बौद्ध धर्म व इस्लाम: भिन्न पद्धती, सामायिक उद्दिष्ट

आशियातील अनेक प्रदेशांमध्ये बौद्ध व इस्लामी जगे परस्परांना छेदतात. त्यांनी एकत्र राहण्याची गरज असली, तरी काही वेळा त्यांच्यातील अन्योन्यक्रीडा फारशी शांततापूर्ण नसते. तरीही, दोन्ही गटांमध्ये काही सामायिक समस्या आहेत, उदाहरणार्थ- पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण व जागतिक उष्णतावाढ. बौद्ध धर्म व इस्लाम यांमध्ये अशा समस्यांवर बुद्धिमानपणे व करुणेने मात करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या भिन्न व्यूहरचना आहेत. एकमेकांच्या पद्धतींचं अधिक ज्ञान झाल्यास समजूत व परस्परांविषयीचा आदर वाढेल. परिणामी दोन गटांना एकमेकांना सौहार्दाने सहकार्य करून आधुनिक जीवनातील या आव्हानांना सामोरं जाता येईल.

जागतिक समस्या हाताळण्यासाठी बौद्ध धर्मात व इस्लाममध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती त्यांच्या श्रद्धाव्यवस्थेतून उद्भवलेल्या आहेत. या पद्धती समजून घेण्यासाठी आपण प्रत्येक पद्धतीची प्राथमिक गृहितकं समजून घ्यायला हवीत.

कार्यकारणभावाचा उगम

इस्लाम

इस्लाम हा ईश्वरवादी धर्म आहे. ईश्वराने हे विश्व निर्माण केले, त्यात व्यवस्था लावली व कार्यकारणभाव निर्माण केला.

बौद्ध धर्म

बौद्ध धर्म निरीश्वरवादी आहे. याचा अर्थ नास्तिक असा होत नाही, पण ईश्वर अस्तित्वात नाही असे यात मानले जाते. हे कोणीतरी निर्माण केलं असं या धर्मात मानलं जात नाही. प्रत्येक गोष्ट कार्यकारणभावामुळे होते- भौतिक अवकाशात, त्याचप्रमाणे व्यक्तिगत व गट अनुभवांच्या पातळीवर होणाऱ्या कोणत्याही गोष्टीला आरंभ नसतो व शेवट नसतो. कोणीही कार्यकारणभाव निर्माण केलेला नाही; आहे हे असंच आहे.

निष्कर्ष

दोन्ही व्यवस्थांमध्ये कार्यकारणभाव स्वीकारला जातो, त्यामुळे जागतिक समस्या हाताळताना शोध घेणं व उच्चाटन करणं, किंवा किमान समस्यांची कारणं कमी करणं, या दृष्टिकोनावर दोघांची सहमती आहे.

कारण व कार्य यांच्यातील संबंध

इस्लाम

कारणांच्या संकुलातून कार्याचं संकुल उद्भवतं, या वस्तुस्थितीला ‘नियती’ असं संबोधलं जातं. कारणं व कार्यं यांच्यातील या संबंधाची निर्मिती ईश्वराने केली आणि कारणांमधून कार्यं उद्भवतात ही ‘ईश्वराची इच्छा’ असते.

बौद्ध धर्म

कारणांचं संकुल व कार्याचं संकुल यांच्यातील संबंध केवळ परस्परावलंबी उगमातून उद्भवतात; त्याची निर्मिती कोणीही केलेली नसते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, कारणं किंवा कार्यं यांपैकी काहीच कारण किंवा कार्य असं स्वतंत्र, स्वप्रस्थापित अस्तित्व म्हणून नसतं. कार्य असतं म्हणूनच त्यावर अवलंबून कारण असतं.

निष्कर्ष

कार्यकारणभावामागे निश्चित नियम आहे आणि कोणतीही गोष्ट कारणाविना यादृच्छिकतेने होत नाही, याबद्दल दोन्ही व्यवस्थांची सहमती आहे. विश्वामध्ये व्यवस्था असते. त्यामुळे जागतिक प्रश्न हाताळण्यासाठी योग्य पावलं उचलली तर या समस्या सोडवता येतील, याबद्दल दोघांचीही सहमती आहे.

संकल्प स्वातंत्र्य व निवड

इस्लाम

ईश्वराने बुद्धिमत्तेसह मानवाची निर्मिती केली. बुद्धिमत्ता म्हणजे विचार करण्याची क्षमता- विशेषतः बुद्धिप्रामाण्यवादी विचार व तर्क यांची क्षमता. संकल्प स्वातंत्र्य हे बुद्धिमत्तेचं एक वैशिष्ट्य असतं. त्याचा अर्थ निवड करण्याची क्षमता व ताकद. उदाहरणार्थ, बाजारहाट करायला जाताना पुनर्वापरक्षम कागदी पिशवी घेऊन जाणं किंवा विल्हेवाट लावता येईल अशा प्लास्टिकच्या पिशव्या स्वीकारणं. राष्ट्रीय पातळीवर आपल्याला हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करायचं आहे की नाही, आणि आपण हे उत्सर्जन कमी करायचं असेल तर कितीने कमी करायचं, याची निवड करण्याचं संकल्प स्वातंत्र्य आपल्याकडे असतं.

अशा निवडी समोर आल्यावर आपण जी काही निवड करू त्यातून ईश्वराच्या इच्छेनुसार अनिवार्य परिणाम दिसून येतो. या अर्थी परिणाम पूर्वनिर्धारित असतो, ईश्वराने निर्माण केलेल्या कार्यकारणनियमांनी ते निर्धारित झालेलं असतं, पण निवड पूर्वनिर्धारित नसते. त्या अर्थी आपल्याला संकल्प स्वातंत्र्य असतं.

बौद्ध धर्म

आपल्याला कृतिमार्गाबद्दल निश्चितता मिळवून देण्यासाठी सक्षम करणाऱ्या मानसिक घटकांमध्ये भेदक्षम जागरूकतेचा समावेश होतो. ही जागरूकता संभाव्य निवडींवर लक्ष केंद्रित करते आणि प्रत्येक पर्यायातील दुबळे दुवे व सक्षम दुवे वेगळे करते, त्याचप्रमाणे प्रत्येक पर्यायातील गुण व लाभ आणि अवगुण व तोटे वेगळे करते. आपल्या भेदावर आधारून आपण आपल्या निवडीबद्दलचा निर्णय घेतो. 

दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर या मानसिक घटकाला बुद्धिमान जागरूकता असं म्हणता येतं. एखादी गोष्ट योग्य वा अयोग्य आहे, रचनात्मक वा विध्वंसक आहे, उपकारक वा अपायकारक आहे, इत्यादी निर्णायक भेद करण्याचे काम ही जागरूकता करते. आपण खरेदी केलेल्या वस्तू पुनर्वापरक्षम कागदी पिशव्यांमधून किंवा विल्हेवाट लावता येईल अशा प्लास्टिकच्या पिशव्यांमधून नेणं पर्यावरणासाठी चांगलं आहे का, याबद्दलचा भेद करून आपण कोणता वापर करायचा हे ठरवतो. आपल्या निर्णयाचा परिणाम कार्यकारणभावावर आधारित असतो.

बौद्ध धर्मात कर्म म्हणजे आपल्या वर्तनाची अनिवार्यता- आपल्या आधीच्या वर्तनाचे व आपल्या आधीच्या निवडींचे आकृतिबंध आपण अऩिवार्यतेने पुनरावृत्त करतो. पण आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं आणि आपण ते करायची निवड करतो, यांमध्ये एक अवकाश असतो. इथे आपण भेदक्षम जागरूकता वापरून ठरवू शकतो की, आपण केलेल्या निवडींचा आकृतिबंध पुनरावृत्त करणाऱ्या प्रेरणेनुसार कृती करायची की नाही. या अर्थी आपल्याला संकल्प स्वातंत्र्य असतं. पण एकदा का आपण कृतीची अंमलबजावणी केली की मग कार्यकारणभावाचे नियम लागू होतात आणि त्यानुसार परिणाम दिसतो.

निष्कर्ष

आपण कसं वागायचं याची निवड करण्याचं संकल्प स्वातंत्र्य आपल्याला असतं, याबद्दल दोन्ही व्यवस्थांमध्ये सहमती आहे. दीर्घकालीन जास्त लाभदायक असलेल्या पद्धतीने समस्या सोडवण्यासाठीचे उपाय मिळतील अशा योग्य निवडी करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते. कारण, प्रत्येकाकडे उपकारक व अपायकारक यांच्यात बुद्धिप्रामाण्यवादी भेद करण्याची प्राथमिक मानवी बुद्धिमत्ता असते. याचा अर्थ प्रत्येक जण सर्वोत्तम निर्णय घेईल असं नाही. पण प्रत्येकाकडे बुद्धिमान निर्णय घेण्याची मानसिक क्षमता असते. एकदा का निवड केली व अंमलबजावणी झाली, की त्यानंतर तार्किक निष्पत्ती होते.

निवडींचं उत्तरदायित्व

इस्लाम

बाळ पोटात तयार होतं, तेव्हा मातेच्या गर्भाशयामध्ये बाळाच्या शरीरात प्राण ओतण्यासाठी ईश्वर देवदूताला पाठवतो. मूर्त रूपातील ईश्वराच्या प्राणाला ‘आत्मा’ (soul) असं संबोधलं जातं, असं बहुतांश मुस्लीम म्हणतात. आपल्याला निवड करण्यासाठी बुद्धिमत्ता वापरू देणारी आणि त्यामुळे आपल्या निवडींना उत्तरदायी असणारी आत्मा ही क्षमता असते. 

बौद्ध धर्म

बौद्ध धर्मामध्ये आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाचं प्रतिपादन केलेलं नाही, पण व्यक्ती म्हणून आपण अस्तित्वात नसतो आणि आपल्या निवडींना आपण उत्तरदायी नसतो, असंही बौद्ध धर्मात म्हटलेलं नाही. प्रचलित रीत म्हणून आपण ‘मी निवड केली’ असं म्हणतो आणि ते योग्य असतं. दुसऱ्या कोणीतरी निवड केलेली आहे किंवा कोणीच निवड केलेली नाही, असं काही नसतं. परंतु, आपण निवड केली असली तरी आपल्या डोक्यांमध्ये बसल्या कोणातरी स्वतंत्र अस्तित्व असलेल्या ‘मी’ने निवडींच्या निश्चित यादीकडे पाहून, भेदक्षम जागरूकतेचा साधन म्हणून वापर करून एकाची निवड केली असं काही ते नसतं. कोणत्याही परिस्थितीत निर्णयकर्ती, निवडी व निर्णय हे परस्परांवर अवलंबून असतात, स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतात. ते केवळ एकमेकांवरच अवलंबून असतात असं नव्हे- निवडीला पर्याय नसतील व निर्णय झाला नाही, तर निर्णय घेणं शक्य नसतं-, पण हे तीनही घटक इतर अगणित कारणांवर व परिस्थितींवर अवलंबून असतात.

निष्कर्ष

व्यक्ती म्हणून आपण स्वतःच्या निवडी करतो, त्यामुळे आपण केलेल्या निवडींची जबाबदारी व उत्तरदायित्व आपल्यावर असतं. त्यामुळे पर्यावरणीय ऱ्हासासारख्या जागतिक समस्या हाताळण्यासाठी पावलं उचलणं आपल्याच हातात असतं.

आपल्या निवड करण्यावर प्रभाव टाकणारे बुद्धिमत्तेव्यतिरिक्तचे घटक

इस्लाम

ईश्वराने मानवाची निर्मिती करताना त्यांच्यात उत्कृष्टता समाविष्ट केली आणि ईश्वराचं मानवतेवरचं प्रेम हे त्याने निर्माण केलेल्या सर्व उत्कृष्टतेबद्दलच्या जवळिकीतून आलेलं असतं. तर, ईश्वराविषयी माणसाला वाटणारं प्रेम हे माणसात अभाव असलेली व त्याला गरज असलेली परिपूर्णता साध्य करण्यासाठीची तळमळ असतं. ही तळमळ ईश्वराच्या प्रार्थनेचं एक प्रमुख रूप म्हणून आविष्कृत होते. ईश्वराने आपल्यामध्ये निर्माण केलेल्या उत्कृष्टतेचं संगोपन व आविष्कार आपल्या चारित्र्यातून व ईश्वराच्या निर्मितीची सेवा करताना आपण करत असलेल्या कृतींमधून होतो. असं करणं ही आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती असते आणि ईश्वराच्या इच्छेपुढील आपली शरणागती असते. आपण ईश्वरनिर्मित नियमांनुसार वागून ईश्वराच्या इच्छेला शरण जातो. या नियमांचं पालन केलं किंवा उल्लंघन केलं की ईश्वराच्या इच्छेनुसार योग्य परिणाम होतात.

ईश्वराने मानवाला हृदयासहदेखील निर्माण केलं, ही सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावना जाणवण्याची क्षमता आहे. यात ईश्वराविषयीची शंकाही भरलेली असू शकते, त्यामुळे अंधपणा येऊ शकतो किंवा श्रद्धेने भरून बळकट झालेली भावनाही त्यात असू शकते. बुद्धिमत्तेच्या संकल्प स्वातंत्र्यावर आधारलेलं असेल तर आपलं हृदय ईश्वराच्या इच्छेचा भंग करणाऱ्या नकारात्मक भावनांनी भारावून जातं, आपला आत्मा या भावनांना अंकित होतो. मग आत्मकेंद्रीपणे आपण स्वतःची इच्छा अनुसरतो, त्यात स्वतःला महत्त्व दिलेलं असतं, स्वार्थ असतो आणि या नकारात्मक भावना ईश्वराच्या इच्छेचं अनुसरण करण्याला विरोधी असतात. तर, आपण आपल्या बुद्धिमत्तेने घेतो ते निर्णय एकतर स्वार्थी, लघुदृष्टीच्या स्वेच्छेने घेतलेले असू शकतात किंवा ईश्वराच्या इच्छेला शरण जाऊन आपल्या चारित्र्याच्या सर्वोत्कृष्टतेने ईश्वराच्या निर्मितीची सेवा करून घेतलेले असू शकतात.

बौद्ध धर्म

आरंभ नसलेल्या आपल्या मानसिक सातत्यामध्ये सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावना असतात. एका बाजूला इतरांविषयी आस्था, प्रेम, करुणा, दयाळूपणा व संयम या भावना असतात, तर दुसऱ्या बाजूला आत्मकेंद्रीपणा, स्वार्थ, हाव, ओढ व भाबडेपणा असतात. आपण भेदक्षम जागरूकतेद्वारे ज्या निवडी करतो त्या वरील विविध भावनांच्या सापेक्ष सामर्थ्यांनुसार उद्भवतात. शिवाय, कोणत्याही क्षणी त्यांचं सापेक्ष सामर्थ्य अनेक बाह्य व आंतरिक परिस्थितींवर अवलंबून असतं- इतर लोक काय करतात व बोलतात, समाजातील मूल्यं, आर्थिक दबाव, त्याचप्रमाणे आपलं आरोग्य, शिक्षण, ताणाची पातळी, व्यग्रतेची पातळी, इत्यादी. तर, आपण घेतो ते निर्णय अनेक घटकांवर अवलंबून असतात.

निष्कर्ष

आपली बुद्धिमत्ता नकारात्मक भावना, स्वार्थ व हाव यांच्या प्रभावाखाली असेल, तर आपण जागतिक समस्यांसंदर्भात भाबडे, अतार्किक निर्णय घेतो, याबद्दल दोन्ही व्यवस्थांमध्ये सहमती आहे. संपूर्ण जगाविषयीच्या करुणामय आस्थेच्या प्रभावाखाली आपण घेतो ते निर्णय तार्किक, बुद्धिमान व दीर्घकालीन लाभाचे असतात.

जागतिक समस्या हाताळण्यासाठी प्रेरणा मिळवणे

इस्लाम

आपण जगाविषयी व मानवतेविषयी विशुद्ध रितीने प्रेम निर्माण करतो, तेव्हा आपलं प्रेम जग किंवा मानवतेपुरतं मर्यादित नसतं, तर आपल्यामध्ये उत्कृष्टता निर्माण करणाऱ्या ईश्वराविषयीचं ते प्रेम असतं. तर, जागतिक पर्यावरणाविषयीची आपली आस्था ही ईश्वराच्या निर्मितीची सेवा करणाऱ्या आपल्या प्रार्थनेचं रूप घेऊन येते. 

बौद्ध धर्म

सर्वांना सुखी होण्याची इच्छा असते आणि कोणालाच समस्या व दुःख नको असतात, या बाबतीत सर्व समान असतात, हे लक्षात घेण्यावर आपली सर्व जीवांच्या कल्याणाबद्दलची आस्था आधारलेली असते. शिवाय, आपण एकमेकांवर आणि ज्या जागतिक वातावरणात आपण राहतो त्यावर अवलंबून असतो. आपण जे काही करतो त्याचा परिणाम प्रत्येकाच्या कल्याणावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत असतो आणि इतर लोक जे काही करतात त्याचा आपल्या कल्याणावर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रेम म्हणजे प्रत्येकाने सुखी असावं आणि त्यांना सुखाची कारणं लाभावीत अशी इच्छा. प्रेमाद्वारे आपण प्रत्येकाने सुखी असावं यासाठीची पावलं उचलतो.

निष्कर्ष

लोकांनी इतर सर्वांच्या कल्याणाबद्दल आस्था बाळगावी, असं बौद्ध धर्म व इस्लाम दोघेही शिकवतात. दोन्हींमध्ये वैश्विक प्रेमाची गरज अधोरेखित केलेली आहे आणि या प्रेमाची अंमलबजावणी परोपकारी कृतींद्वारे व्हावी, असंही म्हटलेलं आहे.

सारांश

जागतिक समस्या हाताळण्यासाठी लोकांना प्रोत्साहन कसं मिळतं, याच्या अलाहिदा इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, प्रत्येकाने जगाच्या हितासाठी एकमेकांसोबत काम करायला हवं. या प्रयत्नाचं महत्त्व अधोरेखित करण्यासंदर्भात बौद्ध धर्म व इस्लाम यांच्यात पूर्ण सहमती आहे.

Top