचं आवडतं विशेषण होतं, ‘बुद्धू’ आणि मी बुद्धूसारखा वागू लागलो की ते हा शब्द वापरायला विसरत नसत आणि ते ही इतरांच्या उपस्थितीत. हे फारच छान प्रशिक्षण होते. मला आठवतं आहे, जेव्हा मी परमपूज्य दलाई लामांसाठी अनुवाद करत होतो आणि तिथे जवळपास दहा हजार श्रोते होते, परमपूज्य दलाई लामांनी मला थांबविले आणि ते हसत म्हणाले, ‘यांनी आत्ता एक चूक केली आहे.’ प्रत्येक वेळी बुद्धू संबोधले गेल्यावर मी लपण्याऐवजी अनुवादाचे काम सुरूच ठेवू शकत होतो. अनुवादासाठी अद्भुत एकाग्रता आणि जबरदस्त स्मरणशक्ती आवश्यक असते, त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला बौद्ध अध्ययनासोबतच पारंपरिक तिबेटी शिकवणही मिळाली.

मी सरकॉंग रिंपोछे यांच्याकडून ९ वर्षे गहन प्रशिक्षण घेतले. मी त्यांच्यासाठी अनुवादाचं काम केलं, त्यांचा पत्रव्यवहार आणि यात्रांमध्ये मदत केली. आणि या पूर्ण काळात ते मला केवळ दोनदा ‘धन्यवाद’ म्हणाले. ते सुद्धा माझ्यासाठी फार उपयुक्त होते, जसे तेच म्हणत असत की माझी अपेक्षा काय आहे? की माझ्या डोक्यावरून हात फिरवला जावा आणि मी कुत्र्याप्रमाणे शेपूट हलवत राहीन? अनुवाद करणाऱ्याला इतरांच्या भल्याच्या प्रेरणेतून अनुवाद करावा वाटायला हवा, ‘धन्यवाद’ सारख्या शब्दांनी स्वतःची प्रशंसा करून घेण्यासाठी नव्हे. अर्थात, कोणत्याही प्रकारे क्रोधित किंवा निराश न होता पारंपरिक शिक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माझी बौद्ध ध्यानधारणा आणि अभ्यास फार महत्त्वाचा होता.  

दोन संस्कृतीतील दुवा ठरण्यासाठी मदत 

सरकॉंग रिंपोछे १९८३ साली निवर्तले. त्यानंतर मला जगभरातून व्याख्यानांसाठी निमंत्रणे येऊ लागली, कारण मी रिंपोछे यांचा अनुवादक म्हणून मी त्यांच्यासोबत यापूर्वी अनेक ठिकाणी भेट दिली होती. तोपर्यंत मी परमपूज्य दलाई लामांसाठीही अनुवाद करू लागलो होतो. पण अनुवाद म्हणजे केवळ शब्दांतरण नव्हते, तर भाव आणि विचारांचा अनुवादही महत्त्वाचा होता. परमपूज्यांच्या पाश्चिमात्त्य जगतातील मनोवैज्ञानिक, वैज्ञानिक आणि धार्मिक नेत्यांसोबतच्या सुरुवातीच्या बैठकांमध्ये माझे काम मुख्यतः त्यांच्या कल्पना आणि विचार स्पष्ट करण्याचे आणि दोन संस्कृतीतील दुवा म्हणून काम करण्याचे होते, केवळ त्यांचे शब्द अनुवादित करण्याचे काम नव्हते(कारण तिबेटी भाषेत बहुतांश शब्द उपलब्धच नव्हते). आणि हे तेच काम होते, ज्यात मला फार छोट्या वयापासून रूची होती की मी बौद्ध शिकवणींच्या दृष्टिकोनातून विभिन्न संस्कृतींमधला दुवा म्हणून काम करावे. दोन संस्कृतींमधील संवादसेतू म्हणून काम करताना तुम्हाला दोन्ही संस्कृतींची, लोकांच्या विचारांची आणि त्यांच्या जीवनमानाची  चांगली जाण असणे आवश्यक आहे. मला तिबेटी लोकांसोबत दीर्घ काळ राहण्याचे सौभाग्य लाभले होते आणि त्यांच्या विचारपद्धतींना व जीवनपद्धतींना सखोलपणे समजून घेणे शक्य झाले होते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी हा अनुभव फार मोलाचा ठरला आहे. 

मला परमपूज्य दलाई लामांच्यावतीने अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना सुरुवात करता आली आणि मी अनेक प्रकल्पांना निर्देशितही केले. यातलं सर्वात महत्त्वाचं काम परमपूज्य दलाई लामा आणि तिबेटी लोकांसाठी जगाची दारं खुली करण्याचे होते. त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हते, फक्त शरणार्थींची कागदपत्रे होती आणि जोपर्यंत एखाद्या देशाकडून निमंत्रण येत नाही, तोपर्यंत त्यांना व्हिसा मिळत नसे. शिवाय त्यांचे संपर्क क्षेत्रही मर्यादित होते. इथे माझी हार्वर्डची पीएचडी फार उपयोगी पडली. कारण मला विश्वविद्यालयांमध्ये अतिथी व्याख्याता म्हणून जगभरात कुठेही आमंत्रित केले जाऊ शकत होते. अशा रीतीने मी संपर्क निर्माण केले, जेणेकरून भविष्यात तिबेटी लोकांना आणि कालांतराने परमपूज्य दलाई लामांना विदेशात आमंत्रित करणे शक्य होईल आणि परमपूज्यांची जगाच्या विविध भागात कार्यालये सुरू करता येतील. १९८५ साली मी सर्व साम्यवादी देश, जवळपास सर्व लॅटीन अमेरिकन देश आणि अफ्रिकेतील मोठ्या प्रदेशांमध्ये प्रवास सुरू केला. त्यानंतर मी बौद्ध आणि मुसलमानांमध्ये संवाद सुरू करण्यासाठी मध्य-पूर्वीय देशांमध्ये जायला सुरुवात केली. 

दरम्यान, मी परमपूज्य दलाई लामांना माझ्या यात्रांचे वृतांत पाठवण्यावर लक्ष केंद्रित केले, जेणेकरून मी ज्या देशांना भेटी देत होतो, त्या देशांची संस्कृती आणि इतिहासाची त्यांना ओळख व्हावी. पुन्हा एकदा माझी हार्वर्डमधली पदवी उपयोगी पडली, ज्यामुळे मला त्या देशातील धार्मिक नेत्यांना भेटण्याची आणि त्यांच्याकडूनच त्यांच्या धर्माबाबत आकलन करून घेण्याची संधी मिळाली. जेणेकरून परमपूज्य दलाई लामा जेव्हा या देशांना भेट देतील, तेव्हा त्यांना त्या त्या धर्माच्या धारणांची चांगली कल्पना असणार होती. मी जी काही बौद्ध आणि वैज्ञानिक शिकवण प्राप्त केली होती, त्यामुळे मला हे ठरवताना मदत मिळाली की नक्की कोणती माहिती महत्त्वाची आहे, ती कशा रीतीने संघटित करून सादर करायला हवी, ज्यामुळे ती लाभकारी ठरेल. 

मी अनेक प्रकल्पांशी जोडला गेलो होतो. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प होता, जो चेरनोबिल पीडितांच्या उपचारांसाठी तिबेटी चिकित्सा पद्धतींच्या वापराविषयी होता, हा प्रकल्प सोवियत संघाच्या आरोग्य मंत्रालयाने आयोजित केला होता. जरी तिबेटी औषध गुणकारी ठरले असले तरी जेव्हा सोवियत संघात फूट पडली, तेव्हा रशिया, बेलारूस आणि युक्रेनने सहकार्य करण्यास नकार दिला आणि तीन स्वतंत्र प्रकस्प सुरू करण्यास सांगितले, जे भौतिक आणि वित्तीय पातळीवर अशक्य होते. दुर्दैवाने तो प्रकल्प तिथेच संपला. 

आणखी एक चांगला प्रकल्प होता, ज्यात मंगोलियात बौद्ध धर्म पुनर्जीवित करण्यासाठी बकुला रिंपोछे यांच्यातर्फे लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा आधुनिक मंगोलियन भाषेत अनुवाद आणि प्रकाशन करण्यासंबंधी होता. बकुला रिंपोछे त्यावेळी मंगोलियातील भारताचे राजदूत होते. 

पश्चिमेला पुनरागमन

मी जवळपास जगभरातील सत्तर देशात प्रवास केला आणि शिक्षा दिली. हे सर्व करतेवेळी मी माझी दैनंदिन ध्यानधारणाही कायम ठेवली, ज्यातून मला माझे काम करत राहण्याची प्रेरणा मिळत राहिली. काळ पुढे जात राहिला, तसतसे मला अनेक नव्या ठिकाणांहून व्याख्यानांसाठी निमंत्रणे येत राहिली. नंतर हे प्रवास लांबत गेले- सर्वात लांबचा प्रवास पंधरा महिन्यांचा होता. जिथे मी दर आठवड्याला दोन किंवा तीन शहरांमध्ये जात होतो. इतका प्रवास करत असतानाच काम करत राहण्याचे स्थैर्य मला बौद्ध साधनेने दिले. विशेषतः या कारणासाठी की मी कायम एकट्याने प्रवास करत होतो. 

या काळात मी अनेक पुस्तके लिहिली आणि एका क्षणी माझ्या लक्षात आले की भारतात राहून माझे प्रकाशक स्नो लायन यांच्यासोबत काम करणे फार सोपे नाही. शिवाय मला इंटरनेटच्या दिशेने जाणेही महत्त्वाचे होते आणि ते भारतात राहून करणे फारच कठीण होते. त्यामुळे १९९८ साली मी भारतातून पश्चिमेला परत आलो. वर्षभर मला निमंत्रित करणाऱ्या अनेक जागांचा अंदाज घेतल्यानंतर मी बर्लिन, जर्मनीत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मला जर्मन आधीपासूनच येत असल्याने भाषेचा अडसर नव्हता आणि तिथे मला अपेक्षित असलेले स्वातंत्र्यही मिळाले. कारण एखाद्या संस्थेशी बांधील राहण्याची माझी इच्छा नव्हती. शिवाय बर्लिन पूर्व युरोपीय राष्ट्रे, पूर्ववर्ती सोवियत गणराज्यांच्या प्रवासासाठी सोयीचे होते, जिथे मी व्याख्यानांसाठी जात होतो. आणि त्या जागांशी माझे खास भावबंध जोडले होते. 

जवळपास तीस हजार पृष्ठसंख्या असलेल्या हस्तलिखितांसोबत मी पश्चिमेत आलो. यात मी लिहिलेली अर्धवट पुस्तके होती, त्याच्या टीपा होत्या, मी अध्ययन केलेल्या ग्रंथांचे अनुवाद होते, माझ्या स्वतःच्या व्याख्यानांचे लेख होते आणि माझ्या गुरूंसाठी अनुवादित केलेली व्याख्यानेही होती. त्या शिवाय परमपूज्य दलाई लामांद्वारे दिल्या गेलेले उपदेश, त्यांचे तीन प्रमुख गुरू आणि गेशे धारग्ये यांच्यातर्फे दिल्या गेलेल्या शिकवणींच्या नोंदींचे गठ्ठे होते. मला फार चिंता होती की माझ्या मृत्युनंतर हे सर्व रद्दीत फेकले जावू नये.  

बर्झिन अर्काइव्ह 

मला मागील पिढीतील महत्तम लामांकडून दीर्घकाळ शिक्षा ग्रहण करण्याचं अनोखं सौभाग्य लाभलं आहे. तिथे मी जे काही शिकलो आणि नोंदवून ठेवले, ते इतके बहुमूल्य होते की ते जगासोबत वाटून घेणे आवश्यक होते. पुस्तकं त्यांच्या स्वरूपामुळे हातात पकडायला छान वाटतात, पण तुम्ही विक्रमी खपाचे पुस्तक लिहिल्याशिवाय तुम्ही फार लोकांपर्यंत पोहचू शकत नाही. आणि माझ्या पुस्तकांपैकी एकही पुस्तक त्या प्रकारात मोडणारे नव्हते. सर्वसाधारणपणे पुस्तके छापण्यासाठी फार खर्च येतो, ती खरेदी करायलाही खर्चिक असतात, त्यांच्या प्रकाशनासाठी फार काळ खर्च होतो आणि तुम्ही पुढील आवृत्ती येईपर्यंत त्यात दुरूस्तीसुद्धा करू शकत नाही. माझी इतिहासात कितीही रूची असली तरी मला भविष्याकडे पाहायलाही आवडते आणि इंटरनेट हेच भविष्य आहे. खरेतर वर्तमान काळही इंटरनेटचाच आहे. हेच मनात ठेवून मी माझे सर्व साहित्य संकेतस्थळावर उपलब्ध करायचे ठरविले आणि नोव्हेंबर २००१ मध्ये berzinarchives.com हे संकेतस्थळ सुरू केले.

मी नेहमी एक तत्त्व पाळले आहे की या संकेतस्थळावरील साहित्य मोफत उपलब्ध असावे. , इथे कोणत्याही स्वरूपाची जाहिरातबाजी किंवा विक्री होऊ नये. संकेतस्थळावरील मजकुरात तिबेटी बौद्ध धर्माचे सर्व घटक, चारही तिबेटी परंपरा, मुख्यतः गेलुग परंपरा यांच्याविषयी माहिती उपलब्ध आहे. खूप सारे तुलनात्मक साहित्यही उपलब्ध आहे, हे साहित्य तिबेटी चिकित्सापद्धती, ज्योतिषशास्त्र, बौद्ध इतिहास, तिबेटी इतिहास आणि बौद्ध व इस्लामदरम्यानच्या संबंधा संबंधी आहे. आणि माझा हे सर्व साहित्य अनुवादाच्या रूपातून विविध भाषांमध्ये पोहचवण्यावर विश्वास आहे. 

मला वाटते की मुस्लिम विभागासंबंधीचे काम फार महत्त्वपूर्ण आहे आणि परमपूज्य दलाई लामा या कामाला तीव्र समर्थन देतात. माझा इस्लामिक देशातील प्रवास आणि तिथल्या विद्यापीठातील व्याख्यानांमुळे मला हे स्पष्ट झाले आहे की तिथले लोक जागतिक ज्ञानासाठी तहानलेले आहेत. त्यांना वेगळं केलं जाऊ नये, हे जागतिक संवादाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. उलट तिबेटी शिकवण त्यांनाही उपलब्ध करायला हवी. पण हे करतेवेळी ही काळजीही घ्यायला हवी की त्यांना असे सुचित होऊ नये की आपण त्यांच्या बौद्ध धर्मांतरासाठी प्रयत्न करीत आहोत. 

उपोद्घात

२०१५ पर्यंत बर्झिन अर्काइव्ह संकेतस्थळ २१ भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे आणि दरवर्षी जवळपास दोन मिलियन लोक संकेतस्थळाला भेट देतात. शंभरहून अधिक कर्मचारी आणि ऐच्छिक स्वयंसेवकांच्या कठोर मेहनतीचे हे फलस्वरूप आहे. अलीकडच्या काळात परमपूज्य दलाई लामांनी वारंवार २१व्या शतकातील बौद्ध धर्मावर भर दिला आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन मी २१व्या शतकातील अशा युवकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, जे माझ्या संकेतस्थळाला भविष्यातील व्यापक वाचकांच्या अभिरूचीनुसार नवे रूप प्रदान करू शकतील. याच प्रयत्नांचा भाग म्हणून studybuddhism.com चा जन्म झाला आहे. 

नवे संकेतस्थळ पूर्णतः प्रतिसादक्षम आहे आणि डेस्कटॉप व इतर हॅण्डहेल्ड डिव्हाइससाठीही समर्पक आहे. वापरताकर्त्यांच्या गरजांचे मूल्यमापन आणि निरीक्षण करून त्या आधारे आम्ही संकेतस्थळ तयार केले आहे. सोशल मीडियावरही आम्ही आमचा वावर वाढवला आहे आणि दर्जेदार ऑडियो व व्हिडीओ उपलब्ध केले आहेत. या सर्वामागे तिबेटी बौद्ध धर्मात रूची असणाऱ्यांसाठी प्रारंभिक स्तरापासून उन्नत स्तरापर्यंत सहज ग्रहण करता येणारी माहिती सहज उपलब्ध करून देणारे एक केंद्रस्थान निर्माण करण्याचा उद्देश आहे. आम्हाला वापरकर्त्यांच्या एक समूह निर्माण करायचा आहे, जे एकत्रित अभ्यास करू शकतील आणि आम्ही त्यांना सर्वश्रेष्ठ शिकवणींसाठी एक खुले व्यासपीठही उपलब्ध करून देऊ इच्छितो. 

या क्षणी आम्ही काही भाषांमध्येच पूर्वीचे साहित्य मर्यादित स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. नव्याने सुरुवात करणाऱ्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नवे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. जोपर्यंत जुन्या संकेतस्थळावरील सर्व माहिती नव्या संकेतस्थळावर येत नाही, तोपर्यंत जुने संकेतस्थळही सुरू राहील. 

सारांश

तर अशी ही माझी संक्षिप्त गोष्ट आहे. या सर्व गोष्टींदरम्यान मी फार दृढविश्वासाने माझी बौद्ध साधना कायम ठेवली आहे. उदाहरणादाखल, यातील बहुतांश काळात मी दिवसातील किमान दोन तास ध्यानधारणा केली आहे. मी अनेकदा दीर्घकालीन एकांतवासातील साधना केल्या आहेत. हल्ली मी माझा ध्यानधारणेचा कालावधी कमी केला आहे. पण तरीही मी किमान ३० मिनिटांची ध्यानधारणा आजही करतोच. आणि मी साधनेत अधिक भर दिल्या गेलेल्या करुणा, योग्य प्रेरणा, अहंभाव नियंत्रण सारख्या साधनेच्या महत्त्वाच्या घटकांना विशेष महत्त्व देतो. मला परमपूज्य दलाई लामांपर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखविणारे माझे गुरू गेशे वांग्याल यांच्यापासून दलाई लामांच्या गुरूंपर्यंत, या सर्वांकडून प्रेरणा घेऊन मी अर्थपूर्ण जीवन जगण्यात यशस्वी झालो आहे, आणि मला आशा आहे की माझे आयुष्य बौद्ध साधना आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे अध्ययन, बौद्ध धर्मातील अनुभवजन्य आणि वस्तुगत घटक एकत्रितपणे प्रस्तुत करण्याच्या दृष्टीने इतरांसाठी उपयोगी ठरले आहे. शक्यता आहे की माझ्या जीवनाची गाथा तुमच्यातील काही लोकांनाही असे काहीतरी करण्यासाठी प्रेरित करेल. 

Top