चार आर्य सत्यांनुसार रचना केलेले लाम-रिम

चार सत्य स्थिती

बुद्ध शाक्यमुनींनी त्यांना साक्षात्कार झाल्याचे दाखवून दिल्यावर तीच स्थिती आपल्याला साध्य करण्यासाठी विविध पद्धती शिकवल्या. प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणणं, निराळ्या शब्दांत सांगायचं तर, धर्माचं आचरण करणं, ही याची पायाभूत पद्धती आहे. (१) प्रत्येकाला सामोरं जावं लागतं अशा खऱ्या समस्या/ दुःख. या समस्यांची (२) खरी कारणं असतात / दुःखाची कारणं. तरीही, (३) कारणांचं उच्चाटन करून या समस्यांचं खरोखरचं निवारण शक्य असतं / दुःखाचं निवारण, आणि या समस्यांचं निवारण करण्यासाठी आपण सत्य मार्ग अनुसरावेत / दुःख निवारणाचे अष्टांगिक मार्ग. 

प्रारंभिक पातळी

या चार आर्य सत्यांचं आकलन विविध पातळ्यांवरून करून घेता येतं. प्रारंभिक पातळी म्हणजे पुनर्जन्माच्या सर्वांत वाईट परिस्थितीमध्ये पुनर्जन्म होण्याशी निगडीत खऱ्या समस्या. आपण दुःखाच्या आत्यंतिक अवस्थेमध्ये असलो, आपण प्रचंड प्रमाणात आजार, भूक, तहान अनुभवत असलो, किंवा आपल्याला सतत वेदना होत असतील, तर आध्यात्मिक विकासासाठी आपल्याकडे वेळ नसेल किंवा तशी शक्यताही नसेल. कारण, आपल्या मनावर गंभीर समस्यांचं व अडचणींचं ओझं असेल.

विध्वंसकरित्या कृती करणं, हे यामागचं खरं कारण आहे. बुद्धाने दिलेल्या शिकवणुकीनुसार, आपण वेदना अथवा दुःख निर्माण केलं, तर आपणच त्या दुःखाचा अनुभव घ्यायला हवा. दुसऱ्या बाजूला, आपण रचनात्मकरित्या कृती केली, तर आपण आनंद निर्माण करतो, आणि त्या आनंदाचा अनुभवही अखेरीस आपणच घेतो. त्यामुळे, आपल्याला त्या गंभीर समस्यांचं खरं निवारण साधायचं असेल, तर आपण नकारात्मक किंवा विध्वंसक कृतींपासून स्वतःला थोपवण्याचा खरा मार्ग अनुसरायला हवा.

एक, आपलं एक अमूल्य मानवी जीवन आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. सध्या आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या वृद्धी आणि विकास साधण्यासाठी सर्व संधी आहेत. उदाहरणार्थ, आपण काही छळछावण्यांमध्ये नाही किंवा गंभीर दुष्काळाने ग्रासलेलो नाही. परंतु, या संधी चिरकाल टिकणाऱ्या नाहीत, कारण आपण सर्व जण मरणार हे निश्चित आहे आणि हे अमूल्य मानवी जीवन संपुष्टात येईल. हे कधी होईल, याची काही शाश्वती नाही. कोणत्या क्षणी आपल्याला एखादा ट्रक धडक मारू शकतो. आपण आत्ता मरणार असलो, आणि आपण कायम विध्वंसकरित्या कृती केल्या असतील, तर त्यातून भविष्यात आपण आणखी खालावल्या स्थितीत जाऊन पोचतो. आपण निर्माण केलेल्या वेदना व दुःख आपल्याला अनुभवावं लागेल अशा स्थितीत आपला पुनर्जन्म होईल. त्यामुळे, या भविष्याच्या भयाने आपण त्यातून बाहेर पडण्याची काही दिशा आहे का, याचा शोध घेतो. आपण खुद्द बुद्धांकडेच पाहतो.

सर्व मर्यादांपासून मुक्त झालेले, त्यामुळेच ज्यांच्या मन, वाचा आणि शरीराच्या कार्यक्षमता अमर्याद व निखळ झाल्या आहेत, ते बुद्ध होत. त्यांची मनं संताप, ओढ किंवा दुराग्रह यांसारख्या अस्वस्थकारक भावना किंवा मनोवृत्तींनी मर्यादित झालेली नसतात. मानसिक नीरसता किंवा मानसिक भरकटलेपणाची मर्यादा त्यांना पडलेली नसते. त्यांच्या मनाचा एक पैलूच असलेल्या हृदयांनाही स्वार्थ किंवा पक्षपातीपणाची मर्यादा नसते. त्यांच्या वाचेची संवादक्षमता मर्यादित नसते आणि त्यांच्या शरीरातील ऊर्जा मर्यादित नसते. अशा रितीने, त्यांच्या मनांबाबत, त्यांच्या हृदयांबाबत, वाचेबाबत आणि शरीराबाबत सर्व काही निखळ असतं. शिवाय, त्यांना स्वतःचं पूर्ण सामर्थ्य लक्षात आलेलं असतं, त्यामुळे ते शक्य तितक्या उच्चावस्थेमध्ये उत्क्रांत झालेले असतात. 

बुद्ध हे केवळ करूनच थांबले नाहीत, तर हे त्यांनी कसं केलं याचं सूचनही त्यांनी केलं आहे. अशा प्रकारे स्वतःसमोर आणि इतरांसमोर समस्या निर्माण करू पाहणाऱ्या स्वतःच्या समस्यांचं दडपण टाळण्यासाठी त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय किंवा धर्माचं आचरण केलं. हे उद्दिष्ट गाठण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या आणि त्या दिशेने चांगली प्रगती साधलेल्यांचा समुदायही असतो, त्याला संघ असं म्हणतात. तर, बुद्ध, धर्म आणि संघ यांचे गुण लक्षात घ्यावेत आणि स्वतःसाठी आणखी समस्या निर्माण होतील अशा दिशेने आयुष्य जाणार नाही अशी इच्छा धरावी, आणि आपण बुद्ध, धर्म व संघ यांच्या दिशेने गेलो तर आपल्याला अशा समस्या टाळणं शक्य होईल, त्यांच्याकडून आपण आयुष्याची सुरक्षित दिशा घेऊ शकतो, हेही लक्षात घ्यावं. आश्रय घेणं याचा अर्थ हा आहे- आपल्या जीवनाला सुरक्षित दिशा देणं.

कार्यकारणसंबंधांचे नियम पाळून प्रत्यक्षातली सुरक्षित दिशा दिसते. त्यामुळे आपल्याला भविष्यातील समस्या टाळायची इच्छा असेल, तर आपण नकारात्मकरित्या कृती करण्यापासून स्वतःला थोपवणारा सत्य मार्ग अनुसरावा- हत्या करणं, चोरी करणं, खोटं बोलणं, इत्यादींपासून आपल्याला थोपवणारा हा मार्ग असतो. तर, आपण रचनात्मकरित्या कृती करतो. चार आर्य सत्यं समजून घेण्याची ही प्रारंभिक पातळी आहे.

मध्यम पातळी

आपण कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये पुनर्जन्म घेतला, तरी जन्माला येणं, आजारी पडणं, म्हातारं होणं आणि मरणं, या सत्य समस्या आपल्याला अनुभवाव्या लागतातच, ही मध्यम पातळी झाली. आपण प्रयत्न करूनही आपल्याला हवं असलेलं प्राप्त होत नाही, अशा खऱ्या/ सत्य समस्या असतात, आणि आपल्याला घडायला नको असतं ते घडतं, अशीही समस्या असतात. इतरांशी अवघड संबंध राखण्यासंदर्भातील निराशा, इत्यादींसारख्या अनेक अनियंत्रित सतत उद्भवणाऱ्या समस्या आपल्या समोर येतात. वास्तवाविषयीच्या- आपण कोण आहोत आणि आपण का अस्तित्वात आहोत याविषयीच्या- जागरूकतेचा आपल्यातील अभाव, हे याचं पहिलं खरं कारण असतं. त्यामुळे आपण ठोस अहंकारी अस्मिता पकडून ठेवतो, त्यातून आपल्याला असुरक्षित वाटतं. परिणामी अशा अस्मितांचं समर्थन करण्यासाठी किंवा प्रतिपादन करण्यासाठी आपल्या मनांमध्ये ओढ, संताप, भाबडेपणा, अभिमान, मत्सर, अनिर्णित भरकटलेपणा यांसारख्या अस्वस्थकारक भावना व प्रवृत्ती यांचा भरणा होत जातो. यावर आधारित विविध प्रेरणा किंवा कर्मं आपल्या मनात येतात, त्यानुसार आपण अंतःप्रेरणेने वर्तन करतो. आपल्या अस्मिता अधिक सुरक्षित करण्यासाठी आपण हे करतो. उदाहरणार्थ, संपत्ती, भौतिक वस्तू किंवा शक्य तितके मित्र जमवण्यासाठी आपण असं करतो. किंवा, आपल्याला न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक व्यक्तीला हुसकावून लावण्यासाठी किंवा उद्ध्वस्त करण्यासाठी आपण असं करतो. अशा बाबतीत आपण अंतःप्रेरणेने कृती करतो, ओरडतो किंवा इतरांविषयी क्रूरपणे वागतो, तेव्हा त्यातून आपल्या सत्य समस्या उद्भवतात.

या समस्या खरोखरच्या थांबाव्यात अशी आपली इच्छा असेल, तर आपण सत्य मार्ग अनुसरणं गरजेचं आहे. एक, आपण योग्य प्रेरणा विकसित करायला हवी, आपल्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठीचा तीव्र निश्चय त्यात असायला हवा, याला काही वेळा सर्वसंगपरित्याग असं म्हणतात. ही प्रेरणा ठेवून आपण भेदक्षम जागरूकता विकसित करणं गरजेचं असतं, त्याद्वारे आपल्याला वास्तव किंवा भावशून्यता पाहणं शक्य होतं. ही शहाणीव प्राप्त करण्यासाठी एकाग्रता गरजेची असते, आणि आपल्या मनावर असं नियंत्रण येण्यासाठी आपण आपलं शरीर आणि वाचा यांच्या सकल कृतींवर नियंत्रण आणणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण नैतिक स्वयंशिस्त बाणवावी लागते. उच्च नैतिक स्वयं-शिस्त, एकाग्रता आणि शहाणीव या तीन उच्च प्रशिक्षणांचा मार्ग अनुसरून आपण भेदक्षम जागरूकता प्राप्त करतो, त्याद्वारे आपल्याला भावशून्यता पाहता येते: अस्तित्वात असण्याच्या सर्व अशक्य रितींचा संपूर्ण अभाव दिसू लागतो.

वास्तवाविषयी आपण अजाण असल्यामुळे आणि आपण कोण आहोत, आपण व जग कसं अस्तित्वात आहे याबद्दल गोंधळल्यामुळे आपण अशक्य रितींनी अस्तित्वात राहण्यासाठी ठोस व स्वतंत्र असलेल्या प्रत्येक गोष्टीला पकडून ठेवतो. परंतु, अशा स्वप्नरंजित अशक्य रितीने काहीच अस्तित्वात नसतं. अशा अशक्य रितीने कोणीच अस्तित्वात असू शकत नाही. परंतु, काहीच अस्तित्वात नसतं, असा याचा अर्थ नाही. किंबहुना, जे काही अस्तित्वात असतं ते परस्परावलंबी रितीने अस्तित्वात असतं किंवा मनाशी आणि मानसिक शिक्के मारण्याच्या प्रक्रियेशी निगडीत राहून ते अस्तित्वात असतं. आकलनाच्या आणि साक्षात्काराच्या अशा सत्य मार्गाद्वारे आपण मानसिक अस्पष्टतांवर किंवा अस्वस्थकारक भावनांसारख्या मानसिक अडथळ्यांवर मात करू शकतो आणि मुक्ती साधू शकतो. चार आर्य सत्यांच्या आकलनामधील ही मध्यम पातळी असते.

प्रगत पातळी

केवळ आपल्यालाच समस्या अनुभवाव्या लागतात असं नाही, तर प्रत्येकालाच याच समस्या अनुभवाव्या लागतात, हे आपल्या लक्षात येतं, ही प्रगत पातळी असते. त्यामुळे, या पातळीवर सत्य समस्या म्हणजे प्रत्येकाला सामोरं जावं लागणाऱ्या समस्या असतात. शिवाय, प्रत्येकाला त्याच्या किंवा तिच्या समस्यांवर मात करण्यासाठी मदत करण्याची आपली अक्षमता ही दुसरी सत्य समस्या असते. आपण केवळ स्वतःबद्दल चिंतीत असतो आणि इतरांकडे दुर्लक्ष करतो, हा स्वार्थीपणा हे या समस्यांचं पहिलं सत्य कारण असतं. त्यानंतर मानसिक अस्पष्टता किंवा मानसिक अडथळे यांमुळेही आपल्याला इतरांसाठी उपकारक ठरण्याच्या कुशल पद्धती जाणून घेण्यापासून प्रतिबंध होतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर या अस्पष्टतांमुळे आपल्या सर्वज्ञतेला प्रतिबंध होतो. आपल्या स्वतःच्या समस्यांपासून मुक्त होण्यापुरतं न थांबता, त्या पलीकडे जात बुद्धत्वाची स्थिती साधण्यासाठी प्रयत्न करायला हवा, तरच ही समस्या खऱ्या अर्थाने थांबते. बुद्धत्वाच्या स्थितीमध्ये आपण आपल्या सर्व मर्यादांवर मात करतो आणि आपल्या सर्व सामर्थ्याची जाणीव आपल्याला होते. त्यातूनच आपण प्रत्येकाला शक्य तितकं उपकारक होऊ शकतो.

बोधिचित्ताची प्रेरणा प्राप्त करणं हा याकडे जाण्याचा सत्य मार्ग आहे. या प्रेरणेने आपलं हृदय इतर सर्वांसाठी खुलं होतं किंवा विस्तारतं आणि आपण साक्षात्काराच्या दिशेने जातो- सर्वांना उपकारक ठरण्याची क्षमता असलेल्या बुद्ध स्थितीपर्यंत जातो. या प्रेरणेद्वारे आपण दीर्घकालीन परिणाम साधणाऱ्या प्रवृत्ती व परिपूर्णता प्राप्त करतो आणि त्याचं आचरणही करतो, हे सर्व काळजीवाहू प्रेम आणि करुणामय सहानुभूती यांवर आधारलेलं असतं. औदार्य, स्वयंशिस्त, संयमी सहिष्णूता, आनंदी चिकाटी, मनाचं स्थैर्य (एकाग्रता), आणि भेदक्षम जागरूकता (शहाणीव) यांच्याशी निगडीत या प्रवृत्ती असतात. दीर्घ दृष्टीच्या भेदाद्वारे आपल्याला स्वतःच्या अस्वस्थकारक भावनांवर मात करण्यासाठी गरजेचं वास्तव किंवा भावशून्यता दिसते आणि मुक्ती प्राप्त करणं शक्य होतं. परंतु, आपण बोधिचित्ताच्या शक्तीकडून प्रेरणा घेतलेली असल्यामुळे ती मुक्त होण्याच्या आपल्या निश्चयाहून अधिक सक्षम असते, या आकलनामध्ये अधिक ऊर्जा असते.

आपल्यामध्ये केवळ स्वतःच्या समस्यांपासून मुक्त होण्याचा निश्चय असेल, तर त्यातून वास्तवाविषयीच्या आपल्या आकलनाला मर्यादित ऊर्जा मिळते. परंतु, वास्तव पाहण्याच्या आपल्या प्रेरणेला इतरांना उपकारक ठरण्याच्या प्रेरणेचीही साथ असेल, तर त्यातून अधिक ऊर्जा मिळते. तर, आपलं आकलन दोन्ही पातळ्यांवर अस्पष्टतेवर मात करू शकतं- केवळ अस्वस्थकारक भावनांच्या अस्पष्टतेवर नव्हे, तर सर्वज्ञतेला प्रतिबंध करणाऱ्या अस्पष्टतेवरही त्यातून मात करता येते.

उदाहरणार्थ, समजा- विषारी सापाच्या दंशावर कोणता उपाय करायचा याबद्दल एखादं वैद्यकीय व्याख्यान असेल. याचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याने केवळ डॉक्टर होण्याच्या, बरेच पैसे कमावण्याच्या आणि स्वतःच्या आर्थिक समस्यांवर मात करण्याच्या हेतूने या व्याख्यानाला उपस्थिती लावली, तर केवळ विशिष्ट प्रमाणात ऊर्जा वापरूनच तो हे व्याख्यान ऐकेल. पण सापाने नुकताच चावा घेतलेल्या एखाद्या मुलाची आई धावत त्या वर्गात आली, तर तिला स्वतःचं मूल बरं होण्याची इतकी तीव्र चिंता लागून राहिलेली असेल, की सर्पदंशावर उपचार कसा करायचा हे ती खूप जास्त उत्कटतेने शिकून घेण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे आपल्या वास्तवाविषयीच्या आकलनामागे बोधिचित्ताची प्रेरणा असते, तेव्हा त्या आकलनाला अधिक बळ मिळतं, परिणामी आपलं आकलन आपल्या मानसिक अस्पष्टतांना छेद देऊन पुढे जाऊ शकतं.

अशा प्रकारच्या पद्धतीमध्ये मनाचा असा मार्ग किंवा पायवाट समाविष्ट असते, ज्यात पद्धती आणि शहाणीव यांचा संयोग झालेला असतो. परंतु, त्यांचा संयोग सुत्राच्या पातळीवर होतो, म्हणजे एकाच वेळी दोन्ही घडतात असं नव्हे. उलट, एकमेकांच्या संदर्भात या गोष्टी घडवणारी ही पद्धत आहे. आपलं हृदय इतरांना सामावून घेण्याइतकं विस्तारणारी आणि इतरांना उपकारक ठरण्याकरिता साक्षात्कार साधू पाहणारी ही पद्धती आहे. आपल्यामध्ये असलेली शहाणीव, किंवा वास्तवाचं आकलन, यांच्या संदर्भात ही पद्धती कार्यरत असते, आणि या पद्धतीच्या संदर्भात आपली शहाणीव कार्यरत असते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपलं हृदय इतरांकरिता विस्तारतं, तेव्हा त्या संदर्भात आपली मनंही वास्तव कवेत घेण्याइतकी विस्तारलेली असतात. आपली मनं वास्तव कवेत घेण्याइतकी विस्तारतात, तेव्हा आपली हृदयं इतरांना सामावण्याइतकी विस्तारलेली असतात. अशा रितीने, यातील एक गोष्ट दुसऱीच्या संदर्भात कार्यरत असते, आणि आपण बुद्ध होत नाही तोवर एकाच मनात दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत नाहीत.

पद्धत आणि शहाणीव यांचा संयोग करणाऱ्या या रितीद्वारे आपल्या सर्व मानसिक अस्पष्टतांना छेद द्यायला बराच दीर्घ काळ जातो. किंबहुना, यात तीन असंख्य युगं, असंख्य म्हणजे सर्वांत मोठी मर्यादित संख्या घालवावी लागतात, म्हणजे १० या आकड्यावर ६० शून्य दिल्यावर जेवढा कालावधी होईल तेवढा कालावधी घालवावा लागतो. याला आपण अनंत संख्या (झिलिअन) असं म्हणू. हा प्रचंड दीर्घ कालावधी आहे. आपण स्वतःच्या मर्यादांवर मात करण्यासाठी आणि इतरांना सर्वाधिक उपकार ठरण्याकरिता स्वतःचं सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असताना, इतर लोक इतका दीर्घ काळ वाट पाहू शकत नाहीत. इथे तंत्राचा मुद्दा येतो. सर्वाधिक वेगाने व कार्यक्षमतेने बुद्धत्वापर्यंत पोचण्यासाठी तंत्र ही महायान किंवा विशाल मनाची उपासना केली जाते. इतरांना शक्य तितकं अधिक आणि शक्य तितक्या लवकर उपकारक ठरावं, हा त्यामागचा उद्देश असतो. चार आर्य सत्यांसंदर्भात आपण नुकत्याच चर्चा केलेल्या सर्व पद्धतींवर ही उपासना आधारलेली असते.

Top