शांत होण्यासाठी श्वसनसाधना

श्वासावर लक्ष केंद्रित करणं, ही शांत होण्यासाठीची पारंपरिक बौद्ध पद्धत आहे. बौद्ध प्रशिक्षणामध्ये श्वसानचे अनेकविध प्रकार आहेत आणि अनेकविध श्वसनाभ्यास आहेत. माझा परिचय असलेल्या अशा सर्व श्वसनप्रकारांमध्ये श्वास नाकावाटे घेतला जातो, तोंडावाटे नाही, आणि श्वास ताकद लावून घेतला जात नाही, तर सौम्य रितीने नैसर्गिकरित्या घेतला जातो.

काही पद्धतींमध्ये आपण श्वास रोखून धरतो आणि काहींमध्ये तसं करत नाही. काही वेळा श्वास आत घेतल्यावर आपण रोखन धरतो आणि काही वेळा श्वास सोडल्यावर आपण रोखून धरतो. श्वसनाभ्यासाच्या मूळ उद्देशावर, आपण श्वास कसा घेतो त्या रितीवर हे सर्व अवलंबून असतं.

शांत होण्यासाठीचा पारंपरिक मार्ग म्हणजे श्वासोच्छवासाच्या चक्राचा वापर करणं. श्वास सोडल्यावर आपण एखादा विराम घेऊ शकतो, कारण तसं केल्याने आपण सक्तीविना नैसर्गिकपणे अधिक खोलवरचा श्वास घेतो. शांत होण्यासाठीच्या या सर्वांत सोप्या पद्धतीमध्ये आपण श्वास घेतल्यावर रोखून धरत नाही. पण काही पद्धतींमध्ये तसंही केलं जातं. हे चक्र वापरण्यासाठीचं कारण- श्वासोच्छवासाच्या चक्राचा वापर करण्यासाठी अनेक कारणं आहेत-, हे करण्यामागचा मुख्य उद्देश असा असतो की, आपल्याला स्वतःचे विचार शांत करायचे असतील, तर त्यासाठी अधिक एकाग्रता आवश्यक असते, कारण बहुतांश लोकांना श्वसनचक्र म्हटल्यावर जी कल्पना करता येते त्याहून ही मोजण्याची रीत निराळी आहे. या पद्धतीमध्ये अधिक एकाग्रता लागते व लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे इतर गोष्टींविषयी विचार करायला त्यात फारसा वाव राहत नाही, आणि मन शांत व्हायला मदत होते.

ही पारंपरिक पद्धत आहे. पण मला माझ्या अनुभवावरून असं लक्षात आलं आहे की, पाश्चात्त्य लोक, विशेषतः शिकवणुकीच्या बाबतीत, अगदी ताण घेऊन दिवस काढतात. सर्वसाधारणतः ते अतिशय तणावदायक नोकऱ्यांमध्ये कष्ट करत असतात आणि वाहतुकीतून वाट काढत त्यांना संध्याकाळी शिकवणुकीच्या ठिकाणी यावं लागतं. पण भारत किंवा तिबेटमधील पारंपरिक बौद्धांविषयी बोलत असताना असे संदर्भ नसतात, किंवा आपण सकाळी उठल्यावरच काही साधना करत असलो तर तिथेही हे संदर्भ नसतात. तर, तणावाखालील पाश्चात्त्य व्यक्ती बौद्ध केंद्रामध्ये आल्यावर तिला पहिल्यांदाच स्वतःच्या श्वसनरितीवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं, तर त्यातून त्यांचा तणाव वाढण्याची शक्यता असते, कारण या प्रकारात त्या गोंधळून जातात. सर्वसाधारण श्वसनरितीहून ही पद्धत बरीच भिन्न असते, हे तणावाखाली लक्षात येत नाही.

श्वसनाभ्यासाचा उद्देश मन शांत करणं हा आहे. त्यामुळे, श्वास सोडणं, मग किंचित विराम घेणं, मग श्वास घेणं- ही श्वसनचक्र मोजण्याची पारंपरिक पद्धत तणावाखालील पाश्चात्त्य उपासकांना गोंधळवणारी वाटत असेल आणि यातून त्यांचा ताण वाढतच असेल, तर त्यातून मूळ उद्देशच पराभूत होतो. तर, या विशिष्ट संदर्भात या पद्धतीवर भर देण्याचं काही कारण नाही. अशा परिस्थितीत श्वसनचक्राच्या पारंपरिक रितीकडे पाहून त्यांना ताण येत असेल, तर ते या चक्राकडे पाहण्याचा अधिक पाश्चात्त्य मार्ग वापरू शकतात, यात श्वास आत घेतला जातो आणि मग विराम न घेता श्वास सोडला जातो आणि हे एक चक्र म्हणून मोजलं जातं.

अशा प्रकारे मन शांत करण्यासाठी, आपलं मन खूप विचलित झालं असेल तर, आपण श्वसनचक्रांवर लक्ष केंद्रित करून ती मोजू शकतो. पण आपली मनं विचलित झालेली नसतील किंवा तुलनेने शांत व तयार असतील, तर मोजायचीही गरज नाही.

निराळ्या शब्दांत सांगायचं तर, पारंपरिक धर्माचा दृष्टिकोन अनुसरल्यास आपल्यासमोर वापरण्यासाठी तीन संभाव्य पद्धती असतात. आपापल्या परिस्थितीनुसार, आणि परिस्थितीचं मूल्यमापन आपलं आपणच करायला हवं, आपण वेगवेगळ्या पद्धती वापरतो. तर,

  • आपण खूप जास्त तणावाखाली असलो, तर आपण सर्वसाधारण पाश्चात्त्य पद्धतीने श्वास मोजावेत- श्वास आत घेणं व सोडणं, हे एक श्वसनचक्र म्हणून मोजावं.
  • आपण तणावाखाली नसलो, पण आपलं मन एकाग्र नसेल, तर आपण मोजण्याची पारंपरिक रीत वापरू शकतो- यात श्वास सोडणं, किंचित विराम घेणं व श्वास आत घेणं- हे एक श्वसनचक्र म्हणून मोजलं जातं. 
  • आपलं मन तुलनेने शांत असेल, तर मोजायची गरज नाही, केवळ श्वासावर लक्ष केंद्रित करावं.

या पद्धतींचं उपयोजन करताना आपल्या लक्षात येतं की, आपण स्वतःविषयी संवेदनशील असायला हवं आणि योग्य पद्धतीचं उपयोजन करायला हवं. बौद्ध शिकवणुकींबद्दलची लक्षणीय बाब म्हणजे त्या पद्धतींबाबत संपन्न आहेत, त्यामुळे एखादं विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी बऱ्याच पद्धती सर्वसाधारणतः उपलब्ध असतात. संवेदनशीलतेच्या प्रशिक्षणामध्येदेखील हे अतिशय उपयुक्त ठरतं. एका विशिष्ट वेळी आपली प्रत्यक्षातील भावनिक स्थिती काय आहे या संदर्भात आपण स्वतःविषयी संवेदनशील राहणं गरजेचं आहे, आणि कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्याच्या विविध पद्धती आपण शिकलो, तरी योग्य असलेल्या एकाच पद्धतीचं उपयोजन करावं. आणि तिचा परिणाम दिसत नसेल, तर दुसरी पद्धत वापरावी. तर या मन शांत करण्यासाठीच्या या तीनपैकी कोणतीही एक पद्धत वापरून श्वासावर लक्ष केंद्रित करूया.

[साधना]

आपल्या डोळ्यांच्या संदर्भात शांत होण्यासाठीचा प्राथमिक टप्पा म्हणून आपण स्वतःचे डोळे उघडे ठेवून जमिनीकडे पाहत राहू शकतो किंवा डोळे बंद ठेवू शकतो. या दोन्ही पद्धती बुद्धाने शिकवलेल्या आहेत. बौद्ध शिकवणुकीच्या दोन मुख्य विभागण्या आहेत. हिनयान परंपरेतील उरलेल्या थेरवाद परंपरेमध्ये सर्वसाधारणतः आपण डोळे बंद करून साधना करतो; महायान परंपरेमध्ये सर्वसाधारणतः डोळे उघडे ठेवून, नाकाच्या टोकाकडे किंवा जमिनीकडे पाहून साधना केली जाते. पण आपण जमिनीकडे पाहत असलो, किंवा नाकाच्या टोकाकडे पाहत असलो, तर आपले डोळे अंशतः लक्ष केंद्रित करून असतात, तीव्ररित्या लक्ष केंद्रित झालेलं नसतं.

तर, इथेही आपण स्वतःविषयी संवेदनशील होणं गरजेचं आहे, पण आपण खरोखरच खूप तणावाखाली असलो व त्रस्त असलो, तर डोळे बंद करून साधना करणं सोपं जातं. पण आपण आधीच थोडे शांत असलो, तर जमिनीकडे पाहात डोळे उघडे ठेवणं चांगलं, कारण आपल्याला स्वतःचे डोळे बंद करून जगाकडे पाठ फिरवून शांत व्हायचं नाहीये, तर जगाला सामोरं जाताना व इतरांना सामोरं जाताना शांत व निवांत होणं आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे ही साधना उघड्या डोळ्यांनी करणं त्या दिशेने जाण्यासाठी सुसंगत ठरतं.

आपल्या प्रेरणेची पुष्टी करणं, हे पुढचं पाऊल असतं. आपण प्रशिक्षणासाठी का येतो आहोत किंवा साधना का करतो आहोत, याची भावनिक किंवा शारीरिक कारणं तपासून त्या संदर्भात आपण याचा अनेकदा विचार करतो. मी हे का करतो आहे? अपराधभावनेतून करतो आहे का? समूहदाबातून करतो आहे का? सामाजिक कार्यक्रम म्हणून, एखाद्या गटाशी जोडून घेण्यासाठी, किंवा एखाद्या “धर्मा-जंकी”प्रमाणे प्रभावशाली नेत्याकडून ऊर्जेचा डोस घेण्यासाठी हे करतो आहे का? किंवा, संबंधित शिक्षकावर तुमचं प्रेम आहे आणि ओढीपोटी तुम्ही तिथे येत आहात का? बौद्ध दृष्टिकोनामध्ये यावर भर दिला जात नाही. हा बराचसा पाश्चात्त्य दृष्टिकोन आहे आणि अर्थातच तोही उपयुक्त ठरतो.

पण प्रेरणेची पुष्टी करावी, असं आम्ही पारंपरिक बौद्ध दृष्टिकोनामध्ये म्हणतो, तेव्हा आपला हेतू काय याची पुष्टी करणं अभिप्रेत असतं. बौद्ध प्रेरणा हा हेतूचा प्रकार आहे. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, इथे येऊन आपण काय करतो आहोत, आपला हेतू काय आहे, आपलं ध्येय काय आहे? इथे येऊन तीन संभाव्य ध्येयं गाठण्याचा विचार आपण करू शकतो, ते योग्य ठरतं. इथेही पुन्हा आपण स्वतःविषयी संवेदनशील असायला हवं आणि स्वतःशी प्रामाणिक असायला हवं- आपलं खरोखरचं ध्येय काय आहे किंवा आपलं उद्दिष्ट काय आहे. “सर्व संज्ञाशील जीवांना उपकारक ठरण्याकरिता साक्षात्काराच्या प्राप्तीसाठी मी हे करतो आहे,” असं स्वतःला बौद्ध मानणारी व्यक्ती म्हणून म्हणणं खूप सोपं आहे. पण हे केवळ शब्द आहेत.

बुद्ध होणं म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने समजून घेतलेलं नसेल आणि विश्वातील प्रत्येक किटकाला सततच्या पुनर्जन्मापासून मुक्त करण्याची प्रामाणिक इच्छा नसेल तर, “सर्व जीवांना मदत करण्यासाठी मी साक्षात्काराचं उद्दिष्ट ठेवलं आहे,” असं नुसतं बोलणं निरर्थक असतं. त्यामुळे वास्तववादी व आपल्या प्रत्यक्षातील उद्दिष्टाविषयी प्रामाणिक राहणं अधिक परिणामकारक ठरतं. तर, तीन योग्य उद्दिष्टं असतात. आपल्याला या जीवनकाळामध्ये स्वतःचे नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करण्याचीच केवळ चिंता असू शकते, त्यामुळे आपण बौद्ध पद्धतींमध्ये सुचवलेला हा एक उपचार शिकण्यासाठी इथे आलेले असू शकतो.

किंवा धर्माच्या संदर्भात आपण याकडे पाहू शकतो. “या जीवनकाळातील माझे नातेसंबंध सुधारण्यासाठी मी हे करतो आहे, पण मुक्ती व साक्षात्कार प्राप्त करण्याच्या दिशेने जाणारी वाट म्हणून मी याकडे पाहतो.” तर, आपलं प्रत्यक्षातील उद्दिष्ट किंवा ध्येय काहीही असलं, तरी आपण त्याची पुष्टी करायला हवी. आपण स्वतःच्या ध्येयाविषयी प्रामाणिक असलो, तर मनापासून ती कृती करणं जास्त सोपं जातं. अन्यथा, आपण स्वतःच्या ध्येयाविषयी प्रामाणिक नसलो, तर आपण करतोय तो एक खेळ होऊन जातो.

मग आपण एकाग्रतेने ऐकण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतो. आपलं लक्ष विचलित झालं, तर आपण ते पुन्हा जागेवर आणतो. आपल्याला झोप आली, तर आपण स्वतःला जागं करायचा प्रयत्न करतो. अधिक एकाग्र होण्यासाठी गरज असेल तर आपण बसण्याची पद्धत दुरुस्त करतो- ताठ बसतो, ताठरपणे नव्हे. मग आपली ऊर्जा थोडी खालावली असेल तर ती उंचावण्यासाठी आपण स्वतःच्या भिवयांमधील बिंदूवर लक्ष केंद्रित करतो, आणि आपलं डोकं समपातळीवर ठेवून डोळे वरच्या बाजूला बघत असतात. आपल्याला थोडं अस्वस्थ किंवा तणावाखाली असल्यासारखं वाटत असेल, तर ऊर्जा एकत्र करण्यासाठी आपण बेंबीवर लक्ष केंद्रित करतो, डोळे खालच्या बाजूला रोखतो, डोकं समपातळीवर ठेवतो. आपण सर्वसाधारण पद्धतीने श्वास आत घेतो, आणि श्वास सोडण्याची गरज वाटेपर्यंत रोखून धरतो.

एकाग्र राहण्याचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय किंवा हेतू थेट मैत्रेयांच्या एकाग्रताप्राप्तीसंदर्भातील सूचनांमधून आलेला आहे. भिवयांच्या मधोमध व बेंबीवर लक्ष केंद्रित करून सर्व ऊर्जा स्थिर करणं, ही पद्धती कालचक्र शिकवणुकींमधील आहे. त्यामुळे, इथे जे घटक एकत्रितरित्या मांडले आहेत तसेच एखाद्या विशिष्ट पारंपरिक बौद्ध प्राथमिक संचामध्ये आढळतील असं नाही, पण हे सर्व बौद्ध शिकवणुकींमधूनच घेतलेले आहे. मी त्यांना या रूपामध्ये एकत्र आणलं आहे, कारण मला असं दिसतं की, बहुतांश पाश्चात्त्य उपासक अतिशय तणावाखाली शिकवणुकीला येतात, आणि इथे नमूद केलेला प्राथमिक पद्धतींचा संच त्यावर उपाय करणारा आहे. आपल्या अतिशय तणावाखालील जीवनांशी सुसंगत अशा प्राथमिक पद्धतींचा संच आपल्याला गरजेचा आहे.

Top