बौद्ध धर्माची आजची जागतिक स्थिती

दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवादी बौद्ध धर्म

भारत

७व्या शतकात बौद्ध धर्माचा भारतातील प्रभाव कमी होऊ लागला, आणि १२व्या शतकात पाल साम्राजाच्या अस्तानंतर सुदूर उत्तर हिमालयीन भाग वगळता बौद्ध धर्म जवळपास संपून गेला. १९व्या शतकाच्या अखेरीस जेव्हा श्रीलंकेतील बौद्ध नेते अंगरिका धर्मपाल यांनी ब्रिटिश विद्वानांच्या मदतीने महाबोधी समाजाची स्थापना केली, तेव्हा भारतात बौद्ध धर्माला पुनरुज्जीवन मिळालं. भारतातील बौद्ध स्थळांचं पुनरुज्जीवन करण्याचे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते आणि ते सर्व बौद्ध स्थळांवर मंदिर उभारणीत यशस्वी झाले, त्या सर्व ठिकाणांवर बौद्ध साधूही होते. 

१९५०मध्ये आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी नव-बौद्ध आंदोलन सुरू केले. तेव्हा जातीविषयक कलंक दूर करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. अखेरच्या दशकातही शहरी मध्यमवर्गीय गटाचा बौद्ध धर्मात रस वाढलेला पाहायला मिळाला. सध्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी २% लोकसंख्या बौद्ध आहे. 

श्रीलंका

ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात भारतीय सम्राट अशोक याचा मुलगा महेंद्र याने श्रीलंकेत बौद्ध धर्माची स्थापना केल्यापासून श्रीलंका बौद्ध शिकवणींचे केंद्रस्थान ठरला आहे. श्रीलंकेला बौद्ध धर्माचा सातत्यापूर्ण प्रदीर्घ इतिहास आहे. इथे युद्धांदरम्यान प्रदीर्घ काळ बौद्ध धर्माची अधोगतीही पाहायला मिळाली आणि १६व्या शतकानंतर या बेटावर  वसाहतवाद्यांनी वर्चस्व मिळवले व युरोपीयन मिशनरींनी इथे ख्रिश्चन धर्मांतर सुरू केले. 

१९व्या शतकात ब्रिटिश विद्वान आणि ब्रह्मविद्यावादी तत्त्वज्ञांच्या साहाय्याने श्रीलंकेत बौद्ध धर्माला प्रबळ पुनरुज्जीवन मिळाले. त्यामुळेच काही वेळा श्रीलंकन बौद्ध धर्माला ‘प्रोटेस्टंट बुद्धिजम’ म्हणून संबोधले जाते, ज्यात भिक्षुंद्वारा अध्यापन, गृहस्थाश्रमातील जनतेसाठी प्रार्थना सभा अशा उपक्रमांवर भर दिला जातो. १९४८ साली श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून इथे बौद्ध धर्म आणि संस्कृतीचे सक्षम पुनरुज्जीवन पाहायला मिळते आहे. 

आज श्रीलंकेत ७० टक्के बौद्ध आहे, ज्यात बहुतांश थेरवाद परंपरेचे अनुयायी आहेत. ३० वर्षांच्या नागरी युद्धानंतर श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या राष्ट्रीयत्वाची संकल्पना जोर धरू लागली आहे. आणि बोडू बल सेना (बौद्ध बल सेना) सारख्या संघटना मुस्लिमविरोधी दंगे आणि सौम्य स्वभावाच्या बौद्ध नेत्यांवरील हल्ल्यांमध्येही सामील असतात. 

म्यानमार (बर्मा)

बर्माला २००० वर्षांहून अधिक काळ बौद्ध धर्माचा इतिहास असल्याचे ऐतिहासिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. सध्याही बर्माची ८५ टक्केहून अधिक जनता बौद्ध आहे. दीक्षाप्राप्त साधकांची ध्यानसाधना आणि संतुलित अध्ययनावर भर असलेली एक मोठी परंपरा इथे पाहायला मिळते आणि  इथल्या गृहस्थ जीवनातही धर्माप्रती आस्था आढळून येते. विपश्यना ध्यानसाधनेचं तंत्र शिकवणारे एस.एन.गोएंका हे लोकप्रिय बौद्ध बर्मी नागरिक आहेत. 

१९४८ साली बर्मा ग्रेट ब्रिटनपासून मुक्त झाला तेव्हापासून इथल्या नागरी आणि लष्करी सरकारांनी थेरवादी बौद्ध धर्माचा उत्तेजन दिले आहे. सैन्य किंवा लष्करी शासनादरम्यान बौद्ध धर्म आचरणावर सख्त नियंत्रण ठेवले जात होते आणि सरकारला विरोध करणाऱ्या भिक्खुंना आश्रय देणाऱ्या मठांना उध्वस्त केले जात होते. अनेकदा बौद्ध भिक्खुंनी लष्करी सरकारविरोधात आंदोलने केली आहेत, ज्याची झलक ८८८८ आंदोलन आणि २००७मधील सॅफ्राॅन आंदोलनात पाहायला मिळाली होती.  

मागील दशकभरात येथे विविध राष्ट्रीय गट उदयाला आले आहेत, जे इस्लामला विरोध करून बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी सक्रिय झाले आहेत. ९६९ गटाचे भिक्खु नेते असहिन विराथू, स्वतःला ‘बर्माचा बिन लादेन’ म्हणवतात, त्यांनी ‘बौद्ध धर्माच्या सुरक्षे’च्या ढोंगाखाली  इथल्या मुस्लिम दुकानांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबवली आहे.  मुस्लिम आणि  मशिदींवरील हल्ले इथे सामान्य बाब झाली आहे.  आणि प्रत्युत्तरादाखल मुस्लिमांकडून होणारे हल्ले आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. 

बांगलादेश

११व्या शतकापर्यंत बांगलादेशात बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म होता. पण सध्या बांगलादेशातील केवळ १% लोकसंख्या बौद्ध आहे. आणि ती बर्माजवळील चित्तगाॅंग पर्वतीय क्षेत्रात केंद्रित आहे. 

राजधानी ढाकामध्ये चार बौद्ध मंदिरे आहेत. तर पूर्वीय खेड्यांमध्येही अनेक मंदिरे आहेत. पण हा भाग बर्मापासून तुटलेला असल्याने बौद्ध साधनेच्या अद्ययावत पद्धती इथे पाहायला मिळत नाहीत. 

थायलंड

दक्षिणपूर्व आशियातील साम्राज्यांना इसवीसन ५व्या शतकापासून बौद्ध धर्माची ओळख आहे. इथल्या स्थानिक लोकांमध्ये स्थानिक धर्म परंपरा आणि हिंदु धर्मासोबतच बौद्ध धर्मातील महायान परंपरेतील थेरवादाचा मोठा प्रभाव आहे. श्रीलंका आणि बर्माप्रमाणे इथे महिलांसाठी दीक्षासमारंभाची परंपरा नाही. जवळपास ९५% जनता बौद्ध आहे. 

थायलंडमधील मठीय परंपरा तिथल्या राजतंत्राच्या ढाच्यात उतरवली गेली आहे. आणि म्हणूनच तिथे सर्वोच्च कुलपती आणि एक ज्येष्ठांचे सभामंडलही असते, ज्यांच्यावर परंपरेचे पावित्र्य कायम राखण्याची जबाबदारी असते. इथे मठांमध्ये राहणारे समुदाय वनांमध्ये आणि गावांमध्येही राहतात. गृहस्थाश्रमातील लोकांकडून त्यांना उचित मानसन्मान देऊन त्यांचे पालन-पोषण केले जाते. 

वन परंपरेतील भिक्खु जंगलात एकाकी जीवन व्यतीत करतात आणि मठीय परंपरेचे काटेकोर पालन करून गहन साधना करतात. तर गावात राहणारे भिक्खु धर्मग्रंथांचे पठन करून स्थानिकांसाठी प्रार्थनासभांचे आयोजन करतात. थाई संस्कृतीतील लोकांचा प्रेतात्म्यावर विश्वास असल्याने स्थानिक धर्मबांधवांना ते ताईत आणि गंडेदोरेही देतात. इथे भिक्खुंसाठी बौद्ध विश्वविद्यापीठ आहे, तिथे प्रामुख्याने अभिजात पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांचे आधुनिक थाई भाषेत भाषांतर करण्यासाठी मठवासियांना प्रशिक्षित केले जाते.  

लाओस

बौद्ध धर्म सर्वप्रथम इसवी सन ७व्या शतकात लाओसला पोहचला आणि सध्या तिथली ९० टक्के जनता जीववाद मिश्रित बौद्ध धर्माची अनुयायी आहे. कम्युनिस्टांच्या राजवटीत तिथल्या अधिकारी वर्गाने प्रथम उघडपणे धर्माविरोधात दडपशाही केली नाही, तर उलट राजकीय हेतू साध्य करण्यासाठी  बौद्ध संघाचा वापर केला. पण नंतरच्या काळात इथे बौद्ध धर्माविरोधात गंभीर दडपशाहीचे धोरण अवलंबण्यात आले. १९९० नंतर इथे बौद्ध धर्माचे पुनरुत्थान झाले आहे. बहुतांश लाओसवासींचा धर्मावर प्रगाढ विश्वास आहे. त्यांच्यातील बहुतांश पुरुष जीवनातील किमान काही काळ मठात घालवतात. बहुतांश कुटुंब भिक्खुंना अन्नदान करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी मंदिरांना भेटी देतात. 

कम्बोडिया

१३व्या शतकापासून थेरवादी बौद्ध धर्म कम्बोडियाचा राष्ट्रीय धर्म आहे आणि इथली ९५% लोकसंख्या बौद्ध आहे. १९७०च्या दरम्यान खमेर रूजने इथून बौद्ध धर्म संपवण्याच्या प्रयत्न केला होता आणि त्यात तो काही अंशी यशस्वीही झाला होता.  १९७९ पर्यंत बहुतांश भिक्खुंच्या हत्या करण्यात आल्या होत्या किंवा त्यांना निर्वासित करण्यात आले होते आणि प्रत्येक मंदिर आणि ग्रंथालय उध्वस्त करण्यात आले होते.  

राजकुमार सिंहानुकना पुन्हा सम्राटपदी पुनर्स्थापित केल्यानंतर हळूहळू बौद्ध धर्मावरील निर्बंध उठवले जाऊ लागले आणि बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानातील रूची वाढू लागली. कम्बोडियन नागरिक मोठ्या प्रमाणात भविष्यवाणी, ज्योतिषशास्त्रात विश्वास ठेवत असल्याने इथे भिक्खु अनेकदा आरोग्यसाधक म्हणून काम करतात. बौद्ध भिक्खु विविध प्रकारचे धार्मिक समारंभ, नामकरण विधी, लग्नसमारंभ आणि अंत्यविधींमध्ये सहभागी होतात. 

व्हिएतनाम

बौद्ध धर्म २००० वर्षांपूर्वी प्रथम भारतातून आणि कालांतराने चीनमधून व्हिएतनामला पोहोचला. पण १५व्या शतकात सत्ताधारी वर्गांचा लोभ कमी झाल्याने धर्मप्रसाराला घरघर लागली. २०व्या शतकाच्या सुरुवातीला इथे बौद्ध धर्माचे पुन्हा पुनरुत्थान सुरू झाले, पण गणतंत्रवादी काळात ख्रिश्चन समर्थनीय धोरणांमुळे बौद्ध नाराज झाले. सध्या इथे फक्त १६% लोकसंख्या बौद्ध आहे, पण तरीही इथे बौद्ध धर्म सर्वात मोठा धर्म आहे.  

इथले सरकार आता बौद्ध धर्माबाबत नरमाईचे धोरण बाळगले असले तरी बौद्ध मंदिरांना स्वतंत्रपणे कारभार करता येत नाही. 

इंडोनेशिया आणि मलेशिया

इसवी सन दुसऱ्या शतकाच्या सुमारास या परिसरात बौद्ध धर्माचा प्रसार झाला, भारताच्या व्यापारी मार्गाने इथे बौद्ध धर्माचा प्रवेश झाला. संपूर्ण ऐतिहासिक आढावा घेतल्यास लक्षात येते की इथे १५व्या शतकापर्यंत शेवटचे हिंदू-बौद्ध साम्राज्य असणाऱ्या मजापाहित साम्राज्याचा अस्त होईपर्यंत हिंदू धर्मासोबतच बौद्ध धर्माचेही अनुसरण आढळून येत होते. पण १७व्या शतकाच्या सुरुवातीस इस्लामने या सर्व धर्मांचे स्थान पटकावले.   

इंडोनेशियन सरकारच्या पंचशीला  धोरणानुसार इथल्या अधिकृत धर्मामध्ये देवाचे अस्तित्व मान्य करणे बंधनकारक आहे. बौद्ध धर्मात देवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा अंतर्भाव नाही, पण भारतात हजारो वर्षांपूर्वी रूळलेल्या कालचक्र तंत्रानुसार बौद्ध धर्मात आदिबुद्ध किंवा ‘प्रथम बुद्ध’ संकल्पनेचा अंतर्भाव असल्याने इथे बौद्ध धर्माला मान्यता आहे. आदिबुद्ध हा काळ किंवा इतर सीमांच्या मर्यादा नसलेला सर्व जीवमात्रांचा निर्माणकर्ता असला आणि त्याला एका विशिष्ट प्रतिमेत सादर केलेले असले तरी तो स्वतंत्र जीव नाही. आदिबुद्ध मनाच्या शीतल प्रकाशाच्या रूपात प्रत्येक जीवमात्रात अस्तित्वात आहे. या आधारे, इंडोनेशियात इस्लाम, हिंदू धर्म, कन्फुशिवाद, ख्रिश्चन आणि प्रोटेस्टंट धर्माच्या सोबतच बौद्ध धर्माला मान्यता देण्यात आली आहे. 

श्रीलंकन भिक्खु मर्यादित स्वरूपात बाली आणि इंडोनेशियाच्या इतर भागात थेरवादी बौद्ध धर्माचे पुनरुत्थान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इथे बौद्ध धर्मात रूची दाखवणाऱ्यांमध्ये हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि स्थानिक आध्यात्मिक परंपरांचे मिश्रण असणाऱ्या परंपरागत बाली विचारधारेच्या लोकांचा समावेश आहे. इंडोनेशियाच्या इतर भागात, जी ५% बौद्ध लोकसंख्या आहे, ते मुख्यतः चीनी समुदाय आहेत. या शिवाय तिथे काही छोटे इंडोनेशियन बौद्ध गट आहेत, जे चिनी आणि तिबेटी थेरवादाचे संमिश्र रूप आहे. 

२० टक्के मलेशियन लोकसंख्या बौद्ध धर्म मानते. ज्यात मुख्यतः विदेशातील चिनी समुदाय आहेत. साधारण अर्ध्या शतकापूर्वी इथली बौद्ध धर्मातील रूची कमी होत गेली. आणि १९६१ साली इथे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बौद्ध मिशनरी सोसायटी स्थापन करण्यात आली.  मागील दशकात इथे बौद्ध साधकांची संख्या वेगाने वाढताना पाहायला मिळाली आणि यात तरुणांचे प्रमाणही उल्लेखनीय आहे. इथे आता अनेक थेरवाद, महायान आणि वज्रयान केंद्र आहेत, ज्यांना चांगला निधी आणि पाठबळ मिळत आहेत.   

पूर्व आशियाई महायान बौद्ध धर्म

चिनी जनतेचे प्रजासत्ताक

चीनच्या मागील २००० वर्षांपासूनच्या इतिहासात बौद्ध धर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि चीनमधील बौद्ध धर्माने पूर्व आशियातील बौद्ध धर्माच्या प्रसारातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रारंभीच्या तांग राजवंशाच्या काळात (६१८-९०७) बौद्ध धर्माने सुवर्ण युग अनुभवले, जेव्हा कला आणि साहित्य क्षेत्रानेही बहर अनुभवला. 

१९६० आणि ७०च्या दशकातील सांस्कृतिक क्रांती दरम्यान बहुतांशी चिनी बौद्ध मठ उध्वस्त करण्यात आले आणि बहुतांशी प्रशिक्षित बौद्ध भिक्खु आणि भिक्षुणींच्या हत्या करण्यात आल्या किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. बौद्ध धर्मावरील दडपशाही तिबेट आणि अंतर्गत मंगोलियात तर आणखी भीषण होती.  जसजसे चिनी सुधारणांमध्ये खुलेपण येत गेले, तसे पारंपारिक धर्म पुन्हा प्रस्थापित होऊ लागले. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि नव्या मंदिराच्या निर्माणाला चालना मिळाली. मठात येणारे बहुतांश लोक खेडूत गरीब आणि अशिक्षित होते, ज्यांचा शैक्षणिक स्तर फार चांगला नव्हता. अनेक मंदिरे निव्वळ पर्यटन स्थळ म्हणून अस्तित्वात आहेत, जिथे मठवासी केवळ तिकीट संकलक आणि मंदिराच्या सेवेकराच्या भूमिकेत काम करत आहेत. 

आज मोठ्या संख्येने चिनी लोक बौद्ध धर्मात रूची बाळगत आहेत, तिबेटी बौद्ध धर्माबाबतची आस्थाही लक्षणीय रीत्या वाढत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार इथे बौद्ध धर्माची लोकसंख्या २०% आहे आणि चीनमध्ये जितका वेळ मंदिर खुले असते तितका वेळ भाविकांची गर्दी कायम असते. जसजसे लोक अधिकाधिक श्रीमंत आणि व्यग्र होत आहेत, ते तणाव दूर करण्यासाठी मार्ग म्हणून चिनी आणि तिबेटी बौद्ध धर्माकडे पाहत आहेत. अनेक हान चिनी लोक तिबेटी बौद्ध धर्मात रूची दाखवत आहेत, याचं विशेष कारण म्हणजे अनेक तिबेटी लामा चिनी भाषेमध्ये धार्मिक शिकवण देत आहेत. 

तैवान, हाँगकाँग आणि विदेशी चिनी क्षेत्र 

मूळ चिनी असलेल्या पूर्व आशियाई महायान बौद्ध परंपरेचा तैवान आणि हाँगकाँगमध्ये प्रबळ प्रभाव आहे. तैवानमध्ये भिक्खु आणि भिक्षुणींचा मोठा मठीय समुदाय आहे, ज्याना गृहस्थाश्रमातील लोकांकडून औदार्यपूर्ण समर्थन मिळते. इथे सामाजिक कल्याणासाठी बौद्ध विद्यापीठांची स्थापना करण्यात आली असून अनेक बौद्ध उपक्रमही राबविले जातात. हाँगकाँगमध्येही मठीय परंपरा बहरास येत आहे. मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड आणि फिलिपाईन्समध्ये वास्तव्यास असलेल्या चिनी बौद्ध समुदायाचा पूर्वजांच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या जीवनातील सुखसमृद्धीसाठीही खास प्रार्थनासभांच्या आयोजनावर भर असतो. अशी अनेक माध्यमं आहेत, ज्या द्वारे समाधिस्त अवस्थेतील सिद्धीप्राप्त साधक गृहस्थाश्रमातील लोकांशी संवाद साधतात आणि लोक त्यांना आरोग्यविषयक आणि मानसिक समस्यांबाबत सल्ला विचारतात. ‘आशियाई टायगर्स’ अर्थव्यवस्थेची सूत्रे चालविणारे चिनी उद्योजक त्यांच्या आर्थिक यशासाठी अशा प्रार्थना करणाऱ्या भिक्खु साधकांना मोठ्या प्रमाणात देणग्या देतात. तैवान, हाँगकाँग, सिंगापूर आणि मलेशियात या देशातही तिबेटी बौद्धांची संख्या वाढते आहे. 

 दक्षिण कोरिया

बौद्ध धर्म इसवी सन ३ऱ्या शतकात चीनद्वारे कोरियन द्वीपकल्पावर पोहचला. मूलतत्त्ववादी ख्रिश्चन समुदायाकडून हल्ले वाढत असतानाही बौद्ध धर्माने दक्षिण कोरियात अजूनही आपली मूळे सशक्तपणे  रोवली आहेत. मागील दशकात अशा गटांकडून अनेक बौद्ध मंदिरांना उध्वस्त करण्यात आले आहे किंवा मंदिरांना आग लावून त्यांना नुकसान पोहचवण्यात आले आहे. २३% टक्के लोकसंख्या  बौद्ध आहे. 

जपान

बौद्ध धर्म ५व्या शतकात कोरियाहून जपानमध्ये पोहचला आणि जपानी समाज आणि संस्कृतीमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. १३व्या शतकापासून इथे विवाहित बौद्ध भिक्खुंची परंपरा आहे, ज्यांच्यावर मद्यपानाचेही निर्बंध नाहीत. या बौद्ध भिक्खुंनी हळूहळू ब्रह्मचर्य पाळलेल्या भिक्खुंची जागा घेतली आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून काही बौद्ध परंपरा अति-राष्ट्रवादी आहेत, ज्या जपानला बौद्ध परंपरेचा स्वर्ग समजतात. आधुनिक काळात काही प्रलयंकारी विचारधारेवर विश्वास ठेवणारे पंथही स्वतःला बौद्ध म्हणवून घेतात, अर्थात त्यांना शाक्यमुनि बुद्धांच्या शिकवणीशी काही घेणेदेणे नाही.   

जवळपास ४०% लोकसंख्या स्वतःला बौद्ध समजते आणि बहुतांश जपानी लोक शिंतो या मूळ जपानी धर्मासोबत बौद्ध धर्मातील धारणांची सरमिसळ करतात. जन्म आणि मृत्युचे संस्कार शिंतो धर्मानुसार केले जातात, जिथे बौद्ध गुरू अंत्यविधीचे संस्कार पूर्ण करतात. 

जपानमधील काही मंदिरे अति व्यावसायिक असली तरी इथली सुंदर मंदिरे भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात येतात. अधिकांश भागात वास्तविक अभ्यास आणि साधना फार कमकुवत आहे. सोका, गकाई ही जगातील सर्वात मोठी बौद्ध संस्था जपानमध्ये उदयाला आली आहे.   

मध्य आशियाई महायान बौद्ध धर्म

तिबेट

इसवीसन ७व्या शतकात बौद्ध धर्माचं तिबेटमध्ये आगमन झालं. नंतरच्या शतकात मिळालेला राजाश्रय आणि अभिजात वर्गाकडून मिळालेल्या समर्थनामुळे तिबेटी जीवनातील विविध घटकात बौद्ध धर्मात प्रस्थापित झाला. 

चिनी जनतेच्या प्रजासत्ताकाकडून तिबेटवर कब्जा मिळवल्यानंतर तिबेटमध्ये बौद्ध धर्माचं मोठ्या प्रमाणात दमन झालं. तिथल्या ६५०० भिक्खु आणि भिक्षुणींच्या मठांपैकी फक्त १५० मठ सोडून बाकी सर्व मठ उध्वस्त करण्यात आले. बहुतांश मठीय विद्वानांची हत्या करण्यात आली किंवा त्यांचा छळछावण्यांमध्ये मृत्यू झाला. सांस्कृतिक क्रांतीनंतर पूर्वाश्रमीच्या भिक्खुंद्वारा, स्थानिक जनतेद्वारा आणि तिबेटी स्थलांतरितांच्या मदतीने बौद्ध मठांचे पुनरुत्थान करण्यात आले, यात सरकारने केवळ दोन किंवा तीन मठांच्या पुनर्बांधणीसाठी साहाय्य केले. 

चीनमधील कम्युनिस्ट सरकार अनिश्वरवादी आहे, पण इथे पाच ‘मान्यताप्राप्त धर्मां’ना अनुमती देण्यात आली आहे. चिनी सरकार भलेही बौद्ध धर्माशी संबंधित विषयांमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचा दावा करत असले तरी दलाई लामांतर्फे जेव्हा एका तिबेटी मुलाला पांचेन लामा यांचा पुनर्अवतार घोषित करण्यात आले, त्यानंतर लगेचच तो आणि त्याचे कुटुंबीय गायब झाले. थोड्याच काळात चिनी सरकारने आपला स्वतःचा शोध सुरू केला आणि एका अर्ध्या चिनी व अर्ध्या तिबेटी मुलाला पांचेन लामा घोषित करण्यात आले. दलाई लामा यांनी शोधलेल्या मुलाला त्यानंतर कधीच पाहिले गेले नाही.  

हल्ली प्रत्येक भिक्खु आणि भिक्षुणींचे मठ आणि मंदिरांकडे स्वतःचा सरकारी कार्यगट असतो. हे सर्व साध्या वेषातले पोलीस असतात, जे विशिष्ट कामांमध्ये साहाय्य करतात. याचा अर्थ ते मठाच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात आणि त्याबाबत सरकारला सूचना देत असतात. काहीवेळा तर या कार्यगटातील सदस्य संख्या मठाच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक असते. सरकारी हस्तक्षेपासोबतच तिबेटमधील बौद्ध धर्मियांना आणखी एका समस्येचा सामना करावा लागतो, ते म्हणजे प्रशिक्षित शिक्षकांचा अभावय होय. इथले भिक्खु, भिक्षुणी आणि धर्मबांधव शिक्षणासाठी उत्सुक असतात, पण इथल्या बहुतांश गुरूंकडेच मर्यादित ज्ञान असते. मागील दशकात सरकारने ल्हासा शेजारी बौद्ध विश्वविद्यालय स्थापन केले आहे. जे तरुण तुल्कूंसाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून काम पाहते, जिथे तिबेटी भाषा, हस्तलिपी, वैद्यक, अॅक्युपंक्चर आणि बौद्ध तत्त्वज्ञानाविषयी प्रशिक्षण दिले जाते. डिजिटल युगाने तिबेटमधील सामान्य माणसांना बौद्ध धर्माच्या जवळ आणले आहे. अनेक जण ‘वीचॅट’ आणि ‘वीइबो’ ग्रुप्सचे सदस्य झाले आहेत, ज्यात बौद्ध शिकवण आणि बौद्ध धर्माबाबतच्या गोष्टींविषयीचे आदानप्रदान होते. बौद्ध धर्माविषयी अधिक ज्ञान प्राप्त करणे इथे आपली ‘खरा तिबेटी’ ही ओळख सक्षम करण्याचे प्रतिक मानले जात आहे. 

पूर्व तुर्कस्तान

पूर्व तुर्कस्तानात (झिनजियांग) राहणाऱ्या काल्मिक मंगोलांचे बहुतांशी मठ सांस्कृतिक क्रांतीदरम्यान उध्वस्त करण्यात आले. त्यातील अनेक मठांचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे, पण इथेही तिबेटपेक्षाही अधिक शिक्षकांची कमतरता आहे. तरुण भिक्खु शैक्षणिक साधन सुविधांच्या अभावामुळे नाउमेद होत आहेत आणि त्यातील अनेक जण आपले शिक्षणही अर्धवट सोडत आहेत.  

अंतर्गत मंगोलिया

चिनी जनतेच्या प्रजासत्ताकाच्या नियंत्रणाखालील अंतर्गत मंगोलियात तिबेटी बौद्धांची स्थिती अधिकच वाईट होती. सांस्कृतिक क्रांती दरम्यान पश्चिमेतील बहुतांश मठ उध्वस्त करण्यात आले होते. तर पूर्व भाग , जो आधी मंचुरियाचा हिस्सा होते, येथील मठ स्टॅलिनच्या सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस उध्वस्त केले होते, जेव्हा रशियाचे सैनिक उत्तर चीनला जपानच्या आधिपत्यातून मुक्त करण्यासाठी आले होते. येथील ७०० मठांपैकी फक्त २७ शिल्लक आहेत. 

१९८० पासून इथे मंदिरांची पुनर्स्थापना आणि मठांची पुनर्बांधणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे, या मठांमध्ये मंगोलियन नागरिकांसोबतच हान चिनी लोकही प्रार्थनेसाठी उपस्थिती लावतात. 

मंगोलिया 

मंगोलियात हजारो मठ होते, जे १९३७ साली स्टॅलिनच्या आदेशांवरून अंशतः किंवा पूर्णतः उध्वस्त करण्यात आले. १९४६ साली उलान बातर येथील एक मठ प्रतिकात्मक स्वरूपात खुला करण्यात आला. आणि १९७० साली भिक्खुंसाठी पंचवार्षिक अभ्यासक्रम असणारे महाविद्यालय सुरू करण्यात आले. यातील अभ्यासक्रम फारच संक्षिप्त होता आणि त्यातही मार्क्सवादी अभ्यासावर अधिक भर देण्यात आला होता. आणि भिक्खुंना मर्यादित स्वरूपात लोकांसाठी प्रार्थना सभा आयोजनाची संमती देण्यात आली. १९९० साली कम्युनिझमच्या अस्तानंतर इथे स्थलांतरित तिबेटींच्या साहाय्याने बौद्ध धर्माचे सशक्य पुनरुज्जीवन झाले. अनेक नवे भिक्खु प्रशिक्षणासाठी भारतात पाठवण्यात आले. शिवाय २००हून अधिक मठांची सामान्य रीत्या पुनर्बांधणी झाली. 

१९९० सालानंतर मंगोलियात बौद्ध धर्मापुढे माॅरमाॅन आणि बाप्तिस्त ख्रिश्चन मिशनरींच्या आक्रमक प्रवेशाची सर्वात मोठी समस्या होती, जे इंग्रजी शिकवण्याचे ढोंग करून मंगोलियात घुसत होते. ते धर्मांतरासाठी लोकांना पैसा आणि अमेरिकेत शिक्षणाचे आमिष दाखवत होते आणि सुंदर छपाई असलेल्या स्थानिक मंगोलियन भाषेतील ईसाई संदेशांच्या पत्रकांचे वाटप करीत असत. अधिकाधिक तरुण मुले ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित होऊ लागताच, बौद्ध संघटनांनी बौद्ध धर्माबाबतची माहिती स्थानिक बोलाचालीच्या मंगोलियन भाषेत आणि छापिल माध्यमासोबत टीव्ही आणि रेडिओवरूनही वितरित करण्यास सुरुवात केली.  

सध्या मंगोलियात आक्रमक धर्मांतरावर बंदी आहे. २०१० साली येथील ५३% टक्के लोकसंख्या बौद्ध होती, तर २.१% लोकसंख्या ख्रिश्चन होती. 

निर्वासित तिबेटींची स्थिती

मध्य आशियाच्या तिबेटी परंपरांमध्ये सर्वात सक्षम परंपरा १९५९ साली चिनी लष्कराने तिबेटचा ताबा घ्यायला सुरुवात केल्यापासून भारतात निर्वासित जीवन जगत असलेल्या परमपूज्य दलाई लामांसोबतच्या समुदायात पाहायला मिळते. त्यांनी तिबेटमधील सर्व प्रमुख भिक्खु भिक्षुणींचे मठ पुन्हा सुरू केले आहेत. शिवाय त्यांच्याकडे विद्वान साधकांसाठी, ध्यानधारणा गुरूंसाठी आणि प्रशिक्षकांसाठी संपूर्ण पारंपरिक प्रशिक्षण कार्यक्रमही उपलब्ध आहेत. तिबेटी बौद्ध परंपरेच्या सर्व घटकांना संरक्षण देणाऱ्या शैक्षणिक, संशोधक आणि प्रकाशनाच्यासाठीच्या सुविधाही इथे उपलब्ध आहेत.  

निर्वासित तिबेटी समुदायाने लडाख व सिक्किमसह भारताच्या हिमालयीन क्षेत्रात आणि नेपाळ व  भूतानमध्ये बौद्ध गुरू पाठवून आणि गुरू परंपरेला पुनर्स्थापित करत बौद्ध धर्माच पुनरुद्धार केला आहे. या क्षेत्रातील अनेक भिक्खु आणि भिक्षुणी तिबेटी निर्वासितांच्या मठांमधून शिक्षण-प्रशिक्षण घेत आहेत. 

नेपाळ

बहुतांश नेपाळी लोकसंख्या हिंदू आहे, पण तरीही बुद्धाचे जन्मस्थान असणाऱ्या या प्रदेशात बौद्ध संस्कतीचा प्रबळ प्रभाव आहे. नेवाड, गुरुंग आणि तमांग या पारंपरिक गटात परंपरागत नेपाळी बौद्ध साधना केली जाते. इथे बौद्ध लोकसंख्या ९% आहे.  

बौद्ध आणि हिंदू धर्माचे मिश्रण असणारा नेपाल एकमात्र देश आहे, जिथे मठांच्या आतही जातीय विभागणी केली जाते. मागील ५०० वर्षात विवाहित भिक्खुंच्या परंपरेचा उदय झाला आहे, जे मंदिराची रखवाली करतात आणि जे धार्मिक कार्यक्रमही पार पाडतात. 

रशिया

बुर्यातिया, तुवा आणि काल्मिकिया या रशियामधील तीन तिबेटी बौद्ध परंपरा आहेत. १९३० मध्ये बुर्यातिया इथले तीन मठ सोडून सर्व मठ स्टॅलिनने उध्वस्त केले. १९४०मध्ये स्टॅलिनने यातील दोन मठ केडीबीच्या कडक नियंत्रणाखाली प्रतिकात्मकतेसाठी पुन्हा खुले केले. जेव्हा धार्मिक वेष काढून घेतलेले भिक्खु दिवसा धार्मिक विधींसाठी वेष परिधान करत असत. कम्युनिजमच्या अस्तानंतर या तीनही भागात बौद्ध धर्माचे पुनरुत्थान झाले. निर्वासित तिबेटींकडून इथे प्रशिक्षित शिक्षक पाठवण्यात येत आहेत, तर नव्या तरुण भिक्खुंना प्रशिक्षणासाठी भारतातील तिबेटी निर्वासित मठांमध्ये पाठवण्यात येत आहे. बुर्यातिया, तुवा आणि काल्मिकियायेथे सध्या २०हून अधिक मठांची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. 

बौद्ध धर्म नसलेले देश

१९व्या शतकात बौद्ध देशातील युरोपियन वसाहतवादामुळे आणि ख्रिश्चन विद्वानांच्या लेखनातून युरोपात बौद्ध धर्माचे परिपूर्ण ज्ञान पोहचले. त्याच सुमारास चिनी आणि जपानी स्थलांतरितांंनी उत्तर अमेरिकेत बौद्ध मठांची स्थापना केली. 

जगभरात बौद्ध परंपरा नसलेल्या देशातही बौद्ध धर्माचे सर्व संप्रदाय पाहायला मिळतात. यात दोन प्रमुख समूह आहेतः आशियाई स्थलांतरित आणि आशियाई नसलेले साधक. मुख्यतः अमेरिका आणि आॅस्ट्रेलिया आणि काही अंशी युरोपात आशियाई स्थलांतरितांची त्यांच्या स्वतःच्या परंपरेतील मंदिरे पाहायला मिळतात. भक्ती साधनेच्या प्रसारासोबतच स्थलांतरित समुहांना त्यांची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख जोपासता यावी, यावरही या मंदिरांचा अधिक भर असतो. अमेरिकेत सध्या चार दशलक्ष बौद्ध आहेत आणि युरोपात दोन दशलक्ष बौद्ध आहेत.  

जगभरातल्या शंभरहून अधिक देशात आणि प्रत्येक खंडात सर्व परंपरांचे हजारो बौद्ध ‘धर्म केंद्र’ आढळतात. या तिबेटी, झेन आणि थेरवादी केंद्रात मुख्यतः गैर आशियाई साधक येतात, ज्यांचा ध्यानधारणेवर, अध्ययनावर आणि धार्मिक विधींवर भर असतो. इथल्या शिक्षकांमध्ये पाश्चिमात्त्य आणि आशियाई बौद्धांचा समावेश आहे.  सर्वाधिक केंद्र अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीत आढळतात. अनेक अभ्यासू विद्यार्थी सखोल ज्ञानासाठी आशियाला भेट देतात. शिवाय जगभरातील अनेक विश्वविद्यापीठात बौद्ध अभ्यास उपक्रम उपलब्ध आहेत, आणि बौद्ध धर्म व इतर धर्मांमध्ये विज्ञान, मानसशास्त्र आणि वैद्यकीय विषयांमधील संवाद वाढतो आहे. परमपूज्य दलाई लामा यांनी या संदर्भात मोलाची भूमिका निभावली आहे.  

Top