आशिया खंडातील बौद्ध धर्माचा प्रसार

05:05
कोणतीही धर्मप्रसारक चळवळ विकसित न करता, बौद्ध शिकवणीचा शतकानुशतके सर्वदूर प्रसार होत राहिला आहेः सर्वप्रथम दक्षिणपूर्व आशिया, त्यानंतर मध्य आशिया ते चीन आणि नंतर उर्वरित पूर्व आशिया, असा प्रवास करत अंतिमतः तिबेट आणि मुख्य आशियातील उर्वरित भागात बौद्ध शिकवणींचा प्रसार झाला. बहुतांश वेळा पाश्चिमात्त्य व्यापाऱ्यांच्या बौद्ध धारणांमध्ये स्थानिकांनी रस दाखवल्याने अतिशय जैविकरीत्या हा धर्मप्रसार झाला. काही वेळा स्वतः राज्यकर्त्यांनी जनतेत नैतिकतेची तत्त्वे रूजवण्यासाठी बौद्ध धर्माचा अंगीकार केला, पण धर्मप्रसारासाठी कधीही बळाचा वापर किंवा सक्ती करण्यात आली नाही. बुद्धांचा संदेश जनतेसाठी उपलब्ध करून देत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी निवडण्याचे त्यांना स्वातंत्र्य देण्यात आले.

भारतीय उपखंडात बौद्ध शिकवणींचा शांततापूर्ण प्रसार झाला आणि तिथून सर्वदूर आशियात याचा प्रसार झाला. जेव्हा जेव्हा बौद्ध धर्माने नव्या संस्कृतीत प्रवेश केला, तेव्हा तेव्हा ज्ञान आणि करुणेच्या मूलभूत तत्त्वांबाबत तडजोड न करता, बौद्ध साधनांनी स्थानिक मानसिकतेनुसार स्वतःला परावर्तित केले. बौद्ध धर्मात कधीच धर्मप्रमुखांच्या संकल्पनेसह धार्मिक अधिपत्त्याची उतरंड विकसित झाली नाही. उलट, ज्या देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला, त्या देशांमध्ये त्याचे स्वतःचे स्वतंत्र धार्मिक स्वरूप, धार्मिक संरचना आणि स्वतंत्र आध्यात्मिक नेतृत्व विकसित झाले. तिबेटचे परमपूज्य दलाई लामा हे सध्याच्या बौद्ध नेतृत्व समूहाचे प्रख्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित प्रमुखाधिकारी आहेत. 

संक्षिप्त इतिहास

बौद्ध विचारधारेच्या दोन प्रमुख शाखा आहेतः हीनयान हे साधारण साधन, ज्यात व्यक्तिगत मुक्तीवर भर दिला जातो आणि महायान हे विस्तृत साधन, ज्यात इतरांसाठी अधिकाधिक साहाय्यक ठरण्यासाठी संपूर्ण ज्ञानप्राप्ती झालेला बुद्ध होण्यावर भर दिला जातो. हीनयान आणि महायानाच्या अनेक उपशाखा आहेत. पण वर्तमानात बौद्ध धर्माच्या तीन प्रमुख शाखा जिवंत आहेतः एक हीनयान शाखा, जी दक्षिणपूर्व आशियात थेरवाद म्हणून ओळखली जाते आणि दोन महायान शाखा, मुख्यतः चिनी आणि तिबेटी परंपरा. 

  • ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात थेरवाद परंपरेचा प्रसार भारतातून श्रीलंका ते बर्मा (म्यानमार) असा झाला. तिथून तो उर्वरित दक्षिणपूर्व आशियात (थायलंड, कम्बोडिया, लाओस) येथे पोहचला. 
  • हीनयानाच्या इतर शाखांचा सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराणचे पूर्व आणि तटीय क्षेत्र आणि मध्य आशियात प्रसार झाला. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात त्यांचा मध्य आशियातून चीनमध्ये प्रसार झाला. हीनयानाच्या या शाखा नंतर महायानाशी एकरूप करण्यात आल्या ज्या हीनयानाप्रमाणेच भारतातून या क्षेत्रापर्यंत पोहचल्या होत्या, अशा रीतीने महायान चीन आणि मध्य आशियातील प्रबळ बौद्ध शाखेच्या रूपात प्रस्थापित झाले. 
  • भारतातील ऐतिहासिक बौद्ध प्रसाराचा वारसा घेत तिबेटी महायानाची परंपरा ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात सुरू झाली. तिबेटमधून याचा प्रसार हिमालयीन परिसरात आणि मंगोलिया, मध्य आशिया आणि रशियाच्या (बुर्यातिया, कालमिकिया आणि तुवा) विविध भागात झाला. 

शिवाय इसवीसन दुसऱ्या शतकात भारतीय स्वरूपाच्या महायान बौद्ध धर्माचा प्रसार व्हिएतनाम, कम्बोडिया, मलेशिया, सुमात्रा आणि जावा, अशा भारत आणि दक्षिण चीन दरम्यानच्या सागरी व्यापारी मार्गाने झाला. पण आज त्यातील एकही अस्तित्वात नाही. 

बौद्ध धर्माच्या प्रसाराची पद्धत

आशिया खंडातील बहुतांश बौद्ध धर्मप्रसार हा शांततापूर्ण मार्गांनी झाला आणि अनेक वेळा त्याची पुनरावृत्तीही झाली. शाक्यमुनी बुद्धांनी स्वतः याचा पाया रचला. धर्मप्रसारक म्हणून प्रवास करत शेजारील राज्यातील स्वागतशील आणि बौद्ध धर्मात रुची दर्शविणाऱ्या लोकांना त्यांनी आपल्या ज्ञानाची शिकवण दिली. त्यांनी त्यांच्या साधकांना जगभर प्रवास करत त्यांच्या शिकवणीचा प्रसार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी इतरांना त्यांच्या धर्माची प्रतारणा करण्याविषयी, त्यांच्या धर्माचा त्याग करण्याविषयी किंवा जुन्या धर्माचा त्याग करून नवा धर्म स्वीकारण्याविषयी सुचवले नाही, कारण त्यांचा स्वतःचा धर्म स्थापन करण्याचा उद्देशच नव्हता. तर वास्तवाबाबतच्या अज्ञानातून लोकांनी स्वतःसाठी निर्माण केलेल्या समस्या आणि असमाधानातून त्यांची सुटका करण्याचा बुद्धांचा उद्देश होता. बौद्ध अनुयायांच्या नंतरच्या पिढ्या यातून प्रेरणा घेत गेल्या आणि त्यांनी त्यांच्या जीवनात उपयुक्त ठरलेल्या बौद्ध पद्धती इतरांनाही सांगितल्या. अशा रीतीने ज्याला आज आपण ‘बौद्ध धर्म’ म्हणतो त्याचा सर्वदूर प्रसार झाला. 

काही वेळा ही प्रक्रिया फार जैविक रीत्या पार पडली. उदाहरणार्थ, जेव्हा बौद्ध व्यापारी एखाद्या जागी भेट देत, तेव्हा स्थानिक लोकांना या विदेशी बौद्ध धारणांबाबत आकर्षण निर्माण होत असे, जसे नंतरच्या काळात इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये इस्लामच्या बाबतीत घडले. सामान्य युगाच्या दोन शतके आधी आणि दोन शतके नंतर मध्य आशियातील सिल्क रूटवरील मरूद्यान राज्यातील बौद्ध धर्माच्या प्रसाराबाबतही याच प्रक्रियेची पुनरावृत्ती झाली. स्थानिक राजकर्ते आणि नागरिकांना जेव्हा या भारतीय धर्माबाबत माहिती झाली, तेव्हा त्यांनी व्यापाऱ्यांच्या निवासी क्षेत्रातून बौध साधुंना सल्लागार किंवा धर्मगुरू म्हणून आमंत्रित केले आणि कालांतराने बौद्ध धर्म स्वीकारला. आणखी एक जैविक पद्धत होती ती म्हणजे संथ सांस्कृतिक एकीकरणाच्या माध्यमातून लोकांना बौद्ध धर्माशी जोडणं, जसे सध्याच्या पाकिस्तानातील ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील गंधारा बौद्ध समाजात ग्रीकांचा समावेश झाला. पण अनेकदा हा प्रसार एखाद्या अशा शक्तिशाली सम्राटाच्या प्रभावामुळे झाला होता, ज्याने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता किंवा तो बौद्ध धर्माचा समर्थक होता. जसे ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकाच्या मध्यात सम्राट अशोकाच्या व्यक्तिगत समर्थनामुळे उत्तर भारतात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. या महान साम्राज्य निर्मात्याने बळाचा वापर करून आपल्या प्रजेला बौद्ध धर्माचा स्वीकार करायला भाग पाडले नाही. उलट त्याने आपल्या राज्यात बौद्ध उपदेशांचे लोहस्तंभ उभे केले, ज्याद्वारे प्रजेला नैतिक आचरणाच्या दिशेने प्रोत्साहित करण्यात आले.  आणि स्वतः बौद्ध शिकवणींच्या आचरणातून आणि बौद्ध तत्त्वांच्या स्वीकारातून इतरांना बौद्ध धर्माच्या अंगीकारासाठी प्रोत्साहित केले. 

सम्राट अशोकाने सुदूर देशांमध्ये धर्मप्रसारक मंडळ पाठवून आपल्या साम्राज्याच्या बाहेरही सक्रियपणे धर्मप्रसार केला. काही वेळा श्रीलंकेचा सम्राट देवानामपिया तिस्सासारख्या विदेशी सम्राटांच्या आमंत्रणानुसार धर्मप्रसारक पाठविले तर काही वेळा स्वतः पुढाकार घेत भिक्षुंना धर्मप्रसारक म्हणून पाठविले. हे भिक्षु कोणावरही धर्मांतरासाठी दबाव आणत नसत, तर केवळ बुद्धाच्या शिकवणीचे ज्ञान सर्वांसाठी खुले करत असत, जेणेकरून लोकांना स्वतःला पर्यायांची निवड करता यावी. याचा पुरावा म्हणून हे तथ्य प्रमाण धरता येईल की दक्षिण भारत आणि दक्षिण बर्मामध्ये बौद्ध धर्माची मूळे खोल रोवली गेली, तर तेच मध्य आशियातील ग्रीक वसाहतींमध्ये तात्काळ परिणाम जाणवल्याची नोंद नाही. 

सोळाव्या शतकात मंगोल शासक अल्तान खान सारख्या इतर धर्मांच्या राज्यकर्त्यांनी बौद्ध शिक्षकांना आपल्या राज्यात पाचारण केले आणि बौद्ध धर्माला त्या राज्याचा अधिकृत धर्म म्हणून घोषित केले, या मागे तिथल्या जनतेत एकजुटीची भावना निर्माण करण्याचा मुख्य उद्देश होता. या प्रक्रिये दरम्यान त्यांना इतर स्थानिक धर्मांवरती प्रतिबंध आणावे लागले असण्याची शक्यता आहे. किंवा त्या धर्मांचे पालन करणाऱ्यांचा छळ किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली गेली असेल, पण या सर्व कठोर कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होत्या. हे महत्त्वाकांक्षी शासक कधीही आपल्या प्रजेवर बौद्ध धर्मातील साधनेची सक्ती करत नव्हते. आणि अशी वागणूक धार्मिक पंथाचा भाग असू शकत नाही. 

सारांश

शाक्यमुनी बुद्धांनी कधीही लोकांना त्यांच्या शिकवणीवर आंधळेपणानं विश्वास ठेवायला सांगितले नाही, तर धर्म स्वीकारापूर्वी त्याची काळजीपूर्वक चिकित्सा करण्याविषयी सांगितले. त्यामुळे हे स्पष्टच होते की लोकांना बौद्ध शिकवण कोणत्याही धर्मप्रचारक चळवळीच्या दबावाखाली स्वीकारायची गरज नव्हती. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला नेइजी तोयिनने पूर्व मंगोलमधील भटक्या लोकांना पशूधनाचे आमिष दाखवत बौद्ध धर्म स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या लोकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि संबंधित शिक्षकांवर हद्दपारीची दंडात्मक कारवाई झाली. 

विविध मार्गांनी प्रेम, करुणा आणि ज्ञानाच्या तत्त्वांसह आणि विविध लोकांच्या स्वभाव आणि गरजेनुसार आवश्यक परिवर्तनासह बौद्ध धर्माचा शांततापूर्ण रीत्या बहुतांश आशिया खंडात प्रसार झाला.

Top