Study buddhism aryadeva 400

आर्यदेव

श्रीलंकेतील शाही घराण्यात जन्मलेल्या आर्यदेव यांचा कालखंड इ.स.दुसऱ्या शतकाच्या मध्यापासून ते तिसऱ्या शतकाच्या पूर्वाधापर्यंतचा होता. काही वृत्तांतामध्ये त्यांचा जन्म कमळापासून झाल्याचा उल्लेख आहे. श्रीलंकेत असताना अगदी लहान वयातच त्यांनी बौद्ध धर्मग्रंथ त्रिपिटकांचा अभ्यास केला होता. त्यानंतर सम्राट उदयभद्रच्या शासनकाळात सातवाहन साम्राज्यात नागार्जुन यांच्यासोबत अभ्यासासाठी ते दक्षिण भारतास रवाना झाले. नागार्जुन यांनी आपल्या सुहल्लेख आणि रत्नावलीत सम्राट उदयभद्राला संबोधित केलं होतं. आर्यदेव नागार्जुनांसोबत सातवाहन राज्यातील सध्याच्या आंध्र प्रदेशातील नागार्जुनकोंडा घाटीस्थित पवित्र श्रीपर्वतावर नागार्जुंनांकडून दीक्षा प्राप्त करण्यासाठी गेले.

त्या काळी मातृचेत नावाचा शिवभक्त वादविवादात प्रत्येकाला हरवत होता. आर्यदेव त्याचं आवाहन स्वीकारण्यास जात होते. त्या वाटेवरच त्यांची भेट एका वृद्ध महिलेशी झाली. ती विशेष शक्ती आत्मसात करण्याच्या प्रयत्नात होती आणि त्यासाठी तिला सिद्धीप्राप्त गुरुचा एक डोळा हवा होता. आर्यदेवांना त्या स्त्रीची दया आली आणि त्यांनी तिला आपला एक डोळा दिला. पण तिनं तो डोळा घेतला आणि सरळ एका खडकावर आपटला. तेव्हापासून आर्यदेव एकाक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. आर्यदेव मातृचेताला मात देण्यासाठी गेले. त्यांनी मातृचेताला वादविवादात मात दिलीच पण इतर विशेष शक्तींमध्येही मात दिली. आणि त्यानंतर मातृचेत त्यांचा शिष्य झाला.

आर्यदेवांचा अनेक वर्ष नालंदा येथे निवास होता. उत्तरार्धात ते नागार्जुनाकडे परत आले. नागार्जुनांनी मृत्यूपूर्वी आपली सर्व शिक्षा आर्यदेवांना सुपुर्द केली. आर्यदेवांनी दक्षिण भारतातील त्या भूभागात अनेक मठांची स्थापना केली. आणि अखंड प्रवास करत महायान परंपरेची स्थापना केली. आपला ग्रंथ  बोधिसत्वयोगाचार चतुःशतक शास्त्र कारिकाच्या साहाय्याने माध्यमिक सिद्धांताची स्थापना केली. हा ग्रंथ चतुःशतक या संक्षिप्त नावानेही ओळखला जातो. नागार्जुनांप्रमाणेच आर्यदेवांनीही गुह्यसमाज तंत्राबाबत चिकित्सात्मक लेखन केले.

Top