जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दलाई लामा

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आजचे प्रमुख पाहुणे भारताचे मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. कपिल सिब्बल, त्याचप्रमाणे कुलगुरू, प्राध्यापक, डीन, विद्यार्थी आणि इथे उपस्थित सर्व पाहुणे यांचे मी आभार मानतो. सुरुवातीलाच मला तुम्हाला अभिवादन करायचं आहे आणि माझा या पुरस्काराने (सन्माननीय डॉक्टरेट पदवी) गौरव केल्याबद्दल मी जामिया मिलिया इस्लामियाचे आभार मानू इच्छितो. 

आता मी इंग्रजीत बोलायचा प्रयत्न करणार आहे. माझी इंग्रजी अगदीच तोडकीमोडकी आहे, त्यामुळे काही वेळा कदाचित मी चुकीचे शब्दही वापरेन, हे श्रोत्यांनी समजून घ्यावं. त्यामुळे मी जेव्हा तोडकीमोडकी इंग्रजी बोलतो, तेव्हा ‘सावध राहा’ असा सल्ला मी सर्वसाधारणतः श्रोत्यांना देतो. मी चुकीचा शब्द वापरल्याने कदाचित काही गैरसमजही होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ मी ‘ऑप्टिमिझम’ (आशावाद) या शब्दाऐवजी चुकून ‘पेसिमिझम’ (निराशावाद) असा शब्द वापरण्याची शक्यता आहे; ही गंभीर चूक आहे. तर, हा खरंच धोका आहे, त्यामुळे तुम्ही माझी तोडकीमोडकी इंग्रजी ऐकताना सावध राहा. 

ही पदवी स्वीकारताना मला स्वतःचा अत्यंत सन्मान झाल्यासारखं वाटतं आहे. एक, मी अशा पदव्या स्वीकारतो तेव्हा प्रतिसाद देताना सर्वसाधारणतः असं म्हणतो की, मी प्रत्यक्षात अभ्यास करण्यामध्ये काहीच वेळ घालवलेला नाही, पण अभ्यास न करताही मी या पदव्या स्वीकारतो. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळते आहे, त्यांनी खूप वेळ अभ्यासात घालवला असणार, प्रचंड प्रयत्न केले असणार, असं मला वाटतं. पण मी फारसे प्रयत्न न करताही विविध विद्यापीठांकडून मला या पदव्या मिळतात, याने मला खरंच स्वतःचा मोठा सन्मान झाल्यासारखं वाटतं. आज इथे मला एका विख्यात इस्लामी विद्यापीठाकडून पदवी मिळते आहे, याबद्दल मला विशेष कृतज्ञ वाटतं, कारण धार्मिक सौहार्दाला चालना देणं, या तत्त्वाशी मी बांधील आहे.

११ सप्टेंबरची घटना घडल्यापासून मी इस्लामच्या समर्थनार्थ ठामपणे उभा राहिलो आहे. मुस्लीम पार्श्वभूमी असलेल्या काही मोजक्या खोडसाळ लोकांच्या कृत्यांमुळे संपूर्ण इस्लामला सरसकटपणे नकारात्मकपणे रंगवलं जातं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. इस्लाम हा पृथ्वीवरील एक अतिशय महत्त्वाचा धर्म आहे, ही स्वाभाविक व वास्तविक बाब आहे. गतकाळातील अनेक शतकं आणि वर्तमानात व भविष्यातही इस्लामने लाखो लोकांना आत्मविश्वास व प्रेरणा दिली आहे, देतो आहे व देईल. ही वस्तुस्थिती आहे. लहानपणापासून माझे अनेक घनिष्ठ मित्र मुस्लीम राहिलेले आहेत. उदाहरणार्थ, माझ्या माहितीनुसार, किमान चार शतकांपूर्वी तिबेटमधील ल्हासा इथे मुस्लीम व्यापारी स्थायिक झाले आणि तिथे लहानसा मुस्लीम समुदाय निर्माण झाला. या मुस्लीम समुदायाने काहीही भांडण केल्याची नोंद सापडत नाही, हे अत्यंत सौम्य लोक होते.

शिवाय, या देशातील माझ्या ओळखीच्या काही मुस्लिमांनी मला असंही सांगितलेलं आहे की, इस्लामच्या सच्च्या उपासकांनी सर्व जीवांबद्दल प्रेम व करुणा बाळगायला हवी. एखाद्या मुस्लिमाने वास्तवात रक्तपात घडवला, तर तो मुस्लीम उरत नाही. ‘जिहाद’चा अर्थ ‘इतरांवर हल्ला करणं’ हा नाही. आपला आंतरिक संघर्ष, हा ‘जिहाद’चा सखोल अर्थ आहे: संताप, द्वेष, ओढ यांसारख्या सर्व नकारात्मक भावनांविरोधातला हा संघर्षच असतो. आपल्या मनोवस्थेमध्ये समस्या निर्माण करणाऱ्या आणि मग त्याद्वारे आपल्या कुटुंबात व आपल्या समुदायात अधिक समस्या उत्पन्न करणाऱ्या या भावना असतात. तर या नकारात्मक, विध्वंसक भावनांविरोधात संघर्ष करणं वा त्यांच्या विरोधात लढणं, हा ‘जिहाद’चा सखोल अर्थ आहे.

त्यामुळे तत्त्वज्ञान भिन्न असलं, तरी त्या धर्माचं सार इतर धर्मांसारखंच आहे. इतर धर्माच्या अनुयायांशी होणारा अधिकचा संवाद व अधिक संपर्क, यांमुळे माझ्या असं लक्षात आलं आहे की, तात्त्विक क्षेत्रात मोठे भेद असले, तरी व्यावहारिक पातळीवर हे सर्व धर्म प्रेम, करुणा, क्षमाशीलता, सहिष्णूता, स्वयंशिस्त व समाधान यांचंच आचरण करतात. त्यामुळे मला संधी मिळते तेव्हा प्रत्येक वेळी मी लोकांना सांगतो की काही मोजक्या खोडसाळ मुस्लिमांमुळे तुम्ही इस्लामबद्दल सरसकटीकरण करू नका. हिंदूंमध्येही काही खोडसाळ लोक आहेत, ज्यूंमध्येही काही खोडसाळ लोक आहेत, ख्रिश्चनांमध्येही आहेत, बौद्धांमध्येही आहेत आणि लहानशा तिबेटी बौद्ध समुदायातही काही खोडसाळ लोक आहेत, हे स्पष्ट आहे. तर, एखाद्या इस्लामी विद्यापीठाकडून पदवी स्वीकारताना मला खरोखरच स्वतःचा खूप सन्मान झाल्यासारखं वाटतं आहे.

तर, माझ्या बांधिलकीविषयी सांगतो. मृत्यू येईपर्यंत मी दोन गोष्टींची बांधिलकी मानली आहे. आधी म्हटल्याप्रमाणे धार्मिक सौहार्दाला चालना देणं ही पहिली बांधिलकी आहे, दुसरी बांधिलकी मानवी पातळीवरची आहे- आंतरिक मानवी मूल्यं, जैविकदृष्ट्या विकसित होणारे मानवी गुण- विशेषतः मानवी ममत्व- यांना चालना देणं, ही आहे. आपण जन्माला आल्यानंतर लगेचच आई मुलावर प्रचंड माया करते. बालकही जन्माला आल्यानंतर समोरची व्यक्ती कोण आहे ते न जाणताही जैविकदृष्ट्या पूर्णपणे तिच्यावर अवलंबून असते. ती आई बालकाला अशा तऱ्हेने स्वीकारते, तेव्हा बाळाला अतिशय आनंद होतो; ते विभक्त होतात, तेव्हा बाळाला असुरक्षित वाटतं. प्राण्यांनाही अशाच प्रकारचा अनुभव येतो, त्यामुळे आपलं जीवन अशा रितीने सुरू होतं. जन्माच्या वेळी, त्यानंतरची काही वर्षं, संपूर्ण आयुष्यभर अधिकाधिक ममत्व लाभलेली व्यक्ती अधिक सुदृढ व अधिक करुणामय माणूस होते. पण अशा तरुण वयात ममत्वाचा अभाव जाणवलेले किंवा अत्याचार सहन करावा लागलेले लोक तो अनुभव संपूर्ण आयुष्यभर सोबत घेऊन जगतात. ते बाहेरून कसेही दिसले, तरी त्यांच्या आत खोलवर भयाची व अविश्वासाची भावना असते. मानवांमधील अविश्वास हा प्रत्यक्षात प्राथमिक मानवी स्वभावाच्या विरोधात जाणारा आहे: आपण सामाजिक प्राणी आहोत. कोणत्याही सामाजिक प्राण्याच्या दृष्टीने व्यक्तिगत हितासाठी पूर्ण सहकार्य अत्यावश्यक असतं. व्यक्ती समाजाचा भाग असते आणि व्यक्तीचं भवितव्य पूर्णतः त्या समाजावर किंवा समुदायावर अवलंबून असतं.

तर, तुमच्या स्वतःच्या यशस्वी जीवनाच्या आधारासंदर्भात बोलायचं तर, तुमच्यात काही प्रकारचा अविश्वास व भय निर्माण झालं असेल, तर तुम्ही दुरावलेले राहता, अशी व्यक्ती सुखी कशी होईल? मग ते अतिशय अवघड होतं! तर, प्रामाणिक सहकार्य विकसित करण्यासाठी मैत्री अत्यावश्यक आहे. मैत्रीचा पाया विश्वास हा असतो. विश्वासाचा पाया खुलेपणा, पारदर्शकता हा असतो, त्यातून मग विश्वास निर्माण होतो. याचा पाया स्नेहशील वृत्तीमध्ये, इतरांच्या कल्याणाविषयी वाटणाऱ्या आस्थेच्या भावनेमध्ये असतो. अशा प्रकारची भावना असेल, तेव्हा इतरांचं शोषण करण्याची, त्यांना फसवण्याची किंवा त्यांच्यावर धाकदपटशा दाखवण्याची शक्यताच उरत नाही, कारण तुम्हाला त्यांच्या कल्याणाबद्दल प्रामाणिकपणे काळजी वाटत असते. तर, हे मुळात धर्मामधून आलेलं नाही, तर जैविक घटकांमधून आलेलं आहे.

त्यामुळे, ‘आपण सामाजिक प्राणी आहोत’ ही वस्तुस्थिती लोकांना सांगणं, या गोष्टीशी मी बांधिलकी मानली आहे. आता विशेषतः आजच्या जगामध्ये, जागतिक अर्थव्यवस्था व पर्यावरणीय प्रश्न यांमुळे आणि जगात जवळपास सात अब्ज माणसं असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं हित परस्परांशी संबंधित असतं. या वास्तवानुसार ‘आपण’ आणि ‘ते’ ही संकल्पना अप्रस्तुत ठरते. आता आपण संपूर्ण मानवी वंशाला एक मानवी कुटुंब मानायला हवं. संपूर्ण जग हा माझा भाग आहे, आपला भाग आहे, अशी मनोवृत्ती आपण विकसित करायला हवी, असं मी लोकांना नेहमीच सांगतो. ‘आपण’ व ‘ते’ अशी स्पष्ट विभागणी झाली की हिंसाचार होतो. आपण संपूर्ण मानवता हा ‘माझा’ भाग आहे, ‘आपला’ भाग आहे, अशी भावना विकसित केली, तर हिंसेची शक्यताच उरत नाही.

तर, माझा मुख्य प्रयत्न, माझ्या इतर काही मित्रांसह, आम्ही असा विचार करतो आहोत की- गेलं शतक, विसावं शतक हिंसाचाराचं शतक ठरलं. या शतकामध्ये हिंसेत २० कोटीहून अधिक लोकांची हत्या झाली. अलीकडेच जपानमधील हिरोशिमा इथे काही नोबेल मानकऱ्यांच्या संमेलनाला हजेरी लावून मी परत आलो. मानवांवर पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर जिथे करण्यात आला ते हिरोशिमा. अतिशय भयंकर! त्या शतकामध्ये माणसांवरही अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला! बराच विकास होऊनदेखील ते शतक रक्तपाताचं शतक ठरलं. आता, त्या प्रचंड हिंसेने, प्रचंड रक्तपाताने माणसांच्या काही समस्या खरोखरच सोडवल्या असत्या, आणि काही लाभ झाले असते, तर कदाचित त्याचं काही समर्थन करता आलंही असतं; पण असं काही घडलेलं नाही. त्यामुळे आपल्या गत अनुभवांच्या आधारे आपण एकविसावं शतक संवादाचं शतक बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. संपूर्ण मानव वंशामध्ये एकत्वाची भावना पसरण्याची गरज आहे. भिन्न राष्ट्रीयत्व, भिन्न संस्कृती, भिन्न वंश, भिन्न धार्मिक श्रद्धा, हे दुय्यम आहे असं मला वाटतं. आपण मूलभूत पातळीवर एकसारखेच मानव आहोत, हे महत्त्वाचं आहे.

आज आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्या मूलतः आपणच निर्माण केलेल्या आहेत, असं मला काही वेळा वाटतं. आपणच निर्माण केलेल्या या समस्या उद्भवतात, कारण आपण दुय्यम पातळीचं महत्त्व जास्त अधोरेखित करतो, मूलभूत पातळी विसरतो. तर, आता, सुखी जग, शांततामय जग उभारण्यासाठी आपण मानवी पातळीचं महत्त्व ठासून मांडण्याची वेळ आली आहे. आपल्याला, प्रत्येकाला सुखी व्यक्ती होण्याचा एकसारखाच अधिकार आहे; प्रत्येक व्यक्तीचे हितसंबंध उर्वरित लोकांवर अवलंबून असतात. त्यामुळे आपण इतरांच्या हितसंबंधांची काळजी घ्यायला हवी. स्वतःचा अधिकाधिक लाभ होण्यासाठीचा हा योग्य मार्ग आहे.

तर, या दुसऱ्या गोष्टीला मी बांधील आहे. धार्मिक सौहार्दाला चालना देणं ही माझी पहिली बांधिलकी आहे, तर प्राथमिक मानवी मूल्यांना चालना देणं ही दुसरी बांधिलकी आहे. तर, मरण येईपर्यंत मी या गोष्टींची बांधिलकी स्वीकारली आहे. 

तर, लोकहो, तरुण लोकहो, विद्यार्थी जनांनो, सुरुवातीला मला आपलं अभिनंदन करायचं आहे. तुमच्या प्रचंड प्रयत्नांमुळे तुम्हाला ही पदवी मिळते आहे. कदाचित गेले काही दिवस तुम्हाला बेचैनीपोटी झोप लागली नसेल, बरीच मौजही करता आली नसेल. आता आज तुम्ही शांतपणे झोपू शकाल, असं मला वाटतं. मी तुमचं अभिनंदन करतो, आणि मला तुम्हाला आणखीही एक गोष्ट सांगायची आहे: जीवन सोपं नसतं; त्यात काही हमी नाही. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल, पण आपण मानवी समाजाचा भाग आहोत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या भेडसावत असतील, तरी आपल्याकडे या समस्यांवर मात करण्याची क्षमताही आहे. यासाठी आत्मविश्वास व आशावाद अत्यावश्यक असतात. तुम्ही तरुण आहात, तुमच्यातही अधिक संयम असणं गरजेचं आहे. तरुणांना काही वेळा तत्काळ गोष्टी हव्या असतात. तुमच्या समोर काही अडथला आला, तर तुमचं मनोबळ खालावतं. “नऊ वेळा अपयश, नऊ वेळा प्रयत्न,” अशी एक तिबेटी उक्ती आहे. तर, ते महत्त्वाचं आहे, हे कृपया लक्षात ठेवा.

आणखी एक: तुम्ही खरोखरच एकविसाव्या शतकातील पिढी आहात. मी विसाव्या शतकातला आहे, आणि इथले काही प्राध्यापक व मंत्रीसुद्धा विसाव्या शतकातीलच असतील, असं मला वाटतं. तर, एकविसाव्या शतकातील केवळ १० वर्षं झालेली आहेत, ९० वर्षं अजून बाकी आहेत. त्यामुळे या शतकाला नवीन आकार देणारे तुम्ही असाल, म्हणूनच तुम्ही त्यासाठी तयारी करायला हवी. अधिक चांगलं, शांततामय जग, सुखी जग निर्माण करण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी असायला हवी, आणि तुमच्याकडे केवळ शिक्षणच नव्हे तर नैतिक मूल्यं असणंही गरजेचं आहे. विसाव्या शतकात, अगदी या शतकाच्या आरंभीही आपण निर्माण केलेल्या बहुतांश समस्या शिक्षणाच्या अभावामुळे नव्हे, तर नैतिक मूल्यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या होत्या, असं मला वाटतं. तर, सुखी, शांततामय जग निर्माण करण्यासाठी शिक्षण व नीतिमूल्यं यांनी हातात हात घालून पुढे जायला हवं.

नीतिमूल्यांच्या अनेक पातळ्या असतात. एक पातळी धार्मिक श्रद्धेची असते. अधिक मूलभूत पातळीवर धार्मिक श्रद्धेविना केवळ सामायिक मानवी अनुभव, सामायिक ज्ञान आणि त्यानंतर ताजे वैज्ञानिक निष्कर्ष वापरून आपली खात्री पटते की, स्नेहशीलता व अधिक खुलेपणा यांतून प्रचंड लाभ होतात, अगदी स्वतःच्या शारीरिक आरोग्यावरही याचा उपकारक परिणाम होतो. प्रत्येक जण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतो. चांगल्या तब्येतीमधील मुख्य घटक असतो मनःशांती. त्यामुळे अधिक करुणामय भावना निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करणं, हा शारीरिक तब्येत चांगली ठेवण्यातील एक सर्वांत महत्त्वाचा घटक असतो आणि सुखी कुटुंब निर्माण करण्यासाठीही तो अत्यंत महत्त्वाचा असतो.

त्यामुळे शिक्षणाच्या बाजूचा विचार करता तुम्हाला उच्च पदवी मिळालेली आहे. आता तुमच्या आंतरिक मूल्यांकडे- म्हणजे खऱ्या मानवी मूल्यांकडे व नीतिमत्तेकडे कृपया अधिक लक्ष द्या. कुलगुरूंनी नीतिमत्तेचा, मानवतावादी दृष्टिकोनाचा उल्लेख केला आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. इतकंच. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

Top