अहिंसा आणि आध्यात्मिक मूल्यं

आधुनिक जगातील अहिंसा व आध्यात्मिक मूल्यं यांवर आज मी बोलावं असं मला सांगण्यात आलं आहे. तुमच्यासारखे विद्यार्थी वैद्यकीय पेशामध्ये व अध्यापनाच्या पेशामध्ये जाण्यासाठी नियोजन करत असतील, अशी माझी समजूत आहे, त्यामुळे तुमच्यासाठी हे विषय खासकरून प्रस्तुत ठरणारे आहेत. तुमच्या कामाचा भाग म्हणून इतरांना मदत करताना तुमच्या बाजूने अहिंसक रितीने मदत केली जाणं निश्चितपणे अतिशय महत्त्वाचं आहे. मदत करणं हे अर्थातच हिंसेच्या विरोधात असतं. तुमची अशी काही आध्यात्मिक मूल्यं असतील, तर तुम्हाला स्वतःचं काम अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी ते सहायक ठरतं. म्हणजे हे फक्त पैसे कमावण्यासाठी नसेल, तर तुम्ही तुमच्या कामातून अर्थपूर्ण रितीने लोकांची प्रत्यक्ष मदत करत आहात, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक मूल्यं सहायक ठरतील.

अहिंसेबद्दल इतर धर्मांप्रमाणे बौद्ध धर्मातही बरंच काही सांगितलेलं आहे; आणि अहिंसा म्हणजे काय, याची व्याख्या भिन्न व्यवस्था स्वाभाविकपणे अनेक भिन्न मार्गांनी करतील. आपण अनेकदा विशिष्ट प्रकारच्या कृतीच्या संदर्भात हिंसेकडे पाहतो, तिला हिंसक कृती म्हणतो आणि अशा प्रकारच्या वर्तनापासून दूर राहणं म्हणजे अहिंसा. पण बौद्ध धर्म याकडे मुख्यत्वे मनाच्या बाजूने पाहतो, यात गुंतलेल्या आपल्या मनस्थितीच्या संदर्भात त्याकडे पाहतो. कारण, आपण एखादी हिंसक प्रकारची कृती केली अथवा नाही, तरी ते आपल्या हिंसक मनातून आलेलं असतं, नाही का? केवळ कोणाला तरी दुखावण्यापासून दूर राहणं, पण मनात मात्र त्यांना इजा पोचवण्याचे अतिशय हिंसक विचार करत राहणं- हे निश्चितपणे योग्य नाही. त्यामुळे हिंसक मनस्थिती समजून घेऊन त्यावर मात करण्याच्या पद्धती शिकणं आवश्यक आहे.

हिंसा व अहिंसेचे तीन प्रकार

बौद्ध शिकवणुकींमध्ये आपण हिंसेचे, हिंसक मनस्थितीचे तीन प्रकार पाडतो. हिंसा या शब्दाचं भाषांतर कदाचित ‘क्रूर होणं’ अशा प्रकारेही करता येईल. हिंसक होण्याबद्दल बोलताना आपण केवळ सक्ती करणं व बळ दाखवणं याबद्दलच बोलत आहोत असं नाही, कारण काही वेळा स्वतःला वा इतरांना इजा पोचवण्यापासून कोणालातरी रोखण्यासाठीसुद्धा आपल्याला बळाचा वापर करावा लागतो. तुमचं मूल रस्त्यावर धावत जात असेल आणि कारची धडक बसून ते सहज मरण पावेल अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असेल तर, “अरे, बाळा रस्त्यावर नको जाऊ” एवढंच म्हणून आपण थांबत नाही. आपण बाळाला थोडं बळ दाखवून, सक्तीने पकडू शकतो. तर, हिंसा म्हणजे फक्त एवढाच अर्थ आपल्याला अभिप्रेत नाही. हिंसा म्हणजे इजा करावीशी वाटणं आणि अनेक वेगवेगळ्या मार्गांनी आपण इजा करू शकतो. तर, बौद्ध धर्मामध्ये याचे तीन प्रकार सांगितलेले आहे, पण आपण अर्थात आणखी प्रकारांचा विचार करू शकतो, याची मला खात्री आहे.

इतरांबाबत अहिंसा

इतरांबाबत हिंसक रितीने विचार करणं ही पहिल्या प्रकारची हिंसा आहे. आपल्यात करुणेचा निष्ठूर अभाव असल्यामुळे आपण इतरांना इजा पोचवायचा किंवा दुखापत करायचा विचार करतो. इतरांनी दुःखापासून व समस्यांपासून आणि त्यामागील कारणांपासून मुक्त व्हावं, अशी इच्छा म्हणजे करुणा. तर, इतरांनी दुःखापासून मुक्त व्हावं अशी इच्छा राखण्याऐवजी त्यांनी दुःखी व्हावं अशी आपली इच्छा होते, त्यांना समस्यांना सामोरं जावं लागावं अशी आपली इच्छा असते, हे आपण घडवू किंवा इतर कोणी घडवेल किंवा निसर्गाचा भाग म्हणून घडेल, पण तसं घडावं ही इच्छा मात्र आपल्या मनात असते. या मनस्थितीवर मात करण्यासाठी आपण असा विचार करायला हवा की, प्रत्येक जण समान आहे, प्रत्येकाला आनंदी व्हायचं आहे, कोणालाही दुःखी व्हायचं नाही.

त्यामुळे कोणी आपल्याला इजा पोचवली किंवा समजा, तुम्ही वर्गात शिकवत आहात आणि एखाद्या विद्यार्थ्याने तुम्हाला इजा पोचवली किंवा इतरांना तो त्रास देत असेल, तर त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा विचार करण्याऐवजी (यात सर्वसाधारणतः राग व उतावीळपणा असतो, आणि ही देखील अस्थिरकारक, अस्वस्थकारक मनस्थितीच आहे)- आपण ते मूल एका अर्थी आजारी आहे असा विचार करणं उपयोगी पडतं. त्या मुलाला सुखी व्हायचं असतं, पण सुखी कसं व्हायचं याची स्पष्ट वा अचूक कल्पना त्याला नसते, त्यामुळे ते अतिशय त्रासदायक रितीने कृती करत असतं, गोंधळलेल्या मनस्थितीने वागत असतं, त्यातून आपण सुखी होऊ अशी त्याची कल्पना असते. तर संबंधित मुलाबद्दल असा दृष्टिकोन ठेवल्याने आपण ते मूल वाईट आहे असा विचार करत नाही आणि त्या मुलाला शिक्षा करत नाही; उलट त्याच्याबद्दल आपल्याला करुणा वाटते, या मुलाने स्वतःच्या गोंधळावर मात करावी, त्याला वर्गात त्रासदायक व खोडकर बनवणाऱ्या कारणांवर मात करावी, अशी आपल्याला इच्छा होते.

आपण काहीच करू नये, केवळ निष्क्रिय राहावं, असा याचा अर्थ नव्हे. अहिंसा म्हणजे निष्क्रिय राहून काहीच न करणं, असं नव्हे. उलट, न रागावणं, या त्रासदायक मुलाला इजा व्हावी अशी इच्छा न करणं, हा अहिंसेचा अर्थ आहे. पण मुलाला त्रासदायक वागण्यापासून थांबवण्यासाठी आपल्याला अर्थातच काहीतरी करावं लागेल. तुमच्या शालेय व्यवस्थेमध्ये स्वीकारार्ह असतील तशा कोणत्याही पद्धती वापरून ते साधावं. पण त्यामागची प्रेरणा, त्यामागची मनस्थिती वेगळी असते. मूल वाईट आहे म्हणून त्याला शिक्षा करावी, अशी इच्छा त्यात नसते.

हा “प्रेरणा” शब्द समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. याचे दोन पैलू आहेत. एक, आपलं उद्दिष्ट व हेतू, आणि दोन, हे उदिद्ष्ट गाठण्यासाठी आपल्याला चालना देणारी भावना. मुलाला मदत करणं हे आपलं उदिद्ष्ट आहे. उदाहरणार्थ, त्यासाठी आपण शिक्षक झालेले आहोत. तुम्ही वैद्यकीय पेशामध्ये गेलात, तरी हीच गोष्ट आहे: रुग्णाची मदत करणं हे आपलं उद्दिष्ट असतं. तर हे उद्दिष्ट साधण्यासाठी आपल्याला चालना देणारी मनस्थिती कोणती असते? केवळ पैसा कमावण्यासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीने आपले आभार मानावेत व आपल्याबद्दल कृतज्ञ राहावं यासाठी हे असेल, तर हा खूपच स्वार्थी उद्देश आहे, नाही का? हे आत्मकेंद्री आहे. अशा वेळी आपल्या विचाराचं लक्ष बहुतांशाने आपल्यावरच केंद्रित असल्याने, आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी काय चांगलं आहे, याकडे सर्वोत्तम लक्ष देत नाही. एखाद्याला शस्त्रक्रियेची गरज नसतानाही तसं सुचवणाऱ्या डॉक्टरप्रमाणे केवळ पैसा कमावण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचं सुचवलं जातं. पण दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अशी प्रेरणा न ठेवता आपण करुणेची प्रेरणा ठेवायला हवी- दुसऱ्या व्यक्तीचा विचार करायला हवा, तिच्या कल्याणाचा, तिच्यासाठी काय सर्वांत योग्य ठरेल, याचा विचार करायला हवा.

वैद्यकीय पेशामध्ये काही वेळा कोणाची मदत करण्यासाठी आपल्याला काहीशा वेदनादायी उपचारांचा अवलंब करावा लागतो: इंजेक्शन, शस्त्रक्रिया यांचा वापर होतो. (शस्रक्रियेतून बरं होणं वेदनादायी असतं). पण ती हिंसक पद्धत नाही, कारण इथे संबंधित व्यक्तीला वेदना पोचवणं हा हेतू नसतो; त्या व्यक्तीला दुःखातून, समस्येतून, आजारातून बाहेर काढून बरं होण्यासाठी मदत करणं, हा हेतू असतो.

शाळेत खोडकर विद्यार्थ्याला शिस्त लावणं गरजेचं असेल, तेव्हा हेच लागू होतं. इथे त्या विद्यार्थ्याला दुखावण्याचा हेतू नसतो. हा माझ्यासारखाच मानव आहे- त्यालाही सुखी व्हायचं आहे, दुःखी व्हायचं नाही- हे लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्याला आपण मदत करू इच्छितो, आणि कदाचित जीवनात अधिक सुखी होण्याचा मार्ग मी त्यांना शिकवू शकतो, दाखवू शकतो. भविष्यात हे मूल कोणत्याही पेशात गेलं, तरी त्याला शिस्त असणं, इतरांशी सहकार्याने वागणं, उपराकरच ठरणार आहे. कोणालाही व प्रत्येकाला भविष्यात या गोष्टी उपकारक ठरतील.

शिस्त म्हणजे आत्मनियंत्रण. त्या मुलाला खोड्या काढायच्या असतील, तेव्हा त्या मुलाला स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकवा. तर, मुलाला शिस्त लावत असताना, त्यांनी स्वतः स्वतःला शिस्त लावून घ्यावी हे शिकवण्याचा आपला हेतू, आपलं उद्दिष्ट असतं. आणि मुलाला शिस्त लावताना आपली मनस्थिती अशी असेल, तर ही जाणीव त्या मुलापर्यंतही पोचते. एखादा पालक मुलाला शिस्त लावत असल्यासारखं ते होतं; पालकाविषयी मुलाच्या मनात तिरस्काराची भावना उत्पन्न होत नाही, हो ना?

तर, आपण दुसऱ्यांना मदत करण्याच्या पेशांमध्ये, वैद्यकीय किंवा शिक्षकी पेशांमध्ये जाणार असू, तर आपण हे शिकून घ्यायला हवं- आपली प्रवृत्ती प्रेमळ, करुणामय असावी, आणि रुग्णांनी, विद्यार्थ्यांनी अधिक सुख, अधिक चांगलं जीवन जगावं, समस्यांपासून मुक्त व्हावं, यासाठी आपण त्यांना मदत करू इच्छितो. आणि बाहेरून अर्थातच व्यावसायिक असावं, म्हणजे गंभीर असावं आणि काही वेळा बऱ्यापैकी कठोर असावं. अशा प्रकारे आपण आपला पेशा अहिंसक रितीने चालवू शकतो- हा अहिंसेचा पहिला अर्थ होतो.

तर करुणेअभावी इतरांना हानी पोचवण्याची इच्छा राखण्याऐवजी आपण करुणेने विचार करावा आणि त्यांनी इजेपासून मुक्त व्हावं, दुःखापासून मुक्त व्हावं, अशी इच्छा राखावी. कोणाला मदत करण्याच्या सर्वोत्तम पद्धती कोणत्या आहेत, हे जाणून घेणं खरोखरच खूप अवघड आहे. प्रत्येक मूल, प्रत्येक रुग्ण एक व्यक्ती असते. याचा असा अर्थ होतो की, एका व्यक्तीला जे लागू पडेल, ते दुसऱ्या व्यक्तीला लागू पडेलच असं नाही. त्यामुळे डॉक्टर म्हणून प्रत्येक रुग्णाच्या आणि शिक्षक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिगततेचा आदर राखणं अतिशय महत्त्वाचं असतं. दररोज आपल्याला अनेक रुग्ण तपासावे लागत असतील आणि शाळांमधील पटसंख्या इतकी वाढलेली आहे, अशा वेळी हे साधणं तितकंसं सोपं नाही. पण प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या ओळखणं शक्य नसलं, तरी इथेही मनस्थिती महत्त्वाची आहे, त्यांना व्यक्तीशः ओळखण्यात आपल्याला रुची वाटायला हवी. त्यांच्यात रुची घेणं हे त्यांचा आदर करण्यावर आधारलेलं असतं. तुमचा एखादा जवळचा मित्र किंवा नातलग- तुमचं मूल, तुमचे पालक, तुमचा भाऊ किंवा बहीण, किंवा कोणीही, यांच्याशी त्यांच्या व आपल्या वयानुसार तुम्ही ज्या प्रकारे रुची घेऊन पाहाल व त्यांना जसा आदर द्याल तसाच इतरांना द्यायचा प्रयत्न करा.

ही व्यक्ती माणूस आहे आणि माझ्यासारख्याच भावना तिलाही आहेत, हे लक्षात ठेवणं कायम अतिशय उपयुक्त ठरतं, हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे, असं मला वाटतं. मला सुखी व्हायचं असतं, तसं त्यांनाही सुखी व्हायचं असतं, आणि मी लोकांना आवडावं असं मला वाटतं, तसंच त्यांना ते लोकांना आवडावेत असं वाटतं. मी त्यांच्याविषयी क्रूर विचार केले व क्रूरपणे वागलो, आणि त्यांच्याबाबतीत भावनाशून्य राहिलो, तर ते दुखावले जातील. माझ्याशी कोणी असं वागलं तर मीही दुखावेनच. तर, इतरांचा आदर करण्याची ही समज व्यक्ती म्हणून खूप, खूप महत्त्वाची असते.

स्वतःबाबत अहिंसा

दुसऱ्या प्रकारची अहिंसा आपण आत्ता स्पष्ट करत होतो त्याच्याशी थोडी संबंधित आहे, कारण इथे आपण स्वतःबाबतच्या अहिंसेबद्दल बोलणार आहेत (पहिल्या प्रकारची अहिंसा इतरांबाबतची असते). आणि इथे आपण आत्मविघातक होण्याबद्दल बोलणार नाही आहोत. आपण आत्मविघातक असतो, तेव्हा आत्मप्रेमाच्या अभावामुळे आपण स्वतःला दुखापत करायची किंवा इजा पोचवायची इच्छा राखून असतो. स्वतःला इजा पोचवणं सहेतूक असू शकतं किंवा निर्हेतूक असू शकतं. उदाहरणार्थ, “मी वाईट आहे”, “मी चांगला नाहीये”, “मी पुरेसा चांगला नाहीये” अशा विचारांनीदेखील हे साधतं.

विशेषतः आपण डॉक्टर असलो आणि आपला एखादा रुग्ण प्राण सोडत असेल, आणि तसं घडणं अपरिहार्य झालं असेल, तर “मी किती भयंकर डॉक्टर आहे, मी किती वाईट आहे” असा विचार करणं आणि नंतर अपराधी वाटून स्वतःला या ना त्या मार्गाने शिक्षा करणं- आपण कोणाला तरी मदत करू शकलो नाही, त्यामुळे ती व्यक्ती मरण पावली असं मानून स्वतःला मानसिक व भावनिक त्रास करून घेणं, अशी ही प्रक्रिया घडते. आपण डॉक्टर किंवा शिक्षक होणार असलो, तर या गोष्टींसाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. आपण बुद्ध नाही; आपण प्रत्येकाची मदत करू शकत नाही- अगदी बुद्धालाही प्रत्येकाची मदत करता आली नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे काही वेळा आपण अपयशी ठरतो. आपल्याला एक तर रुग्णावर उपचार करणं शक्य होत नाही किंवा मुलाला शिकवणं शक्य होत नाही. पण हे वास्तवाचं स्वरूप आहे. कोणाला तरी मदत व्हायची असेल, तर त्यांनीदेखील स्वीकारवृत्ती ठेवणं गरजेचं असतं. काही आजारांवर आपण उपचार करूच शकत नाही आणि तसं शक्य असतं तरी कधीकधी आपली चूक होते; शेवटी आपण माणूस आहोत. काही विद्यार्थ्यांना गंभीर भावनिक व सामाजिक समस्या असतात- कौटुंबिक समस्या असतात, अशा वेळी त्यांना खरोखरची मदत करणं आपल्या क्षमतेबाहेरचं असतं.

तर, आपण आत्मविघातक कोणत्या रितीने होतो, निराळ्या शब्दांत सांगायचं तर आपण स्वतःबाबत हिंसक कसे होतो, याचा विचार करायला हवा. उदाहरणार्थ, आत्मविघातक होण्याचे मार्ग म्हणजे स्वतःला जास्त कष्ट करायला लावणं, “मी अत्यंत परिपूर्ण व्हायला हवं,” असा विचार करणं. वास्तविक हे अशक्य असतं. आपण जे काही करतो आहोत त्यात शक्य तितकं चांगलं व्हायचा प्रयत्न करू शकतो, पण कोणीच परिपूर्ण नसतं. त्यामुळे कशात ना कशात तरी आपण अयशस्वी होतो, स्वाभाविकपणे आपल्याला त्याची खंत वाटते- आपल्याला भविष्यात त्याहून चांगली कामगिरी करायची इच्छा असते- पण त्या कारणावरून भयंकर निराशेत जाता कामा नये, कारण निराश झाल्यास आपण आपल्याच कामाला इजा पोचवू, आपल्या कामातील परिणामकारकतेला इजा पोचवी.

आता तुम्ही कदाचित म्हणाल की, “मी निराश होण्यापासून किंवा खूप दुखावल्यासारखं वाटण्यापासून स्वतःला कसं थोपवू?” समजा, तुमचा एक विद्यार्थी चांगली कामगिरी करतो आहे, पण काही कारणासाठी त्या विद्यार्थ्याने शाळा सोडली. स्वाभाविकपणे तुमच्यासाठी हे दुःखद असेल, पण अशा वेळी निराश न होणं आवश्यक आहे. इथे प्रश्न असा असतो की: आपण स्वतः निराश न होण्यासाठी काय करावं? इतरांशी वागण्यासंदर्भात आपण जे काही बोलत होतो, त्यासारखंच हे आहे. इतरांना खरोखर मदत करण्यासाठी आणि त्यांची हानी होऊ नये यासाठी त्यांचा आदर ठेवणं ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयीसुद्धा आदर ठेवायला हवा. त्याची सतत पुष्टी करायला हवी: “माझ्याकडे क्षमता आहे, अन्यथा मी शिक्षक अथवा डॉक्टर झालो नसतो.” स्वतःच्या प्रेरणेची पुष्टी करावी: “मी करतोय ते काम मी करतोय. माझा हेतू चांगला आहे.” आणि “माणूस म्हणून मी परिपूर्ण नाही; तरीही मी सर्वोत्तमासाठी प्रयत्न करण्याकरिता मी स्वतःचा आदर ठेवतो.” यातून आपण निराश होणं टाळतो.

आपण स्वतःची प्रामाणिकपणे तपासणी करतो आणि आपण सर्वोत्तम प्रयत्न करत नव्हतो असं आपल्या लक्षात येतं तेव्हा काय होतं? मी याहून चांगली कामगिरी करू शकलो असतो. तर, अशा परिस्थितीत आपल्याला निश्चितपणे खंत वाटते आणि त्याचीही पुष्टी करणं गरजेचं आहे: “भविष्यात मी अधिक कष्टपूर्वक प्रयत्न करेन.” पण सर्वोत्तम प्रयत्न करण्यात अपयश येऊ नये यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठी आपण यामागील कारणांची तपासणी करणं गरजेचं आहे. मी खूप थकल्यामुळे हे झालं असावं. त्यामुळे इथेही आपण स्वतःबाबतीत दयाळू असायला हवं, आत्मविघातक असू नये. विश्रांतीच्या बाबतीत आपल्या गरजा काय आहेत- माझ्या मर्यादा काय आहेत- हे आपण जाणणं गरजेचं आहे, आणि त्याचा आदर ठेवावा. त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये. प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात. आणीबाणीच्या वेळी अर्थातच आपण आणखी काही करू शकतो, पण प्रत्येक वेळी काही आणीबाणी नसते. आणि काही वेळा “मला विश्रांती गरजेची आहे” असंही म्हणावं लागतं, आणि मग शक्य असेल तर विश्रांती घ्यायचा प्रयत्न करावा. काही वेळा ते शक्य नसेलही, पण शक्य असेल तर अपराधी न वाटून घेता विश्रांती घ्यावी.

आपण व्यवसाय सांभाळत कुटुंबाकडेही लक्ष देत असलो, तर समतोल साधण्याच्या प्रयत्नात असं करणं सोपं नसतं. मुलांच्या, आपल्या स्वतःच्या मुलांच्या गरजा मोठ्या असतात. पण हे प्राधान्यक्रमावर असायला हवं- आपण स्वतःचं वेळापत्रक कसं लावावं, इत्यादी, जेणेकरून माझे कष्ट अति होणार नाहीत, मी अति थकून जाणार नाही आणि कोणतंही काम मी चांगलं करत राहीन. मोडून पडेपर्यंत नुसतं चालतच राहू नये. स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करणं, हेदेखील स्वतःविरोधात हिंसक होणंच आहे. आणि स्वतःबाबत अहिंसक होणंही अतिशय महत्त्वाचं आहे.

इतरांच्या दुर्दैवामध्ये आनंद मानू नये

इतरांच्या दुर्दैवामध्ये आनंद न मानणं, हा अहिंसेचा तिसरा प्रकार आहे. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, याला क्रूर मानलं जातं- आपण हिंसेचा विचार क्रूर मनस्थितीच्या संदर्भात केला, तर इतरांच्या अडचणींचा, कोणी अपयशी ठरल तर त्याचा आनंद मानणं ही क्रूर मनस्थिती आहे. “बरं, मी काही असं करत नाही,” असं आपल्याला वाटणं शक्य आहे. पण तुम्ही राजकारणाचं उदाहरण विचारात घेतलंत, तर तिथे दोन उमेदवार असताना तुम्हाला न आवडणाऱ्याचं पद गेलं- तो निवडणुकीत हरला किंवा त्याला काढून टाकण्यात आलं- तर आपल्याला त्याबद्दल अतिशय आनंद होतो. त्यांच्या दुर्दैवी अवस्थेचा आपल्याला आनंद होतो, नाही का? त्याचप्रमाणे अशा परिस्थितीत, आपल्याला दुसऱ्या कोणाला तरी पद मिळाल्याचं चांगलंही वाटत असतं, त्यांच्या सुखात आपण आनंदही मानत असतो, पण इतर व्यक्तीच्या पराभवाचा आनंद मानू नये, कारण त्यांनाही निःसंशयपणे कुटुंब आहे, त्यांच्यावरही कोणीतरी अवलंबून असणार आणि त्यांना दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो आहे- तीही माणसंच आहे. तर, ते पदावर नसल्याचा मला आनंद आहे, पण त्यांनाही जीवनात सुख लाभावं अशी माझी इच्छा असावी. त्यांचं वाईट होण्याची इच्छा मी बाळगू नये.

तर, ही तीन प्रकारची अहिंसा तीन प्रकारच्या क्रूर विचारप्रक्रियेवर, क्रूर विचारांवर मात करते, हे आपण पाहिलं:

  • करुणेचा अभाव: इतरांनी दयनीय व दुःखी अवस्थेत राहावं, अशी इच्छा.
  • स्वतःविषयी प्रेम नसणं: स्वतःला जाणीवपूर्वक किंवा अजाणता इजा पोचवण्याची इच्छा.
  • इतरांच्या दुर्दैवात आनंद मानणं: कोणाचा तरी पराभव झाला किंवा कोणाचं काही भयंकर झालं की त्याचा आनंद वाटणं.

मी म्हणालो त्याप्रमाणे, आपण ज्या प्रकारची कृती करतो हे हिंसक न होता अधिक सबळ होतं. एका बौद्ध सूत्रामध्ये याचा अभिजात दाखला दिलेला आहे. एका नदीकाठी दोन साधक बसले होते. तेव्हा एक माणूस नदीपाशी आला- आणि या नदीचा प्रवाह खूप वेगवान होता- तर, त्या माणसाला पाण्यात उडी मारून पोहत पलीकडच्या तीरावर जायचं होतं. अशा प्रकारच्या नदीमध्ये खरोखर कोणीच पोहून पलीकडे जाऊ शकणार नाही. जो कोणी असा प्रयत्न करेल तो निश्चितपणे बुडेल. तर, एक साधक चेहऱ्यावर अतिशय शांत भाव ठेवून तिथे नुसता बसून राहिला आणि त्याला काहीच करायची इच्छा नव्हती- त्या व्यक्तीला नदीत उडी मारायची तर मारू दे, त्यात तो निश्चित बुडेल. आणि दुसरा साधक उठला, पण या नदीत उडी मारू नये असं तो त्या माणसाला पटवून देऊ शकला नाही, आणि नदीत जाण्यापासून थांबवण्यासाठी साधकाने त्या माणसाला ठोसा लगावून बेशुद्ध केलं. बुद्धाने हे सर्व पाहिलं (बुद्ध तिथून येत होता, तेव्हा त्याने हे सर्व पाहिलं) आणि चेहऱ्यावर स्मित ठेवून शांतपणे बसलेल्या साधकाला तो म्हणाला की, त्याने हिंसक कृती केली आहे. एखाद्या व्यक्तीने स्वतःला इजा पोचवू नये यासाठी त्या व्यक्तीला ठोसा लगावणं, ही अहिंसक कृती होती. का? प्रेरणा, मनस्थिती- त्या व्यक्तीला दुःख होऊ नये आणि तो बुडून जाऊ नये, यासाठी त्याला मदत करण्याची इच्छा, हे त्यामागील कारण.

आध्यात्मिक मूल्यं

हे सगळं आपल्या आजच्या विषयाच्या दुसऱ्या भागाशी जुळणारं आहे- आधुनिक जगातील आध्यात्मिक मूल्यं. “आध्यात्मिक” या शब्दाची व्याख्या करणं अवघड आहे, आणि त्यात अर्थातच भिन्न अर्थछटा आहेत, किंवा इंग्रजी व रशियन यांमधील अर्थछटा निःसंशयपणे भिन्न आहेत. पण बौद्ध संदर्भात याची व्याख्या कशी होते ते पाहू किंवा समांतर शब्द कोणता असेल त्याचा विचार करू. बौद्धविचारात आपण धर्माविषयी बोलतो. आणि “धर्म” म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. दुःख व समस्या टाळण्यासाठी आपण जे काही करतो, ते धर्म. याचा अर्थ केवळ तात्कालिक परिस्थितींच्या संदर्भातच विचार करायचा असतो असं नव्हे- म्हणजे आपण कार चालवत असलो किंवा सायकल चालवत असलो, आणि कशाला तरी धडक बसायची ते टाळण्यासाठी आपण बाजूला होतो, तेवढंच नव्हे. तो धर्म नव्हे.

आपण करतो त्या तात्कालिक दैनंदिन गोष्टींपुरतं हे बोलणं नाही. त्याला आपण आध्यात्मिक म्हणत नाही. उलट, भविष्यातील काहीतरी थोपवण्याच्या संदर्भात केलेला हा विचार असतो. बहुतांश धर्मांमध्ये, यात बौद्ध धर्मही आला, भविष्यातील जीवनासंदर्भातील विचार असतो, आणि काही धर्मांमध्ये हे जीवनसंपल्यानंतरच्या अवकाशाविषयीचा विचार असतो. म्हणजे केवळ या जीवनकाळातील भौतिक यशाचीच मुख्य आस्था बाळगू नये, कारण मृत्यूवेळी हे सगळं मागे पडणार आहे आणि भविष्यातील प्रचंड मोठ्या काळाच्या तुलनेत हा जीवनकाळ अतिशय छोटा आहे.

भविष्यातील पुनर्जन्म किंवा जीवनोत्तर अवकाशावर आपला विश्वास असेल तर हे ठीक आहे, पण आपल्यापैकी अनेकांचा असा विश्वास नसतो. तरीही आपण आध्यात्मिक लोक असू शकतो का? आपण केवळ या जीवनकाळातील भौतिक कल्याणाबाबत, केवळ व्यक्तीशः माझ्या व बहुधा माझ्या कुटुंबाच्याही कल्याणापुरता विचार मी करत नसेल, आणि अधिक दीर्घ काळाच्या टप्प्यात विचार करत असेन- उदाहरणार्थ, भावी पिढ्यांचा विचार करत असेन, तर आपण निश्चितपणे आध्यात्मिक असू शकतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपल्याला ज्या प्रकारचं थोडंफार योगदान देणं शक्य असेल, त्यातून जग अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा. इथेही बुद्धाने वापरलेलं उदाहरणं असं आहे: तांदळाने भरलेलं मोठं पोतं तांदळाच्या प्रत्येक दाण्याने भरलेलं असतं. तर, आपल्यापैकी काही जण त्या पोत्यात मूठभर तांदळाचं योगदान देऊ शकती आणि काहींना केवळ तांदळाचा एक दाणाच भरता येईल, पण हे दोन्ही लोक योगदान देत आहेत. हा मुद्दा आहे. आपण फारसं योगदान देऊ शकत नाही, असं आपल्याला वाटत असेल, तरी आपण किमान प्रयत्न करावा.

तर, तुम्ही शिक्षक किंवा वैद्यकीय कर्मचारी होण्यासाठी प्रशिक्षण घेत असाल, तर हे जग अधिक चांगलं करण्यामध्ये योगदान देण्यासंदर्भात विचार करण्याची मोठी संधी तुमच्याकडे असते. शिक्षक म्हणून तुम्ही लोकांना प्रशिक्षित करत असता, ते भविष्यात जाऊन कदाचित स्वतःचं योगदान देण्याची आशा असते. डॉक्टर म्हणून तुम्ही आजारी लोकांना बरं व्हायला मदत करत असता जेणेकरून ते भविष्यात योगदान देत राहू शकतील. तर, त्यांनी सुखी व्हावं, दुःखी होऊ नये, याच्याशी हे अगदी घट्ट जोडलेलं आहे. त्यांच्याबद्दल हिंसक किंवा क्रूर विचार करू नये, आणि त्यांचा आदर करावा. “मी भविष्यासाठी योगदान देऊ शकतो” या संदर्भात आपण स्वतःचा आदर ठेवतो, आणि “ते योगदान देऊ शकतात” अशा संदर्भात आपण आपल्या रुग्णांचा, आपल्या विद्यार्थ्यांचा आदर ठेवतो. योगदान म्हणजे तरी काय? जग अधिक चांगलं करणं म्हणजे काय? लोकांनी अधिक सुखी होण्यासाठी काही मार्गांना चालना देणं, असा याचा अर्थ होतो. अधिक सुखी होणं याचा अर्थ केवळ भौतिक पातळीपुरता नाही- तेही महत्त्वाचं आहे, पण मनाची शांतता लाभणं, आणि केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर भावनिक कौशल्य वापरून जीवनात सामोरं येणाऱ्या गोष्टी हाताळण्याची क्षमता राखणं, असा त्याचा अर्थ होतो.

तर, याला मी आध्यात्मिक मूल्यं मानतो; निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपण स्वतःच्या जीवनात काय महत्त्वाचं मानतो आणि आपण आपल्या जीवनाचं काय करतो आहोत, या संदर्भात केलेला विचार म्हणजे आध्यात्मिक मूल्यं. थोडक्यात, विशेषतः तुमच्यासारख्या तरुण व्यक्तींनी प्रेरणेविषयी अतिशय गांभीर्याने विचार करणं खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. मी ज्याचा अभ्यास करतो तो का करतोय? मला आयुष्यात काय साधायचं आहे? मला भविष्यात माझ्या कुटुंबासाठी काय साधायचं आहे? मला भविष्यासाठी- भावी पिढ्यांसाठी अखेरीस काय सोडून जायचं आहे? आणि मला हे का हवं आहे? यासाठी खूप आंतरिक शोध घ्यावा लागू शकतो, पण तसं करणं अतिशय अर्थपूर्ण ठरेल. या प्रश्नांना आपण देत असलेली उत्तरं फारशी समाधानकारक नाहीत, असंही आपल्याला वाटू शकतं. आणि “मला स्वतःची प्रेरणा दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे की नाही” हे ठरवण्यासाठी आपण असा निकष वापरावा: मी जे काही करतोय त्याने मला व इतरांना सुख वाटेल का, की यातून केवळ अडचणीच निर्माण होतील? याचं मूल्यमापन करण्यासाठी, दीर्घकालीन परिणामांचा विचार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, केवळ अल्पकालीन विचार पुरेसा नाही. पण आपण आयुष्यात काय करतोय याबद्दल आपल्याला स्पष्टता असेल, तर आपण जीवनात योग्य दिशेने जात असल्याचं आपल्याला कळतं, यातून आपल्याला स्वास्थ्याची व समाधानाची विलक्षण जाणीव होते.

आपल्या जीवनाला काही अर्थ नाही, काही दिशा नाही, असं लक्षात आल्याने लोक काही वेळा निराश होतात, असा एक घटक मला लक्षात येतो. आपण एखाद्या पेशात असतो, पण आपलं मन त्यात लागत नाही. जगातील समस्या, माझ्या देशातील समस्या, माझ्या जिल्ह्यातील समस्या, माझ्या कुटुंबाच्या समस्या, माझ्या समस्या- हे सगळं खूप, खूप जास्त भयंकर आहे, असं आपल्याला वाटतं. आणि या सगळ्याला काय अर्थ आहे- अशा मनस्थितीत आयुष्य जगण्याला काय अर्थ आहे? हे अर्थातच खूप दुःखद आहे; हे काही सुखी जीवन नव्हे. त्यामुळे इथेही पुन्हा निराश भावनेवर मात करण्यासाठी आपण स्वतःचा आदर ठेवणं गरजेचं आहे. “बाह्य परिस्थितीच्या अलाहिदा, मी स्वतःमध्ये सुधारणा घडवण्याची, स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याची क्षमता राखून आहे” याची पुष्टी करणं गरजेचं आहे. हे केवळ स्वतःला अधिक सुखी माणूस करण्यासाठी महत्त्वाचं आहे असं नाही, तर माझ्या संपूर्ण मनस्थितीचा माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकावर परिणाम होत असतो. त्यामुळे वैद्यकीय दृष्टीने किंवा शिक्षणासंदर्भात इतरांना मदत करणं... ही एक अर्थपूर्ण कृती आहे. भविष्य कसं असेल हे आपल्याला माहीत नसतं, पण लोकांचं आरोग्य चांगलं असेल, लोक शिक्षित असतील, तर काही आशा आहे, गोष्टी चांगल्या होतील अशी आशा असते. याची कल्पना करणं कदाचित अवघड असेल. पण भविष्यात आणखी अडचणी आल्या, तरी लोकांनी त्यासाठी सुसज्ज असावं, याकरिता आपण त्यांना मदत करू शकतो.

आधुनिक जगातील अहिंसा व आध्यात्मिक मूल्यं यांबद्दलचे माझे विचार हे असे आहेत.

प्रश्न

आपल्या आधुनिक जगामध्ये, बौद्ध मूल्यांमध्ये करुणा आहे, हे अर्थातच आम्हाला कळतं. पण वास्तव जीवनात परिस्थिती खरोखरच अवघड असते आणि काही वेळा मुलं पालकांविना वाढतात आणि मग रानवट होतात. आमच्यासाठी, आम्ही शिक्षक असलो, तर करुणेची आवश्यकता त्यांच्या समोर सिद्ध करून दाखवणं अतिशय अवघड होतं. दुर्बल लोकांचं संरक्षण कसं करावं, त्यांना इजा का पोचवू नये आणि दुर्बल असलेल्या लोकांबाबत रानवटपणे वागू नये, हे त्यांना शिकवणं अवघड जातं. त्यामुळे शिक्षक म्हणून आम्ही हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत, विशेषतः हिंसक असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत, अतिशय अवघड आर्थिक व सामाजिक परिस्थितींमध्ये वाढलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोचवावा?

अशा रानवट मुलांना देण्याची वा दानाची, मदतीची संधी द्यावी आणि त्यांना दानातून उदार होता यावं, यासाठी प्रयत्न करणं, ही एक पद्धत मला दिसते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, समजा कोणाला (उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला) दुसऱ्या मुलांना संधी द्यायची मुभा दिली- म्हणजे पेपर देणं किंवा काही असाइन्मेन्ट देणं, किंवा उदार असं काही त्यांना करायला दिलं- तर त्यातून इतरांना मदत होते. यातून त्या मुलाला स्वतःची क्षमता जाणवते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, एखादं मूल अतिशय अवघड परिस्थितीतून आलं असेल, आणि त्याला पुरेसं प्रेम मिळत नसेल, तर नाकारलं गेल्याची ही भावना ते मूल अतिशय अंदाधुंद वागण्यातून व्यक्त करत असतं. “माझी पार्श्वभूमी चांगली नाही, म्हणून मला एकंदर जीवनात चांगलं मानलं जाणार नसेल, तर मी किती चांगला नाहीये ते सगळ्यांना दाखवून देईन,” असं तो एका अर्थी म्हणत असतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ते असामाजिक असल्याचं नाटक करतात, आपण समाजाचा भाग नाही, आपण गुन्हेगारीत जाऊ, इत्यादी बनाव रचतात. हे अगदी नमुनेदार आहे. पण त्यांना ते चांगली व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे देण्यासारखं काहीतरी आहे- अगदी चांगल्या, किंवा कार्यक्षम मार्गाने नाही, तरीही काहीतरी देण्यासारखं आहे- हे दाखवायची संधी दिली, तर आपण केवळ नकारात्मक कृती न करता सकारात्मक कृतीही करू शकतो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते.

बौद्ध दृष्टिकोनानुसार, अशा देण्यातून एका प्रकारची सकारात्मक शक्ती वा गुण तयार होतात. पण आपण याचं बौद्ध स्पष्टीकरण द्यायला हवं असं नाही. मी जे काही सांगितलं ते काही वेळा मानसिक अर्थाने मदतीचं ठरू शकतं, असं मला वाटतं. पण त्यांना काहीतरी सकारात्मक वा रचनात्मक करायला देताना ही शिक्षा नसेल अशी समज ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

जीवनात अनेकदा आपल्यावर कोणाला तरी शिस्त लावायची वेळ येते. पण आपण कोणाला तरी पुन्हा शिस्त लावण्याचा प्रयत्नही करतो, त्याला पुनर्शिस्तीची प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेमध्ये शिस्त लावली जाणाऱ्या व्यक्तीसाठी काय सर्वाधिक लाभदायक असतं- शिक्षा की सामाजिक कार्यासारखं काही काम? की, काही मूल्यशिक्षण लाभदायक असतं? समजा, तुरुंगातील लोक असतील, गुन्हेगार असतील- म्हणजे आपली मुलं नसलेल्या लोकांना शिस्त लावायची असेल तेव्हा?

याचं उत्तर सरसकटपणे देणं अवघड आहे, कारण प्रत्येक जण व्यक्ती असते. व्यक्तीशः मी तुरुंगात शिकवण द्यायला कधी गेलेलो नाही, पण माझे अनेक सहकारी, बौद्ध सरकारी गेलेले आहेत. तर, त्यांना एक अशी गोष्ट जाणवली की, तुरुंगातील अनेक लोक, अर्थातच प्रत्येक जण नव्हे.... त्यासाठी बराच वेळ लागतो, कारण त्यांच्याकडे स्वतःच्या जीवनाची तपासणी करण्यासाठी बराच वेळ असतो- आपल्या जीवनाबाबत ते काय करत आहेत आणि त्यांना जीवनात काय हवं आहे, हे तपासायला वेळ असतो. आणि काही कैद्यांना स्वतःचा राग हाताळणं, स्वतःच्या हिंसक प्रेरणा हाताळायला शिकणं यामध्ये खरोखरच रस असतो, त्यामुळे ते चित्त शांत करणाऱ्या बौद्ध साधनेच्या प्राथमिक प्रकारांबाबत स्वीकारशील असतात. उदाहरणार्थ, श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्याबाबतची साधना ते शिकून घेतात. तर, अशा प्रकारच्या मदतीचा स्वीकार या व्यक्ती करतात. प्रत्येक जण मदतीबाबत स्वीकारशील असेलच असं नाही, आणि ते स्वीकाराला तयार नसतील तर आपण त्यावर फारसं काही करू शकत नाही. त्यांना स्वतःचं जीवन बदलायची किंवा सुधारायची इच्छा नसेल तेव्हा त्यांना केवळ शारीरिक शिक्षा करत राहिल्याने त्यांच्यात अधिकाधिक वैर व संताप निर्माण होतो.

मानसशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे काही प्रकार इथे थेट लागू होणारे नसतीलही कदाचित, पण तुम्हाला कल्पना देण्यासाठी नोंदवतो: एखादं मूल, सर्वसाधारणतः पौगंडावयीन मूल, काहीच सहकार्य करत नसेल आणि खूप मस्तीखोर असेल, आणि ते एका लोकांच्या गटासोबत प्रवासाला जातं, आणि एक नेता असतो, आणि त्यांच्यासोबत एक खेचर असतं. खेचर अर्थातच सर्वाधिक हट्टी प्राणी आहे आणि आपल्याला जे हवं ते त्याच्याकडून करवून घेणं सर्वाधिक अवघड जातं. आणि या लोकांवर त्या खेचराची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांना ते हाताळावंच लागतं, अशा वेळी स्वतःच्या संतापावर आणि उतावीळपणावर मात करणं त्यांना शिकावं लागतं, काहीही करून या खेचरासंदर्भात काम करावं लागतं. याचा अर्थ त्यांच्यावर काहीएक रचनात्मक जबाबदारी देणं- खेचराला काही काम देणं, हा एक उपाय असतो.

तर, काही वेळा एखाद्या प्राण्याची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांवर दिली तर ती... प्राणी त्यांच्यावर टीका करत नाहीत; लोक त्यांच्यावर टीका करतात. एखादा कुत्रा असेल... त्याला तुम्ही कितीही शिस्त लावायचा प्रयत्न केला, तरी त्याला तुम्ही आवडताच. तर, मुलांना दुसरं काहीतरी सांभाळायला देणं, इथे या संदर्भात कुत्रा सांभाळायला देणं, यातून सकारात्मक परिणाम होऊ शकतो, संबंधित मूल शांत होऊ शकतं, काहीएक जबाबदारी घेऊ शकतं. पण काही लोक अर्थातच खूप हिंसक असतात आणि त्यांना... त्यांना तुम्ही कुत्रा दिलात, तर ते कुत्र्याचा छळ करतील, त्यामुळे अशा बाबतीत सावध राहावं लागतं.

माझी एक मैत्रीण मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि ती मुख्यत्वे हिंसक पौगंडावयीन मुलांवर काम करते- बेघर असणारी, रस्त्यांवर राहणारी ही मुलं असतात आणि त्या जगण्यातून येणाऱ्या सर्व अडचणींना ती सामोरी जात असतात. तर, या कामात ती एक मार्गदर्शक तत्त्व पाळते, ते तिने मला सांगितलं होतं. इथेही पुन्हा आपण मगाशी बोलत होतो तोच विषय येतो- या हिंसक असलेल्या मुलांमध्ये माणूस म्हणून रस घ्या, त्यांना आदर द्या. त्यांना गांभीर्याने घ्या. त्यांचं ऐकून घ्यायला वेळ द्या आणि त्यांच्या समस्या जाणून घ्या. पण त्यांचं ऐकत असताना “तुझी वेळ संपलेय, आता गेलास तरी चालेल” असं मात्र कधीही म्हणू नका, त्यातून तुम्ही त्यांना टाळताय असं वाटू शकतं. यात नकार वाटत असल्यामुळे अशा वेळी ते अत्यंत हिंसकतेने वागण्याची शक्यता असते.

तर, यातील धडा असा: तुम्ही एखाद्या मस्तीखोर विद्यार्थ्याला सामोरं जात असाल, तर त्या विद्यार्थ्याला त्याचा वेळ घेऊ द्या. त्या विद्यार्थ्याचं ऐकून घ्या. त्याच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा. (यात तुम्हाला उपाय सुचला नाही, तर तुम्ही सहानुभूतीने त्याचं ऐकून घेतलंत, याचीदेखील मदत होते.) पण तुम्ही यावर वेळेचं बंधन घातलं नाहीत, आणि त्या मुलाला मानव म्हणून आदर दिलात, तरच याचा उपयोग होतो.

पण प्रत्यक्षात त्यांना शिस्त लावण्यासाठी काय करावं, इत्यादी सांगणं खूप अवघड आहे. तुमच्या समाजामध्ये काय स्वीकारार्ह आहे व काय अस्वीकारार्ह आहे, हे मला माहीत नाही. पण केवळ शिक्षा करणं, विशेषतः संतापून शिक्षा करणं उपकारक ठरणार नाही.

लोकांसोबतच्या दैनंदिन संबंधांमध्ये आपण त्रस्ततेवर मात कशी करायची?

आपल्याला अप्रिय वाटणाऱ्या, त्रासदायक वाटणाऱ्या कोणत्याही घटनेचं आपण विश्लेषण केलं, तर आपल्या असं लक्षात येतं की ही घटना अनेक, अनेक भिन्न कारणांमुळे, व परिस्थितीमुळे- सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, संबंधित लोकांच्या घरी काय सुरू आहे, त्यांची पार्श्वभूमी कोणती आहे, इत्यादी अनेक गोष्टींमुळे घडत असतात. आपण त्रस्त होतो किंवा संतापतो, तेव्हा आपण ती घटना, किंवा आपल्याला त्रस्त करणारं जे काही असेल ते वेगळं करतो आणि एका मोठ्या भयंकर सैतानाच्या रूपात त्याकडे पाहतो. त्याला आधारभूत असणारी कारणं व परिस्थिती यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि प्रत्यक्षात असतील त्याहून अधिक नकारात्मक वैशिष्ट्यं त्यावर लादतो. आणि आपल्याला ती परिस्थिती तशी नको असते, त्यामुळे ती नाकारण्याची अतिशय उत्कट भावना म्हणून संताप येतो.

आता यातल्या नकाराबद्दल आपण विचार केला, तर त्यामागे असा तर्क असतो की, “हे दुःख, ही अडचण दूर जावी, इथे असू नये.” ही करुणा असते. तर, संताप व त्रस्तता यांना प्रेम कायम विरोध करत असतं. दुसऱ्या व्यक्तीने सुखी व्हावं आणि सुखाची कारणं तिला लाभावीत, अशी इच्छा म्हणजे प्रेम. ती व्यक्ती भयंकर प्रकारे कृती करते, त्याचं कारण या सर्व परिस्थितींमध्ये असतं आणि ती व्यक्ती दुःखी असते हेदेखील कारण त्यामागे असतं. त्या व्यक्तीने त्रस्त, भयंकर प्रकारे वागणं थांबवावं, यासाठी तिने सुखी व्हावं असं मला वाटतं. त्या व्यक्तीने सुखी होण्यासाठी त्यांना दुःखी करणाऱ्या व त्रस्ततेने वागायला लावणाऱ्या सर्व परिस्थितींविषयी मी जाणून घ्यायला हवं आणि मग त्यात मी काय बदल करू शकतो याचा विचार करायला हवा.

या काही पद्धती आम्ही वापरतो. यात मूलतः विश्लेषण करणं असतं: अमुके एक कृती यातून उगम पावली आणि तिचं कारण हे आहे. त्यांनी अशा रितीने वागणं थांबवावं असं मला वाटतं, त्यामागची कारणं अशी आहेत, त्यामुळे त्यांच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी बदलण्यासाठी मी काय करू शकतो?

शिक्षक म्हणून आम्ही भिन्न पार्श्वभूमींच्या- भिन्न सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक पार्श्वभूमींच्या मुलांना सामोरे जातो. या सर्व मुलांना शिस्त लावताना व शिकवताना त्यांच्याबाबत, भिन्न प्रकारच्या मुलांबाबत संयम बाळगून पुरेसं आहे का?

मुलांमध्ये रुची घेणं, हा एक सर्वांत महत्त्वाचा घटक आहे, असं मला वाटतं. या मुलांची धार्मिक पार्श्वभूमी काय आहे, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, याच्याशी परिचय करून घेणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या लोकांना शिकवू पाहताय त्यांना तुम्ही अधिक समजून घेतलंत, तर त्यांची प्रत्यक्षातील गरज काय आहे ते तुम्हाला अधिक समजेल. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा पास होण्यासाठी सक्षम करणं नसतं, तर त्यांना अधिक चांगली व्यक्ती होण्यासाठी मदत करणं असतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घ्या. त्यांना तुम्ही त्यांच्या स्वतःबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल किंवा त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल किंवा तत्सम गोष्टींबद्दल छोटे निबंध लिहायला सांगू शकता. त्यांना स्वतःबद्दल बोलायला लावा. मग तुम्ही त्यांना थोडं अधिक चांगल्या रितीने जाणून घेऊ शकाल.

स्वतःचं मत व्यक्त करताना, किंवा स्वतःबद्दल काही बोलताना कचरणारे लोक मला अनेकदा भेटतात. आपण नाकारले जाऊ अशी भीती त्यांना वाटत असते. तर, या लोकांना स्वतःच्या बंदिस्त मनावर व त्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी कशी मदत करावी, असा माझा प्रश्न आहे.

विशेषतः पौगंडावयीन मुलांमध्ये, त्यातही आपल्या समवयीनांकडून मान्यता मिळवण्याची खूप, खूप जास्त चिंता असलेल्या मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसते. त्यांना स्वतःच्या लाजरेपणावर मात करायला कसं शिकवायचं? बौद्ध मठांमधील शिक्षणात वापरली जाणारी एक पद्धत म्हणजे धडा देऊन झाल्यावर सर्व विद्यार्थी जोड्या-जोड्यांमध्ये वेगळे होतात, मग ते एकमेकांशी चर्चा करतात- किंबहुना ते वादविवाद, तार्किक वादविवाद घालतात. नुकतंच जे काही बोललं गेलं याबद्दल ते एकमेकांशी बोलतात, आपल्याला किती समजलंय हे चाचपून पाहतात. अशा वेळी ते संपूर्ण वर्गासमोर बोलत नसतात. संपूर्ण वर्गासमोर बोलताना काही विद्यार्थी दया न दाखवणारे असू शकतात आणि ते बोलणाऱ्याकडे पाहून हसूही शकतात. पण दोनच जण सोबत असतील, तेव्हा त्यांना काहीतरी बोलावंच लागतं. अशा वेळी शिक्षक तिथे फेरफटका मारून प्रत्येक गट काय बोलतोय हे मिनिट-दोन मिनिटं ऐकू शकतो, आणि ते ठरलेल्या विषयावरच बोलत आहेत की नाही, दुसऱ्या कशाबद्दल बोलत नाहीयेत ना, याची खातरजमा करू शकतो. ही एक अतिशय चांगली अध्यापनपद्धती आहे, कारण त्यात विद्यार्थ्याला केवळ निष्क्रियपणे बसून फक्त ऐकायची किंवा लक्ष न देता बसून राहायची मुभा नसते. त्यांना काहीतरी बोलावंच लागतं; त्यांनी कशाकडे लक्ष दिलं, काय ऐकलं, याची चर्चा त्यांना दुसऱ्या व्यक्तीशी करावी लागते. इथे त्यांना भिडस्त राहून चालत नाही. पण दर वेळी ते चर्चेसाठीच एकच जोडीदार निवडत नाहीत ना, याची खातरजमा तुम्ही करायला हवी. चर्चेमधील जोडीदार बदलत राहायला हवेत. मठांमधील शिक्षणव्यवस्थेमध्ये ही एक पद्धत वापरली जाते. कदाचित तुम्हालाही ती उपयुक्त वाटेल.

Top