लिंग रिंपोछे यांचा संदेश

इंटरनेटच्या माध्यमातून सहज आणि व्यापक स्वरूपात माहिती उपलब्ध होत असताना, जगभरातील अधिकाधिक लोक बौद्ध धर्म आणि तिबेटी संस्कृतीच्या शिकवणींचा प्रमुख स्रोत म्हणून या माध्यमाकडे वळतील. ज्या लोकांना सखोल अभ्यासाची इच्छा असेल, त्यांना प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता भासेल आणि अशा शिक्षकांसोबत शिकण्याची संधी मिळालेल्या लोकांना इंटरनेट त्यांच्या अभ्यासासाठी पूरक स्रोत ठरेल. काही लोक अनेक कारणांमुळे प्रशिक्षित शिक्षक मिळण्याजोगे भाग्यवान नसतात. त्यांना असा शिक्षक मिळाला तरी आर्थिक किंवा कार्यालयीन कारणांमुळे कदाचित त्याच्यासोबत पुरेसा वेळ व्यतीत करता येत नसेल. त्यांच्यासाठी इंटरनेट शिकवणींचा प्रभावी स्रोत आहे.

बौद्ध धर्म आणि तिबेटी संस्कृतीबाबतच्या अनेक संकेतस्थळांनी इंटरनेट व्यापलेले आहे. काही संकेतस्थळे योग्य माहिती पुरवतात, पण दुर्दैवाने काही विश्वासार्ह नसतात. अशा परिस्थितीत, अलेक्झ बर्झिन, बर्झिन अर्काइव्हचे मोफत आणि बहुभाषिक संकेतस्थळ तयार करून अधिकृत माहिती उपलब्ध करून देत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. जे दुर्दैवाने कायम दुर्लक्षित असतात, अशा विकलांग व्यक्तींनाही माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत, याचेही मला समाधान आहे.

अलेक्झ माझे पूर्ववर्ती योंगझिन लिंग रिंपोछे यांचे विद्यार्थी आणि प्रासंगिक अनुवादक होते. आणि माझ्या या जीवनातही आमचे ऋणानुबंध कायम आहेत. माहिती आणि आध्यात्मिक शिकवणीच्या प्रसारासाठी वापरण्यात येत असलेल्या, या पारंपरिक आणि आधुनिक माध्यमांचा संयोग असलेल्या बुद्धिमान आणि करुणामयी माध्यमातून जगभर शांतता आणि आनंदाचा प्रसार व्हावा, हीच सदिच्छा.

१९ मे, २००९
लिंग रिंपोछे

Top