धर्म शिकवणींचे श्रवण

ध्यानधारणेचा नक्की फायदा काय 

आपले जीवनमान बदलण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडविण्यासाठी ध्यानधारणा हा एक उत्तम मार्ग आहे. कसे? आपले जीवन आपल्या भावना आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित असते, या भावना व व्यक्तिमत्त्व आपली आर्थिक परिस्थिती, आपला भोवताल आणि इतर गोष्टींमुळे प्रभावित होत असतात. आपल्याला जीवनाचा थोडासा देखील अनुभव असल्यास आपल्या लक्षात येईल की काम, पैसा,  मित्रमंडळी यांसारख्या भौतिक गोष्टीत बदल झाला तरी जोपर्यंत आपला दृष्टिकोन व मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपल्याला एकाच प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागते. आपल्याला कितीही मित्र असले तरी आपल्याला सतत असुरक्षित वाटू शकते. आपण कितीही श्रीमंत असलो तरी आपल्याला राग येऊ शकतो आणि आपण निराश होऊ शकतो. केवळ बाह्य परिस्थिती बदलून अशा गोष्टी बदलता येत नाहीत.

अशा वेळी ध्यानधारणा उपयुक्त ठरते कारण आपल्या जीवनाचा दर्जा वाढवायचा असेल तर आपल्याल्या आपल्या मनावर काम करणे आवश्यक आहे. यामध्ये केवळ आपले बौद्धिक गुण किंवा आळसावर विजय मिळवून एकाग्रता वाढविणे याच गोष्टींचा समावेश होतो असे नाही. या गोष्टीही महत्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर आपण आपल्या मनोवस्थांचाः आपली असुरक्षितता आणि जीवनविषयक भ्रमितावस्था, यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. 

बौद्ध संदर्भातून ध्यानधारणा

ध्यानधारणा केवळ बौद्ध धर्मातच नाही, तर अन्य धर्मातही केली जाते. बौद्धधर्मानुसार ध्यानधारणा म्हणजे आवर्तनच्या माध्यमातून स्वतःचे सकारात्मक मन जागृत करणे होय. हे एखाद्या खेळाचे प्रशिक्षण घेताना अथवा संगीत शिकताना आपण ज्या पद्धतीने गोष्टींची पुनरावृत्ती करतो त्याचप्रमाणे आहे. ध्यानधारणेत आपण मनाची सकारात्मकता विकसित करून स्वतःलाच आपल्या सकारात्मक मनाचा परिचय करून देतो. सुरुवातीला हे सर्व आपल्यावर लादल्यासारखे अथवा कृत्रिम स्वरूपाचे वाटेल, परंतु कालांतराने आपण त्या मनोवस्थेशी इतके एकरूप होतो की ती सहज आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून जाते.

एखादी गोष्ट अशाप्रकारे विकसित केली आहे, याचा अर्थ ती अयोग्य आहे, असा होत नाही. आपण जर मनाची नवीन अवस्था जागृत करत असू तर असे करणे अनैसर्गिक आहे असा विचार करू नये. अनेक लोक स्वतःमध्ये बदल न करता आपण मूलतः जसे आहोत तसेच राहणे योग्य आहे असे समजतात. पण जर आपण नैसर्गिक अवस्थेतच राहिलो असतो तर आजही आपण आपल्या पॅन्टमध्ये प्रातर्विधी केला असता. आपल्याला आपले आयुष्य सुधारण्यासाठी अनेक प्रकारे प्रशिक्षित केले गेले आहे. आपण आपल्या मनाच्या बाबतीतही असे करू शकतो आणि ते केलेही पाहिजे.

आपण असा युक्तिवाद करू शकत नाही की नैसर्गिक किंवा स्वाभाविक वर्तनाने सर्व ठीक होईल, त्यामुळे आपण नैसर्गिकपणेच वागायला हवे. कारण नैसर्गिक वागण्याची परिणती नेहमीच चांगली असेल, असे काही नाही. हे एखादे मूल रडत असेल आणि त्याच्या रडण्याने आपल्या रागाचा पारा चढला आणि त्या मुलाला गप्प करण्यासाठी आपल्याला त्याला मार द्यावा वाटला, तर अशा भावनेला नैसर्गिक समजून योग्य समजण्यासारखे आहे. पण हे कदाचितच योग्य असेल, असेल का? मध्यरात्री मूल रडायला लागले तर आपली पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया कदाचित त्याला मारण्याची असू शकते, पण आपल्याला माहीत असते की हे अयोग्य आहे. 

म्हणूनच ध्यानधारणेचे महत्त्व आहे, जी बौद्ध साधना आणि अभ्यासात अमूल्य भूमिका बजावते. लोक अनेकदा गफलत करतात की साधना अभ्यास आणि ध्यानधारणा या भिन्न गोष्टी आहेत, पण बौद्ध शिकवणीत हे असे बिलकूलच नाही.


लाभदायी सवयी विकसित करणे

लाभदायक सवयी विकसित करण्यापूर्वी आपल्याला त्या सवयी कोणत्या आहेत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, परंतु हे ज्ञान हे त्यातील अंतिम ज्ञान नाही. आपण हे ज्ञान आत्मसात करून ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनविणे आवश्यक आहे, जे ध्यानधारणेमुळे साध्य होते. ज्याप्रमाणे अन्नाचे पचन होण्यासाठी ते प्रथम तोंडात घेऊन चावावे लागते त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण शिकवण समजून घेऊन त्यावर विचार करत नाही तोपर्यंत ती शिकवण केवळ ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मसात करणे अश्यक्य आहे. आणि अन्नाबाबतीत बोलायचे झाले तर अन्न केवळ चावून थुंकून देण्यात काहीच हासील नसते चावलेले अन्न गिळून त्याचे पचन झाले तरच त्याचा आपल्याला फायदा होतो.

ध्यानधारणेची सुरुवात कशी करावी? आपण यापूर्वी पाहिले तसे ध्यानधारणा ही त्रिस्तरीय  प्रक्रियेतील तिसरा भाग आहे. अशा प्रकारची संरचना ही सर्व भारतीय परंपरांमध्ये आढळते उदाहरणार्थ, हिंदूमधील उपनिषदात अशी संरचना आहे. तरीही अनेक लोक हे मान्य करत नाहीत की बौद्ध धर्मातील अनेक पद्धती परंपरागत भारतीय व्यवस्थेशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत. काही पद्धती कदाचित सारख्या असल्या तरी बौद्ध धर्माचं वेगळं वैशिष्ट्य काय आहेः आमचे उद्दिष्ट काय आहे, आमचा यथार्थाबाबतचा बोध काय आहे आणि आमच्या प्रेरणा काय आहेत. 

ध्यानधारणेचे तीन टप्पे आहेत. श्रवण, मनन आणि ध्यान. जर आपण बौद्ध संदर्भातून ध्यानधारणा करत असू तर त्याचा उपयोग आपण बौद्ध शिकवण आत्मसात करण्यासाठी करतो. 

शिकवणींचे श्रवण

आम्ही पहिल्या भागाला ‘श्रवण’ असे का म्हणतो? बुद्धाच्या काळात त्यांची कोणतीही शिकवण लिहून ठेवली नव्हती,  त्यामुळे या शिकवण शिकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कुणीतरी त्यांचे स्मरण करून त्याचे पठण करताना ऐकणे आणि त्यांच्याकडून त्या समजून घेणे. सध्याच्या काळात आपण सर्व शिकवणींचे वाचन करू शकतो, मग श्रवणाचे काही विशेष फायदे आहेत का? अर्थात श्रवणामुळे तुमचा अशा शिक्षकाशी थेट संबंध येतो, ज्याला विद्यार्थ्यांना शिकवणींचे आकलन व्हावे, अशी तळमळ असते. ते विविधांगी पद्धतींनी गोष्टींचे विश्लेषण करू शकतात आणि तुम्हाला शंका असल्यास तुम्ही त्यांना थेट विचारू शकता. हे पुस्तक वाचनात शक्य नसते. 

श्रवणाचा एक तोटा म्हणजे जर ऐकताना तुमचे लक्ष्य विचलित झाले तर पुस्तकांप्रमाणे तुम्ही मागचे पान पालटू शकत नाही. जर तुम्ही एक मोठ्या समूहात बसून ऐकत असाल तर केवळ तुमचे लक्ष्य नव्हते म्हणून शिक्षकांना पुन्हा त्या गोष्टी सांगावयास लावणेही लज्जास्पद आहे. कदाचित तुम्ही खूप मागे बसलेले असू शकता आणि त्यामुळे शिक्षकांचे बोलणे तुम्हाला ऐकू आले नसेल अथवा ज्या खोलीत तुम्ही बसला असाल तिथे खूप उष्णता असल्याने तुम्हाला झोप आली असेल, असे अनेक तोटेही आहेत. परंतु याचा अर्थ तुम्ही अधिक प्रयत्नशील असायला हवे आणि बौद्ध शिकवणीत प्रयत्नशीलता हा एक महत्त्वाचा घटक असून तो  विकसित करणे आवश्यक असते. बौद्ध धर्माचा अभ्यास आणि साधना करताना निष्क्रिय राहून चालत नाही.

बौद्ध धर्माची शिकवण देणाऱ्या शिक्षकांना अशी स्पष्ट सूचना दिली जाते की विद्यार्थ्यांना अगदी सहज सोपे जाईल असे शिकवू नका, पहिल्याच वेळी त्यांना गोष्टी फार स्पष्टपणे समजवू नका. माझ्या सारख्या अनेक लोकांसाठी हे खूप कठीण आहे कारण मी माझे म्हणणे अतिशय स्पष्टपणे मांडतो. माझे गुरू सरकाँग रिंपोछे, ज्यांचा अनुवादक म्हणून मी काम करत होतो, तेव्हा ज्यांनी फार जाणीवपूर्वक अध्यापनाची पद्धत शिकवली. त्यांच्या सूचना स्वीकारायच्या झाल्यास, ते म्हणत, ‘ सुरुवातीलाच सर्व गोष्टी समजावून सांगू नयेत, कारण ज्यांना शिकण्यात खरेच रस आहे त्यांना इतर कारणांनी तिथे आलेल्यांपासून वेगळे करणे गरजेचे असते. ज्यांना खरोखरच शिकण्यात रस आहे, ते अधिक ज्ञानालालसा ठेवतील आणि त्याची विचारणा करतील. आणि विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये शिकण्याबाबत तीव्र इच्छा जागृत करणे महत्वाचे असते.’ 

जर विद्यार्थी म्हणून तुमची तक्रार असेल की शिक्षक सरळ, सोपे शिकवत नाहीत आणि म्हणून तुम्हाला तिथे परत जायचे नाही, तर तुम्ही त्या शिक्षकाच्या गुणवत्तेबाबत विचार करायला हवा. तो शिक्षक खरंच अपात्र आहे आणि त्याला सोपेपणाने समजावता येत नाही?  या प्रकारात मोडणारेही अनेक असतात. किंवा त्या शिक्षकाने तुमच्यातील चिकाटी व संयम वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या नाहीत? श्रवणाचा मुख्य हेतू म्हणजे शिकवण ऐकून त्यावर विचार करणे जो की दुसरा टप्पा आहे. जर शिक्षकाने तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे त्वरित दिली नाहीत तर तुम्ही त्यावर विचार करू शकाल आणि त्यामुळे तुमच्यात शिकवणींचे स्वतःच परीक्षण करण्याचा गुण विकसित होईल. 

शिकवणींचे परीक्षण 

तुम्ही घेत असलेल्या शिकवणींचे परीक्षण करून त्या तुमच्यासाठी उपयुक्त आहेत का, हे पाहणे महत्त्वाचे असते. सर्वप्रथम त्याबाबतचे तुमचे मत तपासा आणि मग इतरांकडून त्यावर प्रतिक्रिया घ्या. मोठ्या गटामध्ये अशा प्रतिक्रिया कळणे अवघड असते आणि तुम्हाला तुमचे शिक्षक जर वर्षातून एकदाच भेटत असतील तरी ते खूपच कठीण असते. इथे मी आदर्श परिस्थिती काय असेल याबाबत बोलत आहे. अनेक बौद्ध केंद्रात जिथे बहुतांश वेळेस शिक्षक उपलब्ध नसतात, तिथे तुम्हाला वाचन आणि ध्वनीमुद्रित मजकुरावर अवलंबून राहावे लागते, यांमधूनही तुम्हाला चांगले ज्ञान मिळू शकते. पण अशा रीतीच्या अध्ययनात उपलब्ध असलेले साहित्य आपण कादंबरी वाचनासारखे वाचत नाही, किंवा टॉयलेटमध्ये बसूनही वाचत नाही. हे वाचताना तुम्ही आदराने, शांत चित्ताने वाचले पाहिजे. आपण हळूवारपणे त्यांचे आकलन करून घेऊन त्यावर विचारमंथन करतो. तुमच्या अभ्यास केंद्रात शिक्षक नसतील तर तुम्ही शिकवण वाचून त्याविषयी इतरांसोबत चर्चा करू शकता. काही लोकांना शिकवणींचे चांगले आकलन झालेले असू शकते आणि ते इतरांनाही अंतर्दुष्टी देऊ शकतात. जर आपण तथाकथित ‘बेघर साधकां’सारखे असू जे कोणत्याच बौद्ध अध्ययन केंद्रात जात नाहीत अथवा अध्ययन केंद्रात जाऊनही ज्यांना सहजता वाटत नसेल तर असे लोक त्यांना आवडतील अशा ऑनलाईन बौद्ध चर्चा गटात सामील होऊ शकतात.

अशा प्रकारे इतरांशी केलेली चर्चा उपयुक्त ठरते. असे केले नाही तर शिकवण केवळ वास्तविक जीवनाशी काडीमात्र  संबध नसलेले बौद्धिक बनून जाते. याबाबत आपण गंभीर असले पाहिजे, पण गांभीर्याचा अर्थ न हसता कठोरपणे बसून राहणे असा नाही, तर धर्माच्या बाबतीत सखोल चर्चा करणे असा होतो. आणि जर कोणी काही मजेशीर किस्सा सांगितला अथवा हास्यास्पद चूक केली तर आपण मनमोकळेपणाने हसू शकतो.

काही पाश्चिमात्य लोकांसाठी एकाचवेळी तणावमुक्त राहणे व त्याचवेळी गांभीर्य पाळणे खूप कठीण असते. तुम्ही तुमच्या आयुष्यात बौद्ध शिकवण कशी अंगीकारली आहे, याचा तो संकेत आहे. शेवटी बौद्ध शिकवणीचा मूळ उद्देश तुम्हाला आनंदी करणे हाच आहे. जर आपण अद्याप सैन्यात असल्यासारखे औपचारिक असू तर ती आपल्या मनाची आनंदी स्थिती नाही. आपण घाबरतो की आपण परिपूर्ण असणार नाही आणि आपल्या हातून काहीतरी चूक घडेल व आपल्याला शिक्षा होईल. परंतु हा बौद्ध धर्म नव्हे! 

उलटी फुलदाणी, अस्वच्छ फुलदाणी, फुटलेली फुलदाणी

आता पुन्हा श्रवणाकडे वळू. शिकवण कशी ऐकावी याबाबत सांगताना आम्हाला विविध प्रकारच्या फुलदाणींचे दाखले दिले जातात व त्यांच्या सारखे कसे नसावे हे सांगितले जाते. पहिले म्हणजे आपण उलट्या फुलदाणी सारखे नसावे कारण असे असेल तर आतमध्ये काहीच शिरणार नाही; आपलं मन मोकळं असणं गरजेचं असतं. आपण तडा गेलेल्या फुलदाणीसारखेही असू नये कारण त्यामध्ये जे काही जाते ते गळून बाहेर पडते. आणि शेवटचे म्हणजे आपण अस्वच्छ फुलदाणीसारखे असू नये. आपल्या मनात पूर्वीपासून पूर्वग्रह, गैरसमज असतील तर बौद्ध शिकवणाबाबत पूर्णतः गोंधळ उडून जाईल. 

जेव्हा तुम्ही बौद्ध शिकवणीचा अभ्यास करता तेव्हा त्यांची इतर धर्मातील शिकवणींसोबत तुलना करणे टाळायला हवे. तुम्ही कदाचित विचार कराल की ‘हिंदू धर्मात असे सांगितले आहे आणि ताओ विचारसरणीत तसे सांगितले आहे’. माझे एक गुरू सांगत असत की ‘जर तुम्ही तुम्हाला पूर्णपणे माहीत नसणाऱ्या दोन गोष्टीची तुलना करत असाल तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे फक्त तुमचा गोंधळ वाढेल.’ जर तुम्हाला दोन्ही गोष्टीबद्दल सखोल ज्ञान असेल तर तुम्ही अशी तुलना करू शकता. पण जर तुम्हाला बौद्ध धर्माची शिकवण माहिती नसेल तर अशावेळी ‘ती शिकवण अशी आहे अथवा तशी आहे’ असा विचार करण्याऐवजी त्या शिकवणी ऐकण्यावर भर दयावा. अन्यथा तुम्ही तुमच्या चुकीच्या व असंबद्ध पूर्वग्रहांमध्ये अडकून पडाल.

ज्यावेळी तुम्ही तडा गेलेल्या फुलदाणीसारखे होऊ नका असा सल्ला दिला जातो, त्यावेळी त्याचा अर्थ तुम्ही यापूर्वी जे शिकला असाल ते आठवत बसू नका असा होतो. अनेक लोकांना टिपणं काढायची सवय असते, अशी टिपणं नंतर वाचल्यास त्याचा फायदा होतो. आपली स्मरणशक्ती फारच चांगली असल्याची परिस्थिती सोडल्यास अन्य कोणत्याही स्थितीत टिपणं काढणं फायद्याचं असतं. 

 पाश्चिमात्य लोकांची मानसिकता पाहणे फारच रोचक असते, जोपर्यंत आम्हाला कोणती परीक्षा द्यायची नसते तोपर्यंत आम्ही एखादी गोष्ट शिकण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही.

आम्ही एखादी गोष्ट केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीच शिकतो आणि त्यातही जर बेईमानी करावी लागली तर का नाही? पण बौद्ध शिकवणीत असल्या गोष्टी फायद्याच्या नाहीत. इथे परीक्षा नसते, गुण नसतात की तुम्हाला संमती देणारे शिक्षक नसतात. इथे मुख्य मुद्दा हा आहे की आपण स्वतःत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे – जर आपला त्याच्यावर पूर्ण विश्वास असेल तर – आपण इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करत असतो. इथे दुसऱ्यांसोबत स्पर्धा नसते. आपल्याला फक्त स्वतःत सुधारणा घडविण्याच्या संदर्भातून बौद्ध शिकवणींकडे पाहायचे असते. आपण असा विचार करू नये की, ‘ती व्यक्ती रागीट आहे, मी तसा नाही.’ धर्मरूपी आरशाचे तोंड तुमच्या दिशेने हवे बाहेर नको. 

औषध सादृश्य शिकवण

शिकवणींच्या श्रवणासंबंधीची आणखी एक सूचना म्हणजे यात आपण स्वतःला आजारी समजणे अपेक्षित असते, बुद्धाला वैद्य, तर बौद्ध शिकवणींना औषध समजले जाते. तर आपण सिद्धीप्राप्त लोकांना परिचारिका समजतो, ज्या आपल्याला मदत करतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर,  बौद्ध शिकवणींचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण हे मानून चालतो की ‘मला समस्यांनी घेरले आहे.’ आपल्यात अनेक आजार असतात मग तो स्वार्थीपणा असेल वा क्रोध किंवा अन्य एखादा आजार असेल, ज्यातून आपल्याला बरे व्हायचे आहे. बुद्ध हे सर्वोच्य वैद्य आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार, त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे मी हे शिकवणरुपी औषध घेत आहे. मी हे औषध दररोज न चुकता घेईन तसेच सर्व औषध एकाचवेळी घेणार नाही. बौद्ध धर्माचा अभ्यास करणे हे एक प्रकारे प्रतिजैविके घेण्यासारखे आहे. ते घेताना तुम्हाला ठरावीक वेळेस ठरावीक प्रमाणातच घ्यावे लागते. जर तुम्ही ते घेणे मधेच बंद केले अथवा काही दिवस घेतले नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. ही बौद्ध शिकवणीला चिकित्सेच्या स्वरूपात पाहण्याची पद्धत आहे. 

 दुसरी सूचना म्हणजे जेव्हा आपण बौद्ध शिकवण मिळवत असतो, तेव्हा आपल्याला वाटते की आपण एखाद्या पवित्र भूमीवर आहोत आणि स्वतः बुद्ध आपले शिक्षक आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला शुद्ध ज्ञानप्राप्ती होत आहे. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या शिक्षकांना बुद्ध मानलेच पाहिजे, परंतु आपण त्यांच्याप्रति, स्वतःप्रति आणि शिकवणीप्रति आदर बाळगायला हवा. आपण काहीतरी गंभीर गोष्ट करत आहोत याचा अर्थ असा नाही की आपण उदास चेहऱ्याने तिथे बसून राहावे, त्याऐवजी आपण त्या कोंदट खोलीचा विचार न करता आपल्याला जी शिकवण लाभली आहे, त्याबाबत खुल्या मनाने विचार करावा.

मन ग्रहनशील बनविणे

बुद्धांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे की, आपण सोने खरेदी करताना ज्या प्रमाणे पडताळणी करतो त्याच प्रमाणे या शिकवणींची पडताळणी करावी. केवळ आपली बुद्धावर श्रद्धा आहे म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. हे करण्यासाठी आपले मन खुले हवे, त्याशिवाय आपण हेही ग्राह्य धरायला हवे की केवळ मौजेसाठी बुद्ध एखादी शिकवण देणार नाही. अशा मानसिकतेतून आपण बौद्ध शिकवणींचा अभ्यास करून त्यातून नेमके काय सांगायचे आहे, याची पडताळणी करू शकतो. नंतर त्यातील जे उपयुक्त आहे आणि यथार्थ आहे ते अंगीकारु शकतो. मी गतजन्म व पुढील जन्मांच्या दृष्टीने अनुमानाचे एक उदाहरण देतो.

माझी जडणघडण सर्वसामान्य पाश्चिमात्य पद्धतीने झाली आणि अर्थातच जेव्हा मी बौद्ध धर्माचा अभ्यास सुरू केला तेव्हा माझा पूर्वजन्म व पुनर्जन्मावर विश्वास नव्हता. बहुतांश पाश्चिमात्य लोकांसाठी हा विचार परका आहे, आणि त्यांनी मृत्युपश्चात जीवनाची कल्पना केलीच तर ती ख्रिश्चन धर्मातील स्वर्ग आणि नरकाच्या संकल्पनेसारखी असते. पण प्रत्येक व्यक्तीचा आपल्या पूर्वजन्मातील आईसारखा विचार करणे, असा विचार सर्व शिकवणींमध्ये अंतर्भूत आहे, त्यामुळे ही संज्ञा अशीच फेकून देऊ शकत नाही. 

सुरुवातीला पुनर्जन्माच्या संकल्पनेला सामोरे जाताना मी विचार करत असे की, ‘मला पुनर्जन्माची संकल्पना आत्ता समजत नसली, तरी या क्षणी मी ती यथार्थ समजून घेईन. मी याविषयी कोणताही बहाणा न देता अथवा टाळाटाळ न करता भरपूर वेळ घेऊन ती संकल्पना समजून घेण्यासाठी प्रयत्न करेन.’ कालांतराने मला असे समजत गेले की पुनर्जन्माच्या आधारावर सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही फायदेशीर व यथार्थ आहे. कदाचित त्यामुळेच पुनर्जन्माची संकल्पना खरी असू शकेल.

खरेतर हे तुम्हाला नंतर समजते की बुद्धाच्या पुनर्जन्मासंदर्भातील शिकवणीचा संबंध, अर्थात पुनर्जन्म नक्की कोणाचा होतो, हे उमजत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुनर्जन्मची संकल्पना समजू शकत नाही. हे साध्य करण्यासाठी तुम्ही सखोल स्तरावर जाणे गरजेचे असते आणि तिथून पुढे भूतप्रेत, नरक आदी गोष्टींचे अर्थ लागू लागतात. आणि जर आपल्याला या मनोवस्थेचा बोध होत नसेल तर यातील कोणतीच गोष्ट समजणार नाही. त्यामुळे शिकवणीतील एखादा भाग जर समजला नाही अथवा थोडा विचित्र वाटला तरी तो लगेच नाकारू नये. खुले मन असण्याचा आणि विवेकी जागरूकतेचा संदर्भ याच गोष्टींशी आहेः ‘हो, हीच बुद्धाची शिकवण आहे, बुद्धांनी पुनर्जन्माविषयी शिकवले आहे आणि हे मला मान्य नसले, आवडत नसले तरी जर मला बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करायचा असेल तर या गोष्टींना सामोरे जावे लागेल.’


सारांश

बौद्ध ग्रंथात दिलेले सल्ले हे केवळ बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठीच उपयुक्त नाहीत, तर ते आपल्या दैनंदिनी जीवनातही उपयुक्त आहेत. तडा गेलेल्या अथवा अस्वच्छ फुलदाणी सारखे असणे कधीच चांगले नसते. बौद्ध धर्माची शिकवण आपल्या जीवनात अंगीकरणे ही एक सक्रिय प्रक्रिया आहे, जी श्रवणातून सुरू होते. एकदा हा टप्पा ओलांडला की जणू एखादी हिऱ्याची अंगठी विकत घेताना आपण जशी ती चांगली पारखून घेतो, त्याप्रमाणे आपण शिकवणींचे यथार्थ परीक्षण करतो आणि ज्या विषयांचे आपल्याला संपूर्ण आकलन झालेले नाही, त्यांना खुल्या मनाने समजून घेतो

Top