बुद्ध आणि त्यांच्या कार्यकाळातील राजकीय घटना

अभिजात बुद्ध साहित्याच्या अनेक स्तरातून बुद्धांचे ऐतिहासिक जीवन दर्शन घडते. सर्वात जुनी आवृत्ती कोणत्याही एका मजकुरात आढळत नाही, परंतु केवळ पाली सुत्त ( संस्कृत सूत्र) आणि थेरवादा परंपरेतील विनय साहित्यात नोंदवलेल्या घटनांवरून एकत्रित केली जाऊ शकते. महासांघिक, सर्वस्तिवाद आणि महायान परंपरेतील नंतरचे ग्रंथ या पूर्वीच्या ग्रंथांमधूनच आलेल्या मजकुराची अतिमानवी वैशिष्ट्यांसह प्रकट होणारी सुशोभित बाह्यरेखा मांडतात. पाली साहित्यातून स्पष्ट होणारे मूळ चित्र मात्र एक सामान्य मानवी व्यक्तीचे जीवन व्यक्त करते ज्याने, संकटात, असुरक्षित काळात जगत असताना, वैयक्तिकरित्या आणि त्याच्या मठ समुदायासाठी असंख्य अडचणी आणि आव्हानांना तोंड दिले. येथे, स्टीफन बॅचलरच्या कन्फेशन ऑफ बुद्धिस्ट एथिस्ट मध्ये सादर केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनाच्या आधारे आपण बुद्धाच्या जीवनाच्या या सर्वात जुन्या आवृत्तीची रूपरेषा देऊ. सर्व नावे त्यांच्या पाली आवृत्त्यांमध्ये दिली जातील.

बुद्धाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६६मध्ये आजच्या दक्षिण नेपाळमधील लुंबिनी पार्क (लुंबी-नई त्शाल) येथे झाला. हे उद्यान कपिलवत्थु (सेर-स्कयग्नस, संस्कृत कपिलवस्तु), साकियाची राजधानी (संस्कृत शाक्य) पासून फार दूर नाही. जरी पाली तत्त्वांमध्ये त्यांचे वैयक्तिक नाव सिद्धार्थ (डॉन-ग्रब, संस्कृत सिद्धार्थ) आढळत नाही; तरीसुद्धा, सोयीसाठी, आपण तेच येथे वापरू. गोतम (गौ-ता-मा, संस्कृत गौतम), हे बुद्धाच्या संदर्भात अनेकदा वापरले जाणारे दुसरे नाव, खरे तर त्यांच्या कुळाचे नाव होते.

सिद्धार्थचे वडील, शुद्धोदन (झास त्संग-मा, संस्कृत शुद्धोदन), हे राजा नव्हते, जसे नंतरच्या बौद्ध साहित्यात वर्णन केले आहे. उलट ते गोटामा कुळातील एक कुलीन होते, ज्यांनी कदाचित साकियामध्ये प्रादेशिक राज्यपाल म्हणून काम केले होते. पाली ग्रंथात त्यांच्या आईचे नाव नोंदवले गेले नाही; पण नंतर संस्कृत स्रोत तिला माया-देवी (ल्हा-मो सग्यु-‘फ्रु-मा) म्हणून ओळखतात. सिद्धार्थच्या जन्मानंतर लगेचच त्याची आई मरण पावली आणि म्हणून त्याचे संगोपन त्यांची बहीण पजापती (स्क्य-ग्यू-दाग-मो चेन-मो, संस्कृत महाप्रजापती) यांनी केले, ज्यांच्याशी त्यांच्या वडिलांनी त्या काळातील प्रथेप्रमाणे लग्न केले.

साकिया हे एक प्राचीन प्रजासत्ताक होते, परंतु सिद्धार्थच्या जन्मापर्यंत, ते कोसल (को-सा-ला, संस्कृत. कोशला) च्या शक्तिशाली राज्याचा भाग होते. कोसल सध्याच्या बिहारमधील गंगा नदीच्या उत्तरेकडील तीरापासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पसरलेले आहे. त्याची राजधानी सावत्ती (ज्ञान-योड, स्कट. संस्कृत श्रावस्ती) होती.

बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या भूगोलाच्या संक्षिप्त वर्णनाने त्यांच्या चरित्राचे अनुसरण सोपे ठरू शकते, येथे त्याची रूपरेषा देऊ. साकिया कोसलाच्या पूर्वेकडील भागात होते, तर साकियाच्या आग्नेय भागात मल्ल प्रांत (ग्याड-की युल, संस्कृत मल्ला) होता. मल्लाच्या पूर्वेला वाज्जी (संस्कृत व्रजी) प्रजासत्ताक होते, त्याची राजधानी वेसाली (यांग्स-पा-कॅन, संस्कृत वैशाली) येथे होती. वाज्जी प्रजासत्ताकावर कुळांच्या संघाचे राज्य होते; लिच्छवी (लि-च्छ-बी संस्कृत लिच्छवी) कुळ त्यांच्यापैकी सर्वात प्रसिद्ध होते. वज्जी आणि कोसलच्या दक्षिणेला, गंगा नदीच्या पलीकडे, मगधचे बलाढ्य राज्य (युल मा-ग-धा, संस्कृत मगध), त्याची राजधानी राजगाह (ग्याल-पोई खाब, संस्कृत राजगह) येथे आहे. कोसलाच्या पश्चिमेस, सध्याच्या पाकिस्तानी पंजाबमध्ये, गांधार (सा-दझिन, संस्कृत घंधार) होते, जे पर्शियन अचेमेनिड साम्राज्याचे एक राज्य होता. त्याच्या राजधानीत, तक्कशिला (डो-जोग, संस्कृत तक्षशिला) हे त्या काळातील सर्वात प्रसिद्ध विद्यापीठ होते. तेथे, ग्रीक आणि पर्शियन कल्पना आणि संस्कृती त्यांच्या समकालीन भारतीय समकक्षांशी जोडल्या गेल्या. 

सिद्धार्थ जिथे मोठा झाला, ते कपिलावत्थू,  हे उत्तर मार्गावरील प्रमुख शहर आणि त्या काळातील मुख्य व्यावसायिक वाहिनी होते. उत्तर मार्ग पश्चिमेला कोसलला गांधारला जोडत होता, तर दक्षिणेला साकिया, मल्ल आणि वाज्जी प्रजासत्ताकातून मगधला जोडत होता.  त्यामुळे पाली ग्रंथात वयाच्या एकोणतीस वर्षांच्या आधीच्या सिद्धार्थ गोतमाच्या आयुष्याबद्दल फार मांडणी नसली तरी तो बहुधा अनेक संस्कृतींच्या संपर्कात होता. आणि जरी हे सिद्ध होऊ शकत नसले तरी त्याने तक्कशिला येथे शिक्षण घेतले असावे.

सिद्धार्थने भद्दकक्कनाशी लग्न केले, जिला संस्कृत साहित्यात यशोधरा (ग्रॅग्स ‘डिझिन-मा) म्हणून ओळखले जाते. ती सिद्धार्थची चुलत बहीण आणि देवदत्तची बहीण होती (ल्हास-बाईन, संस्कृत. देवदत्त). देवदत्त नंतर बुद्धाचा मुख्य प्रतिस्पर्धी बनला. त्यांना राहुल(ग्रा-कन,झीन, संस्कृत राहुला) नावाचा एक मुलगा होता.  मुलाच्या जन्मानंतर, बुद्धांनी वयाच्या एकोणतीसव्या वर्षी कपिलावत्थू सोडले आणि आध्यात्मिक सत्याच्या शोधात मगधकडे प्रयाण केले. उत्तर मार्गाने प्रवास करून गंगा नदी पार करून ते राजगृहात आले. त्या वेळी मगधवर राजा बिंबिसार (झग्ज-कन स्नाइंग पो) आणि कोसलावर राजा पासेनदी (ग्याल-पो साल-ग्याल, संस्कृत प्रसेनाजीत) यांचे राज्य होते. कोसल आणि मगध यांच्यातील युतीचा भाग म्हणून, दोन्ही राजांनी एकमेकांच्या बहिणींशी लग्न केले होते. राजा पासेनदीच्या बहिणीचे नाव देवी (ल्हा-मो, संस्कृत देवी) होते.

मगधमध्ये, सिद्धार्थने अलारा कलामा (संस्कृत अरादा कलामा) आणि उदका रामापुत्त (संस्कृत उद्रका रामपुत्र) या दोन शिक्षकांच्या समुदायात अभ्यास केला. ब्राह्मणी परंपरेतून आलेल्या या दोघांनी त्याला शून्यतेवर आणि भेद ओळखणे किंवा भेद न करणे यावर एकाग्रता आत्मसात करण्याची दिक्षा दिली. पण  सिद्धार्थ या सिद्धींवर असमाधानी होता आणि म्हणून त्याने या शिक्षकांना सोडले. त्यानंतर त्याने संपूर्ण अन्नत्याग करून कठोर तपस्या करण्याचा मार्ग स्वीकारला. त्याला पुन्हा वाटले की अशा तऱ्हेने मुक्ती प्राप्त होत नाही. त्यानंतर त्याने आपला उपवास सोडला आणि जवळच्या उरुवेला (डेंग-ग्यास, संस्कृत उरूबिल्वा), सध्याच्या बोधगया येथे गेला, जिथे त्याला वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. मगधला आल्यानंतर सहा वर्षांनी ही ज्ञानप्राप्ती झाली. 

ज्ञानप्राप्तीनंतर, बुद्ध पश्चिमेला वाराणसीच्या अगदी बाहेर मिगदया (रि-द्वाग्स-की ग्नास, संस्कृत मृगदवा), मृग उद्यान, इसापटाना (ड्रंग-स्रॉन्ग ल्हांग-बा, संस्कृत ऋषिपताना), सध्याच्या सारनाथ येथे गेले. गंगा नदीच्या उत्तरेला असला तरी, हा भाग राजा पासेनदीने राजा बिंबिसाराला बहीण देवीच्या लग्नाचा हुंडा म्हणून  मगधला दिला होता. बुद्धांनी पावसाळा तेथे आपल्या पाच साथीदारांसह मृग उद्यानात घालवला आणि लवकरच काही अनुयायी बुद्धांकडे आकर्षित झाले, ज्यांनी एक ब्रह्मचारी समुदाय तयार केला ज्याची त्यांना काळजी घेणे आवश्यक होते.

 वेसाली येथील लिच्छवी कुलीन महालीने बुद्धांबद्दल ऐकले आणि राजा बिंबिसाराला सुचवले की त्याने त्यांना मगधला आमंत्रित करावे. त्यामुळे पावसाळ्यानंतर, बुद्ध आणि त्यांचा वाढणारा समुदाय पूर्वेकडे मगधची राजधानी राजगाह येथे परतला. राजा बिंबिसारा बुद्धांच्या शिकवणीने प्रभावित झाला आणि त्याने त्यांना "वेलुवाना" ('ओड-माई त्शाल, संस्कृत वेणुवना) नावाचे बांबू उपवन देऊ केले, जेथे ते पावसाळ्यात आपला समुदाय स्थापन करू शकणार होते. 

लवकरच, एका प्रमुख स्थानिक गुरूचे प्रमुख शिष्य सारीपुत्त (शा-रीई बु, संस्कृत शरीपुत्र) आणि मोग्गलाना (मोउ डगल-गी बु, संस्कृत मौद्गल्यायन) बुद्धांच्या समुदायात सामील झाले. पुढे ते बुद्धांचे जवळचे शिष्य बनले. सारिपुत्तने बुद्धांना वाढत्या मठवासी समुदायासाठी वचनबद्धता तयार करण्याची विनंती केली आणि राजा बिंबिसराने सुचवले की समुदायाने जैनांसारख्या इतर धर्मवादी आध्यात्मिक गटांच्या काही प्रथा स्वीकारल्या पाहिजेत. विशेषतः, राजाने शिकवणींवर चर्चा करण्यासाठी तिमाही-मासिक संमेलने (ग्सो, संस्कृत उपोषधा ) आयोजित करण्याची शिफारस केली. जी बुद्धांनी मान्य केली. 

एके दिवशी, कोसल राजधानी सावत्ती येथील एक श्रीमंत बँकर अनाथपिंडिका (ग्योन-मेड झास-ब्यईन, संस्कृत अनाथपिंडदा), व्यवसायानिमित्त राजगाहात आला. बुद्धांना प्रभावित होऊन, त्याने त्यांना राजा पासेनदीची राजधानी सावत्ती येथे पावसाळा घालवण्याची जागा देऊ केली. काही काळानंतर, बुद्ध आणि त्यांचा भिक्षू समुदाय कोसलला गेले; परंतु अनाथपिंडिका त्यांना राहण्यासाठी योग्य जागा देऊ शकण्याआधी बरीच वर्षे झाली होती.

दरम्यान, बुद्ध कपिलावत्थु येथे आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी परतले. त्यांचे वडील शुद्धोदन त्वरीत त्यांच्या अनुयायांपैकी एक बनले आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा राहुल एक नवशिक्या म्हणून मठात सामील झाला. पुढील वर्षांमध्ये, बुद्धाचे चुलत भाऊ आनंद (कुन द्गा-बो, संस्कृत आनंद), अनुरुद्ध (मा-गग-पा, संस्कृत अनुरुद्ध), आणि देवदत्त, तसेच बुद्धांचे सावत्र भाऊ नंदा (गा-बो, संस्कृत नंदा), जे "सुंदरानंद" (डीझेस-गा, संस्कृत सुंदरिनंदा), म्हणूनही ओळखले जात, यांच्यासह अनेक साकियान कुलीन देखील सामील झाले.  

बुद्धांची सावत्र आई आणि मावशी, पजापती, यांनीही वाढत्या समुदायात सामील होण्याची विनंती केली, परंतु बुद्धांनी प्रथम नकार दिला. निराश न होता, तरीही तिने आपले डोके मुंडन केले, पिवळे वस्त्र परिधान केले आणि इतर स्त्रियांच्या मोठ्या गटासह, तरीही बुद्धांचे अनुसरण केले. पजापतीने बुद्धांकडून आदेशाची विनंती करणे सुरूच ठेवले, परंतु बुद्धांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही नकार दिला. शेवटी, बुद्धांच्या निधनाच्या काही वर्षांआधी, आनंदाने मध्यस्थी केली आणि तिच्या वतीने पुन्हा एकदा विनंती केली. शेवटी बुद्धांनी स्त्रियांना नियुक्त करण्यास सहमती दर्शविली. हे वाज्जी प्रजासत्ताकातील वेसाली येथे घडले आणि बौद्ध धर्मातील भिक्खुणी प्रथा सुरू झाली. 

अनाथपिंडिका त्यांच्या महान उदारतेसाठी प्रख्यात होते आणि बुद्ध कोसलला परतल्यानंतर काही वर्षांनी, त्यांनी सावत्ती येथे “जेतवन” (ग्याल- बेयेद-क्यी, संस्कृत जेतवना), नावाचे उद्यान विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने दिले.  तेथे त्यांनी बुद्ध आणि त्यांच्या भिक्खूंसाठी पावसाळ्यातील अत्यंत आलिशान निवासस्थान बांधले. अखेरीस, बुद्धांनी त्यांच्या ज्ञानप्राप्तीनंतर सुमारे वीस वर्षांनी, त्यांच्या मठवासी समुदायासाठी औपचारिक पावसाळी माघार घेण्याची प्रथा (दब्यर-ज्ञान, संस्कृत वर्षाक) प्रस्थापित केली, ज्या दरम्यान भिक्षुक पावसाळ्याचे तीन महिने एकाच ठिकाणी निवास करतील आणि उर्वरित वर्षाप्रमाणे भटकत राहणार नाहीत. एकंदरीत, बुद्धांनी जेटवन उपवनात एकोणीस पावसाळ्यात माघार घेतली, ज्या दरम्यान त्यांनी ८४४ प्रवचने दिली. अनाथपिंडिका आयुष्याच्या अखेरीस दिवाळखोर झाले, तरीही ते  बुद्धांच्या मठवासी समुदायाचे प्रमुख संरक्षक म्हणून कायम राहिले. 

कोसल राजा पासेनदी गोतम बुद्धांना जेतवन उपवन येथे प्रथम भेटले, जेव्हा बुद्ध सुमारे चाळीस वर्षांचे होते. बुद्धांनी राजाला खूप प्रभावित केले आणि नंतर पासेनदी देखील त्याच्या संरक्षक आणि अनुयायांपैकी एक बनले. राजा पासेनदीशी बुद्धांचे संबंध मात्र नेहमीच अतिशय नाजूक होते. राजा जरी विद्येचा बौद्धिक संरक्षक होता; तरीसुद्धा तो एक कामुकतावादी आणि अनेकदा अतिशय क्रूर होता. उदाहरणार्थ, एका मानसिक आजारातून त्याने त्याचा मल्लाचा मित्र आणि त्याच्या सैन्याचा सेनापती याची हत्या केली. त्याला जरी, पश्चात्ताप वाटत असला तरी, त्याने नंतर बंधुलाचा पुतण्या, कारायण याची सैन्य प्रमुख म्हणून नियुक्ती केली. बर्‍याच वर्षांनंतर, सेनापती कारायणाने आपल्या काकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पासेनदीला पदच्युत केले. तरीही बुद्धांनी राजाची चंचलता आणि बदलत्या नशिबाशी जुळवून घेतले. कारण बुद्धांना चोर आणि जंगली प्राण्यांपासून समुदायाचे संरक्षण करणे आणि त्यासाठी धनाढ्य संरक्षकांपर्यंत पोहचणे आवश्यक होते.

राजघराण्याचा उत्तराधिकार सुरक्षित करण्यासाठी, राजा पासेनदीला वारसदार पुत्र असणे आवश्यक होते. त्याची पहिली पत्नी, मगध राजा बिंबिसाराच्या बहिणीकडून त्याला मुले झाली नाहीत. त्यानंतर राजाने दुसरी पत्नी मल्लिका (मा-लि-का, संस्कृत मल्लिका) या बुद्धांच्या खालच्या जातीतील सुंदर अनुयायीशी लग्न केले. राजदरबारातील ब्राह्मण पुरोहितांना तिच्या जातीचे वावडे होते. मल्लिका आणि राजा पासेनदीला वजिरी (दो-जे-मा, संस्कृत वजिरी) ही मुलगी झाली. 

त्यानंतर राजाला पुत्रप्राप्तीसाठी तिसऱ्या पत्नीची गरज भासली.  म्हणून त्याने बुद्धांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर साकियाचा राज्यपाल झालेला त्यांचा चुलत भाऊ महानामा (मिंग-चेन, संस्कृत महानामा) ची मुलगी वसभा हिच्याशी विवाह केला. महानामा हे बुद्धाचे जवळचे शिष्य आनंद आणि अनुरुद्ध यांचे भाऊ होते. जरी महानामाने वसभाला एका कुलीन स्त्रीचा दर्जा दिला असला, तरी प्रत्यक्षात ती त्याची गुलाम स्त्रीपासूनची अवैध मुलगी होती. वसाभापासून राजा पासेनदीला एक मुलगा, विदर्भा जन्मला, पण त्याच्या आईच्या कुलवादामुळे  कोसल सिंहासनाचा वारस म्हणून त्याचे स्थान अनिश्चित होते. बुद्ध देखील वसभाशी संबंधित असल्यामुळे त्यांनाही या परिस्थितीने अवघड स्थितीत टाकले.  

त्याच्या बेकायदेशीरपणाची जाणीव नसल्यामुळे, विदर्भाने साकिया आणि त्याचे आजोबा महानामा यांची सोळा वर्षांचा असताना भेट घेतली. तेथे असताना पासेनदीच्या सैन्याचा सेनापती कारायण याला विदर्भाच्या आईची खरी पार्श्वभूमी कळली. जेव्हा सेनाप्रमुखाने पासेनदीला कळवले की त्याचा मुलगा एका गुलाम स्त्रीचा अवैध नातू आहे, तेव्हा राजा साकियांविरुद्ध संतापाने भडकला. त्याने आपली पत्नी आणि मुलाची शाही पदे काढून घेतली आणि त्यांना गुलाम बनवले. बुद्धांनी त्यांच्या वतीने मध्यस्थी केली आणि शेवटी राजाने त्यांचे मान पुन्हा त्यांना बहाल केले.

यानंतर, बुद्धांचे कोसलातील स्थान असुरक्षित झाले आणि वयाच्या सत्तरीच्या आसपास, ते प्रथमच मगध आणि त्याची राजधानी राजगहात परतले. तेथे, ते राजाच्या बांबू उपवनात न राहता शाही वैद्य जिवाका (‘त्शो-बायड, स्क्टि. जिवाका) यांच्या मालकीच्या आंब्याच्या उपवनात राहिले. हे सूचित करते की कदाचित बुद्ध या वेळी आधीच आजारी होते.

बुद्ध जेव्हा बहात्तर वर्षांचे होते, तेव्हा त्यांचा पहिला संरक्षक, मगधचा राजा बिंबिसार याला त्याचा मुलगा, अजातसत्तू (मा-स्कायस डग्रा, स्क्टि. अजातशत्रु) साठी पदत्याग करण्यास भाग पाडले गेले. अजातसत्तूने आपल्या वडिलांना कैद केले आणि त्यांना उपाशी ठेवून मारले. बिंबिसाराची विधवा पत्नी आणि राजा पासेनदीची बहीण, देवी दुःखाने मरण पावली. तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, पासेनदीने देवीच्या हुंड्याचा एक भाग म्हणून बिंबिसाराला दिलेली गंगेच्या उत्तरेकडील वाराणसीच्या आसपासची गावे परत मिळवण्याचा प्रयत्न करत त्याचा पुतण्या अजातसत्तूविरुद्ध युद्ध सुरू केले. युद्ध अनिर्णित होते आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पासेनदीला आपली मुलगी वजिरीचे अजातसत्तूशी लग्न करून देणे भाग पाडले.

त्याच वेळी,  बुद्धांचा चुलत भाऊ  देवदत्त, जो अजातसत्तूचा गुरू बनला होता, त्याने बुद्धांच्या संन्यासी मठांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. देवदत्तने बुद्धांना अनेक अतिरिक्त नियम लागू करण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केला. जसे भिक्षूंनी जंगलात राहावे, फक्त झाडाखाली झोपावे, सामान्य लोकांच्या घरात न जावे, फक्त चिंध्या परिधान कराव्यात आणि त्यांच्याकडून कापडाच्या भेटवस्तू स्वीकारल्या जाऊ नयेत. कठोर शाकाहारी रहावे. बुद्धांनी याला नकार दिला, कारण त्यांना वाटले की असा आदेश अनुयायांना अती तपस्वी बनवेल आणि त्यांना समाजापासून दूर करेल. देवदत्तने बुद्धांच्या अधिकाराला आव्हान दिले आणि बुद्धांच्या अनेक तरुण भिक्खूंना त्यांच्या कल्पनांकडे आकर्षित करून, स्वतःचा प्रतिस्पर्धी मठवासी समुदाय तयार करून मतभेद निर्माण केले. खरं तर, देवदत्तने बुद्धांची हत्या करण्याचा वारंवार प्रयत्न केला, परंतु अयशस्वी झाला. सरतेशेवटी, सारिपुत्त आणि मोग्गलाना यांनी बुद्धांचा समुदाय सोडून गेलेल्या भिक्षूंना परत जाण्यास प्रवृत्त केले.

बहुदा देवदत्ताला आपल्या कृतीचा पश्चाताप झाला असावा, पण तो बुद्धांकडे क्षमायाचना करण्यापूर्वीच मरण पावला. असेही बुद्धांनी त्याच्या विरोधात कोणताही अढी किंवा वाईट भावना बाळगली नव्हती. राजा अजातसत्तूलाही स्वतःच्या वडिलांच्या हत्येबद्दल पश्चाताप झाला आणि राजवैद्य जिवाकाच्या सल्ल्यानुसार, त्यांनी बुद्धांपुढे उघडपणे आपल्या पितृहत्येची कबुली दिली आणि पश्चात्ताप करण्याचा प्रयत्न केला.

सुमारे एक वर्षानंतर, बुद्ध पुन्हा एकदा त्यांच्या मूळ प्रदेशी साकियाला गेले. राजा पासेनदी बुद्धांना आदरांजली वाहण्यासाठी गेले असताना, सेनापती कारायणाने सत्तापालट करून राजकुमार विदर्भाला  कोसल सिंहासनावर बसवले.पदच्युत राजा पासेनदीला परतायला स्थानच नसल्याने राजगाहातील आपला पुतण्या आणि जावई राजा अजातसत्तू यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी तो मगधला पळून गेला. मात्र पासेनदीला शहरात प्रवेश नाकारण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी तो मृतावस्थेत आढळला.

दरम्यान, नवीन कोसल राजा विदर्भाने त्याचे आजोबा महानामाच्या कुळासंदर्भातील केलेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी साकियाविरुद्ध युद्ध सुरू केले. महानामा, तुम्हाला आठवत असेल, तो बुद्धांचा चुलत भाऊ आणि साकियाचा वर्तमान राज्यपाल होता. बुद्धांनी राजाला हल्ला करू नये म्हणून तीन वेळा पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तो शेवटी अयशस्वी ठरला. कोसल सैन्याने साकिया राजधानी कपिलवत्थु येथील सर्व रहिवाशांची कत्तल करण्याचे आदेश दिले. हे हत्याकांड रोखण्यात अक्षम झालेले बुद्ध, पासेनदीने केलेल्या अयशस्वी प्रयत्नाप्रमाणेच  राजा अजातसत्तूकडून संरक्षण मिळवण्यासाठी मगधमधील राजगाहात पळून गेले. 

मगधचा रस्ता वाज्जी प्रजासत्ताकातून जात होता, जिथे सारिपुत्त राजधानी वेसालीमध्ये बुद्धांचा सर्वात जवळचा शिष्य त्यांची वाट पाहत होता. पण तिथेही बुद्धांच्या पूर्वीच्या सेवकांपैकी एक, सुनक्कट्टा (लेग्ज-पाय र्ग्यु-स्कार, संस्कृत सुनक्षत्र), वेसाली येथील एक कुलीन, ज्याने पूर्वी संन्यस्थाची वस्त्रे सोडली होती आणि बौद्ध समुदाय सोडला होता, त्याने वज्जी संसदेत बुद्धांना बदनाम केले. त्यांनी त्यांना सांगितले की बुद्धांकडे कोणतीही अलौकिक शक्ती नाही आणि त्यांनी केवळ तर्कशास्त्रानुसार तृष्णा कशी थांबवायची हे शिकवले, परंतु अतींद्रिय स्थिती कशी मिळवायची हे शिकवले नाही. बुद्धांनी हे कौतुक म्हणून घेतले. तरीसुद्धा, ही निंदा, तसेच कदाचित यावेळी त्यांनी भिक्षुणींच्या मठांची स्थापना केल्यामुळे, बुद्धांना त्यांचा पाठिंबा आणि वाज्जीमधील चांगले स्थान गमवावे लागले. परिणामी, बुद्ध गंगा ओलांडून राजगाहाकडे निघाले, जिथे ते जवळच्या गिज्जाकुटा (ब्या-र्गोड-की फुंग-पो, संस्कृत ग्रध्रकुटा), गिधाडाच्या शिखरावरील गुहांमध्ये राहिले.

राजा अजातसत्तूचा पंतप्रधान वसकार बुद्धांना भेटायला आला. त्याने त्यांना आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या अजातसत्तूच्या योजनेबद्दल आणि लवकरच वाज्जी प्रजासत्ताकवर आक्रमण करण्याच्या त्याच्या मनसुब्याबद्दल सांगितले. बुद्धांनी वज्जियांना बळाने जिंकता येणार नाही, परंतु त्यांचे पारंपरिक सन्माननीय मार्ग पाळले जातील, असा सल्ला दिला. परंतु साकियावरील कोसल आक्रमणाप्रमाणेच तो येऊ घातलेला युद्धाचा उद्रेक रोखू शकले नाहीत. भरीस भर म्हणून, बुद्धांचे सर्वात जवळचे शिष्य, सारिपुत्त आणि मोग्गलाना, दोघेही याच सुमारास मरण पावले. वयोवृद्ध सारिपुत्त एका आजाराने मरण पावला आणि मोग्गलानाला एकांतात असताना डाकूंनी मारहाण केली.

मगधमध्ये कोणतीही सहानुभूती किंवा समर्थन न मिळाल्याने, बुद्धांनी पुन्हा एकदा उत्तरेकडे आपली मातृभूमी साकियाला परत जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित कोसल हल्ल्यानंतर काय उरले ते त्यांना पाहायचे होते. निघण्यापूर्वी, बुद्धांनी आनंदला सर्व भिक्षूंना गिधाडाच्या शिखरावर एकत्र करण्यास सांगितले, जिथे ते त्यांना शेवटचा उपदेश देणार होते. त्यांनी त्यांना वज्जियन संसदेच्या लोकशाही व्यवस्थेनंतर मठवासी समुदायाचे मॉडेल बनवण्याची सूचना केली. त्यांनी नियमित संमेलने भरवली पाहिजेत, एकोप्याने राहावे, त्यांची भिक्षा वाटून घ्यावी आणि त्यांच्या वडिलांचा आदर करावा, असा उपदेश केला. 

बुद्धांनी लवकरच गिधाडाचे शिखर आणि मगध सोडले आणि वाज्जी प्रजासत्ताकातील वेसाली येथे पोहोचल्यावर, पावसाळा घालवण्यासाठी थांबले. युद्धाचा धोका असतानाही तेथील समाज अधोगतीकडे वळत असल्याचे त्यांना आढळले. वज्जी संसदेची मर्जी गमावल्यामुळे, बुद्धांनी पावसाळा एकटाच घालवला आणि आपल्या भिक्षूंना त्यांच्या मित्रांकडे किंवा समर्थकांकडे आश्रय घेण्यास सांगितले.

पावसाळ्यात ऐंशी वर्षांचे बुद्ध गंभीर आजारी पडले आणि मृत्यूच्या समीप होते. आनंदाने त्यांना भिक्षुंना अंतिम उपदेश देण्यास सांगितले. बुद्धांनी त्यांना सांगितले की त्यांनी त्यांना माहीत असलेल्या सर्व गोष्टी शिकवल्या आहेत आणि भविष्यात, त्यांची शिकवण हाच त्यांचा मुख्य आश्रय आणि दिशानिर्देशाचा स्रोत असावा. दु:खापासून मुक्ती मिळवण्यासाठी, त्यांनी शिकवण स्वतःमध्ये समाकलित केली पाहिजे आणि स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी काही नेत्यावर किंवा समुदायावर अवलंबून राहू नये. त्यानंतर बुद्धांनी घोषणा केली की लवकरच ते निर्वाण पावणार आहेत.

त्यांचे शिष्य चुलत भाऊ आनंद आणि अनुरुद्ध यांच्यासह, बुद्ध पावसाळ्यानंतर पुन्हा निघाले. साकियाच्या वाटेवर ते मल्लांच्या दोन प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पावा येथे थांबले. तेथे चुंडा (त्सु-नडा, संस्कृत कुंडा) नावाच्या लोहाराने भोजनाला विषयुक्त डुकराचे मांस दिले होते. काहीतरी चुकीचे घडत असल्याचा संशय आल्याने, बुद्धांनी आपल्या चुलत भावांना डुकराचे मांस न खाण्यास सांगितले, पण त्यांनी स्वतः ते खाल्ले आणि बाकीचे दफन करण्यास सांगितले. मल्ल ही सेनापती कारायणाची मातृभूमी होती, ज्याने साकियातील नरसंहाराचे नेतृत्व केले होते आणि हे विष आनंदासाठी होते, जो बुद्धांच्या सर्व शिकवणी लक्षात ठेवल्याबद्दल प्रसिद्ध होता. जर आनंद मारला गेला तर बुद्धांची शिकवण आणि समाज कधीही टिकणार नव्हता.

तीव्र अतिसाराने त्रस्त असताना, बुद्धांनी आनंदाला जवळच्या कुसिनारा (कु-शाई ग्रोंग-खेर, ग्नास-त्सवा-चोंग, संस्कृत कुशीनगरा) येथे नेण्यास सांगितले. तिथे दोन झाडांच्या मधोमध घातलेल्या पलंगावर, बुद्धांनी त्यांच्यासोबत असलेल्या काही भिक्षूंना विचारले की त्यांना आणखी काही प्रश्न किंवा शंका आहेत का? दुःखाने भारावून आनंदा आणि इतर शांत राहिले. त्यानंतर बुद्धांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, ख्रिस्तपूर्व ४८५ मध्ये निधन झाले.

बुद्धाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याआधी, भिक्षूंचा एक गट पावा येथून आला. त्यांचे नेतृत्व महाकसपा (ओड-श्रुंग चेन-पो, संस्कृत महाकश्यप) करत होते, ज्यांनी त्यांच्या तर्फे केले जाणारे अंतिम प्रार्थना सोपस्कार पूर्ण होईपर्यंत अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी असा आग्रह धरला. महाकसपा हा मगधचा एक ब्राह्मण होता जो काही वर्षांपूर्वी म्हातारपणी संन्यासी झाला होता. बुद्ध जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा त्यांनी महाकसपाला त्यांचा जुना झिजलेला झगा ब्राह्मणाच्या नवीन वस्त्राच्या बदल्यात दिला होता. नंतर, बुद्धांची वस्त्रे बौद्ध परंपरेतील पुढील संतांच्या अधिकार हस्तांतरणासाठी सादर करण्यात आली. 

तथापि, बुद्धांनी अनेक प्रसंगी आपल्या शिष्यांना स्पष्ट सांगितले होते की, त्यांच्या निधनानंतर, धर्मच त्यांचा गुरू म्हणून काम करेल. वज्जीच्या संसदीय पद्धतीच्या आकृतीबंधानुसार आपल्या समुदायाने पुढे जावे अशी त्यांची इच्छा होती. कोसल आणि मगध सारख्या राज्यांनाच प्रमाण मानून न राहता आणि त्यांचा प्रमुख म्हणून एकच मुख्य साधू ठेवण्याचा त्यांचा उद्देश नव्हता.

असे असले तरी, बुद्धांच्या निधनानंतर, महाकसपा आणि आनंद यांच्यात सत्तासंघर्ष झालेला दिसतो, दुसऱ्या शब्दांत गुरूकडून शिष्याकडे निरंकुश अधिकार हस्तांतरित करणारी पारंपरिक भारतीय प्रणाली आणि येथे राहणाऱ्या भक्त भिक्षूंची लहान समुदाय व सामान्य पद्धती आणि तत्त्वांचे पालन करणारी अधिक लोकशाही समतावादी व्यवस्था यांच्यातील हा संघर्ष होता. ज्यात महाकसपा जिंकला.

बुद्धांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर आणि त्यांचे अवशेष वितरीत केल्यानंतर, भिक्षूंनी बुद्धांनी शिकवलेल्या गोष्टींचे स्मरण करण्यासाठी, पुष्टी करण्यासाठी आणि संहिताबद्ध करण्यासाठी पुढच्या पावसाळ्यात राजगाहात परिषद घेण्याच्या महाकसापाच्या प्रस्तावास सहमती दिली. महाकसपा यांना परिषदेस पात्र साधूंची निवड करायची होती. त्याने फक्त मुक्ती मिळालेल्या ४९९ अर्हतांची निवड केली. सुरुवातीला, महाकसप्पाने आनंदाचा समावेश केला नाही कारण त्याने अद्याप अर्हतत्व प्राप्त केले नव्हते. आनंदाला बुद्धांच्या प्रवचनांची उत्तम पठन असूनही महाकसपाने त्याला वगळले. शिवाय, आनंद हे बुद्धांच्या आदेशाला एकच नेता नसावा या इच्छेचा खंबीर समर्थक होता. महाकसपाला आनंदाबद्दल नापसंती असण्याचे आणखी एक कारण म्हणजे आनंदनेच बुद्धांना स्त्रियांची नियुक्ती करण्यास पटवून दिले होते. यामुळे महाकसापाच्या परंपरावादी ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या असत्या. पण शेवटी, मठातील ज्येष्ठांनी  आनंदाच्या बहिष्काराचा निषेध केला आणि महाकसपाला होकार द्यावा लागला. आनंदाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली. थेरवादाच्या अहवालानुसार, आनंदाने परिषदेच्या आदल्या रात्री अर्हतपद प्राप्त केले.

परिषद भरण्याची वाट पाहत असताना, आनंदाला राजा अजातसत्तूचा पंतप्रधान वसकर (ब्यार-ग्यी-नाम, संस्कृत वर्षाकरा) भेटला. आनंदाला त्याच्याकडून कळले की मगध सैन्याने वज्जीवर केलेल्या हल्ल्याच्या व्यतिरिक्त, ते मगधच्या पश्चिमेकडील राज्य अवंतीचा(अ-बंती युल, संस्कृत अवंती) राजा पज्जोता (रब-गसल, संस्कृत प्रद्योता) यांच्याकडून अपेक्षित हल्ल्याची तयारी करत होते. अशाप्रकारे, जरी बुद्धांचा  आपल्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुखांची एक परंपरा असावी असा कल नसला तरी, महाकसपाच्या नेतृत्वाने निःसंशयपणे या धोकादायक आणि अनिश्चित काळात बुद्धांच्या शिकवणी आणि भिक्षुक समुदायाचे अस्तित्व टिकवण्यात योगदान दिले. 

राजगाहाजवळील सात पानांची गुहा, सत्तीपन्निगुहा (लो-मा बदुन-पाय फुग, संस्कृत सप्तपर्णगुहा) येथे झालेल्या या पहिल्या बौद्ध परिषदेला पाचशे अर्हत उपस्थित होते. महाकसपा अध्यक्षस्थानी होते, आनंदाने स्मृतीतून बहुतेक सुत्तांचे पठण केले आणि उपली (नये-बार ‘खोर, संस्कृत उपाली) यांनी मठातील विनय नियमांचे पठण केले. या परिषदेच्या थेरवाद आवृत्तीनुसार, ज्ञानाच्या विशेष विषयांवरील अभिधम्म (चोस मंगोन-पा, संस्कृत अभिधर्म) शिकवण यावेळी स्मरण केली गेली नाही. सर्वस्‍तीवाद परंपरेमध्‍ये, तथापि, वैभाषिक आवृत्ती सांगते की महाकसपाने काही पाठ स्मरण केले, परंतु सर्व अभिधम्‍म शिकवणी केल्या नाहीत. परंतु सौत्रांतिक प्रतिपादनानुसार, ही अभिधम्म शिकवण प्रत्यक्षात बुद्धांची वचने नव्हती, तर ती सात अर्हतांनी रचली होती.

तिबेटी परंपरेनुसार, महाकसपा यांनी सात कुलपिता (ब्स्तान-पाई गताड- रब्स बदून) ची एक परंपरा सुरू केली. चीनची चान परंपरा, त्यानंतर कोरियन सोन आणि जपानी झेन परंपरांमध्ये भारतातील अठ्ठावीस कुलपरंपरांचा माग घेतात. ज्यात बोधिधर्म हा अठ्ठावीसवा आहे. बोधिधर्म हा भारतीय गुरु होता ज्याने चान शिकवण चीनमध्ये आणली. पूर्व आशियामध्ये त्यांची गणना प्रथम चान कुलपिता म्हणून केली जाते.

सारांश सांगायचा झाल्यास थेरवादीनांच्या पाली साहित्यात बुद्धांचे एक करिष्माई, जवळजवळ दुःखद आध्यात्मिक नेता असे चित्र दिसून येते, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिष्य आणि अनुयायांच्या सतत वाढणाऱ्या समुदायाची स्थापना आणि समर्थन करण्यासाठी संघर्ष केला. त्याला राजकीय कारस्थानांचा सामना करावा लागला, अनेक युद्धे, त्याच्या मायदेशातील लोकांची कत्तल, सरकारसमोर वैयक्तिक निंदा, त्याच्या शिष्यांमधून त्यांच्या नेतृत्वाचे आव्हान, त्यांच्या जवळच्या शिष्यांपैकी एकाची हत्या आणि शेवटी , विषबाधेने मृत्यू. तरीही, या सर्व परीक्षांमध्ये, बुद्धाने मनःशांती राखली आणि निराश झाले नाहीत. ज्ञानप्राप्तीनंतर ते उपदेश देत असलेल्या सेहचाळीस वर्षांमध्ये जगाला मुक्ती आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखविण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेत ते स्थिर राहिले.

Top