बौद्ध शिकवणींच्या परीक्षणासाठीची चार स्वयंसिद्ध तत्त्वे

बौद्ध शिकवण योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तिचे काळजीपूर्वक परीक्षण आवश्यक आहे. जर आपल्याला चांगले गुण विकसित करायचे असतील, तर आपल्याला आधीपासून हे माहीत हवे की त्यासाठी काय करणे गरजेचे आहे, एकदा आपण ते विकसित केले की त्याचा उपयोग कसा करायचा, ते लाभ तर्कसंगत आहेत की नाही आणि ते लाभ मूळ प्रकृती अनुरूप आहेत. जर ती शिकवण या सर्व निकषावर खरी उतरत असेल, तर आपण आश्वस्त होऊ शकू की ती अंगीकारायला हरकत नाही.

धम्म साधनेचे  यश व्यावहारिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. याचा अर्थ धर्माच्या शिकवणींचे अशा रीतीने परीक्षण करणे आवश्यक असते की जे गोष्टींच्या अस्तित्वाला अनुरूप असेल. अशा परीक्षणासाठी बुद्धांनी चार स्वयंसिद्ध तत्त्वे (रिग्स-पा-बझी) सांगितली आहेत, ज्या बौद्ध दर्शनातील मूलभूत धारणा आहेत. स्मरणात असू द्या, बुद्धाने सांगितले आहे, ‘माझी शिकवण केवळ माझ्यावरील श्रद्धेमुळे किंवा आदरामुळे स्वीकारू नका, तर सोने खरेदी करताना जशी पारख केली जाते, तशी त्याची स्वतः पारख करा.’

चार स्वयंसिद्ध तत्त्वे खालीलप्रमाणे आहेतः 

  • अवलंबन
  • व्यावहारिकता
  • तर्कावर आधारित सिद्धता
  • गोष्टींचे स्वरूप अर्थात नैसर्गिक प्रकृती 

आता त्सोंगखापा बृहत ग्रंथ मार्गावरील  क्रमिक स्तरासम्बंधी च्या भव्य व्याख्यानात  या चार तत्त्वांना कशा रीतीने स्पष्ट करतात ते पाहू. 

अवलंबनाचे तत्त्व

पहिले तत्त्व हे आहे की काही गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी इतर गोष्टींवर अवलंबून असतात. हेच अवलंबनाचे तत्त्व आहे. कारण आणि परिस्थितींच्या अवलंबनातूनच परिणाम घडत असतात. हे असे तत्त्व आहे, जे आपण सर्व जण स्वीकारू शकतो. याचा अर्थ आपल्याला एखादा चांगला गुण विकसित करायचा आहे किंवा एखाद्या गोष्टीचे आकलन वा बोध प्राप्त करायचा आहे, तर आपल्याला ती गोष्ट कशावर अवलंबून आहे, हे शोधावे लागेल. तर त्याच्या आधारभूत गोष्टींना अनुरूप ठरण्यासाठी आपल्याला कोणते गुण विकसित करायला हवेत?

आध्यात्मिक सिद्धीचा प्रत्येक स्तर इतर सिद्धी आणि घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ आपल्याला विवेकी जागरूकता विकसित करायची असेल किंवा शून्यता वा यथार्थविषयक बोध विकसित करायचा असेल, तर आपल्याला शोध घ्यायला हवा की तो बोध कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे. तो एकाग्रतेवर अवलंबून आहे. एकाग्रतेशिवाय आपण बोध विकसित करू शकत नाही. आणि असा कोणता आधार आहे, ज्यावर एकाग्रता अवलंबून आहे? एकाग्रता स्वयंशिस्तीवर अवलंबून आहे. जर आपले ध्यान भरकटत असण्याच्या स्थितीत आपल्याकडे स्वयंशिस्त नसेल तर आपण एकाग्रता विकसित करू शकणार नाही. त्यामुळे शून्यतेसंबंधी विवेकी जागरूकता विकसित करू इच्छित असू, तर आधी आपल्याला स्वयंशिस्त आणि एकाग्रता विकसित करायला हवी. 

धर्माच्या अभ्यासावेळी हे पहिले तत्त्व लागू करणे फार महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथांमध्ये वाचलेल्या उत्तमोत्तम गोष्टी साध्य करण्याची अनेकांची इच्छा असेल, पण आपल्या इच्छांबाबतचा आपला दृष्टिकोन व्यावहारिक असेल तर, आपल्याला अपेक्षित सिद्धी कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे, याचा शोध घ्यायला हवा. जेव्हा आपल्याला आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कोणते गुण विकसित करायला हवेत, याची जाणीव होईल, तेव्हा आपल्याला त्या ध्येयापर्यंत कसे पोहचायचे याचीही जाणीव होईल. तेव्हा आपण आधारबिंदूपासून सुरुवात करू शकतो. त्यामुळे आपला प्रयत्न व्यावहारिक ठरतो. 

व्यावहारिकतेचे तत्त्व

दुसरे तत्त्व कार्यात्मकतेविषयीचे तत्त्व आहे. प्रत्येक घटना, जी कारणे आणि परिस्थितीने प्रभावित असते, तिचे विशिष्ट कार्य किंवा प्रयोजन असते. जाळण्याचे काम आग करते, पाणी नाही. ही सुद्धा बौद्ध धर्मातील एक मूलभूत पूर्वधारणा आहे, एक स्वयंसिद्ध तत्त्व आहे आणि जे आपण स्वीकारू शकतो. हे लागू करण्याचा अर्थ आहे की धर्माभ्यास करतेवेळी आणि त्याविषयीचे ज्ञान प्राप्त करतेवेळी त्या घटनेचे कार्य काय आहे, याचा आपल्याला शोध घ्यायला हवा.  आपल्याला प्रेम व करुणा सारख्या मनोवस्था विकसित करण्यास आणि भ्रम व क्रोधासारख्या मनोवस्थांपासून स्वतःला मुक्त करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीही शिकवल्या जातात. त्या पद्धतींच्या आकलनासाठी आपल्याला त्यांची कार्ये काय आहेत आणि त्यांचे प्रयोजन काय आहे, हे शोधावे लागते. अर्थात काही गोष्टी अनुरूप असतात, तर काही गोष्टी अनुरूप नसतात, त्यामुळे काही मनोवस्था दुसऱ्या मनोवस्थेत वाढ करतात. 

उदाहरणार्थ, प्रेमभाव विकसित करण्यासाठीच्या ध्यानधारणेतील एखाद्या विशिष्ट पद्धतीचे विवेचन केल्याने आणि त्याचा अनुभव घेतल्याने त्या पद्धतीवरील आपला विश्वास वृद्धिंगत होतो. आपण शोधतो की, ‘हे योग्य आहे की नाही?’ आणि त्यानंतर आपण ते अनुभवण्यासाठी प्रयत्न करतो. ही कार्यपद्धती आपल्याला त्या पद्धतीबद्दल विश्वास देते. ध्यानधारणेतील एखादी विशिष्ट पद्धत योग्य आहे की नाही, याबाबत विश्वास बसल्याने कोणते लाभ होतात? त्यातून त्या पद्धतीनुसार ध्यानधारणा करण्याची आपली क्षमता वाढते. आपण जे कार्य करत आहोत, त्यावर आपला विश्वास नसेल, तर आपण ते करणार नाही. पण आपण त्यातील प्रत्येक टप्प्यावर होणारा लाभ ओळखला, तर आपण तो प्रत्येक टप्पा मनःपूर्वक पूर्ण करू. आणि जर ते आपल्याला समजू शकलं नाही, तर आपण ते करणारच नाही. 

याशिवाय आपल्याला एखाद्या गोष्टीच्या कार्याचे आकलन वा बोध यासाठी महत्त्वाचा असतो की त्यामुळे आपण दुसऱ्या गोष्टीतून होणारे नुकसान थांबवू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या पद्धतीवरील विश्वास त्याबाबतची द्विधावस्था संपवतो. एखाद्या पद्धतीच्या अनुसरणासाठी आपल्या क्षमतांवरचा विश्वासाचा अभाव आपल्याला त्या साधनेत पुढे मार्गक्रमण करण्यासाठी मारक ठरतो. 

आपण शिकलेली प्रत्येक गोष्ट आणि साधना पद्धतीतील प्रत्येक टप्पा कोणती गोष्ट सक्षम करेल आणि कोणती गोष्ट नष्ट करेल, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. तेव्हा आपण जे करत आहोत, त्याबाबतचा आपला दृष्टिकोन व्यावहारिक असेल. उदाहरणार्थ, प्रेमासारखी विशिष्ट सकारात्मक मनोवस्था आपल्याला का विकसित करावी वाटते? याचे वैध कारण म्हणजे ती मानसिक शांती बहाल करण्याचे कार्य करते आणि इतरांना मदत करण्यासाठी आपणास सक्षम करते. क्रोधासारख्या नकारात्मक मनोवस्थेपासून आपल्याला मुक्ती का हवी असते? कारण ती आपल्यासाठी आणि इतरांसाठीही संकटे निर्माण करते. जेव्हा आपण धूम्रपानासारख्या विनाशकारी वर्तन आणि सवयींचा त्याग करू इच्छितो, तेव्हा या गोष्टी समजून घेणे फार महत्त्वाचे असते. जेव्हा आपण स्पष्टपणे हे समजू शकतो की, एखाद्या कृत्याचा परिणाम काय असू शकतो, जसे धूम्रपानाने आपल्या फुफुसांवर काय परिणाम होतो, तर आपण तसे वागणे बंद करतो. अशा रीतीने आपण व्यावहारिकतेचे तत्त्व उपयोगात आणतो. 

तर्कावर आधारित सिद्धतेचे तत्त्व

तर्कावर आधारित सिद्धतेचे चौथे तत्त्व आहे. याचा अर्थ असा आहे की ज्ञान किंवा बोधाच्या एखाद्या सिद्ध पद्धतीने एखाद्या गोष्टीचे खंडन होत नसेल, तर ती गोष्ट सिद्ध किंवा प्रमाणित आहे. सर्वप्रथम आपल्याला हे शोधणे आवश्यक असते की आपण धर्माभ्यास म्हणून ज्या गोष्टी शिकलो आहोत, त्या धर्मशास्त्राच्या अधिकृत ग्रंथांतील शिकवणींच्या विरुद्ध तर नाहीत ना. एखादी शिकवण धार्मिक शिकवण आहे की नाही, हे कसे सिद्ध करायचे? ती शिकवण बुद्धांनी दिलेल्या शिकवणीला अनुरूप असेल. आता बुद्धांनीच वेगवेगळ्या शिष्यांना वेगवेगळी शिकवण दिली आहे, जी पृष्ठभागीय स्तरावर परस्पर विरोधी वाटते, तर आपण हे कसे ओळखायचे की त्या पाठीमागे बुद्धांचा गूढ आशय काय होता? भारतीय गुरू धर्मकिर्ती यांनी असे स्पष्ट केले आहे की, एखादी शिकवण बुद्धांच्या उपदेशात पुन्हा पुन्हा येत असेल तर आपण ओळखायला हवे की बुद्ध ती शिकवण महत्त्वपूर्ण मानतात. नैतिकतेच्या बाबतीत ही गोष्ट अधिक महत्त्वपूर्ण आहे. 

एखाद्या गोष्टीला प्रमाण पद्धतीने समजण्याचे दुसरे साधन आहे, त्याला तर्क आणि निष्कर्षाच्या माध्यमातून समजून घेणे. ते तर्कसंगत आहे की तर्कविरोधी? त्याला स्वाभाविकपणे समजले जाऊ शकते का की ते पूर्णतः अस्वाभाविक आहे? समजून घेण्याची तिसरी प्रमाण पद्धत ही असते की स्पष्ट बोधाच्या मदतीने गोष्टी समजवून घेणे. जेव्हा आपण ध्यानधारणा करतो, तेव्हा आपल्याला येणारा अनुभव त्या गोष्टीचे समर्थन करणारा असतो की खंडन करणारा?

आता आपण उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊ की हे तत्त्व कसे लागू करायचे. समजा आपल्याला शिकवण दिली गेली आहे की एखादे विरोधी तत्त्व लागू करून एखाद्या कमतरतेवर कशी मात करायची, उदाहरणार्थ, ‘प्रेमाने क्रोधावर विजय मिळवणे शक्य आहे.’ सर्वप्रथम आपण हा विचार करतो की हे बुद्धांच्या उपदेशाला अनुरूप आहे का? तर होय, हे बुद्धांनी शिकवलेल्या कोणत्याही शिकवणीच्या विरोधी नाही. 

हे तर्कसंगत आहे का? हो. प्रेम म्हणजे इतरांनी सुखी व्हावे ही इच्छा आहे. मला नुकसान पोहचवू पाहणारी व्यक्ती, ज्याच्या विषयी माझ्या मनात क्रोधाची भावना आहे, तो तसे का वागतो? तो किंवा ती तसे वागण्याचे कारण म्हणजे तो दुःखी आहे, ती व्यक्ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या हताश आहे. जर त्या व्यक्तीप्रति माझ्या मनात प्रेम असेल, तर मी इच्छा बाळगेन की तो किंवा ती आनंदी असावी. माझी इच्छा असेल की ती व्यक्ती हताश आणि त्रासदायक असू नये. अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्याला इतरांवर क्रोधित होण्यापासून रोखतो, हो ना? हे अगदी तर्कसंगत आहे. जर ती व्यक्ती फार नुकसान पोहचवत असेल, आणि माझी इच्छा असेल की त्याने तसे वागणे बंद करावे, तर मला त्याच्याप्रतिचा प्रेमभाव अधिक व्यापक करायला हवा. मी इच्छा बाळगायला हवी की ती व्यक्ती आनंदी राहावी, कारण तो किंवा ती आनंदी नसेल तर ती नुकसान पोहचवणार नाही. त्या व्यक्तीवर क्रोधित होण्याने ती व्यक्ती नुकसानकारक वागणे थांबवणार नाही. ही शिकवण तर्कसंगत आहे.

शेवटी आपण त्याचा शोध स्पष्ट बोधाच्या माध्यमातून किंवा ध्यानधारणेच्या माध्यमातून घेतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते खरोखरच परिणामकारक आहे की नाही, ते आपण तपासून पाहतो. जर मी प्रेमविषयक ध्यानधारणा करत असेन तर त्याने माझा राग कमी होतो का? हो, निश्चितच. ही तिसरी परीक्षा असते, ज्यातून ध्यानात येते की ती शिकवण तर्कसंगत आहे की नाही. अशा प्रकारे आपण तर्कावर आधारित सिद्धतेचे तत्त्व लागू करतो. 

गोष्टींचे स्वरूप अथवा नैसर्गिक प्रकृतीविषयक तत्त्व 

अंतिम तत्त्व हे गोष्टींचे स्वरूप किंवा त्यांच्या नैसर्गिक प्रकृतीविषयीचे आहे. हे तत्त्व सांगते की काही तथ्ये ही गोष्टींच्या मूळ स्वरूपाचा किंवा त्यांच्या नैसर्गिक प्रकृतीचा भाग असतात, जसे आगीचा उष्णतेचा गुणधर्म आणि पाण्याचा ओलसरपणाचा गुणधर्म. तर आग उष्ण का असते आणि पाणी ओलसर का असते? तर त्या तत्त्वांची नैसर्गिक प्रकृतीच तशी आहे. धर्माभ्यासात आपल्याला याचा शोध घ्यायचा असतो की कोणत्या गोष्टी निव्वळ त्यांच्या नैसर्गिक प्रकृतीमुळे यथार्थ असतात, जसे प्रत्येक जीव सुखाची अपेक्षा करतो आणि कुणीच दुःखाची अपेक्षा बाळगत नाही, का? तर ते तसेच असते. आणखी एक उदाहरण पाहू. सकारात्मक वर्तनातून सुखप्राप्ती होते, तर विनाशकारी वर्तनातून दुःख उत्पन्न होते, का? कारण तो सृष्टीचा नियम आहे. असे नाही की बुद्धांनी ते तसे निर्माण केले आहे, ते तसेच आहे. जर आपण शोध घेतल्याने आपल्याला हे ज्ञान प्राप्त झाले की काही गोष्टी जशा आहेत, ती त्यांची प्रकृती आहे, तर आपण त्या तथ्यांचा जीवनातल्या अटळ सत्यांप्रमाणे स्वीकार करायला हवा. आपण त्या गोष्टींबद्दल त्रास करून घेत राहिलो, तर तो निव्वळ वेळेचा अपव्यय ठरेल.       

धर्माभ्यासाच्या दृष्टीने गोष्टींच्या प्राकृत रूपांबाबतचे समर्पक तथ्य म्हणजे संसाराचे चक्र वर-खाली होत राहते. याचा संबंध केवळ सुदैवी किंवा दुर्दैव पुनर्जन्मांशी संबंधित नाही, तर हे दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षणाला लागू होते. आपली मनोवस्था आणि आपल्या आवडीनिवडींमध्ये चढउतार होत असतो. जर आपण गोष्टी अशाच असणार आहेत, हे स्वीकारले तर आपण त्याबाबत निराश होणार नाही. संसाराकडून तुमची काय अपेक्षा असते? अर्थात, एखादा दिवस ध्यानधारणा छान पार पडेल, तर काही दिवस होणार नाही. काही दिवस मला ध्यानधारणा करावी वाटेल, काही वेळा वाटणार नाही. असे होणे स्वाभाविक आहे. गोष्टी अशाच पद्धतीने घडत असतात. ते तिथेच सोडून द्या आणि निराश होऊ नका. ही गोष्ट समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. 

जर आपण धर्माप्रति व्यावहारिक दृष्टिकोन ठेवू इच्छितो, तर त्यासाठी बुद्धांनी शिकवलेल्या चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपले त्याबाबतचे आकलन पडताळण्यासाठी आणि त्या शिकवणींना कसे लागू करायचे यासाठी, आपल्या देहाबाबतच्या अनासक्तीचे उदाहरण घेऊ 

  1. या अनासक्तीचा विकास कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? तर तो नश्वरता, पुनर्जन्म, स्वतःचे अस्तित्व, देह, मन व ‘स्व’चा अंतर्संबंध याबाबतच्या जाणिवेवर अवलंबून आहे. 
  2. देहाबाबतची अनासक्ती विकसित करण्यातील उपयोगिता काय आहे? ती आपण आजारी पडल्यावर, म्हातारे होत जात असताना येणारी निराश किंवा क्रोध टाळण्यासाठी साहाय्यकाचे कार्य करते. 
  3. ही गोष्ट तर्कसिद्ध आहे का? हो, बुद्धांची शिकवण आहे की देहाची अनासक्ती त्यासंबंधीच्या दुःखाच्या कारणांना नष्ट करते, जसे स्वतःला चिरंतन समजणे. हे तर्कसंगत आहे ना? हो, अर्थातच. कारण देह क्षणागणिक बदलत असतो, म्हातारा होत जात असतो. तर आपण अनासक्तीची उपयोगिता अनुभवू शकतो ना? हो, आपण अनासक्ती विकसित केली की आपला दुःखाचा अनुभव कमी होत जातो. 
  4. गोष्टींच्या नैसर्गिक प्रृकतीचे काय? जर मी माझ्या देहाच्या अनासक्तीसाठी ध्यानधारणा केली तर माझा आनंद दिवसेंदिवस वाढत जातो का? नाही, तसे होत नाही. हा संसाराचा नियम आहे, त्यात चढउतार असणारच. पण कालांतराने दीर्घकालीन दृष्टिकोनातून मी आनंदी होऊ शकतो आणि माझे जीवन अधिक चांगले होऊ शकते. पण ही प्रगती एकरेषीय असणार नाही. गोष्टींची नैसर्गिक प्रकृतीच तशी नाही, त्यात चढउतार असणारच. 

सारांश

इथे आपण पाहू शकतो की देहाबाबत अनासक्ती विकसित करण्यासारख्या शिकवणीतील यथार्थता पडताळण्यासाठी चार स्वयंसिद्ध तत्त्वे अमलात आणली तर आपण त्या शिकवणीबाबत व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करू शकतो. म्हणूनच जेव्हा बुद्ध सांगतात की, ‘माझी शिकवण केवळ माझ्यावरील श्रद्धेमुळे किंवा आदरामुळे स्वीकारू नका, तर सोने खरेदी करताना जशी पारख केली जाते, तशी त्याची स्वतः पारख करा.’ तेव्हा त्याचा अर्थ असतो की चार स्वयंसिद्ध तत्त्वांच्या कसोटीवर ती शिकवण पडताळून पाहावी.

Top