बौद्ध धर्म आणि इस्लाममधील प्रेमभाव: तौलनिक अभ्यास

सर्व धर्मांकडे एक समान उद्दिष्ट असतं                                                             

सर्व धर्म प्रेम, संयम, क्षमाशीलता, आत्मकेंद्री व स्वार्थी वृत्तीवर मात हा एकसम संदेश देतात. ही अशी बाब आहे, जी सर्व धर्मांच्या शिकवणींमध्ये एकसमान असते आणि ती आंतरधर्मीय संवादाचा पाया असते. या मूल्यांच्या शिकवणीच्या पद्धती आणि तत्त्वज्ञान कदाचित भिन्न असेल, पण त्यांचं उद्दिष्ट समान असतं. जगातील सर्व धर्म व्यक्ती आणि समष्टीचं जीवनमान सुधारण्यासोबतच त्यांच्या जीवनात आनंद निर्मिती करण्याचं उद्दिष्टं बाळगतात. हा समान दुवा मानून आणि तत्त्वज्ञानातील वैविध्याचा स्वीकार करून, आज जगाला ज्याची सर्वाधिक गरज आहे, असा धार्मिक सुसंवाद कसा प्रस्थापित करता येईल, हा खरा प्रश्न आहे.   

जेव्हा आपण बौद्ध आणि इस्लामिक जगताच्या संदर्भातून पाहतो, तेव्हा हे दोन्ही धर्म भारत आणि मध्य व दक्षिणपूर्व आशियासारख्या जगातील अनेक भागांमध्ये ऐतिहासिक आणि समकालीन स्थितीतही परस्पर संवादी किंवा आंतरच्छेदित असलेले आढळतात. सध्या अनेक मुस्लिम स्थलांतरित युरोप आणि उत्तर अमेरिकेत स्थलांतरित होत आहेत. या समाज आणि संस्कृतींशी आपला जवळून संपर्क येत आहे. ते ज्यू आणि ख्रिश्चन लोकांशीच संवाद साधत नाहीत, तर बौद्ध धर्मियांशीही संवाद साधत आहेत. आज इथे असलेल्यांपैकी काही जण बौद्ध पार्श्वभूमी असणारे असू शकतात आणि या दोन्ही धर्मांच्या तुलनेत त्यांना कदाचित रस असू शकेल. 

आंतरधर्मीय सुसंवादाच्या संदर्भातून हा परमपूज्य दलाई लामा यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षण हा अशा सुसंवादाचा पाया असल्याचे ते सतत अधोरेखित करतात. जेव्हा लोक इतर धर्मांविषयी अनभिज्ञ असतात आणि बहुतांश वेळा अपप्रसाराची शिकार ठरतात, तेव्हा भीती किंवा गैरविश्वासाची भावना निर्माण होते. तेव्हा लोक त्या संपूर्ण अल्पसंख्याक धर्मगटाला, परमपूज्य ज्याला ‘लबाड’ म्हणतात, तसे समजू लागतात. सर्व समाज आणि धर्मांमध्ये हीच स्थिती असते. 

हे फार दुर्दैवी आहे; त्यामुळे धार्मिक सुसंवादासाठी शिक्षण हाच पाया आहे. शिक्षणाच्या आधारे परस्परांच्या तत्त्वज्ञानाप्रति आदरभाव निर्माण करणं शक्य आहे आणि आपल्यातील समान दुवा असणारे सकारात्मक गुण रूजवणंही शक्य आहे. हे सर्व प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेसारखे सार्वभौम गुण आहेत. त्यामुळे आपण हे दोन्ही धर्म प्रेमाच्या विकासाबद्दल काय म्हणतात, हे पाहण्यासाठी इस्लामपासून सुरुवात करत,या दोन्ही धर्मांचे तुलानात्मक निरीक्षण करू. 

Top