भारतीय सम्राट अशोकाचा मुलगा महिंद याच्या मोहिमेसोबत इसवीसनपूर्व २४९मध्ये बौद्ध धर्म श्रीलंकेत पहिल्यांदा आला. त्या वेळी पहिल्या श्रीलंकाई भिक्खूंचं दीक्षादान झालं. कोणत्या तारखेपासून थेरवाद हे नाव वापरात आलं, याबाबत वाद असला, तरी सोपं जावं यासाठी आपण या बौद्ध वंशावळीला ‘थेरवाद’ असं संबोधणार आहोत. तर, सम्राट अशोकाची मुलगी संघमित्ता हिचे इसवीसनपूर्वी २४०मध्ये श्रीलंका बेटावर आगमन झालं तेव्हा थेरवाद भिक्खुणी दीक्षा वंशावळ तिथे पोचवली. इसवीसन १०५०पर्यंत तामिळ आक्रमण आणि श्रीलंकेतील चोल साम्राज्याचं राज्य याचा परिणाम म्हणून दीक्षा वंशावळ संपुष्टात आली.
मौखिक परंपरेनुसार सम्राट अशोकाने सोना व उत्तरा या दोन दुतांना सुवण्णफुम (संस्कृत- सुवर्णभूमी) राज्यात पाठवले आणि त्यांनी तिथे थेरवाद बौद्ध धर्माची व भिक्खू दीक्षा वंशावळीची स्थापना केली. हे राज्य मोन (ताइलाइंग) लोकांशी व दक्षिण ब्रह्मदेशातील थातोन या बंदर असलेल्या शहराशी संबंधित होते, असे बहुतांश अभ्यासक मानतात. परंतु, भिक्खुणी दीक्षा वंशावळ या काळात तिथे संक्रमित झाली की या नंतर हे स्पष्ट नाही.
किमान इसवीसनपूर्वी पहिल्या शतकापासून उत्तर ब्रह्मदेशातील विविध प्यू नगर-राज्यांमध्ये थेरवाद बौद्ध धर्म उपस्थित असला, तरी तो महायान, हिंदू धर्म व आत्म्यांना प्राण्यांचं बलिदान देणाऱ्या स्थानिक आरी धर्माशी मिसळून गेला. इसवीसन अकराव्या शतकाच्या मध्यात अनाव्रत राजाने उत्तर ब्रह्मदेश एकसंध केला, थातोनमध्ये मोन राज्यावर विजय मिळवला, आणि स्वतःची राजधानी पागन इथे स्थापन केली. त्याने मोन भिक्खू अरहत यांना थेरवाद बौद्ध धर्म व त्याची दीक्षा वंशावळ स्थापन करण्यासाठी आपल्या साम्राज्यात निमंत्रित केलं.
इसवीसन १०७०मध्ये श्रीलंकेत चोल राजांचा पाडाव झाल्यावर पोलोन्नरुव इथे नवीन राजधानी स्थापन झाली, तेव्हा थेरवाद भिक्खूंना पागनमध्ये निमंत्रित करण्यात आलं आणि त्यांची भिक्खू वंशावळ तिथे पुनर्स्थापित झाली. परंतु, अनाव्रत राजाने मोन भिक्षुणी वंशावळीच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उमटवलं आणि परिणामी भिक्षुणी दीक्षा पुनर्स्थापित करण्यासाठी कोणाही भिक्षुणीला पाठवलं नाही. ब्रह्मदेशात भिक्षुणींचा मठ होता, याचा शेवटचा कोरीव लेख स्वरूपातील पुरावा इसवीसन १२८७ सालातील आहे, त्या वेळी पागनचा मंगोल आक्रमणापुढे पाडाव झाला होता.
कलिंगाचा (आताचं पूर्व भारतातील ओडिशा) राजा माघ याने इसवीसन १२१५ ते १२३६ या काळात श्रीलंकेवर स्वारी करून तिथे राज्य चालवलं. या काळात श्रीलंकाई भिक्षू संघ गंभीररित्या दुबळा झाला. मेघ राजाच्या पाडावानंतर दक्षिण भारतातील आताच्या तामिळनाडूमधील दुबळ्या झालेल्या चोल साम्राज्याचं बौद्ध केंद्र असणाऱ्या कांचिपुरममधील थेरवादी भिक्षूंना भिक्षू दीक्षा वंशावळीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी इसवीसन १२३६मध्ये श्रीलंकेला बोलावण्यात आलं. कोणत्याही तामिळ भिक्षुणीला बोलावण्यात आलं नाही, याचा अर्थ त्या वेळी दक्षिण भारतात थेरवादी भिक्षुणी संघ अस्तित्वात नसावा. बंगालसह उत्तर भारतातील भिक्षुणी संघाचा शेवटचा पुरावा इसवीसन बाराव्या शतकाअखेरचा आहे. भिक्षुणी वंशावळीची दीक्षा भिक्षुणी घेत असत, हे अस्पष्ट आहे.
थायलंडमधील सुखोथाई राज्याच्या राजा रामखमेंग याने तेराव्या शतकाच्या अखेरीला श्रीलंकेतून थायलंडमध्ये थेरवाद बौद्ध धर्म स्थापन केला. त्या वेळी श्रीलंकेमध्ये भिक्षुणी संघ अस्तित्वात नसल्यामुळे, थेरवादी भिक्षुणी दीक्षा वंशावळ कधीच थायलंडला पोचली नाही. केवळ भिक्षू वंशावळ तिथे आली. चौदाव्या शतकारंभी थायलंडहून कंबोडियाला थेरवाद प्रस्थापित झाला, आणि मग लगेचच लाओसहून तो कंबोडियाला पोचला, पण थेरवादी भिक्षुणी दीक्षा वंशावळ या देशांमध्ये कधीच पोचली नाही.
थेरवादी देशांमध्ये केवळ श्रीलंकेनेच इसवीसन १९९८मध्ये अधिकृतरित्या थेरवादी भिक्षुणी दीक्षेची पुनर्स्थापना केली. तोवर श्रीलंकेतील महिलांना केवळ दसाइल माता- म्हणजे ‘दशोपदेश उपासक’ बनण्याचीच परवानगी होती, त्यांना भिक्खुणी होता येत नसे. अशा मठबाह्य स्त्रिया कफनी परिधान करत असत आणि ब्रह्मचर्यही पाळत, पण त्यांना मठाधिष्ठित संघाच्या सदस्य मानलं जात नसे. ब्रह्मदेश व कंबोडिया इथे स्त्रियांना केवळ ‘अष्टोपदेश उपास’ होण्याची मुभा होती- याला ब्रह्मदेशात सिलाशिन म्हटलं जात असे, तर कंबोडियात दोन्ची किंवा यिएयची म्हटलं जात असे. ब्रह्मदेशातील काही स्त्रियांना दशोपदेशही मिळत असत. थायलंडमध्ये त्या ‘अष्टोपदेशी उपासक’ होऊ शकत- तिथे त्यांना माएची (माएजी) असं संबोधलं जात असे. इसवीसन १८६४मध्ये ब्रह्मदेशाच्या किनारपट्टी भागातील अराकान जिल्ह्यातून बांग्लादेशातील चितगांव जिल्ह्यात व चितगांव डोंगररांगांमध्ये थेरवादी बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन झाल्यावर तिथे स्त्रिया अष्टोपदेशी उपासक झाल्या.