अहिंसा हाच मार्ग

संघर्षांचं निवारण करून शांतता प्रस्तापित करण्याचा अहिंसा हाच वास्तविक मार्ग आहे. करुणा हा प्राथमिक मानवी स्वभाव आहे, या वैज्ञानिक निष्कर्षांशी हे सुसंगत आहे. आपण गेल्या काही शतकांच्या इतिहासाकडे पाहिलं, तर आपल्याला असं दिसतं की, हिंसेने केवळ द्वेष व नकारात्मक भावनाच वाढतात. हिंसेचा प्रतिकार करण्यासाठी हिंसेचा वापर केला, तर त्याचा काही सकारात्मक परिणाम होत नाही. हिंसा ही योग्य पद्धत नाही, हे युरोपातील नेत्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ढोबळमानाने हा विचार केल्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी युरोपीय संघाची सुरुवात केली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धावेळी फ्रान्स व जर्मनी एकमेकांचे शत्रू कसे होते, हे मी लोकांना बरेचदा सांगतो. क्वान्टम फिजिक्ससाठीचे माझे मार्गदर्शक आणि मित्र कार्ल फ्रेडरिख व्हॉन वेइझसाकर ९० वर्षांचे झाले, तेव्हा मला म्हणाले की, ते तरुण असताना जर्मन लोक सर्व फ्रेंचांना शत्रू मानत असत आणि फ्रेंच लोक सर्व जर्मनांना शत्रू मानत असत. पण आता त्यांचे दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेले आहेत.

लोकांना सखोल अनुभव मिळायला लागल्यावर लक्षात आलं की, हिंसा कालबाह्य झाली आहे. “आपण” व “ते” या संकल्पनांवर हिंसेचा जास्त भर असतो, त्यामुळे त्यातून लढाई उद्भवते. पण सर्व शेजाऱ्यांना एक समुदाय मानल्यावर त्यांनी युरोपीय संघाची स्थापना केली. युरोपीय संघ स्थापन झाल्यापासून युरोपातील भांडणं युद्धात रूपांतरित होण्याचा धोका उरलेला नाही, असं मी कायमच म्हणतो. युरोपीय संघ नसता, तर कदाचित आत्तापर्यंत काही गंभीर समस्या उद्भवल्या असत्या. पण अहिंसक झाल्याने लोक त्यांच्या प्राथमिक मानवी स्वभावाशी सुस्वर झाले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत लोकांच्या विचारात महत्त्वाचा बदल झाला आहे. उदाहरणार्थ, पोलंडमधील ऐक्याच्या चळवळीकडे पाहा. तिथे दोन लाख सैनिक होते, पण त्यांच्या आक्रमकतेशी अहिंसक पद्धतींनी लढा देण्याचा लोकांचा निर्धार होता. अशा गोष्टींवरून स्पष्ट संकेत मिळतात की, हिंसा प्रचंड प्रमाणात सहन केल्यानंतर या खंडातील लोकांना अहिंसा ही सर्वोत्तम पद्धती असल्याचं लक्षात आलं आहे.

रशियाही युरोपीय संघात सामील व्हावी, अशी माझी इच्छा आहे. युरोपीय संघासारखीच प्रेरणा लॅटिन अमेरिकेत व आफ्रिकेतही निर्माण व्हावी, असंही मला वाटतं. आफ्रिकेमध्ये अनेक विविध देश आहेत, त्यामुळे कदाचित ते केवळ उत्तर आफ्रिका म्हणून सुरू करू शकतात, आणि मग मध्य, पूर्व, पश्चिम, व दक्षिण आफ्रिका यांच्यापर्यंत संघाचा विस्तार करू शकतात. मग संपूर्ण जगही त्यात सामावून घेता येईल! अखेरीस संपूर्ण जग हा एक संघ व्हावा, हे आपलं उद्दिष्ट आहे. हे शक्य आहे, असं मला वाटतं. हे माझं स्वप्न आहे.

भारत हे याचं चांगलं उदाहरण आहे. भारतात उत्तर, मध्य, पूर्व, पश्चिम व दक्षिण यांचा संघ साधलेला आहे. सर्व राज्य भिन्न देशांसारखी आहेत, त्यांची स्वतःची भाषा व लिपी आहे. तरीही ते एक संघ आहेत. माझं स्वप्न- कदाचित ते पोकळ स्वप्न असेल- असं आहे की, भारत, चीन व जपान हे एखाद्या दिवशी एक संघ म्हणून एकत्र येतील. संघाची संकल्पना अहिंसेच्या संकल्पनेवर आधारलेली आहे.

हे शतक संवादाचं शतक व्हायला हवं. लोकांचे हितसंबंध वेगळे असतात, तेव्हा चर्चा व्हायला हवी, शस्त्रं वापरली जाऊ नयेत. हे शक्य आहे. सर्वांत आधी आण्विक निःशस्त्रीकरण व्हायला हवं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. नोबेल शांतता पुरस्कारविजेत्यांची एक बैठक दक्षिण आफ्रिकेत होणार होती, पण तिथल्या सरकारला काही अडचणी असल्यामुळे बैठकीचं स्थान रोमला हलवण्यात आलं, तेव्हा आम्ही आण्विक निःशस्त्रीकरण कसं करायचं यावर बोललो. त्या वेळी मी या संदर्भात वेळापत्रक करण्याविषयी बोललो आणि आण्विक सत्तांना या वेळापत्रकानुसार वागायला लावावं असं म्हटलं. पण तसं काहीच झालं नाही. “आण्विक निःशस्त्रीकरण” हे ऐकायला चांगलं वाटतं, पण निश्चित वेळापत्रक नसेल तर कदाचित ते परिणामकारक ठरणार नाही. ही एक जगव्यापी चळवळ झाली, तर कदाचित हे ध्येय साध्य करता येईल. त्यानंतर आपल्याला सर्व आक्रमक शस्त्रं काढून टाकावी लागतील, मग बचावात्मक शस्त्रं काढून टाकावी लागतील. शांततापूर्ण जग साध्य करण्यासाठी आपण टप्प्या-टप्प्याने निःशस्त्रीकरण करायला हवं.

बाह्य शांतता साध्य करण्यासाठी आधी आपण आंतरिक पातळीवर शांतता साधायला हवी. जगात खूप संताप, ईर्षा व अभिलाषा आहे. त्यामुळे आपल्याला बाह्य निःशस्त्रीकरण व आंतरिक निःशस्त्रीकरण या दोन्हींची एकाच वेळी गरज आहे. आंतरिक निःशस्त्रीकरण शिक्षणातून येतं. अधिक करुणामय मन असेल, तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं.

या संदर्भात स्मितहास्य महत्त्वाचं ठरतं. लोकांना स्मित करायला आवडतं, संतापायला किंवा गंभीर चेहऱ्याने बसायला आवडत नाही. मुलांना, आणि अगदी कुत्र्यांनाही स्मितहास्य करायला आवडतं. तुम्ही कुत्र्याकडे पाहून स्मित करता, तेव्हा तो तुमच्याकडे पाहून शेपूट हलवतो. तुम्ही कुत्र्याला खाणं दिलंत आणि तुमचा चेहरा अतिशय गंभीर असेल, तर कुत्रा खाणं घेतो, पण निघून जातो.

सामाजिक प्राण्यांचं जगणं उर्वरित समुदायावर अवलंबून असतं, त्यामुळे त्यांच्यात सामाजिक आस्था असते. आपण मानव सामाजिक प्राणी आहोत आणि संपूर्ण जग हा आपला समुदाय आहे. या विचारप्रक्रियेद्वारे आपण इतरांविषयी आदर विकसित करतो. त्यामुळे भिन्न मतं असली, भिन्न हितसंबंध असले, तरी आपण पुढे कसं जायचं याबद्दल काहीएक सहमती प्रस्थापित करू शकतो.

पहिल्यांदा आपण इतरांचा, आपल्या बंधुभगिनींचा आदर करायला हवा. आपल्याला आवडो अथवा न आवडो, आपल्याला या पृथ्वीवर एकत्र राहावंच लागणार आहे. या युरोपीय संघामध्ये, पूर्व व पश्चिम एकमेकांवर अवलंबून आहेत, आणि उत्तर व दक्षिण एकमेकांवर अवलंबून आहेत. आपल्यातील प्रत्येक जण इतरांवर अवलंबून आहे, या स्थितीवर आपल्या सर्वांचं भवितव्य अवलंबून आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय सीमा महत्त्वाच्या नाहीत. 

जागतिक उष्णतावाढ हा गंभीर प्रश्न आहे. तो असाच सुरू राहिला, तर पुढच्या शतकामध्ये जगात गंभीर अडचणी निर्माण होतील. मी संन्यासी आहे, त्यामुळे मला मुलं नाहीत. पण तुम्ही पालक आहात, आजीआजोबा आहात, तुमच्यावर तुमच्या मुलांची, नातवंडांची जबाबदारी आहे. त्यामुळे कृपया जागतिक उष्णतावाढ गांभीर्याने घ्या.

शिवाय, मानवी लोकसंख्यादेखील वाढते आहे. मी भारतात आलो तेव्हा जगाची लोकसंख्या सहा अब्ज होती. आता सात अब्ज झाली आहे. या शतकाअखेरीला जगाची लोकसंख्या दहा अब्ज झालेली असेल, असं वैज्ञानिक म्हणतात. त्यामुळे पर्यावरण व समाज यांसह सर्वांच्या कल्याणाचा विचार करा.

या समस्या हाताळण्यासाठी केवळ अहिंसक मार्गच रास्त आहेत. भारतामध्ये मी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील अहिंसा व इहवादी नीतिमूल्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतात अहिंसेचा उगम झाला. तीन हजार वर्षांहून अधिक काळ इथे धार्मिक सौहार्द आहे. भारतीय मुस्लिमांनी अफगाणिस्तान, सिरिया व इतर ठिकाणच्या त्यांच्या शिया व सुन्नी मित्रांना मदत करावी, असं मी सुचवलं आहे. भारतामध्ये सुन्नी व शिया यांच्यात कोणत्याही समस्या नाहीत. भारतात, हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी, इत्यादी सौहार्दाने राहतात. त्याचप्रमाणे धार्मिक सौहार्दाला चालना देण्यासाठी मी पावलं उचलतो आहे.

भौतिक गोष्टींवर खूप जास्त जोर दिला जातो. भारतामध्ये आधुनिक भौतिक शिक्षण आणि अहिंसा, नैतिक जबाबदारी व भावनिक ज्ञान यांच्या प्राचीन परंपरा यांमध्ये संयोग साधणं सोपं जातं. भावनांसंदर्भातील प्राचीन परंपरांचं पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात भारताला मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. चीनमध्येही प्राचीन परंपरा आहेत. आता तिथे ४० कोटी बुद्ध आहेत. भारत व चीन यांना एकत्र केलं तर ती खूप मोठी लोकसंख्या होते.

टप्प्या-टप्प्याने, वेगवेगळ्या प्रतिज्ञांचा वापर करून आपण शांततापूर्ण, करुणामय जग निर्माण करू शकतो. हे शक्य झालं, तर एकविसाव्या शतकाचा उत्तरार्ध अधिक शांततापूर्ण असेल. आता मी ८४ वर्षांचा आहे, त्यामुळे पुढील दहा ते वीस वर्षांमध्ये मला निरोप घ्यावा लागेल. पण आत्ताच आपण दूरदृष्टीने व व्यावहारिक पद्धतींनी सुरुवात करायला हवी. इतकंच. धन्यवाद.

Top