वादविवादाचा उद्देश आणि त्याचे लाभ

02:26
बौद्ध धर्मातील वादविवादाची संकल्पना एखाद्याला तर्काच्या चतुराईने हरवण्यासंबंधी नाही. ती विद्यार्थ्यांना त्यांच्या बोधाबाबतची निश्चितता विकसित व्हावी यासाठी आहे, जेणेकरून त्यांना ध्यानधारणेबाबत शंका उरणार नाही. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या सहाध्यायाला आव्हान देतो की त्याने प्रश्न विचारून आणि त्याच्या उत्तरांमधील त्रुटी नमूद करून स्वतःची विचारपद्धती योग्य असल्याचे सिद्ध करावे. शेवटी दोन्ही पक्षांना या विवादाचा लाभ होतो.

बौद्ध साधनेत वादविवादाचा उद्देश एक स्पष्ट आणि निश्चित बोध (नगेस-शेस) विकसित करण्यासाठी साहाय्यक ठरण्याचा असतो. तुम्ही एखादा दृष्टिकोन स्वीकारता आणि तुमचा सहाध्यायी अनेक दृष्टिकोनातून त्यास आव्हान देतो. जर तुम्ही सर्व आक्षेपांपासून स्वतःच्या दृष्टिकोनाचा बचाव करू शकला आणि तुमच्या लक्षात आले की तर्काच्या दृष्टीने यात कोणत्याही कमतरता किंवा विरोधाभास नाही, तर तुम्ही स्वतःच्या दृष्टिकोनावर एका स्थिर निश्चित बोधासह लक्ष केंद्रित करू शकता. या पद्धतीच्या चित्तवृत्तीला आपण दृढ धारणा  (मोस-पा)संबोधतो.   नश्वरता, सर्वसमभाव, इतरांना स्वतःहून अधिक महत्त्व देणे, बोधचित्त, शून्यता अशा गोष्टींसंबंधी एकाग्र होऊन ध्यानधारणा करण्यासाठी दृढ विश्वासावर आधारित बोध आणि दृढ धारणा आवश्यक असते. विश्लेषणात्मक ध्यानधारणेच्या किंवा धम्म चिंतनाच्या माध्यमातून जर तुम्ही ती आश्वस्त सचेतनता स्वतःच विकसित करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही स्वतःच्या बोधाबाबत प्रश्न उपस्थित करू शकणार नाही, जसे एखाद्या सुविज्ञ सहाध्यायासोबतच्या वादविवादात शक्य आहे. इतर लोक तुमच्या तर्काबाबत अधिक सहजतेने कमतरता किंवा त्रुटी स्पष्ट करू शकतात, जे तु्म्ही स्वतः करू शकत नाही. 

शिवाय वादविवादातून अशी स्थिती निर्माण होते की जी नवशिक्या साधकांसाठी ध्यानधारणेच्या तुलनेत अधिक उपयुक्त ठरू शकते. वादविवादातले तुमच्या सहकाऱ्याचे आव्हान आणि तुमचा सहाध्यायी ऐकत आहे, याच्या जाणिवेने तुमच्यावर एकाग्रतेचे बंधन येते.  तुम्ही एकटे ध्यानधारणा करत असता तेव्हा केवळ तुमची इच्छाशक्ती तुम्हाला भरकटण्यापासून आणि झोपी जाण्यापासून रोखू शकते. तर मठांच्या वादविवादाच्या प्रांगणात बहुतांश वादविवाद एकमेकासमोर मोठमोठ्याने केले जातात. त्यामुळेही तुम्हाला एकाग्र राहणे बंधनकारक ठरते. जर आसपास सुरू असलेल्या वादविवादावरून तुमचे ध्यान निसटले तर तुम्ही हराल. एकदा तुम्ही वादविवादाच्या प्रांगणात एकाग्रतेचे कसब मिळवले की ते तुम्ही ध्यानधारणेतही लागू करू शकता. अगदी गोंगाट असलेल्या जागीसुद्धा ध्यानधारणा करताना हे शक्य होईल

आणखी महत्त्वाचे म्हणजे वादविवाद तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही साहाय्यक ठरतो. तुम्ही संकोच बाळगून वादविवाद करू शकत नाही. तुमच्या विरोधकाने आव्हान दिल्यानंतर तुम्हाला बोलावेच लागते. तर दुसरीकडे, तुम्ही घमेंडी  किंवा रागीट असाल, तर तुमची चित्तवृत्ती स्पष्ट असणार नाही आणि अपरिहार्यपणे तुमचा सहकारी विवादात तुम्हाला हरवेल. सदासर्वकाळ तुम्ही भावनात्मक संतुलन कायम ठेवायला हवे.  तुम्ही जिंका किंवा हरा, वादविवाद तुम्हाला तुमचा ‘अहम्’ ओळखण्याची एक अपूर्व संधी देतो, ज्याचे खंडन करणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही असा विचार करता की ‘मी जिंकलो आहे, मी किती हुशार आहे’ किंवा ‘मी हारलो आहे, मी किती बुद्धू आहे.’, तेव्हा तुम्ही स्पष्टपणे त्या मूर्त आणि स्वतःला अत्याधिक महत्त्व देणाऱ्या  ‘मी’ ला ओळखू शकता, ज्याचा रूपात तुम्ही स्वतःला ओळखत असता. हा ‘मी’ पूर्णतः काल्पनिक असतो आणि त्यालाच नाकारण्याची गरज असते. 

अगदी तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला त्याचा दृष्टिकोन तर्कसंगत नसल्याचे दाखवून देता, तेव्हाही तुम्ही हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते की त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हुशार आहात आणि तुमचा सहकारी मूर्ख आहे. तुमची प्रेरणा कायम हीच असायला हवी की तुमच्या सहकाऱ्याला त्या सर्व विषयात निश्चित बोध आणि दृढ धारणा विकसित करण्यासाठी साहाय्यक ठरावे, जे तर्काच्या आधारावर सिद्ध करता येतात.

Top