आयुष्याला सामोरं जाण्याच्या बौद्ध पद्धती

दैनंदिन जीवनात आपल्याला मदत होईल अशा रितीने बौद्ध पद्धतींचा वापर कसा करायचा, याबद्दल आज संध्याकाळी आपण बोलणार आहोत. बौद्ध पद्धती किंवा बौद्ध शिकवणुकी यांबद्दल आपण बोलतो, तेव्हा त्यासाठी वापरलेला संस्कृत शब्द “धर्म” असा असल्याचं नमूद करायला हवं. “धर्म” या शब्दाचा प्रत्यक्षातला अर्थ आहे “आपल्याला थोपवणारं”. तर, धर्म आपल्याला दुःखापासून आणि समस्यांपासून थोपवतो किंवा थांबवतो.

चार आर्य सत्यं

बुद्धाने आपल्याला शिकवलेली पहिली गोष्टी “चार आर्य सत्यं” म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ असा की, साक्षात्कारी असलेल्या आणि वास्तव समजणाऱ्या कोणालाही सत्य म्हणून जाणवतील अशी चार तथ्यं आहेत. ही चार तथ्यं अशी:

  • आपल्या सर्वांसमोर उद्भवणाऱ्या खऱ्या समस्या / दुःखं.
  • या समस्यांमागची खरी कारणं / दुःखाची कारणं.
  • या समस्या आपल्याला नको असतील तर त्या खरोखरच्या थांबल्यावर काय होईल / दुःखाचं निवारण.
  • आपल्या सर्व समस्या थांबण्यासाठी काय समजून घ्यावं, कोणती कृती करावी, इत्यादी / दुःखाच्या निवारणाचे मार्ग.

आपल्या खऱ्या समस्या

बौद्ध धर्मात समस्यांविषयी आणि त्यांना सामोरं कसं जावं याबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. किंबहुना, बुद्धाच्या सर्व शिकवणुकी आपल्याला जीवनातल्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करू पाहणाऱ्या आहेत. यामागचा दृष्टिकोन प्रत्यक्षात अतिशय बुद्धिप्रामाण्यवादी आणि नम्र आहे. आपल्या कोणत्याही समस्या असतील, तरी त्या सर्वांचा उगम कोणत्या तरी कारणांमधून झाला आहे, असं बुद्धविचाराचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्या समोर कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपण अतिशय प्रामाणिकपणे स्वतःमध्ये खोलवर पाहायला हवं. आपल्यापैकी अनेकांसाठी ही खूप सहज प्रक्रिया नसते. किंबहुना आपल्या जीवनातल्या अडचणीच्या प्रदेशांकडे पाहणं प्रत्यक्षात अतिशय वेदनादायी असतं. अनेक लोक नकाराच्या भूमिकेत असतात. त्यांना स्वतःच्या समस्या मान्य करायच्या नसतात- उदाहरणार्थ, एखाद्या रोगट संबंधांमध्ये समस्या असल्याचं नाकारलं जातं, पण त्यांना दुःखाचा अनुभव येतोच. पण “मी दुःखी आहे” एवढ्याच पातळीवर ते ठेवता येत नाही. ती समस्या नक्की काय आहे, हे आपण खोलवर पाहणं गरजेचं असतं.

आपल्या समस्यांची खरी कारणं

मग आपण स्वतःच्या समस्यांची कारणं कोणती यांचा शोध घेणं गरजेचं आहे. समस्या स्वतःच्या बळावर, शून्यातून अस्तित्वात आलेल्या नसतात. त्यांचं काहीएक कारण असतंच आणि एखादी असमाधानकारक परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्यात अनेक स्तरांवरचे घटक सहभागी असतात. उदाहरणार्थ, एखाद्या नातेसंबंधामध्ये व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष होतो, तेव्हा त्यात आर्थिकतेपासून (पुरेसा पैसा नसणं, इत्यादी) मुलांसंबंधीच्या समस्या, किंवा इतर नातलगांसंबंधीच्या समस्या इथपर्यंत विविध गुंतागुंतीच्या घटकांचाही समावेश असतो. त्या समस्येला बळकटी आणणाऱ्या विविध प्रकारच्या परिस्थिती असू शकतात. पण आपल्या समस्यांचं सर्वांत खोलवरचं कारण काय आहे, याचा शोध घेण्यासाठी आपण अधिक खोल, अधिक खोल जायला हवं, असं बुद्ध म्हणतो; आणि वास्तवाविषयीचा आपला गोंधळ, हे आपल्या समस्यांचं सर्वांत खोलातलं कारण असतं.

आपल्याला दुःख होतं, आपल्याला वेदना होतात, आणि अर्थातच यामागे काहीएक कारण असतं. उदाहरणार्थ, आपण अतिशय अस्वस्थकारक रितीने- उदाहरणार्थ, अतिशय संतापून- कृती करत असण्याची शक्यता आहे. संतापलेलं असताना कोणीच सुखी नसतं, हो ना? त्यामुळे इथे संतापामुळे आपल्याला दुःख होतं आहे आणि काहीही करून आपण या संतापापासून मुक्त व्हायला हवं, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. 

आपल्याला दुःखी करणारी समस्या सदासर्वकाळ चिंतेला कारण ठरत असू शकते. चिंताग्रस्तता ही अतिशय अप्रिय मनोवस्था आहे. चिंताग्रस्त असताना कोणीच सुखी नसतं, हो ना? महान भारतीय बौद्ध गुरू शांतिदेव म्हणतात की, तुम्ही अडचणीच्या परिस्थितीत असाल, पण ती बदलण्यासाठी काही करणं तुम्हाला शक्य असेल, तर चिंता का करायची? ती परिस्थिती बदलायची. चिंतेने काहीच उपाय होणार नाही. आणि परिस्थिती बदलण्यासाठी काहीच करणं शक्य नसेल, तरी चिंता का करायची? त्यानेही काहीच उपाय होणार नाही. तर, चिंताग्रस्ततेच्या निरुपयोगी असण्याबद्दल आपण गोंधळात असतो, आणि आपण चिंता करत राहतो. चिंताग्रस्तता उपकारक नसते, हा इथला मुद्दा आहे.

समस्याचा दुसराही स्तर असतो- कधीही समाधानी न वाटण्याची समस्या असते. आपल्याला सुखीपणाचा काळ अनुभवायला मिळतो, पण दुर्दैवाने तो चिरकाल टिकत नाही, आणि आपल्याला सतत अधिक काही हवं असतं. कधीच समाधान होत नाही. आपल्या आवडीचा अन्नपदार्थ केवळ एकदा खाऊन आपलं समाधान होत नाही, हो ना? आपल्याला तो पदार्थ पुनःपुन्हा खायचा असतो. आणि एका वेळी आपण तो पदार्थ जास्त खाल्ला, तर सुरुवातीला आपल्याला वाटणारं सुख बदलून पोटदुखी सुरू होते. तर, अशा प्रकारच्या सुखाबद्दल आपण थोडेसे गोंधळलेलेच असतो. हे चिरकाल टिकणारं नाही आणि त्यातून कधीही समाधान मिळणार नाही, हे लक्षात घेऊन आहे तेवढ्यापुरताच आनंद घेण्याऐवजी आपण ते धरून ठेवतो; आणि ते सुख गमावल्यावर आपल्याला अतिशय दुःखी वाटतं.

आपण आपल्या प्रिय मित्रासोबत किंवा प्रियजनासोबत असतो, मग ते आपल्याला सोडून जाताना जसं होतं, तसा हा प्रकार असतो. कोणत्या तरी क्षणी ते सोडून जाणारच आहेत, त्यामुळे ते आपल्या सोबत असतानाचा काळ आपण आनंदात घालवणं गरजेचं आहे. आम्ही काही वेळा एक अतिशय सुंदर प्रतिमा वापरतो. आपल्याला अतिशय प्रिय असलेलं कोणीतरी विलक्षण आपल्या जीवनात येतं, तेव्हा आपल्या खिडकीत येणाऱ्या एखाद्या मुक्त वन्य पक्ष्यासारखंच ते असतं. तो पक्षी खिडकीत येतो, तेव्हा त्या पक्ष्याच्या सोबतीचं सौंदर्य आपल्याला आनंद देतं, पण थोड्या वेळाने तो पक्षी उडून जातो, तो स्वतंत्र असल्यामुळे हे स्वाभाविकच आहे. आणि आपण अतिशय मृदूपणे वागलो असलो, तर कदाचित तो पक्षी परत येईल. पण आपण त्या पक्ष्याला पकडून पिंजऱ्यात टाकलं, तर त्या पक्ष्याला अतिशय दुःख होईल आणि कदाचित तो मरेलही. त्याचप्रमाणे या सुंदर वन्य पक्ष्याप्रमाणे हे लोक आपल्या जीवनात येतात आणि ते आपल्यासोबत असतानाच्या काळाचा आनंद घेणं हीच सर्वोत्तम गोष्ट आहे. कोणत्याही कारणाने, कितीही काळासाठी ते लोक दूर गेले- तरी, ते घडतंच. आपण याबद्दल निवांत व शांत असलो, आणि काही मागण्या केल्या नाहीत- म्हणजे “मला कधीच सोडून जाऊ नको. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही” असलं काही केलं नाही- तर ते परत येण्याची शक्यता असते. अन्यथा, आपण पकडून ठेवायचा प्रयत्न केल्याने आणि त्यांच्याकडून जास्तीच्या मागण्या केल्याने ते पळून जातील.

आपल्या जीवनातील सर्वसाधारण सुख व संतोष यांच्या स्वरूपाबद्दल आपण गोंधळेलेले असू तर आपल्या समोर अर्थातच समस्या येतात. सुखाच्या काळाचा आनंदही आपल्याला घेता येत नाही, कारण हा काळ निघून जाईल याची चिंता व भीती आपल्याला वाटत असते. अन्नाचा वाडगा समोर असलेल्या कुत्र्यासारखी आपली अवस्था होते- हा कुत्रा अन्न खात असतो, पण कोणी येऊन ते अन्न पळवू नये यासाठी आजूबाजूला पाहत गुरगुरतही राहतो. आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घेऊन, ते स्वीकारावं आणि ते संपल्यावर संपल्याचं मान्य करावं- असं करण्याऐवजी काही वेळा आपण कुत्र्यासारखे वागतो, नाही का? पण हे अर्थातच वाटतं इतकं साधं नाही. कदाचित हे साधं वाटतही नसेल- पण त्यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे, जीवनातल्या गोष्टींकडे पाहण्याच्या विविध रितींची सवय व्हावी लागते.

आपल्या समस्या खरोखरच्या थांबवणं

आपल्या समस्या चिरकालासाठी थांबवणं शक्य आहे आणि असं करण्याचा मार्ग म्हणजे समस्यांच्या कारणांपासून मुक्त होणं, असं बुद्ध म्हणतो. हा अतिशय बुद्धिप्रामाण्यवादी, अतिशय तर्कशुद्ध दृष्टिकोन आहे. आपल्याकडचं इंधन संपलं, तर आग पेटणार नाही. समस्या पुन्हा येणार नाहीत अशा रितीने त्यांच्यापासून मुक्त होणं शक्य आहे, असं बुद्ध म्हणाला.

या समस्यांपासून केवळ तात्कालिक मुक्ती मिळवून आपण समाधान मानायला नको, बरोबर? हे झोपी जाण्यासारखं असतं- आपण झोपेत असतो, तेव्हा अवघडलेल्या नातेसंबंधांची समस्या आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे तो काही उपाय नाही, कारण जागं झाल्यावर ती समस्या असणारच आहे. आपण कुठेतरी सुट्टी घालवायला गेलेलो असतो, पण आपल्याला घरी परतावंच लागतं, आणि घरी परतल्यावर तिथे समस्या तशाच असतात. तर, सुट्टीवर जाणं हा काही सर्वोत्तम, प्रदीर्घ काळ टिकणारा उपाय नाही.

शिवाय, गप्प बसावं, आपल्या समस्या स्वीकारून त्यांच्यासह जगावं, असं बुद्ध सांगत नाही. कारण, हाही काही चांगला उपाय नाही, बरोबर? असं केल्याने आपल्याला असहाय वाटतं- आपल्याला करण्यासारखं काहीच नसतं, त्यामुळे आपण हातपाय गाळतो आणि प्रयत्नही करत नाही. आपल्या समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्याला फारशी प्रगती साधली नाही, तरी आपण प्रयत्न केल्याचं तरी आपल्याला जाणवतं.

आपल्या समस्या थांबवण्याच्या पद्धती 

पण आपल्याला या समस्या खरोखरच्या थांबवायच्या असतील, खरोखरच्या संपवायच्या असतील, तर बुद्धाने तिसरं तथ्य आपल्याला शिकवलं आहे. समस्यांचं सर्वांत खोलातलं कारण म्हणजे आपला गोंधळ, आणि त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी आपण काहीएका प्रकारची पद्धती अनुसरायला हवी, काहीएका प्रकारचं योग्य आकलन करून घ्यायला हवं, असं बुद्ध सांगतो. पण आपल्याला हे सदासर्वकाळ लक्षात राहत नसेल, तर चांगलं आकलन प्राप्त करणंही पुरेसं होत नाही, त्यामुळे आपण एकाग्रता विकसित करायला हवी. पण लक्षात ठेवण्याकरिता एकाग्रता प्राप्त व्हावी आणि त्या आकलनासह लक्ष केंद्रित करता यावं, यासाठी आपल्याला स्वयंशिस्त गरजेची असते. त्यामुळे आपल्या समस्या थोपवण्यासाठी आपण वापरतो त्या सर्वसाधारण बौद्ध पद्धती म्हणजे शिस्त, एकाग्रता आणि योग्य आकलन (याला काही वेळा “शहाणीव” असं म्हणतात).

शिवाय, आपल्या समस्यांचं एक सर्वांत मोठं कारण म्हणजे आपला स्वार्थीपणा. आपला बराचसा स्वार्थीपणा वास्तवाविषयीच्या गोंधळावर आधारलेला असतो, कारण या जगामध्ये केवळ आपणच अस्तित्वात आहोत असा विचार आपण करत असतो. इतर जण अस्तित्वात आहेत हे कबूल केलं, तरी या विश्वात आपण स्पष्टपणे स्वतःलाच सर्वाधिक महत्त्वाचे, या विश्वाचा केंद्रबिंदू मानतो. या गैरसमजुतीमुळे, “कायम माझ्याच रितीने गोष्टी व्हायला हव्यात. मला कायम जे हवंय ते मिळायला हवं” असं आपल्याला वाटतं, आणि आपल्याला हवंय त्या रितीने गोष्टी झाल्या नाहीत, तर आपण अतिशय दुःखी होतो.

पण हा वास्तवाकडे पाहण्याचा अतिशय गोंधळलेला दृष्टिकोन आहे, कारण एका अर्थी माझ्यात विशेष असं काही नसतं. प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं, कोणालाही दुःखी व्हायचं नसतं, या अर्थी आपण सगळे सारखेच असतो; प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनुसार काहीतरी हवं असतं, कोणालाही स्वतःच्या इच्छेनुसार हवंसं वाटणारं मिळू नये असं वाटत नाही. आणि तरीही आपल्याला सोबत राहावं लागतं, कारण आपण सोबत राहतच असतो. त्यामुळे समस्यांवर मात करण्याच्या किंवा समस्या थोपवण्याच्या रितींमध्ये आपण इतरांविषयी प्रेम, करुणा व आस्था यांची भर घालायला हवी. इतरांनी आपल्याला मदत केलेली आपल्याला आवडेल, त्याप्रमाणे आपणही त्यांना मदत केलेलं त्यांना आवडेल.

अस्वस्थकारक भावनांना सामोरं जाणं

प्रत्येक जण संत किंवा बोधिसत्त्व नसतो, हे एकदम खरं. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पातळीवर गोंधळलेला असतो. गोंधळलेलं असल्यामुळे आपण अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली कृती करतो. उदाहरणार्थ, मी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि मी सर्वांत महत्त्वाचा आहे, असं मला वाटत असेल, तर त्यासोबत असुरक्षिततेची भावना येते, बरोबर? तुम्ही गोंधळलेले असता, तेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटतं आणि तुम्ही विचार करता की, “बरं, मीच सर्वाधिक महत्त्वाचा असणार, पण लोक मला कायम तसं वागवत नाहीत.” तर, यात असुरक्षितता असते.

आपण असुरक्षित असताना कोणत्या व्यूहरचना वापरू शकतो- आपल्याला अधिक सुरक्षित वाटावं यासाठी प्रयत्न करण्याच्या व्यूहरचना कोणत्या? यातील एक व्यूहरचना अशी: “माझ्या भोवती पुरेशा गोष्टी असल्या, तर त्यातून मला सुरक्षित वाटेल. मला पुरेसा पैसा मिळाला, पुरेशी प्रसिद्धी मिळाली किंवा पुरेसं प्रेम मिळालं, तर त्यातून कसातरी मी अधिक सुखी होईन.” पण आपण आधी पाहिल्याप्रमाणे, अशा प्रकारचं सुख कधीही पुरेसं होत नाही, आपल्याला कधीही समाधान वाटत नाही, आणि आपल्याला सतत अधिकाधिक हवं असतं.

याबद्दल विचार करा. हे अर्थपूर्ण वाटतं. “माझं तुझ्यावर प्रेम आहे” असं आपल्या प्रियजनांनी एकदाच म्हटलं, तर तेवढं आपल्याला पुरेसं वाटतं का? असं त्यांनी एकदाच म्हटलं तर ते पुरेसं ठरतं- त्यानंतर त्यांनी परत कधीच ते म्हटलं नाही तर चालतं का? “बरं, आता हे तू मला पुन्हा सांगायची गरज नाही. मला ते माहीत आहे” असं आपण म्हणून असा क्षण कधीच येत नाही. त्यामुळे आपण लोभी असण्याविषयी बोलतो तेव्हा केवळ भौतिक गोष्टी व पैसा यांच्याबद्दलचा हा लोभ नसतो. आपण प्रेमासाठीदेखील लोभी असतो आणि आपल्यापैकी बहुतांश लोक इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावं यासाठी विशेष लोभी असतात. लहान मुलांमध्ये हे दिसतं. तर ही एक पद्धत आहे: आपल्या भोवती पुरेशा गोष्टी असतील, तर त्यातून आपल्याला सुरक्षित वाटेल, असा समस असतो. पण तो कधीच उपायकारक ठरत नाही.

पुढची पद्धत संताप व तिटकारा यासंबंधीची आहे: “मला धोकादायक वाटत असलेल्या काही गोष्टी मी दूर लोटल्या, तर त्यातून मला सुरक्षित वाटेल.” पण तसंही आपल्याला कधीच सुरक्षित वाटत नाही; आपल्याला सतत धोकादायक अवस्थेत असल्यासारखं वाटतं; आणि आपल्याला आवडणार नाही असं काहीतरी कोणीतरी करेल म्हणून आपण सतत सज्ज राहतो- आणि मग आपण संतापतो आणि त्यांना हुसकावून लावतो. काही वेळा यातून आपलाच मोठा पराभव होऊ शकतो. दुसरी व्यक्ती आपल्याकडे पुरेसं लक्ष देत नाहीये, आपल्याला पुरेसा वेळ देत नाहीये, असं वाटून आपण त्या व्यक्तीवर ओरडतो, अशा नातेसंबंधाचं उदाहरण माझ्या समोर येतं. आपण संतापतो आणि ओरडतो, “तू माझ्याकडे आणखी लक्ष द्यायला हवंस! तू माझ्यासोबत आणखी वेळ घालवायला हवा!” इत्यादी. यातून काय निष्पन्न होतं? सर्वसाधारणतः त्या व्यक्ती आणखी दूर जातात. किंवा आपल्यावर उपकार करून आणखी काही काळ त्या आपल्यासोबत राहतात, पण यात त्या अवघडलेल्या असल्याचं आपल्याला जाणवतं. आपण कोणावर संतापलो, तर त्याने आपण त्यांचे अधिक आवडते होऊ, असा विचार आपण कसा काय करू शकतो? हे अतिशय असंगत आहे, नाही का? यातील बहुतांश पद्धती वापरताना आपल्याला अधिक सुरक्षित वाटेल अशी आशा असते, पण प्रत्यक्षात गोष्टी आणखी बिघडतात.

आणखी एक पद्धती म्हणजे आपल्या भोवती भिंती उभारणं. आपण या समस्येला कसंही करून हाताळलं नाही, तर ती अस्तित्वाच राहणार नाही किंवा ती स्वतःहूनच दूर जाईल, असा भाबडा विचार यामागे असतो. “मला त्याबद्दल काहीही ऐकायचं नाही” अशा प्रकारची ही मनोवृत्ती असते, आणि मग तुम्ही भिंत उभारता. पण अशा प्रकारची भाबडी अवस्थाही उपयोगी ठरत नाही. समस्येकडे दुर्लक्ष केल्याने किंवा तिची दखल न घेतल्याने ती निघून जाणार नाही.

तर, या अस्वस्थकारक भावनांच्या आधारे आपण विध्वंसक मार्गांनी कृती करतो. आपण ओरडतो. आपण कोणाला मारूही शकतो. “मी बिचारा आहे, माझ्याकडे काहीच नाहीये” असं वाटून आपण चोरीही करू शकतो. त्यातून आपली काही मदत होईल, असं आपल्याला वाटतं. मी भारतात बरीच वर्षं राहिलो, तेव्हाचं एक उदाहरण मला आठवतं. भारत हा किटकांचा प्रदेश आहे- तिथे बरेच, बरेच, बरेच, आणि विविध प्रकारचे किटक आहेत. आणि त्या सर्वांना तुम्ही मारू शकत नाही; अशात आपण जिंकण्याचा काही मार्गच नाही. यावरचा एकमेव उपाय म्हणजे या किटकांसह जगायला शिकणं. तुमच्या खोलीत विविध किटक आलेले तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही डास थोपवणारी जाळी लावून झोपा- तुमच्या भोवती जाळी असेल, तर तुम्हाला संरक्षित अवकाश मिळेल. हा शांततापूर्ण उपाय आहे. अन्यथा तुमच्या खोलीतल्या सर्व डासांना मारण्याची मोहीम काढली तर, रात्रभर जागं राहावं लागतंच, शिवाय कितीतरी डास मारायचे राहिलेलेच असतात. जमिनीखाली जागा असते, किंवा खिडक्या धड बंद होत नसतात- त्यामुळे आणखी डास येणारच. अशा वेळी विध्वंसक वर्तनाची प्रेरणा अनिवार्यपणे उद्भवते: “मी त्यांच्यापासून सुटका करून घेणारच!”

विध्वंसक वर्तनाची अनेक विभिन्न रूपं आहेत. खोटं बोलणं, कठोर भाषा वापरणं, व्यभिचार, बलात्कार- या सगळ्या गोष्टी त्यात येतात. आणि आपण विध्वंसकरित्या कृती करतो, तेव्हा मुळात दुःख निर्माण करत असतो- हे दुःख केवळ इतरांसाठी नसतं, तर स्वतःसाठीही आपण दुःख निर्माण करत असतो. या संदर्भात विचार केला असता, तुमच्या लक्षात येईल की, बौद्ध धर्मामध्ये हत्या न करण्याबद्दल अतिशय उत्कटपणे मांडणी केली आहे, बरोबर? तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टीची हत्या करण्याची सवय तुम्हाला लागली- डासांबाबतीत होतं तसं झालं, तर ती आपली पहिली, आपोआप दिली जाणारी प्रतिक्रिया असते, हो ना? आणि हे केवळ हत्येबाबत असतं असं नाही. आपल्याला काही आवडत नसेल, तर आपण शांत मनस्थितीत त्याला सामोरं जाणं शिकण्याऐवजी ती गोष्ट अतिशय हिंसक रितीने बाजूला सारतो- हे शाब्दिकरित्या असेल, शारीरिक पातळीवर असेल किंवा भावनिक पातळीवर असेल.

काही वेळा अर्थातच तुम्हाला हत्या करावी लागू शकते. उदाहरणार्थ, पीक खाणारे कीटक असतील, आजार पसरवणारे कीटक असतील, इत्यादी. बौद्ध धर्म दुराग्रही व्हायला सांगत नाही. पण भाबडंही असू नये. संताप व तिरस्कार यांच्याविना हे करावं- “मला या मलेरियाच्या डासांचा तिरस्कार वाटतो!” असं असू नये. आणि याच्या नकारात्मक परिणामांबद्दल भाबडं असू नये. एक साधं उदाहरण: आपल्या भाज्यांवर आणि फळांवर सर्वत्र आपण कीटकनाशकं वापरली तर- तीच फळं व भाज्या आपण खातो, त्यामुळे आपल्याला आजारही होऊ शकतात. त्यामुळे याचे नकारात्मक परिणामही असतात. आपल्या मूळ मुद्द्याकडे परत येऊ- आपण शिस्त, एकाग्रता व योग्य आकलन यासोबत प्रेम व करुण यांची जोड असलेल्या पद्धती वापराव्यात.

नैतिक स्वयंशिस्त

जीवनातील समस्या टाळण्यासाठी या प्रतिबंधात्मक उपायांचं उपयोजन कसं करायचं? पहिल्या पातळीवर सुरुवातीला आपण नैतिक स्वयंशिस्त लावून घ्यावी, विध्वंसक कृती टाळण्यासाठी ती गरजेची आहे. विध्वंसकरित्या कृती करणं म्हणजे संताप, हाव, ओढ, मत्सर, भाबडेपणा, अहंकार, इत्यादींसारख्या अस्वस्थकारक भावनांच्या प्रभावाखाली कृती करणं. याचा अर्थ असा की, आपल्याला विध्वंसक कृती करावीशी वाटल्यावर आपण स्पष्टपणे निर्णय घेतो आणि “नाही, मला अशी कृती करायची नाहीये” असं ठरवतो.

तुम्ही केलेल्या एखाद्या चुकीसाठी तुमच्यावर ओरडावं असं मला वाटतं, तेव्हा ओरडण्याने ती परिस्थिती आणखी खालावण्याचीच शक्यता असल्याचं मला माहीत असतं. मला कदाचित तुमच्या कृतीत दुरुस्ती करावी लागेल किंवा तुम्ही केलेल्या चुकीला सामोरं जावं लागेल, पण ओरडण्याने ही परिस्थिती आणखी बिघडेल, बरोबर? विशेषतः तुम्हाला नावं ठेवली आणि शिव्या दिल्या, तर त्याने परिस्थिती निश्चितपणे सुधारणार नाही. त्यामुळे आपण विध्वंसक रितीने अनिवार्य कृती करणार आहोत, हे प्रत्यक्ष ती विध्वंसक कृती करण्यापूर्वी लवकरात लवकर ओळखणं म्हणजे नैतिक स्वयंशिस्त. अशा प्रकारे कृती करण्याची प्रेरणा असते आणि आपण त्यात भेद करतो: “हे अजिबातच मदतीचं होणार नाही,” आणि आपण त्या प्रेरणेनुसार कृती करण्यापासून स्वतःला थोपवतो.

स्वतःचा संताप आतच दाबून ठेवावा, असं आपण इथे म्हणत नाहीयोत. तसं केल्याने संताप तुम्हाला खात राहील आणि स्फोट होईपर्यंत तुम्ही तो दाबत राहाल. अशी ती पद्धत नाही. आपल्याला संताप हाताळता आला नाही, तर तो आत साठत जातो- पण दुसऱ्या व्यक्तीवर तो काढू नये. भिंतीवर ठोसा मारल्याने आपल्याच हाताला लागणार आहे, त्यामुळे तसं करणं मूर्खपणाचं असतं. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने संताप बाहेर काढावा, बरोबर? उशीला ठोसे मारा किंवा घरातली फरशी धुवा- अशा प्रकारे “आईच्या शहाणीवे”च्या पद्धती वापरून संताप व निराशा हाताळाव्यात. काहीतरी कष्टाचं घरकाम करावं किंवा लांब पळायला जावं किंवा जिममध्ये व्यायाम करावा, असं केल्याने निराश संतापाची ऊर्जा बाहेर काढायला मदत होते.

सजगता व एकाग्रता

अशा प्रकारे वागायची आपल्याला अधिकाधिक सवय लागली आणि आपण स्वतःला विध्वंसक कृतीपासून आवरतं घेतलं, तर तसं करण्यासाठी आपण जी पद्धत वापरतो त्याला “भेदक्षम सजगता” (शेस-रब) असं म्हणतात. काय उपकारक आहे व काय अपायकारक आहे, यात आपण भेद करतो, आणि त्या आधारे आपण शांत राहू शकतो, केवळ आतमध्ये संताप साठवत राहत नाही. तर, सर्वसाधारणतः “सजगता” (द्रान-पा) असं ज्याचं भाषांतर केलं जातं ती गोष्ट आपण इथे जोपासू पाहत आहोत. याचा अर्थ “लक्षात ठेवणं” असा आहे. शिस्तीचं पालन करण्यासाठीचा हा मानसिक डिंक असतो- ते पकडून ठेवावं, विसरून जाऊ नये- याला सजगता म्हणतात. “सक्रिय आठवण ठेवणं” हाच त्याचा अर्थ होतो.

तर, आपण अधिक जागृत राहायचा प्रयत्न करत असतो. “बुद्ध” या शब्दाचा प्रत्यक्षातील अर्थ “पूर्णतः जागृत असलेला" असा होतो. आपल्याला कोणत्या भावना जाणवतायंत, आपल्याला कोणत्या उत्कट भावना अनिवार्यपणे कृती करायला लावत आहेत किंवा अमुक कृती करू नयेत असं सांगत आहे, याबद्दल जागृत राहायचा प्रयत्न आपण करतो, आणि या गोष्टींचे गुलाम न व्हायचा प्रयत्न करतो. पण आकलनाद्वारे आपण कृती कशी करायची हे निवडू शकतो हेही आपण लक्षात घेतो. माझी मनस्थिती चांगली नसेल, तर ती बदलू शकते; ती बदलण्यासाठी मी काहीतरी करू शकतो.

काही वेळा मनस्थिती वाईट असेल तरी त्यावरचा उपाय अगदी साधा असतो. एक सर्वांत साधी पद्धत म्हणजे “त्रस्त बाळाला झोपवावं.” बराच वेळ जागं असणारं बाळ भोकाड पसरून रडत असतं, तसं आपल्याला वाटत राहतं. आपली मनस्थिती वाईट असते, तेव्हा आपण अनेकदा असेच असतो. मग आपण आडवं व्हावं, एखादी डुलकी काढावी, किंवा झोपी जावं. मग उठल्यावर आपल्याला सर्वसाधारणतः बरंच बरं वाटतं.

किंवा कोणाशी तुमची असहमती झाली असेल, आणि ती अतिशय उत्कट स्थितीपर्यंत पोचली असेल- तर, अशा परिस्थितीत दुसरी व्यक्ती तुमचं काही ऐकत नसल्याचं आणि तुम्हीही तिचं ऐकत नसल्याचं तुम्हाला कळतं. अशा वेळी संभाषण थांबवणं चांगलं- “आपण दोघेही शांत असू तेव्हा यावर बोलू”, असं म्हणावं आणि चालायला जावं, किंवा शांत होण्यासाठी असं काहीतरी करावं. 

या अतिशय साध्या-सोप्या पद्धती आहेत. बौद्ध धर्मामध्ये याहून बऱ्याच सखोल जाणाऱ्या पद्धतीही शिकवलेल्या आहेत, पण ही सुरुवात आहे. आपल्याला उपयोजन करणं शक्य होईल, अशा पद्धतींच्या उपयोजनापासून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. पण त्यातील तत्त्व महत्त्वाचं आहे, समस्येचं कारण काय याकडे पाहणं हे ते तत्त्व असतं, आणि या समस्येच्या निवारणासाठी काहीतरी करावं लागतं. समस्येला नुसतं बळी पडू नये. एका अर्थी, तुमच्या जीवनात काय घडतंय यावर ताबा मिळवा.

आपल्या वर्तनामध्ये काय उपकारक आहे आणि काय अपायकारक आहे, याचं आकलन पकडून ठेवण्यासाठी आपण सजगता विकसित करणार असू, काय घडतंय याकडे लक्ष देणं आपल्याला शक्य असेल आणि कशी कृती करायची आहे हे आपल्याला आठवणार असेल, तर त्यात दुरुस्ती करावी. आपण शरीराने कशी कृती करतो, आपण कसे बोलतो, या संदर्भात आपल्याला असं करता आलं, तर आपल्या मनाबाबत, आपल्या विचारप्रक्रियेबाबत तसं करण्याचं सामर्थ्य विकसित झालेलं असतं.

तर आपल्या मनात हे चिंतेचं विचारचक्र सुरू होतं- “बिचारा मी. कोणालाच मी आवडत नाही”, इत्यादी इत्यादी प्रकारच्या भावना मनात येतात, तेव्हा आपण म्हणावं, “अरे! मला असं आत्मवंचना, चिंता, असलं सुरू करायचं नाहीये. याने मी दुःखीच होत जाईन.” आणि मग आपण अधिक सकारात्मक गोष्टीकडे लक्ष देतो. केवळ चिंता करत बसण्याव्यतिरिक्त आपण आपल्या शरीराने, आपल्या मनाने इतर अनेक सकारात्मक गोष्टी करू शकतो. सगळं किती भयंकर होईल याचा विचार करत बसून, चिंता करत राहण्यापेक्षा आपण अनेक सकारात्मक गोष्टींबद्दल विचार करू शकतो. इथे आपण एकाग्रता विकसित करायचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून आपलं लक्ष विचलित झाल्यावर पुन्हा थाऱ्यावर आणता येईल. 

उदाहरणार्थ, आपण कोणाशी बोलत असलो आणि आपलं मन दुसरीकडे भरकटायला लागलं- तर त्यातून चिंताग्रस्त होऊ नये. “हे बोलायचं कधी थांबणारेत?” किंवा “रात्री मला जेवायला काय मिळेल?” अशा कशामुळेही मन भरकटू शकतं, मग आपण त्या व्यक्तीकडे लक्ष देणं थांबवतो. किंवा, आपण मनातच टिप्पण्या करू लागतो: “ते आत्ता जे काही बोलले ते मूर्खपणाचं होतं.” असं म्हणून आपण आपलं लक्ष पुन्हा मूळ जागी आणू शकतो.

एकाग्रतेचं हे अतिशय व्यावहारिक उपयोजन आहे, पण त्यासाठी शिस्त आवश्यक आहे; आणि पहिल्यांदा आपल्या शारीरिक व शाब्दिक वर्तनासंदर्भात आपण ही शिस्त लावून घेतो. हे कौशल्य- लक्ष पुन्हा मूळ ठिकाणी आणून विचलित होऊ न देण्याचं कौशल्य- विकसित केल्यानंतर ते सर्व प्रकारच्या परिस्थितीत उपयोजित करता येतं. हे खूप मदतीचं ठरतं. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचं शरीर कसं थाऱ्यावर ठेवता याबद्दल सजग होऊन सुरुवात करता येते. तुमचे खांदे अवघडले असतानाही तुम्ही लक्ष द्यायचा प्रयत्न करता, तुमची मान अवघडलेली असतानाही तुम्ही लक्ष द्यायचा प्रयत्न करता, इत्यादी- तुम्ही सजग असाल आणि हे तुमच्या लक्षात आलं, तर तुम्ही स्वतःचे खांदे मागे करून त्यांना थोडा आराम देता. हा केवळ लक्ष देण्याचा, लक्षात ठेवण्याचा आणि त्याबद्दल काहीतरी करण्याचा मुद्दा आहे. किंवा तुम्ही अतिशय उत्तेजित होऊ लागता, आणि ते त्या परिस्थितीत पूर्णतः अनुचित असतं, तुम्ही अतिशय मोठमोठ्याने आणि आक्रमकतेने समोरच्याशी बोलू लागता, तेव्हा ते लक्षात आलं तर तुम्ही ते बदलून टाकू शकता. तुम्ही शांत होता, तुमचे खांदे मागे करण्यासारखंच हे असतं, फक्त हे ऊर्जेच्या पातळीवर, भावनेच्या पातळीवर केलेलं असतं. 

धर्माच्या या पद्धतींचं जीवनात कसं उपयोजन करायचं, याचं हे पूर्ण गुपित आहे. हे लक्षात घ्या आणि ते करण्यासाठी, त्याचं उपयोजन करण्यासाठी पुरेशी शिस्त अंगी बाणवा. हे तुम्ही चांगलं होण्यासाठी किंवा तुमच्या शिक्षकांना संतुष्ट करण्यासाठी किंवा अशा कशासाठीही करत नसता. तुम्हाला समस्या- अडचणी टाळायच्या असतात म्हणून तुम्हाला हे करायचं असतं, कारण तुम्ही याबद्दल काहीही केलं नाही तर तुमची अवस्था दयनीय होणार आहे आणि ही गंमत नाही. त्यामुळे एकाग्रतेच्या संदर्भात- आपल्या भावना हाताळण्यासंदर्भातही- आपण मनाला स्वयंशिस्त लावायला हवी. भावना हाताळणं अर्थातच अधिक नाजूक, अधिक अवघड असतं. पण मी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही अतिउत्तेजित होत असाल, तर शांत होणं शक्य आहे.

योग्य आकलन

एकाग्रतेचं साधन किमान काहीएका पातळीपर्यंत विकसित करता आलं, तर जे काही घडतं आहे त्याचं योग्य आकलन होण्यावर लक्ष एकाग्र करण्याचा प्रयत्न करता येतो. वास्तवाबद्दल आपल्याला अनेक प्रकारचे गोंधळ जाणवत असतात- आपण कसे अस्तित्वात आहोत, इतर कसे अस्तित्वात आहेत, जग कसं अस्तित्वात आहे- आणि त्या गोंधळामुळे प्रत्यक्षात काय अवास्तव आहे याबद्दल आपल्या अनेक प्रकारच्या कल्पना असतात, बरोबर? आपण अशी कल्पना करू शकतो की: “माझ्यात काहीच चांगलं नाहीये. मी सतत हरतो.” किंवा आपण अशी कल्पना करू शकतो: “मी जगातली सर्वांत भारी गोष्ट आहे.” आपण अशीही कल्पना करू शकतो: “बिचारा मी. कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही.” पण आपल्या जीवनातल्या प्रत्येकाचं आपण खरोखरचं विश्लेषण केलं, तर या कल्पनांचा अर्थ असा होतो की, माझ्या आईने माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही, माझ्या कुत्र्याने माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही- कोणीच माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. पण असं असणं कधीच शक्य नाही. 

त्यामुळे आपण या कल्पना करतो आणि त्या सत्य मानू लागतो; ही भयंकर गोष्ट आहे. आपण ठरलेल्या वेळी उशिरा आलो किंवा आलोच नाही, तरी त्याने काही फरक पडत नाही, अशी आपली धारणा असते: “तुम्हाला काही भावना नाहीत,” बरोबर? आणि आपण इतरांचा अजिबात विचार करत नाही. पण प्रत्येकाला माझ्यासारख्याच भावना असतात. कोणालाही स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं नको असतं. भेटीची वेळ ठरलेली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने फोनही केला नाही किंवा दुसरी व्यक्ती उशीरा आली, तर तसं कोणालाच आवडत नाही. तर, या कल्पनारम्यतेला छेद देण्यासाठी आणि या सर्व निरर्थक गोष्टींची कल्पना थांबवण्यासाठी आपण एकाग्रतेचा वापर करणं गरजेचं आहे. आपल्या अविचारी वागण्याने इतरांना फटका बसत नाही यांसारख्या निरर्थक गोष्टींची कल्पना थांबवावी, कारण आपल्या समस्यांचं ते सर्वांत खोलवरचं कारण असतं: “मी या विश्वाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक वेळी मला हवं तसंच घडायला हवं. मीच सर्वांत महत्त्वाचा आहे.” हे अर्थातच कल्पनारम्यतेने विचार करणं आहे. कोणीच सर्वांत महत्त्वाचं नसतं. आपली कल्पनारम्यता सत्य आहे यांवर विश्वास ठेवून आपण स्वार्थी होतो. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या स्वार्थीपणावर मात करायची असेल, तर आपण या कल्पनारम्यतेची विरचना करून ही कल्पना करणं थांबवायला हवं. मी या विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि मीच केवळ अस्तित्वात आहे (कारण मी स्वतःचे डोळे बंद करतो तेव्हा माझ्या डोक्यात आवाज येतो, आणि मला कोणी दुसरं दिसत नाही, त्यामुळे मीच तेवढा अस्तित्वात आहे असं वाटतं) असं मला वाटत असलं, तरी हा भ्रम आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि त्यावर विश्वास न ठेवायचा प्रयत्न करायला हवा: “हे तसं नाहीये. हे केवळ तसं वाटतंय.”

हे आकलन सदासर्वकाळ कायम ठेवणं म्हणजे सत्याच्या मार्गावर असणं, असं बुद्ध म्हणतो, आपल्या समस्या / दुःख खऱ्या अर्थाने थांबवण्यासाठी हा मार्ग आवश्यक आहे. आपण सदासर्वकाळ योग्य आकलन राखलं, तर आपला काही गोंधळ होणार नाही. आणि आपला काही गोंधळ झाला नाही, तर आपण संतापणार नाही; आपल्याला ओढ, हाव, इत्यादी वाटणार नाही. आणि यातील कोणत्याही अस्वस्थकारक भावना आपल्यात आल्या नाहीत, तर आपण विध्वंसकरित्या कृती करणार नाही. आणि आपण विध्वंसकरित्या कृती केली नाही, तर इतरांसाठी व स्वतःसाठी विविध प्रकारच्या समस्या आपण निर्माण करणार नाही. जीवनातील समस्यांना सामोरं जाण्याची बौद्ध पद्धती मूलत अशी आहे.

आपल्याला आनंदी नातेसंबंध हवे असतील, तर आपण पुढील गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे:

  • मी मानव आहे. तुम्ही मानव आहात. आपल्या सर्वांच्या भावना सारख्या आहेत, इत्यादी.
  • प्रत्येकाचं काही सामर्थ्य असतं. प्रत्येकाच्या काही उणिवा असतात. माझ्यातही हे आहे, तुमच्यातही आहे.
  • कोणीच राजकुमार नसतं किंवा पांढऱ्या घोड्यावर विराजमान झालेलं राजकुमार नसतं.

तुमच्या गोष्टींमध्ये ही प्रतिमा असते का? आपण सतत परिपूर्ण साथीदाराच्या शोधात असतो, तो पांढऱ्या घोड्यावरून येईल अशी कल्पना असते, पण ही केवळ अद्भुतरम्य कथा आहे. तसं काही अस्तित्वात नाही, आपण तशी केवळ कल्पना करतो. या अद्भुतकथेवर विश्वास ठेवल्यामुळे अमुक व्यक्ती राजकुमार किंवा राजकुमारी होईल असं आपल्याला वाटतं आणि त्या व्यक्ती तशा नसतात तेव्हा आपण त्यांच्यावर संतापतो, आणि काही वेळा आपण त्यांना नाकारतोही. त्यानंतर आपल्याला पुढे भेटणाऱ्या संभाव्य साथीदारावर आपण तो अथवा ती राजकुमार अथवा राजकुमारी असल्याची कल्पना लादतो. पण आपल्याला कधीच तसा राजकुमार किंवा राजकुमारी मिळत नाहीत, कारण अशी काही गोष्टच नसते. 

त्यामुळे आपल्याला निरोगी नातेसंबंध हवे असतील, तर आपण वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे. मी म्हणालो त्याप्रमाणे वास्तव हेच आहे की, प्रत्येकात सामर्थ्य असतं, प्रत्येकात उणिवा असतात, आणि काही मार्ग काढून आपण सोबत राहणं शिकण्याची गरज असते, कोणीच विश्वाच्या केंद्रस्थानी नसतं. शिवाय, दयाळू असावं, आस्था राखावी, प्रेम करावं, संयम राखावा, उदार असावं, क्षमाशील असावं, इत्यादी सर्वसाधारण शिकवणं कोणत्याही धर्मात किंवा कोणत्याही मानवतावादी तत्त्वज्ञानात तुम्हाला सापडेलच. प्रत्येक धर्म आणि प्रत्येक मानवतावादी तत्त्वज्ञान सारख्याच गोष्टी शिकवतं, आणि बौद्ध धर्मही तेच करतो.

आपल्या कामाच्या ठिकाणच्या संबंधांनादेखील हीच तत्त्वं लागू होतात. आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी आपण दयेने वागलो (किंवा तुम्ही दुसऱ्यांना रोजगार देत असाल, तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांशी दयेने वागलात), तर सर्व कामकाज सहजतेनं चालतं. तुम्ही एखाद्या दुकानात काम करत असाल आणि तुम्ही ग्राहकांशी दयेने व आल्हादक पद्धतीने वागलात, तर संपूर्ण वातावरण अधिक आल्दाददायक होतं, हो ना? व्यवहारांमध्ये आपण प्रामाणिक असलो- इतरांना फसवलं नाही तर- गोष्टी अधिकाधिक चांगल्या होतात. तुम्ही नफा कमवायचा प्रयत्न करू नये आणि उपजीविका साधू नये, असा याचा अर्थ नाही, पण त्याबाबत हाव धरू नये.

प्रत्येक जण काही असं वागणार नाही, त्यामुळे इतरांनी आपल्याला फसवलं, तर तुम्ही काय अपेक्षा ठेवाल? बौद्ध दृष्टिकोनानुसार, तुम्ही हे लोक वाईट आहेत असं म्हणणार नाही, ते गोंधळलेत एवढंच तुम्ही म्हणाल. अशा प्रकारे कृती केल्याने त्यांच्या समोरच्या समस्या आणखी वाढणार आहेत हे त्यांना कळत नाही: कोणालाच ते आवडणार नाहीत. त्यामुळे ते करुणेचा नव्हे तर तिरस्काराचा विषय ठरतात. आपण त्यांच्याकडे करुणेचा विषय म्हणून पाहिलं आणि त्यांच्याबाबतीत संयम राखला, तर ते आपली फसवणूक करतात तेव्हा आपल्याला भावनिक त्रास होत नाही, त्यानंतर आपण पुढे भेटणाऱ्या लोकांबाबत अधिक सावध व्हायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपली पुन्हा फसवणूक होऊ नये. पण लोकांकडून कोणती अपेक्षा ठेवावी? बरेच लोक असे असतात. त्यामुळे हे वास्तव आहे. प्रत्येक जण प्रामाणिक आहे, अशी कल्पना केलेली असते. प्रत्येक जण प्रामाणिक नसतो! प्रत्येक जण प्रामाणिक असता, तर चांगलं झालं असतं, पण प्रत्येक जण तसा नसतो. त्यामुळे किमान आपण तरी प्रामाणिक व्हायचा प्रयत्न करावा.

बौद्धेतर व्यक्ती या पद्धती वापरू शकतात का?

या पद्धतींचं उपयोजन करण्यासाठी काटेकोरपणे बौद्ध आध्यात्मिक मार्गावरची साधना व रुढीच करायला हव्यात का? तर, तसं काही नाही. या गोष्टींचं उपयोजन करण्यासाठी आपण काटेकोरपणे, प्रमाणित आध्यात्मिक मार्गाचंच पालन करायला हवं असं नाही. परम पूजनीय दलाई लामा कायम इहवादी नीतिमत्तेविषयी आणि मानवी मूल्यांविषयी- दयाळू असणं, अधिक सजग असणं, भाबडं नसणं, कल्पनेत रमणं, इत्यादींविषयी बोलतात. ही सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वं आहेत, आणि कोणीही त्यांचं पालन करू शकतं.

आपण साधनेविषयी बोलतो तेव्हा आपण एका ठिकाणी बसून या विचाररितीशी परिचय करून घेण्याच्या पद्धतीविषयी बोलत असतो, अशा प्रकारे विचार करणं आणि आपलं लक्ष भरकटेल तेव्हा पूर्ववत करणं यासाठीचा हा प्रयत्न असतो. साधनेसाठी बसून आणि बुद्धावर किंवा तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करून हे करता येतं, पण एखादं पुस्तक वाचताना, किंवा जेवण करतानाही आपण हे करू शकतो, आणि तुमचं मन काही वेडगळ विचारांच्या मागे भरकटत असेल, तर ते पुन्हा स्वैपाकाकडे परत आणावं. यासाठी औपचारिक बौद्ध साधना करण्याचीच गरज आहे असं नाही. विचारांच्या, कृतीच्या या अधिक उपकारक मार्गांशी परिचय करून घेण्याचे अनेकानेक मार्ग आहेत, त्यासाठी बौद्ध रुढीमध्ये किंवा औपचारिक बौद्ध रचनेमध्येच सहभागी व्हायला हवं असं काही नाही.

अशा प्रकारे आपण धर्माचं- प्रतिबंधात्मक उपायांचं- उपयोजन करतो, जेणेकरून समस्या टाळायला आपल्याला मदत व्हावी. तुमचे काही प्रश्न आहेत का?

प्रश्न

आत आणि बाहेर काय घडतंय याबद्दल जागरूक असणं

समस्या टाळण्यासाठी आम्ही सदासर्वकाळ केवळ एकाग्र असायला हवं का?

एका अर्थी, होय. पण हे पूर्ण चित्र नाही. उदाहरणार्थ, आपण कोणावर तरी ओरडताना व मारतानाही पूर्ण एकाग्रता राखू शकतो, पण हे असं पूर्ण चित्र नाही. आतमध्ये- आपले विचार, आपल्या भावना, इत्यादींबाबत- काय घडतंय याबद्दल आपण जागरूक असणं गरजेचं आहे आणि आपल्या भोवती इतर लोकांसोबत काय होतं आहे याबद्दलही आपण जागरूक असायला हवं, अशी ही जागृतावस्था गरजेची असते. कोणी आपल्या घरी येतं- आपल्या कुटुंबातलं कोणी, किंवा आपलं प्रियजन किंवा कोणीही- तेव्हा ते अतिशय थकल्याचं तुम्हाला दिसणं शक्य असतं. तर त्याबद्दल तुम्ही सतर्क असायला हवं. ते थकलेले असतील अशा वेळी कोणत्यातरी महत्त्वाच्या विषयावर त्यांच्याशी मोठी चर्चा सुरू करणं योग्य नसतं. तर, आपल्याला कायम सतर्क, एकाग्र राहावं लागतं, आपल्या भोवती काय घडतंय यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. इतर लोकांची परिस्थिती कशी आहे, हेदेखील पाहावं, केवळ माझी परिस्थिती कशी आहे एवढ्यापुरतं मर्यादित राहू नये.

तर केवळ स्वतःबद्दल जागरूक असणं आणि इतरांबद्दल जागरूक नसणं, या टोकाला आपण जात नाही. त्याचप्रमाणे केवळ इतरांकडे लक्ष देणं आणि स्वतःकडे लक्ष न देणं, या टोकालाही आपण जात नाही. “नाही” म्हणणं अनेक लोकांना शक्य होत नाही, त्यामुळे ते सतत इतरांसाठी काहीतरी करत राहतात, त्यांच्या कुटुंबासाठी किंवा कोणाहीसाठी, आणि ते पूर्णपणे थकून जातात, शेवटी ते मोडून पडतात किंवा चिडखोर होतात. आपल्याला कसं वाटतंय याकडेही लक्ष देणं आणि आपल्या गरजांची काळजी घेणंही महत्त्वाचं असतं. आपण आराम करणं गरजेचं असतं, तेव्हा आराम करावा. “माफ करा, मी हे करू शकत नाही. हे खूप होतंय. एवढं मला शक्य नाही” असं म्हणणं गरजेचं असेल, तेव्हा “नाही” म्हणावं. आदर्शरित्या आपण “नाही” म्हणतो तेव्हा शक्य असेल तर आपण त्यांना काही पर्याय द्यावा. “पण कदाचित ही अमुक व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल,” असं तुम्ही सुचवावं.

थोडक्यात, बाहेर आणि आत जे काही घडत असेल त्या सगळ्याबद्दल जागृत राहावं आणि मग योग्य आकलन, प्रेम व करुणा यांचं उपयोजन करावं.

संताप हाताळताना

संताप किंवा इतर विध्वंसक भावना हाताळण्याची पद्धती म्हणून फरशी साफ करावी, असं तुम्ही म्हणालात, पण बौद्ध धर्मात याहून सखोल पद्धती आहेत असा निर्देशही तुम्ही केलात. या संदर्भात आम्ही कोणत्या दिशेने शोध घ्यावा याचा काही किमान अंदाज तुम्ही देऊ शकाल का?

संताप हाताळण्यासंदर्भात थोडं आणखी खोलात जायचं तर, कोणावर आपण संतापलो की संयम राखायचा प्रयत्न करावा. संताप कसा विकसित करावा? याच्या अनेकानेक पद्धती आहेत, पण उदाहरणार्थ एक पद्धत “लक्ष्यसदृश संयम” म्हणून ओळखली जाते: “आपण लक्ष्य ठेवलं नाही, तर कोणीच ते साधणार नाही.” उदाहरणार्थ, माझ्यासाठी काहीतरी करायची विनंती मी तुम्हाला करतो, आणि तुम्ही ते चुकीच्या रितीने करता. अशा वेळी मी तुमच्यावर संतापतो, अशी प्रवृत्ती असते. किंवा तुम्ही ते काम अजिबातच केलं नाही, तर ती चूक कोणाची? ती चूक मुळात माझीच असते, कारण आळसाने मी ते काम स्वतः करत नाही आणि तुम्हाला ते काम करायची विनंती मी केलेली असते. मग मी कोणती अपेक्षा ठेवावी? तुम्ही कोणालातरी काही काम करायची विनंती करता, तेव्हा तुम्ही कोणती अपेक्षा ठेवता? समजा, तुम्ही दोन वर्षाच्या बाळाला गरम चहाचा कप आणायला सांगितलंत आणि त्याने तो चहा सांडला. तर, दोन वर्षांचं बाळ तो चहा सांडणारच होतं, हे स्वाभाविकच आहे. तसंच आपण कोणालातरी आपल्यासाठी काही करायला सांगतो तेव्हा आपण कोणती अपेक्षा ठेवावी?

तर, ही समस्या माझ्या आळशीपणामुळे निर्माण झाल्याचं माझ्या लक्षात येतं. दुसऱ्या व्यक्तीवर तुम्ही संतापत नाही. आणि माझ्यासाठी काहीतरी करायची विनंती मी तुम्हाला करतो, तेव्हा मी स्वतः ते काम करण्यासाठी खूप आळस दाखवल्यामुळे तसं झालेलं असतं- खूप आळसामुळे किंवा माझ्याकडे वेळ नसल्यामुळे हे झालेलं असतं, याची मला जाणीव असते. पण मी कोणालातरी काम करायला सांगत असेन, तर त्या व्यक्तीने ते परिपूर्णरित्या- किंवा मी करेन त्याप्रमाणे- करावं अशी अपेक्षा मी ठेवू नये. तसंही मी करेन ते कामही अंतिमतः योग्यच असेल असं नाही. मीदेखील चुका करेन. आणि मी स्वतः ते काम केलं व त्यात काही चूक झाली, तर स्वतःवर संतापायचं काही कारण नसतं. “मी परिपूर्ण नाही- कोणीच परिपूर्ण नसतं- त्यामुळे मी चुका करतो.” तर मी हे वास्तव स्वीकारतो. “मी माणूस आहे, माणसं चुका करतात: मी चूक केली.” आणि मी ते दुरुस्त करू शकत असेन, तर तसं करावं. मी स्वतःवर संतापत नाही. स्वतःवर संतापण्यात अर्थ नसतो. शक्य असेल तर केवळ चूक दुरुस्त करावी. मला ते शक्य नसेल, तर आहे ते तसंच ठेवावं आणि भविष्यात त्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही असा प्रयत्न करावा.

संताप हाताळण्याची आणखी खोलवरची पातळी म्हणजे आपलं वास्तव समजून घ्यावं. आता मी अतिशय सोप्या पातळीवर बोलतो आहे, पण त्या सोप्या पातळीवरही हे मदतीचं ठरतं. “मी विश्वाचा केंद्रबिंदू नाही. मग गोष्टी मला हव्या तशाच का घडायला हव्यात? का? मला हवं तसंच घडायला हवं आणि इतर कोणाच्या मनासारखं होऊ नये, इतकं माझ्यात काय विशेष आहे?” अशा विचारांनी आपण विश्वातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणून “मी”ला ठोस स्थान देणाऱ्या दृष्टिकोनाची विरचना करू लागतो. ठोस “मी”. मग अर्थातच तुम्ही आणखी विरचना करत जाऊ शकता. “मी” असा कोणीतरी ठोस आहे आणि प्रत्येक गोष्ट मला हवी तशी व्हायला हवी, असा तुमचा दृष्टिकोन असेल, तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत की तुम्ही अर्थातच संतापणार, बरोबर?

आपण कसे अस्तित्वात असतो आणि प्रत्येक जण कसा अस्तित्वात असतो, याबद्दल सांगण्यासारखं बौद्ध धर्मात खूप काही आहे. आपण अस्तित्वात असतोच, पण आपण स्वतःच्या अस्तित्वाविषयी जशी कल्पना करतो तशा अशक्य मार्गाने आपण अस्तित्वात नसतो. उदाहरणार्थ, माझ्या डोक्यात बोलणाऱ्या, तक्रार करणाऱ्या आवाजाचा जनक म्हणून एक लहानसा “मी” असतो, अशी एक कल्पना केली जाते: “मी आता काय करावं? बरं, असं करतो,” आणि मग आपण आपलं शरीर हलवतो, जणू काही शरीर हे एखादं यंत्र असावं. पण हा भ्रम आहे. आपल्याला स्वतःच्या आत असा काही लहानसा “मी” सापडत नाही, सापडतो का? पण तरीही मी अस्तित्वात असतो- मी बोलतो, मी कृती करतो. तर या कल्पनांवर विश्वास ठेवणं आपण सोडून द्यायला हवं, कारण ते वास्तव असल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं. तसं वाटत राहतं. हा आवाज सुरू राहतो, आपल्या आत कोणीतरी बोलत असल्यासारखं वाटत राहतं.

तर, आपण ज्याला “मानसशास्त्र” म्हणतो त्याबद्दल बोलण्यासारखं बौद्ध धर्मात खूप काही आहे.

स्वतःच्या शरीरावर काम करणं

माझे दोन प्रश्न आहेत. पहिला: शरीरासोबत काम करण्याबाबत कदाचित तुम्ही आम्हाला अधिक काही सांगू शकाल का? आपण स्वतःच्या शरीराला आराम देणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणालात, पण आपण आणखीही काही गोष्ट करणं गरजेचं असेल कदाचित. दुसरा प्रश्न: या सर्व कल्पनांचा स्त्रोत कोणता? उदाहरणार्थ, आपल्या डोक्यांमध्ये बोलणारी ही व्यक्ती- ती कुठून अवतरते?

शारीरिक आरोग्यासाठी आपण अर्थातच अनेक शिस्तींचं उपयोजन करू शकतो. उदाहरणार्थ, तिबेटी परंपरेमध्ये एक बौद्ध औषध आहे, त्यात शरीराच्या ऊर्जांमध्ये समतोल साधण्याबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. आपल्या ऊर्जेवर आणि एकंदरच आपल्या आरोग्यावर आपल्या आहाराचा आणि आपल्या वर्तनाचा बराच परिणाम होतो. तुम्ही थंडीत बाहेर गेलात आणि तुम्ही पुरेसे उबदार कपडे घातले नसतील तर तुम्ही आजारी पडाल. अशा प्रकारच्या वर्तनाबद्दल आपण बोलतो आहोत. किंवा अति काम करणं- अशा प्रकारच्या वर्तनानेही तुम्ही आजारी पडाल.

आपल्या शरीराच्या स्थितीविषयी जागरूकता राखायचाही आपण प्रयत्न करतो. तुम्ही आतून जितके शांत व्हाल, तितके तुम्ही स्वतःच्या मनासोबतच तुमच्या शरीरातील ऊर्जेच्या परिस्थितीविषयीही अधिक सतर्क व्हाल. उदाहरणार्थ, तुमच्या शरीरातली ऊर्जा अतिशय अस्वस्थ असल्याचं तुमच्या लक्षात येतं, तेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके अतिशय वेगाने पडू लागतात. अशा वेळी आपण काही अतिशय प्राथमिक गोष्टी करू शकतो. अगदी आपला आहार बदलला तरीही त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ, आपण कॉफी किंवा कडक चहा पिणं सोडू शकतो, आणि आपल्या ऊर्जेचं खच्चीकरण करणारं चीझ किंवा तत्सम चरबीयुक्त अन्न आपण कमी करू शकतो. उब मिळेल अशा ठिकाणी थांबावं; वाऱ्यामध्ये जाऊ नये, किंवा उघड्यावर जाऊ नये. आणि ‘झररररर...’ असा आवाज करत राहणाऱ्या, बरीच ऊर्जा खाणाऱ्या या यंत्रांचा वापर तर करूच नका. अशा यंत्रांनी आपली ऊर्जा आणखी अस्वस्थ होईल. शांत राहावं. ही उपासनेची एक पातळी आहे.

शरीरावर काम करण्यासाठी तिबेटी परंपरेमध्ये शारीरिक व्यायाम किंवा चिनी अथवा जपानी बौद्ध परंपरांप्रमाणे मार्शल आर्ट्सचे प्रकार सांगितलेले नाहीत. पण ताइजी, क्विगोंग, यांसारखे मार्शल आर्ट्सचे वेगवेगळे प्रकार निश्चितपणे अतिशय उपयुक्त ठरू शकतात. तुमच्या हालचालींबाबत सजग राहून एकाग्रता वाढवण्याच्याही या पद्धती आहेत. तिबेटी बौद्धांमधील शारीरिक व्यायम अधिक सूक्ष्म स्तरावरचे आहेत, त्यात ऊर्जाव्यवस्थांवर निराळ्या रितीने काम केलं जातं, मार्शल आर्ट्ससारखं त्यात काही नसतं. हा काहीसा निराळा मार्ग आहे, तो योगाच्या अधिक जवळ जाणारा आहे. तर, आपल्या शरीरावर अशा पद्धतीने काम करता येतं.

आपल्या डोक्यांमधील आवाजाचा स्त्रोत

आपल्या डोक्यातील आवाजाच्या स्त्रोतामध्ये मनाच्या स्वरूपाचा संदर्भ येतो आणि हे काहीसं गुंतागुंतीचं होतं. बौद्ध धर्मामध्ये आपण मनाविषयी बोलतो तेव्हा आपण कोणत्या गोष्टीविषयी बोलत नसतो. आपण मानसिक क्रियांविषयी बोलत असतो आणि या मानसिक क्रियांमध्ये विचार करणं, पाहणं, भावना जाणवणं यांचा संबंध असतो. हा खूप, खूप मोठा विषय आहे. या क्रियांमध्ये विशिष्ट प्रकारचा मानसिक होलोग्राम अवतरत जातो. उदाहरणार्थ, आपण काहीतरी पाहतो, तेव्हा प्रकाश आपल्या डोळ्यांतील पडद्यावर पडतो, त्यातून इलेक्ट्रिक चेतना जाग्या होतात आणि मज्जातंतूंमध्ये रासायनिक प्रक्रिया घडतात. त्याचा परिणाम म्हणून समोरची गोष्ट कशी दिसतेय याचा काहीएक मानसिक होलोग्राम तयार होतो. पण हा खरंतर मानसिक होलोग्राम असतो. या सर्व रासायनिक व इलेक्ट्रिक चेतनांमधून तो तयार झालेला असतो.

पण होलोग्राममध्ये केवळ दृश्यमानता नसते. मानसिक होलोग्राम शब्दांसारख्या ध्वनींबाबतचेही असू शकतात. आपण एकाच क्षणात संपूर्ण वाक्य ऐकत नाही- आपण तुकड्या-तुकड्यामध्ये वाक्य ऐकतो, एका क्षणी एक शब्द असं ऐकतो- तरीही संपूर्ण वाक्याचा मानसिक होलोग्राम तयार होतो आणि तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. त्याचप्रमाणे भावनांच्या रूपांचे मानसिक होलोग्राम असतात, विचारांच्या रूपांचे मानसिक होलोग्राम असतात आणि शाब्दिकीकरणाच्या रूपाचे- या आवाजाचेही मानसिक होलोग्राम असतात. या गोष्टी निव्वळ उद्भवतात. त्यात काही बोधन समाविष्ट असतं. त्यामुळे आपण पाहतो किंवा विचार करतो किंवा आपल्याला जाणवतं ते हे असतं. हेच असतं. पाहणारा किंवा नियंत्रित करणारा आणि ते घडवणारा याहून विभक्त नसलेला “मी” नसताना ही मानसिक क्रिया घडत असते. ति निव्वळ घडते. त्यामुळे या मानसिक होलोग्रामचा काही भाग म्हणजे “मी”चे विचार असतात- “तो आवाज म्हणजे मी.” विचार कोण करतंय? मी विचार करतोय. तुम्ही विचार करत नाही आहात- मी विचार करतोय. पण या होलोग्रामांच्या संपूर्ण प्रक्रियाचा हा केवळ एक भाग असतो.

आपल्या डोक्यातल्या या आवाजाचा स्त्रोत कोणता? मानसिक क्रियेचं हे केवळ एक वैशिष्ट्य असतं. सर्व मानसिक क्रिया अशाच पार पडतात असं नव्हे. हा आवाज सदासर्वकाळ सुरू नसतो, आणि गांडूळही अशा एखाद्या आवाजाने विचार करत असेल असा माझा अंदाज आहे. गांडुळाला मेंदू असतोच, मनही असतं, त्याला गोष्टी दिसतात आणि ते कृतीही करतं.

याबद्दल विचार करायला लागल्यावर हे अतिशय रोचक होत जातं. एखाद्या आवाजाच्या ध्वनीचा होलोग्राम हे एक प्रकारचं संदेशन असतं, नाही का? शब्दांच्या मानसिक ध्वनीच्या रूपामध्ये एखादा विचार व्यक्त करणारी किंवा संदेशन साधणारी ही एक संकल्पना असते. यातील रोचक प्रश्न असा: जन्मतः मूकबधीर असलेल्या व्यक्तीकडे ध्वनीची संकल्पना अजिबात नसते- त्यांच्या डोक्यात असा आवाज असतो का, की ते खाणाखुणांच्या भाषेत विचार करतात? हा एक अतिशय रोचक प्रश्न आहे. याचं उत्तर मला अजूनपर्यंत मिळालेलं नाही.

तर, आवाज असो किंवा खाणाखुणांची भाषा- किंवा कीटकाची विचारप्रक्रिया असो- यात भ्रम असा असतो की, बोलणाऱ्यापाठीमागे कोणीतरी विभक्त “मी” आहे, तो कंट्रोल बोर्डापाशी बसलेला आहे, आणि डोळ्यांद्वारे पडद्यावर माहिती उमटतेय, तिथे मायक्रोफोन आहे आणि ते बोलतायंत, मग ते बटण दाबतात आणि हात व पाय हलू लागतात. हा पूर्णतः भ्रम आहे. “अरे, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील?” आणि “मी आता काय करायला हवंय?” असा विचार करणारा “मी” कंट्रोल बोर्डापाशी बसलेला असतो. आपल्याला याचीच चिंता असते, कंट्रोल बोर्डापाशी बसलेल्या “मी”ची.

हा “मी” भ्रामक असल्याचं आपल्या लक्षात येतं, तेव्हा चिंता करण्यासारखं काही उरत नाही. आपण बोलतो, कृती करतो. हा अर्थातच मी असतो: मी बोलतो, मी कृती करतो. आणि लोकांना ते आवडत नसेल, तर आवडत नसेल. त्याचं काय? बुद्धाने सर्वांना संतुष्ट केलं नाही. सर्वांनाच काही बुद्ध आवडत नव्हता, मग माझ्याकडून मी कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात? आपण आकलन, प्रेम, करुणा यांचा वापर करावा आणि त्यानुसार कृती करावी. एवढंच. आणि “त्यांना माझ्याबद्दल काय वाटतंय?” याबद्दल चिंता करू नये. हे वाटतं तितकं साधं-सोपं नसतं.

इतर संतापलेले असतात तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवणं

दुसरी कोणी व्यक्ती आपल्यावर संतापली असेल, तेव्हा आपण स्वतःला नियंत्रित कसं करावं?

मुळात ते लहान बाळांसारखे आहेत, हे आपण समजून घ्यावं. “चला, झोपायची वेळ झालेय” असं आपण म्हणतो तेव्हा दोन वर्षांचं बाळ आपल्यावर संतापतं आणि “मला तू आवडत नाहीस. तू भयंकर आहेस” असं ते म्हणतं आणि मग बराच गडबड-गोंधळ करतं, मग आपण संतापतो का? काही लोक संतापतात, पण हे केवळ दोन वर्षांचं बाळ असतं, त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता? बाळाला आपण शांत करायचा प्रयत्न करतो. दोन वर्षांच्या मुलाशी बोलल्याप्रमाणे अशा व्यक्तींशी सौम्यपणे बोलावं. याबद्दल विचार करा: अशा दोन वर्षांच्या बाळाशी तुम्ही कसे वागाल? सर्वसाधारणतः दोन वर्षांचं मूल विचित्र वागत असेल, तेव्हा तुम्ही त्याला उचलून जवळ घेता आणि त्यांच्यावर माया करतात, मग ते शांत होतात, हो ना? त्यांच्यावर ओरडलं तर ते आणखी रडतात. तर, काही लोकही असेच असतात- मोठ्या बाळांसारखे.

Top