बौद्ध धर्मातील महिला: भिक्खुणी आदेशाची पुनर्स्थापना

प्राचीन काळी, लिंगभेद कदाचित इतके महत्त्वाचे नव्हते. पण जसजशी सभ्यता विकसित होत गेली, तसतसे समाजाचे त्यांच्या शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी सामर्थ्य आणि सत्ता अधिक महत्त्वाची होत गेली.  परिणामी, अधिक शारीरिक ताकदीमुळे पुरुषांचे वर्चस्व वाढले. नंतरच्या काळात, शिक्षण आणि बुद्धिमत्तेने अधिक महत्त्वाची भूमिका बजावली आणि या संदर्भात, स्त्री आणि पुरुष यांच्यात कोणताही फरक नाही. तरीही आजकाल, संघर्ष निवारणासोबतच इतर समस्यांच्या निराकरणात आपुलकी आणि प्रेमळपणा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. हे दोन गुण शिक्षण आणि बुद्धिमत्तेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना विनाशकारी दिशेला वळवण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक आहेत. अशा प्रकारे, स्त्रियांनी आता अधिक मध्यवर्ती भूमिका घेणे आवश्यक आहे कारण, कदाचित जैविक घटकांमुळे, त्या नैसर्गिकरित्या पुरुषांपेक्षा अधिक सहजपणे स्नेह आणि प्रेमळपणा विकसित करण्यास सक्षम आहेत. गर्भाशयात मूल वाढवण्यापासून ते नवजात अर्भकांच्या संगोपनकर्त्या असण्यातूनही हा प्रेमभाव येतो. 

आक्रमक वर्तनासाठीचे बलवान शरीर असल्याने युद्धं ही परंपरागतपणे पुरुषांकडूनच प्रामुख्याने केली जातात. याउलट स्त्रिया अधिक प्रेमळ आणि इतरांच्या अस्वस्थतेबद्दल आणि वेदनांबद्दल अधिक संवेदनशील असतात. जरी पुरुष आणि स्त्रिया यांच्यात आक्रमकता आणि दयाळूपणाची समान क्षमता असली तरी, दोघांपैकी कोणते अधिक सहजपणे प्रकट होते त्यामध्ये फरक आहे. अशाप्रकारे, जर बहुसंख्य जागतिक नेते महिला असतील, तर कदाचित युद्धाचा धोका कमी असेल आणि जागतिक प्रश्नांबाबत अधिक संवेदनशीलता असेल. अर्थात काही महिला कठीण असू शकतात! मला स्त्रीवाद्यांबद्दल सहानुभूती आहे, पण त्यांनी नुसती ओरड करू नये. त्यांनी समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कधी कधी धर्मांमध्ये पुरुषी महत्त्वावर भर दिला गेला आहे. पण बौद्ध धर्मात भिक्खु आणि भिक्खुणी या सर्वोच्च प्रतिज्ञा समान आहेत आणि त्यांना समान अधिकार आहेत. काही कर्मकांडांवेळी सामाजिक प्रथेमुळे भिक्खु आधी जात असले तरी हे वास्तव आहे. पण बुद्धांनी दोन्ही संघसमूहांना समान मुलभूत अधिकार दिले आहेत. भिक्खुणी अध्यादेशाचे पुनरुज्जीवन करायचे की नाही यावर चर्चा करण्यात अर्थ नाही; प्रश्न फक्त विनयाच्या संदर्भात हे योग्यरित्या कसे करता येईल हे पाहायला हवे. 

शांतरक्षिताने तिबेटमध्ये मूलसर्वस्तिवदा भिक्खु अध्यादेशाची ओळख करून दिली. पण त्यांच्या पक्षातील सर्व भारतीय पुरुष होते आणि भिक्खुणी व्यवस्थेसाठी द्वैत संघाची आवश्यकता असल्याने, ते भिक्खुणी मठ सुरू करू शकले नाहीत. नंतरच्या काळात, काही तिबेटी लामांनी त्यांच्या मातांना भिक्खुणी म्हणून दीक्षा दिली. परंतु विनयाच्या दृष्टिकोनातून, हे अध्यादेश प्रमाण मानले जात नव्हते. १९५९ पासून मला असे वाटू लागले आहे की बहुतेक भिक्खुणींच्या मठांनी त्यांच्या शिक्षणाचा दर्जा इतर मठांइतका वाढविला पाहिजे. मी ते लागू केले आहे आणि आज आपल्याकडे विद्वान भिक्खुणी आहेत. पण भिक्खुणी नियमाची पुनर्स्थापना करण्यासाठी, मी एकटा कार्य करू शकत नाही. हा प्रश्न विनय संहितेनुसार हाताळायला हवा. 

आता आमच्याकडे या प्रश्नावर इतर बौद्ध परंपरांशी चर्चा करण्याची संधी आहे. जसे चिनी, कोरियन आणि व्हिएतनामी परंपरा, ज्यात अजूनही भिक्खुणी अध्यादेश आहेत. धर्मगुप्तक परंपरेनुसार सुमारे दोन डझन तिबेटी महिलांनी त्यांच्यासोबत भिक्खुणी पदग्रहण केले आहे. त्या आता भिक्खुणी आहेत हे कोणीही नाकारत नाही.

गेली तीस वर्षे आम्ही मूलसर्वस्तिवदा आणि धर्मगुप्तक विनय ग्रंथांवर संशोधन करत आहोत. विनया या संस्कृत-आधारित परंपरा आणि पाली परंपरा या दोन्ही परंपरेत आढळत असल्याने, तिन्ही विनय परंपरेतील संघाच्या ज्येष्ठांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे अनुभव सांगण्यासाठी एकत्र येणे उपयुक्त आहे. श्रीलंकेत भिक्खुणी अध्यादेशाची पुनर्स्थापना आधीच झाली आहे आणि थायलंडमध्येही असे करण्यास स्वारस्य आहे. शांतरक्षिताच्या अपयशावर उपाय शोधता यावा, यासाठी अधिक संशोधन उपयुक्त ठरेल. पण एक व्यक्ती म्हणून, माझ्याकडे या समस्येवर निर्णय घेण्याची शक्ती नाही. ते विनयाच्या कार्यपद्धतीनुसार योग्य होणार नाही. माझ्याकडे फक्त संशोधन सुरू करण्याची शक्ती आहे.

धर्मगुप्तक भिक्खुणी पद लाभलेल्या सर्व तिबेटी आणि पाश्चात्य व्यक्तींना आम्ही धर्मगुप्तक भिक्खुणी म्हणून ओखळतो आणि स्वीकारतो. पण हा खरा मुद्दा नाही. मूलसर्वस्‍तिवदा विनय ग्रंथांच्‍या अनुषंगाने भिक्खणींची नियुक्ती करण्यासाठी मार्ग शोधण्‍याचा खरा मुद्दा आहे. बुद्ध जिवंत असायला हवे होते आणि इथे आणि आता त्यांना विचारता यायला हवं होतं.  मी बुद्ध असतो तर ठरवू शकलो असतो; पण तसे नाही. मी बुद्ध नाही. मी काही मुद्द्यांवर अधिकारवाणीने काम करू शकतो, पण विनयाच्या बाबतीत नाही. धर्मगुप्तक परंपरेत नियुक्‍त असलेल्या तिबेटी भिक्खुणींचा तीन सांघिक विधी [दोमासिक शुध्दीकरण (सोजोंग संस्कृत पोशधा, पाली:उपोसथा), उन्हाळ्याची स्थापना माघार (ब्यार-ब्योर संस्कृत वर्षोपनायिका पाली: वस्सोपवयिका), आणि उन्हाळ्याच्या माघारीच्या निर्बंधांपासून वेगळे होणे (डिग्यॅग- डिबाय, संस्कृत प्रवरण, पाली:प्रवरण)] पार पाडण्यासाठी मी गटांना एकत्र करू शकतो. पण अध्यादेश सोहळ्याची पुनर्स्थापना ही वेगळी बाब आहे. हे व्हावे अशी माझी इच्छा असली तरी त्यासाठी ज्येष्ठ भिक्खुंची सहमती आवश्यक आहे. त्यापैकी काहींनी जोरदार प्रतिकार केला आहे. त्यात एकवाक्यता नाही हीच समस्या आहे. पण या तिन्ही सांघिक विधींच्या धर्मगुप्तक आवृत्त्यांसाठीचे योग्य ग्रंथ माझ्याकडे चिनी भाषेतून तिबेटी भाषेत त्वरित अनुवादित केले जाऊ शकतात. याला कोणी विरोध करू शकत नाही.

इतर पैलूंबद्दल, आपल्याला अधिक चर्चा आवश्यक आहे. इतर बौद्ध परंपरेतील संघाकडून मिळणारा पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि म्हणून ही बैठक या प्रक्रियेतील एक उपयुक्त टप्पा आहे. पुढची पायरी म्हणून, मी या आंतरराष्ट्रीय संघाच्या ज्येष्ठांना भारतात येण्याचे निमंत्रण देतो. त्यांना त्या संकुचित मनाच्या तिबेटी ज्येष्ठांशी चर्चा करू द्या, जे मूलसर्वस्तिवादी भिक्खुणी अध्यादेशाच्या पुनर्स्थापनेला विरोध करतात.

जर बुद्ध आज येथे असते तर निःसंशयपणे त्यांनी संमती दिली असती. पण मी बुद्ध म्हणून काम करू शकत नाही. तिबेटमध्ये आठव्या शतकापासून मठवाद असला तरी, तीन संघाचे विधी करणाऱ्या भिक्खुणी आपल्यामध्ये कधीच नव्हत्या, त्यामुळे आता ते होईल. मात्र अध्यादेशाबाबत आत्ताच बोलणे फार घाईचे होईल.  

या वर्षी या तीन भिक्खुणी संघाचे विधी सुरू करणे कदाचित कठीण आहे, परंतु पुढच्या वर्षी आपण ते सुरू करू शकलो पाहिजे. भिक्खुणी प्रतिमोक्षाचे यापूर्वीच चिनी भाषेतून तिबेटीमध्ये भाषांतर झाले आहे. ते तीस ते चाळीस पानांचे आहे. तिबेटी धर्मगुप्तक भिक्खुणींना ते मनापासून शिकावे लागेल. परंतु तिन्ही सांघिक विधींसाठीच्या वास्तविक विधी ग्रंथांचे भाषांतर करणे आवश्यक आहे.

जर तिबेटी भिक्खुणी मूलसर्वस्तिवदा भिक्खुणी म्हणून नियुक्ती करू इच्छित असल्या, तरी धर्मगुप्तक भिक्खुणी अध्यादेश मूलसर्वस्तिवदा म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही. जर हे दोघे आदलाबदल करण्याजोगे असते,  तर तिबेटमध्ये महासांघिक भिक्खु नियुक्ती न देण्यासंबंधी आतिशाला विचारले जाण्याचे कारणच नसते. [जेव्हा अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात राजा जंगचुब (तिब. बयांग-चुब'ओड) यांनी भारतीय गुरु आतिशाला तिबेटमध्ये आमंत्रित केले होते, तेव्हा राजाचे आजोबा, राजा येशे ओ, यांनी आधीच पूर्व भारतीय गुरु धर्मपाल यांना आमंत्रित करून मूलसर्वस्तिवदा भिक्खु अध्यादेशाची पुनर्स्थापना प्रायोजित केली होती. आतिशाला महासांघिक भिक्खु पद न देण्याची विनंती करण्यात आली कारण त्यामुळे तिबेटमध्ये दोन विनय वंशांचा परिचय झाला असता.]

शिवाय जर धर्मगुप्तक अध्यादेश हा मूलसर्वस्‍तिवदा अध्यादेश असला असता तर थेरवदा अध्यादेश देखील मूलसर्वस्‍तिवाद ठरेल आणि हे फारच विचित्र आहे.. मूलसर्वस्‍तिवदा विनयाच्‍या अनुषंगाने आपण मूलसर्वस्‍तिवदा भिक्खुणी अध्यादेश पुन्‍हा स्‍थापित करण्‍याची आवश्‍यकता आहे. 

या हिवाळ्यात, आपण भारतात बोधगया, सारनाथ किंवा दिल्लीत अशीच एक परिषद घेऊ. या हॅम्बुर्ग परिषदेत सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय संघाच्या वरिष्ठांव्यतिरिक्त, आपण तिबेटी संघाच्या सर्व प्रमुख नेत्यांना आणि बोनपोससह चारही तिबेटी परंपरेतील प्रमुख मठांच्या सर्व मठाधिपतींना देखील आमंत्रित करू. बोनपोसमध्ये अजूनही भिक्खुणी आहेत. आपण जवळपास शंभर जेष्ठ, सर्वात आदरणीय भिक्खु विद्वानांना आमंत्रित करायला हवं. तेव्हा मी आंतरराष्ट्रीय संघाच्या वरिष्ठांना विनंती करेन की त्यांनी भिक्खुणी अध्यादेशाची पुनर्स्थापना करण्याच्या बाजूने त्यांचे वाजवी युक्तिवाद वैयक्तिकरित्या मांडावेत. हे खूप उपयुक्त होईल. आम्ही तिबेटी लोक अशा परिषदेला वित्तपुरवठा करू आणि ते कोण आयोजित करू शकेल ते ठरवू.

गेल्या सव्वीस शतकांमध्ये, अभिधर्माच्या पाली आणि संस्कृत आवृत्त्यांमध्ये अनेक फरक निर्माण झाले आहेत. नागार्जुन यांनी काही मुद्दे स्पष्ट केले आहेत; दोन परंपरांमधील इतर फरक परीक्षणाने स्पष्ट केले जाऊ शकतात. त्या भावनेने, आपण बुद्धांच्या शब्दांचे परीक्षण करण्याचे स्वातंत्र्य घेऊ शकतो, उदाहरणार्थ मेरू पर्वतासंबंधी निरीक्षण, पृथ्वी सपाट आहे आणि सूर्य व चंद्र पृथ्वीपासून जवळजवळ समान अंतरावर आणि समान आकाराचे आहेत. हे मुद्दे पूर्णतः अस्वीकार्य आहेत. ल्हासा येथील माझ्या स्वत:च्या शिक्षकांनीही माझ्या दुर्बिणीतून चंद्रावरील पर्वतांच्या सावल्या पाहिल्या आणि अभिधर्माच्या नोंदीनुसार चंद्र स्वतःचा प्रकाश सोडत नाही हे त्यांना मान्य करावे लागले. म्हणून, नागार्जुनच्या स्पष्टीकरणासाठी, संघाच्या चर्चेची गरज नाही. सूत्राच्या मुद्द्यांबाबतही असेच आहे. पण विनयाचा विचार केला तर मात्र ते पूर्णपणे वेगळे आहे.

विनय ग्रंथांची सर्व भाषांतरे सर्वज्ञांना नमस्काराने सुरू होतात. याचा अर्थ असा आहे की बुद्धांनी स्वतः ग्रंथांना प्रमाणित केले आहे, कारण केवळ सर्वज्ञ बुद्धांनाच माहीत आहे की कोणत्या कृती करायच्या आहेत आणि कोणत्या कृती सोडल्या पाहिजेत. अभिधर्म ग्रंथात तर दुसरीकडे मंजुश्रीला नमस्कार केला आहे. तसेच, परिनिर्वाणासह बुद्धांच्या निधनानंतर, एक संघ परिषद आयोजित केली गेली आणि विनयामध्ये काही बदल केले गेले. बुद्धाने यासाठी परवानगी दिली आहे आणि ती इतर मुद्द्यांपर्यंत वाढवता येईल. उदाहरणार्थ, आम्ही तिबेटी लोक बोधिसत्वायन आणि तंत्रयानाचा त्यांच्या स्वतंत्र वचनांच्या संचासह सराव करतो. काही मुद्दे आणि उपदेश त्यांच्यात आणि विनयामध्ये परस्परविरोधी आहेत. अशा प्रकरणांमध्ये, उच्च प्रतिज्ञांना खालच्यांपेक्षा प्राधान्य दिले पाहिजे.

एकविसाव्या शतकात युद्ध ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. त्याऐवजी, विवाद मिटवण्यासाठी आपल्याला संवादाची गरज आहे आणि त्यासाठी बुद्धिमत्ता पुरेशी नाही. आपल्याला देखील प्रेमळ मनाची आणि इतरांच्या कल्याणाप्रति गंभीर आस्था हवी. प्रामाणिक संवादासाठी करुणा अधिक महत्त्वाची आहे. जैविक घटकांमुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा इतरांच्या दुःखाबद्दल अधिक संवेदनशील असतात. उदाहरणार्थ, स्त्रियांचा फारशा कत्तली, हत्येसारख्या गुन्ह्यात नसतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाटाघाटीसाठी महिलांची नितांत गरज आहे आणि मोठी भूमिका घेण्याची गरज आहे.

बुद्धांच्या शिष्यांच्या चौपट समुदायामध्ये भिक्खु, भिक्खुणी,  उपासक आणि उपासिक यांचा समावेश होतो. साहजिकच महिला आणि पुरुष समान भूमिका बजावतात. परंतु, सध्या तिबेटी लोकांमध्ये चौपट समुदाय अपूर्ण आहे. मौल्यवान मानवी पुनर्जन्म लाभण्यासाठी आठ आणि दहा गुण आहेत, त्यापैकी एक मध्यवर्ती भूमीत जन्माला येणे हा आहे, जो भौगोलिक किंवा आध्यात्मिकरीत्या स्पष्ट करू शकतो.  तिबेट ही भौगोलिकदृष्ट्या परिभाषित केलेली मध्यवर्ती भूमी नाही. आध्यात्मिकरित्या परिभाषित केलेल्या भूमीसाठी, ती अशी आहे ज्यामध्ये शिष्यांचा चौपट समुदाय पूर्ण आहे. साहजिकच भिक्खुणींशिवाय ते अपूर्ण आहे. अनेक तिबेटी लोक म्हणतात की जर भिक्खु ती मध्यवर्ती भूमी आहे, कारण चार गटांपैकी भिक्खु हे सर्वात महत्वाचे आहेत. परंतु हे केवळ मध्यवर्ती भूमीची समानता आणि मौल्यवान मानवी पुनर्जन्माची समानता परिभाषित करते. तिबेटमधील पूर्वीच्या स्वामींनी याकडे लक्ष दिले असावे.

संघाच्या समुहाशी सल्लामसलत न करता, मी तिबेटी भिक्खुणींमधील शिक्षण सुधारण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो. मी हे केले आहे आणि याआधीच अनेक भिक्खुणींनी पांडित्याची उच्च पातळी गाठली आहेत. मुंडगोड येथील मठांमध्ये, मी जाहीर केले होते की आपण गेशेमा परीक्षेची तयारी केली पाहिजे. काही ज्येष्ठ भिक्खुंनी आक्षेप घेतला, पण मी त्यांना सांगितले की बुद्धाने स्त्री-पुरुषांना भिक्खु आणि भिक्खुणी बनण्याचा समान अधिकार दिला आहे, मग गेशे आणि गेशेमास होण्याचा समान अधिकार का नाही? मला वाटते की समस्या अशी आहे की या ज्येष्ठ भिक्खुंना अशा प्रकारच्या विचारांची सवय नाही.

साठच्या दशकाच्या सुरुवातीस, मी केवळ भिक्खुंनाच नाही तर भिक्खुणींनाही बोलावले आणि त्यांना सांगितले की ते द्वैमासिक सोजोंग समारंभात सहभागी होऊ शकतात. त्या वर्षांत, भिक्खुणी नव्हत्या, म्हणून श्रमणेरिका नवशिक्या भिक्खुणींना ही भिक्खुंच्या सोजोंगमध्ये सहभागी होण्याची परवानगी नसली तरी माझ्या शिक्षकांनी त्यांना मान्यता दिली. तर, आम्ही ते करायला सुरुवात केली आहे. दक्षिण भारतातील मठांकडून अनेक व्यंग्यात्मक आक्षेप घेण्यात आले होते, कारण असे कधीच घडले नाही की भिक्खु आणि भिक्खुणी एकत्र सोजोंग करतात. परंतु सत्तरच्या दशकापासून, काही तिबेटी लोकांनी चिनी परंपरेतून भिक्खुणी नियम घेतले आहेत. माझ्या तैवानला भेट देण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे तेथील भिक्खुणी वंश पाहणे आणि तेथील परिस्थिती तपासणे. भिक्खुणी व्रताचे संशोधन करण्यासाठी मी लोसांग त्सेरिंग यांची नियुक्ती केली आणि त्यांनी वीस वर्षे हे काम केले आहे. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले आहेत. मी मुख्य चिनी नियुक्त भिक्खुंना आंतरराष्ट्रीय संघाची बैठक आयोजित करण्याची विनंती केली, परंतु ते ते करू शकले नाहीत. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनामधून उद्भवणाऱ्या अडचणी आणि गुंतागुंतीमुळे मी स्वतः अशी बैठक बोलावू शकलो नाही. मला असे वाटले की अशी बैठक दुसर्‍या संस्थेने बोलावली तर बरे होईल, आणि म्हणून मी जम्पा चोड्रोएन यांना तसे करण्यास सांगितले. वैयक्तिक साधू जे काही करू शकतो ते केले आहे. आता आपल्याला तिबेटी भिक्खु ज्येष्ठांकडून व्यापक मठवासी सहमती हवी आहे.

नवशिक्या भिक्खु आणि भिक्खुणींसाठींच्या नियमांमध्ये, असे सांगितले आहे की एखाद्याला आदराच्या योग्य वस्तू माहीत असणे आवश्यक आहे. त्यात म्हटले आहे की, व्रताच्या दृष्टीने जरी भिक्खुणी श्रेष्ठ असल्या; तरी, त्या नवशिक्या भिक्खुंच्या पूजनीय वस्तू असू नयेत. कदाचित बोधिसत्व आणि तांत्रिक प्रतिज्ञा लक्षात घेऊन, विशेषत: स्त्रियांना अपमानित न करण्याचे तांत्रिक व्रत लक्षात घेऊन हे देखील पुन्हा शब्दबद्ध करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने हा विनयातील मुद्दा ठेवणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे व्रतांचे तीन संच पाळताना काही किरकोळ मुद्द्यांमध्येही बदल करणे आवश्यक आहे. आणि मूलसर्वस्‍तिवदा भिक्खुणी व्रतांचा अभ्यास करण्‍यापूर्वी, धर्मगुप्तक वंशात ज्या भिक्खुणी झाल्या आहेत, त्या त्यांचे वाचन आणि अभ्यास करू शकतात, जरी त्यांना धर्मगुप्तकानुसार त्यांचे विधी करणे आवश्यक आहे. मात्र, या व्रतांचा अभ्यास न करणाऱ्या भिक्खुणींमध्ये अजूनही अडचण आहे.

हे सर्व फेरबदल करताना आणि विशेषत: मूलसर्वस्‍तिवदा भिक्खुणी अध्यादेशाची पुन्‍हा स्‍थापना करण्‍याच्‍या दृष्‍टीने, हे केवळ काही तिबेटी संघांनीच करू नये हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण संघातील फूट टाळली पाहिजे. आपल्याला तिबेटी संघामध्ये एक व्यापक सहमती हवी आहे आणि म्हणूनच आपण त्या दिशेने पुढील पावले उचलत आहोत. तुमच्या प्रयत्नांबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे.

Top