शून्यता म्हणजे काय?

शून्यता म्हणजे “नथिंगनेस” किंवा “काहीच नसणं” नव्हे. काहीच अस्तित्वात नाही, त्यामुळे आपल्या सर्व समस्यांविषयी विसरून जावं, कारण त्या अस्तित्वातच नाहीत, असा याचा अर्थ होत नाही. शून्यता म्हणजे संपूर्ण अनुपस्थिती, अस्तित्वाच्या अशक्य मार्गांची अनुपस्थिती. सर्व गोष्टी कशा अस्तित्वात आहेत याबद्दलच्या आपल्या कल्पना वास्तवाशी सुसंगत नसतात. आपल्या समस्यांसह कोणत्याही गोष्टीमध्ये कोणतंही असं अंतर्गत बळ नसतं ज्याद्वारे ती समस्या ठरावी. प्रचलित दृष्टिकोनानुसार, त्या समस्या असणं शक्य आहे, पण आपण संकल्पना म्हणून त्या समस्यांची दखल घेऊ शकतो, “समस्या” हा शब्द प्रचलित अर्थानेच घडलेला आहे.

‘शून्यता’ या संस्कृत शब्दाला इंग्रजीत सर्वसाधारणतः “एम्प्टीनेस” असं संबोधतात. बुद्धाने दिलेली ही एक मुख्य मर्मदृष्टी होती. आपण, इतर व सर्व काही कसं अस्तित्वात आहे यासंबंधीचा गोंधळ हा जीवनातील प्रत्येकाच्या समस्यांचा सर्वांत सखोल स्त्रोत आहे, याचा साक्षात्कार बुद्धाला झाला. आपल्या मनांद्वारे अस्तित्वाच्या अशक्य रिती सर्व गोष्टींवर लादल्या जातात. ही धारणा वास्तवाशी सुसंगत नसल्याची जाणीव नसल्यामुळे अजाणतेने लोक स्वतःसाठी समस्या व दुःख निर्माण करतात. उदाहरणार्थ, आपण पराभूत आहोत आणि आपण काहीही केलं तरी आपण जीवनात यशस्वी होणार नाही असा समज आपण स्वतःवर लादून घेतला, तर आपण खालावलेल्या आत्मविश्वासामुळे निराश होतोच, शिवाय आत्मविश्वासाच्या अभावापोटी आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्नही सोडून देण्याची शक्यता असते. आपण जीवनातील सर्वांत खालच्या स्थानावर स्वतःला नेऊन ठेवतो.

शून्यता म्हणजे संपूर्ण अनुपस्थिती, आपण अंतःप्रेरणेने लादलेल्या समजाशी सुसंगत असलेल्या अस्तित्वाच्या प्रत्यक्ष मार्गाची अनुपस्थिती. आपल्या कल्पनेतील भऱाऱ्या हेच वास्तव आहे, असा विश्वास ठेवण्याच्या आपल्या अंगभूत सवयीपायी आपण सक्तीने हा समज लादून घेतो. उदाहरणार्थ, “पराभूत” हा केवळ एक शब्द व एक संकल्पना आहे. आपण स्वतःवर “पराभूत” असा शिक्का मारून घेतो आणि स्वतःला “पराभूत” या शब्दाशी व नामाशी जोडून घेतो, तेव्हा हे केवळ प्रचलित संकेत आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. आपण जीवनामध्ये अनेक वेळा अपयशी ठरतो, हे असू शकतं किंवा आपण प्रत्यक्षात आपण अपयशी ठरलो नसलो तरी परिपूर्णत्वाच्या ध्यासामुळे आपण अपयशी ठरतो, कारण आपण पुरेशी चांगली कामगिरी करू शकत नाही. काहीही असलं तरी, आपल्या जीवनामध्ये यशापयशापलीकडे बरंच काही घडलेलं असतं. पण स्वतःवर पराभूत असा शिक्का मारून आपण मानसिकदृष्ट्या स्वतःला “पराभूत” या कप्प्यामध्ये टाकतो आणि आपण या कप्प्यातच अस्तित्वात आहोत अशी आपली धारणा होते. किंबहुना, आपल्यामध्ये काहीतरी अंगभूत चुकीचं किंवा वाईट आहे, त्यामुळे आपण या कप्प्यात आहोत, अशी आपण कल्पना करतो. आपण आपल्या जीवनात केलेल्या इतर कशाच्याही अलाहिदा किंवा इतर कोणाला आपल्याबद्दल काय वाटतंय याच्या अलाहिदा आपण या कप्प्याच्या आंतरिक बळामुळे त्यात आहोत, असं आपल्याला वाटायला लागतं.

पराभूतांच्या कप्प्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीप्रमाणे अस्तित्व असणं आणि तिथेच असण्याची आपली पात्रता आहे असं मानणं, ही पूर्णतः कल्पनारम्यता आहे. त्याचा वास्तवाशी काहीही सांधा जोडता येत नाही. कोणीही एखाद्या कप्प्यात अडकल्याप्रमाणे अस्तित्वात नसतं. आपण स्वतःला दिलेल्या एका नामावर व केवळ एका संकल्पनेवर आपलं पराभूत म्हणून अस्तित्व आधारलेलं आहे. “पराभूत” ही संकल्पना आणि “पराभूत” हा शब्द म्हणजे केवळ प्रचलित संकेत आहेत. ते योग्यरित्या कोणालाही लागू करता येतात, उदाहरणार्थ, कोणी पत्त्यांच्या खेळात हरलं, तर त्या परिस्थितीमध्ये प्रचलित दृष्टिकोनानुसार संबंधित व्यक्ती पराभूत ठरते. पण कोणीही अंगभूतरित्या पराभूत म्हणून अस्तित्वात नसतं, खरोखरचा पराभूत असल्यामुळे जिंकणं अशक्य आहे अशी अवस्था कोणाच्याच बाबतीत नसते.

आपल्या पराभूत म्हणून अस्तित्वात असण्यामधील शून्यता आपल्या लक्षात आली की अशा अस्तित्वाचा काही मार्गच नाही हेही आपल्याला कळतं. ते वास्तवाशी सुसंगत नसतं. आपण खरोखरच पराभूत आहोत ही आपली जाणीव “पराभूत” या संकल्पनेनुसार व शब्दानुसार सिद्ध होते, ही संकल्पना आपण स्वतःला लागू करतो, कारण आपण कधीतरी कशाततरी अपयशी ठरलेले असतो. परंतु, ज्यामुळे स्वतःच्या बळावर आपण कायमस्वरूपी पराभूत म्हणूनच अस्तित्वात असू, असं आपल्यामध्ये अंगभूतरित्या चुकीचं असं काही नसतं. अस्तित्वात  असण्याच्या या अशक्य मार्गाची संपूर्ण अनुपस्थिती म्हणजे शून्यता. भूतकाळात, वर्तमानात व भविष्यामध्ये कोणीही अशा रितीने अस्तित्वात राहू शकत नाही.

आपल्या कल्पनारम्यतेची विरचना करून त्यांवर विश्वास ठेवणं थांबवण्यासाठी शून्यतेशी चांगला परिचय करून घ्यावा लागतो. पण आपण शून्यतेमधील साधना जतन करून ठेवली, तर हळूहळू सवयीने आपल्या लक्षात येऊ लागतं की स्वतःवर पराभूत असा शिक्का मारणं निरर्थक आहे, आणि अशा रितीने आपली कल्पनारम्यता पुसली जाते. अखेरीस, आपण ही सवय सोडूही शकतो आणि पुन्हा कधीही आपण स्वतःला पराभूत मानून विचार करणार नाही.

सारांश

काहीच अशक्य मार्गांनी अस्तित्वात नसतं, याचा अर्थ काहीच अस्तित्वात नसतं, असा नव्हे. शून्यतेमध्ये केवळ अस्तित्वाच्या अशक्य मार्गांना नाकारलेलं आहे- उदाहरणार्थ, स्वस्थापित अंगभूत अस्तित्व त्यात नाकारलेलं आहे. पण शब्द व संकल्पनांच्या प्रचलित संकेतांनुसार “ही” अथवा “ती” गोष्ट अस्तित्वात नाही, असं शून्यतेमध्ये मानलं जात नाही.

Top