सैद्धान्तिक दृष्टिकोन
कोणत्याही दोन धर्मांमध्ये किंवा तत्त्वज्ञानांमध्ये समान आधार शोधण्यात अनेक अडथळे आणि धोके असतात. यातील एक प्रमुख अडथळा धर्मांच्या तुलनेच्या सैद्धान्तिक विषयाप्रति कोणता सैद्धान्तिक दृष्टिकोन वापरावा याविषयीचा असतो. इथे मला ख्रिश्चन धर्मशास्त्रातील अशा एका तुलनात्मक वर्गीकरणाचा उल्लेख करावासा वाटतो, जे क्रिस्टिन बीज किब्लिंगरनी इतर धर्मांबाबतचा बौद्ध दृष्टिकोन पुस्तकातील ‘अन्य धर्मांप्रति बौद्ध व्यवहारः प्रकार, उदाहरण, विचार’ या लेखात अधोरेखित केलं आहे.
या लेखात किब्लिंगर यांनी तीन दृष्टिकोन अधोरेखित केले आहेतः विशेषतावाद, समावेशवाद आणि बहुलतावाद.
- विशेषतावाद दृष्टिकोन अर्थात केवळ एकच धर्म मुक्तीचा मार्ग दाखवतो. इतर धर्म आमच्या धर्मांप्रमाणेच हा समान विषय हाताळत असले, तरी त्यांचा दृष्टिकोन चुकीचा आहे. अनेक बौद्ध ग्रंथात गैर बौद्ध मतांविषयीच नव्हे, तर इतर बौद्ध मतांविषयीही हा दृष्टिकोन आढळून येतो.
- समावेशवाद दृष्टिकोनानुसार मुक्तीचे अनेक मार्ग आहेत, पण त्यातील एकच श्रेष्ठ आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर इतर धर्मांमध्ये आमच्या धर्मातले समान दुवे असू शकतात आणि ते वैधही असतील, पण आमचा धर्म सर्वात चांगला आहे. विविध तिबेटी परंपरेतील काही अनुयायी इतर तिबेटी परंपरांबद्दल हा दृष्टिकोन बाळगताना दिसतात – ते सर्व मुक्तीच्या दिशेने नेतात, पण आमचा मार्ग सर्वौत्कृष्ट आहे.
- बहुलतावादानुसार, मुक्तीचे अनेक मार्ग आहेत आणि त्यातील कोणताच सर्वौत्कृष्ट नाही. हा असंप्रदायवादी दृष्टिकोन आहे, जो विविध धर्मांमधील या विषयाशी संबंधित मतं प्रस्तुत करतो, पण त्यात श्रेणी ठरवली जात नाही.
समावेशवाद आणि बहुलतावादात दोन मतप्रवाहांमधील भिन्नता कितपत स्वीकाराव्या आणि त्यांच्यातील फरक किती सखोल आहे, याबाबतच्या सीमा ठरलेल्या आहेत.
- पहिल्या प्रकारात समानतांवर भर दिला जातो, या प्रकारात वैविध्याचा स्वीकार केला गेला तरी त्यांना समानता, समतुल्यता आणि गौण म्हणून वर्गीकृत केले जाते. याचा अर्थ इतर धर्मही तेच करत आहेत, जे आपण करत आहोत, पण त्यांचे मार्ग भिन्न आहेत – एका अर्थाने ते अजाणतेपणी आपल्याच धर्माचे अनुसरण करत आहेत. गेलुग यांनी निंग्मा जोगचेनचे स्पष्टीकरण गेलुग अनुत्तरायोग सिद्धांताच्या संदर्भातून देणं, हे याचं उदाहरण आहे.
- दुसऱ्या प्रकारात प्रामाणिक भिन्नतांचा सन्मान राखला जातो आणि विकासाच्या दृष्टीने दोन मतांमधील संवादाला मुल्यवान साधन मानले जाते, जिथे स्वतःचा धर्म सर्वश्रेष्ठ मानला जात असो वा नसो.
पहिल्या प्रकारातील (आपण करतो तेच ते करतात, फक्त वेगळ्या पद्धतीने) धोका हा आहे की हा दृष्टिकोन फाजील उद्दाम, अरेरावी आणि आत्मप्रौढीचं रूप घेऊ शकतो. – त्यांचा धर्म त्यांच्यापेक्षा आपल्याला अधिक चांगला माहीत आहे, हा समज त्यात असतो. आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे, असा विश्वास बाळगणारे याचे समावेशी रूप असे प्रतित करू शकते की इतर धर्म आपल्याच धर्मातील उद्दिष्ट बाळगत आहेत, पण त्यांना त्याची जाणीव नाही. किंवा ते आपल्याहून कनिष्ठ पातळीवर आहेत. अशा दृष्टिकोनातून आपण काहीच शिकवण घेऊ शकत नाही, उलट तेच आपल्याकडून अनेक गोष्टी आत्मसात करू शकतात. याचे उपविभाग खालीलप्रमाणे आहेतः
- सर्व किंवा बहुतांशी धर्म समान उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत; आणि त्यांचा मार्ग आमच्याइतका चांगला नसला, तरी तो अखेरीस नैसर्गिकतः त्यांना आमच्या उद्दिष्टाला समान असणाऱ्या उद्दिष्टाच्या दिशेनेच नेईल.
- आम्ही जे उद्दिष्ट साध्य करू पाहत आहोत, तेच त्यांचे उद्दिष्ट आहे, पण ते त्यांच्या स्वतःच्या मार्गाच्या अनुसरणातून साध्य होऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांना अखेरीस आमच्याच मार्गावर यावे लागेल. बौद्ध धर्मातीलच उदाहरण द्यायचे झाले तर, अनुत्तरयोग तंत्रातील एक दावा असा आहे की सूत्र किंवा कनिष्ठ तंत्र तुम्हाला दहाव्या स्तरावरील भूमिचित्ताच्या (दशम भूमी) दिशेने नेऊ शकते, पण ज्ञानप्राप्तीसाठी तुम्हाला अनुत्तरयोग तंत्राचीच गरज भासेल.
पहिल्या प्रकारच्या समावेशवादाचे(जो भिन्नतेला गौण मानतो किंवा ते एकसमान असल्याचेच सांगतो) अन्य घटक ठामपणे सांगतात की:
- शब्द, संकल्पना आणि उपदेश हे ध्यानानुभूतीचे योग्य वर्णन करत नाहीत, आणि सर्व धर्म एकाच समअनुभूतीविषयी बोलतात.
- सर्व धर्मांचा मुलभूत सिद्धान्त किंवा धारणा एकच आहे, आणि फक्त सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीत फरक आहे. उदाहरणार्थ, भारत, दक्षिणपूर्व आशिया, चीन, जपान आणि तिबेटसारख्या देशात बौद्ध धर्माचे सादरीकरण विभिन्न स्वरूपाचे आहे.
शिवाय, आपण जेव्हा बौद्ध धर्म आणि इस्लाममधील समान दुवे शोधतो, तेव्हा इथे धर्मांतरणाचीही चर्चा होते.
- विशेषतावादी दृष्टिकोनातून पाहिल्यास, जर केवळ आमचा धर्म खरा असल्यास, तुम्हाला स्वरक्षणार्थ स्वतःच्या धर्माचा त्याग करून आमच्या धर्माचा स्वीकार करण्याची गरज आहे.
- समावेशवादी दृष्टिकोनातून पाहिल्यास, तुमच्या धर्माच्या अनुसरणास हरकत नाही, कारण तो आमच्याच धर्माचा कनिष्ठ स्तर आहे, आणि शेवटी स्वाभाविकपणे तुम्हाला आमची मते पटतील (उदाहरणार्थ, अनुत्तरयोग तंत्राची साधना करणारे चित्तमंत्र साधक साधनेच्या परिपूर्ण मनोवस्थेला प्राप्त झाल्यानंतर नैसर्गिकपणे प्रासंगिक होतील.) किंवा आम्ही तुमचे धर्मांतरण करू.
- बहुलतावादी दृष्टिकोनातून पाहिल्यास, सर्व धर्म आपल्याला अंतिम उद्दिष्टाच्या दिशेने नेतात आणि ते सर्व कौतुकास पात्र आहेत. याचे दोन विभिन्न घटक आहेत; ते समतुल्य आहेत किंवा ते समतुल्य नाहीत – आणि कुणीही सर्वश्रेष्ठ नाही. त्यामुळे धर्मांतरणाची आवश्यकता नाही. हे बौद्ध साधना केल्यानंतर तुम्ही बौद्ध स्वर्गात जाता, मुस्लिम स्वर्गात जात नाही; आणि मुस्लिम साधना केल्यास मुस्लिम स्वर्गात जाता, बौद्ध स्वर्गात जात नाही, अशा स्वरूपाचे आहे.
दुसऱ्या प्रकारच्या समावेशवाद आणि बहुलतावादात (ज्या प्रकारात धर्मांमधील भिन्नतेचा सन्मान राखला जातो, ते सर्वश्रेष्ठ असो वा नसो, ते सर्व वैध असल्याचे स्वीकारले जाते.) इतर धर्मांना समजून घेण्याचा आणि त्याची आपल्या धर्माशी तुलना करण्याचा नाजूक मुद्दा असतो.
- तुम्ही एखादा धर्म त्या धर्माच्या दृष्टिकोनातूनच समजून घेऊ शकता का, की त्या धर्मातील गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या तुमच्या धर्माच्या कसोटीवर तपासाव्या लागतात?
- जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला (त्या धर्मातील गोष्टी समजून घेण्यासाठी, त्या तुमच्या धर्माच्या कसोटीवर आजमावणे), तर तुम्ही ते पहिल्या प्रकारातील समज विकसित न करता करू शकता का की, त्यांच्या धारणा या तुमच्याच धर्माचे वेगळे परावर्तित रूप आहे?
दुसरीकडे तुम्ही दोन धर्मांमधील, जसे बौद्ध धर्म आणि इस्लाममधील समान दुवे शोधू शकलात, आणि जरी तुम्हाला ते तुमच्या धर्माच्या संदर्भातून मांडण्याची गरज भासली, तरी तुम्ही दोन धर्मांमधील भिन्नता ओळखून तिचा सन्मान राखू शकता. तेव्हा तुम्ही तुमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे, असा समज न बाळगता आणि दुसऱ्या धर्माबाबत नकली श्रेष्ठभाव व्यक्त न करता सहिष्णू आलोचना मुक्त दृष्टिकोनातून दोन धर्मातील भिन्नतेचा सन्मान राखू शकता. अशी शहाणीव आणि सन्मानजनक वागणुकीच्या आधारे धार्मिक सलोखा प्रस्थापित करणे शक्य आहे.
परमपूज्य दलाई लामा हाच दृष्टिकोन बाळगतात. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की, “सर्वोत्कृष्ठ धर्म कोणता?” परमपूज्यांनी उत्तर दिलं, “धार्मिक धारणा आणि साधनांचा असा संच, जो तुम्हाला अधिक दयाशील आणि अधिक करुणामय व्यक्ती बनण्यास मदत करतो.”
ऐतिहासिक परिप्रेक्ष्य
बौद्ध धर्माबाबतचा ऐतिहासिक मुस्लिम दृष्टिकोन
आता आपण विशेषतः बौद्ध धर्म आणि इस्लामबाबत चर्चा करू. इस्लामविषयी मांडणी करताना, मी माझ्या स्वतःच्या संशोधनाशिवाय परमपूज्य दलाई लामा आणि जॉर्डनचे युवराज गाझी बिन मुहम्मद यांची प्रस्तावना लाभलेल्या रजा शहा काझमी यांच्या कॉमन ग्राउंड बिटवीन इस्लाम अॅण्ड बुद्धिजम या पुस्तकाचाही संदर्भ घेतला आहे. डॉ. काझमी यांच्या पुस्तकातून मी विशेषतः कुराणातील उद्धरणांचे संदर्भ घेतले आहेत.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहायला गेल्यास, मुस्लिम आणि बौद्ध दोन्ही धर्मांनी (इथे आपण बौद्ध धर्माचा संदर्भ केवळ इंडो-तिबेटी स्वरूपाशी मर्यादीत ठेवू) समावेशवादी दृष्टिकोन अंगीकारला आहे. उदाहरणार्थ मुस्लिमांनी बौद्धांना ज्यू, ख्रिश्चन आणि झोरोस्टेरियनांमध्ये समाविष्ट केले आहे. हे कसे घडले?
उमय्यद खलिफांच्या काळात(६६१ – ७५० इसवी) अरबांनी मध्य पूर्वेला त्यांची सत्ता आणि धर्म, अर्थात इस्लामचा प्रसार केला. अशा रीतीने आठव्या शतकाच्या सुरुवातील उमय्यद सेनापती मुहम्मद बिन कासीमने बौद्ध बहुल सिंध प्रांत, सध्याचा दक्षिण पाकिस्तान आधिपत्याखाली आणला. ब्राह्मणाबाद हा प्रमुख शहरातील बौद्ध आणि हिंदूंनी आपली मंदिरे पुन्हा उभारून, धार्मिक स्वातंत्र्य कायम राखण्याची विनंती केली. सेनापती कासीमने राज्यपाल हज्जाज बिन युसुफ यांच्याकडे सल्लामसलत केली, तर हज्जाज बिन युसुफनी पुढे मुस्लिम धर्माधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. तेव्हा धर्ममार्तंडांनी बौद्ध (हिंदूही) ईश्वर प्रदत्त धर्मग्रंथ असणारे स्वतंत्र धर्मीय असल्याचे घोषित केले, जो नंतर “ब्राह्मणाबाद करार,” म्हणून ओळखला गेला.
उमय्यद सेनापती हज्जाज यांचा जाहीरनामा:
ब्राह्मणाबादच्या प्रमुखांनी केलेली बौद्ध आणि इतर मंदिरांच्या पुनर्बांधणीची आणि धार्मिक सहिष्णुतेची मागणी रास्त आहे. सर्वसाधारण कर आकारणीअतिरिक्त त्यांच्यावर आपला इतर कोणता हक्क असल्याचे मला दिसत नाही. त्यांनी आपल्याप्रति सन्मान व्यक्त केला आहे आणि खलिफाला व्यक्तिगत कर रूपात (जजिया) एक निश्चित रक्कम देण्याचे मान्य केले आहे. आता ते आपल्या संरक्षणाखाली असणारी प्रजा (धिम्मी) झाले असल्याने आपल्याला त्यांचे जीवन आणि मालमत्ता यांच्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही हक्क नाही. आपण त्यांना त्यांच्या धर्माचे अनुसरण करण्याची परवानगी देत असून कोणीही त्यांच्यावर बंधने आणू नयेत.
त्यानंतर, बौद्धांना त्यांची मंदिरं आणि मठांची पुनर्बांधणीची करण्याची परवानगी देण्यात आली, आणि ते जोपर्यंत कर भरत राहतील किमान तोपर्यंत त्यांना गैर-मुस्लिम जनतेचा दर्जा देण्यात आला. उमय्यद खलिफा आणि त्यानंतर बगदादमधून शासन चालवणारे अब्बासिद खलिफा (७५०-१२५८ इसवी) आणि भारतातील मुस्लिम शासकांनी यांनी हेच तत्त्व कायम ठेवलं, अर्थात सत्ताधिशांकडून कायमच याचं पालन केलं गेलं असं नाही. तरीही या निर्णयाचा मतितार्थ असा आहे की बौद्ध धर्माला त्या मूर्तिपूजक बहुदेववादी धर्मांच्या समरूप मानले गेले नाही, ज्यांच्या अनुयायांना हे विशेषाधिकार दिले गेले नव्हते.
आता तुम्ही असा विवाद करू शकता की बौद्धांना कायदेशीर मान्यता देणं हे धार्मिक कारणांपेक्षा राजकीय कारणांवर आधारित होतं, आणि त्याचा स्रोत सुक्ष्म दार्शनिक विश्लेषणापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोनावर आधारलेला होता. कदाचित असेही होते. बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या पुनर्बांधणीनंतर अरबांनी या मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांकडून कर आकारणी सुरू केली. पण तरीही इस्लामी विद्वानांनी या ‘व्यावहारिक’ धोरणाला इस्लामच्या मुलभूत धार्मिक तत्त्वांविरोधी म्हणून पाहिले नाही किंवा आजही ते याला त्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत. बौद्ध धर्माला कायदेशीर मान्यता आणि राजकीय संरक्षणासोबतच धार्मिक सहिष्णुतेचा व्यवहार हा बौद्धांचा आध्यात्मिक मार्ग आणि धर्मसंहिता ही एखाद्या उच्चस्तरीय, अर्थात दैवी रूपातून उद्धृत झाल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
बौद्धांना ईश्वरप्रदत्त धर्मग्रंथवाले म्हणून जाहीर करण्यामागे काय आधार होता? हे फक्त एकसारख्या पूजा पद्धतींवर आधारले होते का? उदाहरणार्थ, आठव्या शतकाच्या सुरुवातीस इराणी इतिहासकार अलकिरमानी यांनी बल्ख अफगाणिस्तानातील नवविहार मठाबद्दल विस्तृतपणे लिहिले होते आणि काही बौद्ध प्रथांचे इस्लामी प्रथांशी साधर्म्य सांगणारे वर्णन केले होते. त्यांनी वर्णन करताना बौद्ध मंदिराच्या मुख्य केंद्रस्थळी कापडाने आच्छादलेला चौकोनी पवित्र दगड असून भाविक त्याला प्रणाम करून प्रदक्षिणा घालत असल्याचे आणि ते मक्केतील काबा सारखे असल्याचे म्हंटले आहे. पण त्यांनी कोणत्याही बौद्ध धारणांची चर्चा केलेली नाही.
बौद्धांना ईश्वरप्रदत्त धर्मग्रंथ असणाऱ्या धर्मानुयायांचा दर्जा देण्याचा काही सौद्धान्तिक आधार होता का? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे कारण जर बौद्धांना ईश्वरप्रदत्त धर्मग्रंथ असणारे अनुयायी म्हणून ओळखले जात होते, तर कुराणातील खालील छंदात(२:६२) सांगितल्याप्रमाणे त्यांचा अप्रत्यक्षपणे ‘उद्धार’ झालेल्या समुदायामध्ये समावेश होतो:
प्रामाणिकपणे ज्यांचा विश्वास आहे आणि जे ज्यू, ख्रिश्चन आणि साबीइ आहेत – ज्यांचा परमेश्वरावर आणि अंतिम दिवसावर विश्वास आहे आणि जे चांगले कर्म करतात – अशा लोकांसाठी त्यांच्या परमेश्वराकडे बक्षीस आहे. ना ते भयभीत होतील किंवा वेदनेने त्रस्त होतील.
यातून असे प्रतिबिंबित होते की कुराणानुसार परमेश्वरावरील विश्वास, न्यायाचा अंतिम दिवस आणि चांगली सकारात्मक कर्मांचे अनुसरण हे बौद्ध धर्म आणि इस्लाममधील समान दुवे आहेत. जरी धर्मांमधील मते एकसमान नसली, तरी इस्लामनुसार धर्मांच्या तुलनेसाठी हे पुरेसे आहे. जसे कुराणात सांगितले आहे(२:१३७):
आणि तुमची जशी श्रद्धा आहे, तशीच त्यांची असेल, तर ते योग्य मार्गावर आहेत.
हा दृष्टिकोन मग पूर्णतः समावेशवादी आहे. बौद्धही इस्लामने शिकवलेल्या मुक्तिच्या मार्गावर पोहचतील, कारण त्यांचा दृष्टिकोन एकसारखा आहे.
इथे हा प्रश्न उपस्थित होतो की परमेश्वर, परमेश्वराने निर्माण केलेला धर्म, न्यायाचा अंतिम दिवस आणि सत्याची एकात्मता यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या? बौद्ध धर्म आणि इस्लाम दोन्हीमध्ये असे धर्ममार्तंड आहेत, जे अशा मर्यादांची व्याख्या निश्चित करतात, पण काहींनी त्या व्याख्या लवचिकही ठेवलेल्या आहेत.
इस्लामप्रति बौद्धांचा ऐतिहासिक दृष्टिकोन
वरील संकल्पनांच्या मर्यादा शोधण्यापूर्वी आपण इस्लामप्रति बौद्धांचा ऐतिहासिक दृष्टिकोन पाहू. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि अकराव्या शतकाच्या पूर्वाधात दक्षिणपूर्व अफगाणिस्तान आणि उत्तर पाकिस्तानात लिहिला गेलेला संस्कृत भाषेतील ‘कालचक्र तंत्र’ हा बौद्ध ग्रंथ परंपरेतील एकमेव ग्रंथ आहे, ज्यात इस्लामिक प्रथांचे आणि धारणांचे संदर्भ आढळतात. त्यावेळी त्या परिसरातील बौद्धांपुढे मध्य पाकिस्तानातील मुल्तानाच्या संभाव्य आक्रमणाचं संकट होतं. मुल्तान हे इस्लामचा उपसंप्रदाय असणाऱ्या पूर्वीय इस्माइली शिया पंथाचे अनुयायी होते. अरब अब्बासिदांचे कट्टर शत्रू असणाऱ्या इजिप्तच्या फातिमा खलिफांशी संगनमत करून मुल्तान मुस्लिम जगतावर अधिराज्य गाजवू पाहत होते. दक्षिणपूर्वीय अफगाणिस्तान आणि उत्तर पाकिस्तानातील बौद्ध आणि हिंदू या शत्रुत्वाच्या कचाट्यात सापडले.
कालचक्र ग्रंथात संभाव्य आक्रमकांच्या श्रद्धा आणि प्रथांविषयीचा उल्लेख आहे. या ग्रथांत वर्णन केलेल्या काही धारणा जसे पैगंबरांची सूची, तत्कालिन इस्माइली तत्त्वज्ञानाशी विशिष्ट रूपाने संबंधित आहे, तर काही धारणा त्या तत्त्वज्ञानाला विरोधाभासी आहेत, जसे मानी धर्माचे संस्थापक मानी यांचा पैगंबरांच्या यादीत समावेश आहे. तरीही यातील बहुतांशी धारणा या इस्लामच्या मूलतत्त्ववादी धारणा आहेत. काही धारणा नैतिक आचरणाशी संबंधित आहेत आणि बौद्धांच्या नैतिक आचरणासंबंधीच्या विचारांना प्रतिध्वनित करतात. अर्थात ग्रंथात त्यांना समान परंपरा मानले गेले नाही. पण या बाबींना दोन्ही धर्मातील समान दुवा मानले जाऊ शकते. उदाहरणार्थ, ‘श्रीकालचक्रतंत्रोत्तरतंत्र – हृदय’मध्ये सांगितले गेले आहे की
त्यांची एकच जात आहे, ते चोरी करत नाहीत, आणि सत्य बोलतात. ते स्वच्छताप्रिय आहेत, परस्त्रीगमनापासून दूर राहतात, तपश्चर्या करतात आणि त्यांच्या पत्नीप्रति प्रामाणिक राहतात.
तरीही, बौद्ध धर्माच्या संदर्भातून कालचक्र ग्रंथात वर्णिलेल्या आक्रमकांच्या धारणा समावेशवादी दृष्टिकोन असणाऱ्या आढळतात. जसे ‘लघु-कालचक्र-तंत्र-राजा’ ग्रंथात सांगितल्याप्रमाणेः
सगळ्या निर्मित गोष्टी, चल-अचल सर्व निर्मात्याने निर्माण केलेल्या आहेत. त्याला प्रसन्न करण्याने, जे तायी लोकांच्या मुक्तीचे माध्यम आहे, स्वर्गप्राप्ती होते. मनुष्यासाठी हीच रहमानची शिकवण आहे.
कालचक्र ग्रंथात आक्रमकांसाठी वापरण्यात आलेला “तायी,” हा शब्द इराणमधील अरब आक्रमकांसाठी (पर्शियनः ताझी) वापरण्यात येणारा अरबी शब्द आहे. तर “रहमान,” हे अल्लाहसाठीचे विशेषण आहे.
पुंडरिकाने ‘विमलप्रभा नाम लघु कालचक्र तंत्र राजा टिका’ ग्रंथात या छंदाची व्याख्या करताना लिहिले आहे,
तायी आक्रमकांच्या धारणेनुसार, सर्वोच्च निर्माता रहमान प्रत्येक चल-अचल घटकाचा निर्माता आहे. रहमानला प्रसन्न करणे, हे श्वेत वस्त्र धारण करणाऱ्या तायी आक्रमकांच्या मुक्तीचे माध्यम आहे आणि त्यातूनच त्यांना स्वर्गातील उन्नत पुनर्जन्माची प्राप्ती होईल. नाहीतर त्यांना नरकातील पुनर्जन्म मिळेल, अशी तायी लोकांची धारणा आहे.
पुंडरिका अधिक स्पष्ट करताना म्हणतात:
तायी आक्रमकांची धारणा आहे की मृत्युपश्चात रहमानच्या निर्णयानुसार स्वर्गातील उच्च पुनर्जन्मात आनंद किंवा नरकातील नीच पुनर्जन्मात दुःख भोगतात.
इथे बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्माची इस्लामबाबतची धारणा यांच्यातील समान दुवा हा नैतिक आचरणावर आधारित स्वर्ग आणि नरकातील पुनर्जन्म हा आहे. या अंशांबाबत रसपूर्ण बाब ही आहे की कालचक्र ग्रंथात निर्मात्याविषयी किंवा मृत्युपश्चातच्या जीवनाबाबतच्या त्याच्या भूमिकेबाबत आणि त्याला प्रसन्न करण्याबाबत उल्लेख आढळत नाही. यातील शेवटच्या मुद्द्याच्या बाबतीत, अल्लाहच्या त्याला प्रसन्न करण्याबाबतचा न्यायनिवाड्याच्या संदर्भातून पाहिल्यास बौद्ध दृष्टिकोन योग्य नाही. हदीथनुसार (मुहम्मदाचे व्यक्तिगत कथन) अल्लाह म्हणतो की,
माझ्या अनुयायांनो, मी तुमच्या कर्मांची पारख करतो आणि त्यानुसार तुम्हाला फळ देतो.
कोणत्याही स्थितीत, कालचक्राचा भर हा पुनर्जन्माचे स्वरूप आणि व्यक्तीच्या सर्वसाधारण जीवनातील कृत्यांचा त्यावर होणारा परिणाम, यावर आहे. पुनर्जन्माला अशा मार्गाने व्यक्त करत कालचक्र ग्रंथ एक समावेशवादी दृष्टिकोन बहाल करत आक्रमकांच्या अनंत पुनर्जन्मांच्या दाव्याला गैर सिद्ध करतो, जो बौद्ध धर्मात अधिक समर्पकपणे समजवण्यात आला आहे. लघु कायचक्र तंत्र राज, II.१७४ मध्ये नमूद केले आहे:
मृत्युपश्चातच्या (बाह्य) जीवनात व्यक्ती या जगातील त्याच्या कार्मिक कृत्यांचे परिणाम भोगते. तसे असेल तर एका जन्मातून दुसऱ्या जन्मातील माणसाच्या कर्मांचा हिशोब कधीच संपणार नाही. संसारातून बाहेर पडता येणार नाही आणि अगणित अस्तित्वं अनुभवूनही मुक्ती प्राप्त होणार नाही. निश्चितच असा दृष्टिकोनही तायी विचारधारेत येऊन गेला आहे, पण इतर गटांनी तो अमान्य केला आहे.
जर आपण अनंत नरकदंडाला व्यापक बौद्ध संदर्भातून पाहिले तर, बौद्ध आणि मुस्लिम तत्त्वज्ञानातील समान दुवा अधिक व्यापक होईल. हे अधिक व्यापक होण्याचं कारण म्हणजे तेव्हा पुनर्जन्म आणि मुक्तीबाबतचा मुस्लिम दृष्टिकोन बौद्ध दृष्टिकोनाकडे नेणारा एक टप्पा असेल. बौद्ध संदर्भातून तेव्हा आपण असे म्हणू शकू की इस्लाम वेदनेच्या वेदनेततून मुक्तीबाबत किंवा नीचतम पुनर्जन्माच्या अवस्थेपासूनच्या मुक्तीबाबत बोलतो. इथे मुक्तीचा अर्थ स्वर्गातील उच्चतम पुनर्जन्म असा असेल. पण ही तर केवळ लाम-रिमच्या श्रेणीबद्ध मार्गातील प्राथमिक प्रेरणा आहे. पुढे जाऊन बौद्ध धर्म सर्वव्यापी दुःखातून मुक्तीविषयी बोलतो, जे मध्यक्रमाच्या प्रेरणेचे उद्दिष्ट आहे. या परिप्रेक्ष्यातून पाहिल्यास, इस्लामचा अंगीकार हा बौद्ध धर्माच्या अंगीकाराचा प्राथमिक टप्पा ठरेल.
पण, मग तुम्ही अनंत वेदनेच्या मुस्लिम धारणेला निराळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता, जेणेकरून ते बौद्ध दृष्टिकोनापासून फार भिन्न वाटणार नाही. मुस्लिम धारणेतील एकदा नरकाच्या ज्वाळांमध्ये अडकला की त्याला अंत नसून त्यातून तुम्ही मुक्ती मिळवू शकत नाही, या संकल्पनेवर कालचक्र ग्रंथात आक्षेप नोंदवला गेला आहे. पण बौद्ध धर्मातील संसाराची व्याख्या पाहिल्यास ती अशाच परिस्थितीतून बाहेर पडण्यासंदर्भात आहे, जसे एखाद्याला आगीने व्यापलेल्या इमारतीतून बाहेर पडायचे आहे. शिवाय संसारिक पुनर्जन्मही अनंत असतात, जोवर एखादा त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत नाही, जसे धर्माचा अंगीकार करणे.
एकोणिसाव्या शतकातील मिपाम आचार्य निंग्मा यांनी आपल्या वज्र सन प्रदीपन, श्रीकालचक्र तंत्र अर्थनिर्वचन अध्याय (पाच) गहन चेतनेवरील टीका ग्रंथात याहून अधिक समावेशवादी दृष्टिकोन मांडला आहे. बुद्धांनी कौशल्यपूर्ण साधनांच्या साहाय्याने मुस्लिमांना ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर आणण्याची शिकवण दिल्याचे संकेत देत मिपाम लिहितात की,
गैर भारतीय आक्रमणकर्त्यांकडे दोन तात्त्विक मुद्दे आहेत. बाह्य तात्त्विक मुद्द्यानुसार त्यांची धारणा असते की गोष्टी अणुसंग्रहाच्या स्वरूपात अस्तित्वात असतात आणि मानवी स्वत्वाच्या अल्पकालीन अस्तित्वावर किंवा त्याच्या संसारचक्रातील जन्मांवर त्यांचे नियंत्रण असते. यात फलस्वरूप म्हणून देवाला प्रसन्न करण्याचे उद्दिष्ट असते. याशिवाय ते अन्य कोणत्या निर्वाणावर भर देत नाहीत.
मिपाम पुढे जाऊन आक्रमणकर्त्यांची घटकांच्या अणुस्वरूपाची धारणा बौद्ध विचारधारेतही समर्पक बसत असल्याचा मुद्दा मांडतात. ते स्पष्ट करतात की हिनयान विचारधारेतील वैभाषिक आणि सौत्रांतिक निकायमध्ये अविभाज्य अणुंविषयींची चर्चा आहे; तर महायानातील चित्तमात्र आणि माध्यमिक निकायमध्ये अगणित खंडांमधील विभाजित होणाऱ्या अणुंविषयीचा दावा आहे.
स्वत्व किंवा आत्म्याच्या संदर्भात मिपाम सांगतात,
त्यांच्या प्रवृत्ती आणि विचारधारांचा विचार करून बुद्धांनी त्यांना (आक्रमणकर्त्यांना) स्वीकारार्ह असेल अशी शिकवण दिली. उदाहरणार्थ, उत्तरदायित्व स्वीकारण्यासंबंधीच्या सूत्रात बुद्ध सांगतात की, उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती (त्यांच्या कर्मानुसार) अस्तित्वात असतात, पण त्यांनी व्यक्तीच्या आत्म्याच्या नश्वर-अनश्वरतेविषयी भाष्य केलेले नाही. त्यांच्या (आक्रमणकर्त्यांच्या) धारणांनुसार ते मुद्दे योग्य आहेत. बुद्धांच्या म्हणण्याचा मतितार्थ व्यक्तीच्या कर्मांच्या उत्तरदायित्वाच्या परिमाणस्वरूप त्याच्या स्व’चे सातत्य अस्तित्वात असते, पण ते केवळ अखंडतेशी अध्यारोपित असते आणि त्याचे स्वरूप स्थायीही नसते किंवा अस्थायीही नसते.
स्वप्नाच्या अवस्थेत, जी केवळ मनोव्यापारातून निर्माण होते, तिथे व्यक्ती अनुभवत असलेला आनंद वा दुःख अस्तित्वातच नसतो. त्यामुळे हे फक्त दृश्य पातळीवर असल्याने, तिथली व्यक्तीची नश्वरता ही नश्वर गोष्टींच्या स्वरूपासारखीही नसते. कारण ते व्यक्तीच्या नैसर्गिक स्वरूपाशिवाय असते. त्याचा अभ्यास केल्यास लक्षात येते की तो स्वाभाविकपणे स्थायी किंवा अस्थायी प्रक्षेपण नसलेला घटक आहे. या शिकवणीनुसार, (आक्रमणकर्ते) त्यांनी आपल्या धर्माचा त्याग केला आणि बौद्ध व्यवस्था अंगीकारत ते वैभाषिक झाले.
इथे समावेशवादी दृष्टिकोन हा आहे की बुद्धांनी आक्रमणकर्त्यांच्या धारणांना अनुरूप शिकवण दिली आणि कौशल्यपूर्ण साधनांच्या साहाय्याने आक्रमणकर्त्यांना मुक्तीच्या दिशेने मार्गस्थ केले. अन्ययथा मुस्लिमांना हे स्पष्टपणे आक्षेपार्ह्य वाटले असते आणि हा दृष्टिकोन त्यांना धार्मिक ऐक्याच्या दिशेने नेणारा वाटला नसता.
बौद्ध ईश्वरप्रदत्त धर्मग्रंथ असणारे लोक असल्याच्या समजावर आधारित दोन धर्मातील समान दुवे
आणखी समान दुवे शोधण्यासाठी आपण परत इस्लामद्वारे बौद्धांना ईश्वरप्रदत्त धर्मग्रंथ असणारे गैर मुस्लिमधर्मीय समजण्याच्या परिणामांकडे वळूत. आपण पाहिले आहे की, या समजामुळे दिसणारा समान दुवा म्हणजे बौद्ध धर्म हा सर्वौच्च सत्ता अर्थात ईश्वराने निर्माण वा प्रकट केला आहे. यातून स्वाभाविकपणे प्रकटीकरणाचा स्रोत असणारा ईश्वर आणि प्रकट झालेली व्यक्ती, जिने ते प्रकटीकरण संपूर्ण जगासोबत वाटून घेतले, याबाबतचे प्रश्न निर्माण होतात.
या प्रकटीकरणाच्या प्रश्नाच्या संदर्भात बौद्ध आणि मुस्लिम दोन्ही धर्म समावेशवादी दृष्टिकोन अनुसरतात. उदाहरणार्थ, कालचक्र टीका निर्मल प्रकाश (विमलप्रभा) ग्रंथ स्पष्ट करतो की,
आक्रमणकर्त्यांच्या समजेनुसार, मुहम्मद हा रहमानचा अवतार होता. आक्रमणकर्त्यांच्या शिकवणीनुसार तो तायी आक्रमणकर्त्यांचा गुरू होता.
हिंदू धर्मात अवतार म्हणजे ईश्वरी आत्म्याचा अन्य स्वरूपातील पुनर्अवतार. अशा रीतीने मुहम्मद हा रहमानचा अवतार असणं कृष्ण हा भगवान विष्णूंचा अवतार असल्याच्या हिंदू धारणेला समांतर आहे. बौद्ध संदर्भातून ही समानता ही मुहम्मद हा अल्लाहचे निर्माणकाय रूप असल्याच्या समान आहे.
दुसरीकडे, बुद्ध अल्लाहचे प्रेषित किंवा पैगंबर समजले जाऊ शकतात का? अकराव्या शतकाच्या पूर्वाधातील गझनीच्या मुहम्मदाच्या भारतीय उपखंडावरील आक्रमण मोहिमेत पर्शियन इतिहासकार अलबरूनी सोबत आला होता. तिथे त्याने जे अनुभवले त्यावर आधारित किताब-ए-हिंद पुस्तक लिहिले. ज्यात त्याने भारतीय बुद्धांना प्रेषित समजत असल्याच्या बौद्ध श्रद्धा आणि प्रथांबाबत वर्णन केले आहे. याचा अर्थ असा असण्याची आवश्यकता नाही की मुस्लिमांनी बुद्धांना अल्लाहचे प्रेषित म्हणून स्वीकारावे. तरीही, कुराणात (४:१६३ - १६४)म्हंटले आहे की:
आम्ही तुलात तसेच प्रेरित केले आहे, जसे आम्ही नूह आणि त्याच्या नंतरच्या प्रेषितांना प्रेरित केले आहे. आणि आम्ही अब्राहम, ईस्माइल, इसाक, याकूब आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना आणि ईसा, अय्यूब, युनूस, हारून आणि सुलेमानला प्रेरित केले आहे. आम्ही दाऊदला स्तोत्रे प्रदान केली. आम्ही तुला यापूर्वी पाठविलेल्या काही प्रेषितांविषयी सांगितले, पण कितीतरी प्रेषितांविषयी सांगितलेले नाही.
बुद्धांचा त्या प्रेषितांमध्ये समावेश होऊ शकतो, ज्यांचा स्पष्ट उल्लेख झालेला नाही.
उदाहरणार्थ बुद्धांच्या बारा ज्ञानप्राप्तीच्या दिशेने नेणाऱ्या कृत्यांनुसार, बुद्ध निरनिराळ्या काळात दाखल होतात, जेव्हा जेव्हा जीव त्यांची शिकवण ग्रहन करण्यास परिपक्व होतात, आणि जिवांना अनुकूल ठरेल अशा रीतीने वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बुद्ध स्वतंत्र शिकवण देतात. जरी या महायुगात हजारो सर्वोच्च निर्माणकाय बुद्ध झाले असले, जिथे पुढील महायुगाच्या आगमनापूर्वी ज्यात हे निर्माणकाय बुद्ध प्रकट होतील, असे अनेक श्रेष्ठ निर्माणकाय पुरूषच्या रूपात अस्तित्वात आहेत. निर्माणकायांच्या या गटांना ‘धर्माचे संदेशवाहक’ मानले जाऊ शकतात. शिवाय प्रत्येक बुद्ध निरनिराळ्या लोकांच्या धार्मिक शिकवणीसाठी कौशल्यपूर्ण माध्यमं वापरतात. काहींना बुद्धांनी ‘स्व’ची शिकवणही दिली आहे. इस्लामकडेही शिकवणींची स्वतःची अशी कौशल्यपूर्ण माध्यमं आहेत. कुराण (१४:४) सांगते,
आणि आम्ही जो प्रेषितही पाठवला, तो त्यांच्या भाषेत संवाद साधणारा पाठवला, जेणेकरून तो स्पष्ट आणि नेमका संदेश पोहोचवेल.
इथे आपण विशेष काळजी घ्यायला हवी. जरी इस्लाम बुद्धाला ईश्वराचा प्रेषित म्हणून स्वीकारू शकलं; तरी मुस्लिम, आणि अगदी ख्रिश्चन व ज्यूसुद्धा मुहम्मद, येशू, अब्राहम आणि डेव्हिड हे निर्माणकाय बुद्ध किंवा अल्लाहचा अवतार होते, असे म्हणल्यास आक्षेप घेऊ शकतात. धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासातील समावेशवादी दृष्टिकोनातील ही प्रमुख कमतरता आहे. शिवाय बौद्धांच्या हा दावा आपण कसा समजून घेऊ की मंजुश्रीने नागांना सोपवलेली आणि नागांनी समुद्रात लपवलेली प्रज्ञापारमिता शिकवण नागार्जुनने जाहीर केली. किंवा हा दावा की असंगाला प्रेम, करुणा आणि बोधिचित्ताची व्यापक शिकवण तुषित स्वर्गात मैत्रेयाकडून प्राप्त झाली होती? निंग्मा परंपरेतील निर्मल दृष्टी आणि प्रकट संपन्न ग्रंथाची शिकवण आपल्याला कशी समजून घेता येईल? या बौद्ध धारणा, ईश्वरीय ज्ञानाला प्रकट करणाऱ्या पैगंबरांच्या मुस्लिम दाव्याहून फार भिन्न आहेत?
ईश्वरासंबंधीचा बौद्ध धर्माला अमान्य असणारा एकमेव घटक म्हणजे सर्वशक्तिमान ईश्वर, जो कोणत्याही घटकाच्या प्रभावाशिवाय किंवा परिणामाशिवाय, अगदी निर्मितीच्या इच्छेच्या परिणामाशिवाय निर्मिती करतो.
बौद्ध धर्म ईश्वराची इतर वैशिष्ट्ये किंवा अगदी त्याची निर्मितीही अमान्य करत नाही. उदाहरणार्थ, अनुत्तरयोग तंत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की प्रत्येक व्यक्तीचे निर्मळ तेजोमय चित्त हे ती व्यक्ती अनुभवत असलेल्या सर्व अनुभवांच्या प्रक्षेपणाचा निर्माता आहे. आणि हे सर्व त्या व्यक्तीचे व्यक्तिगत आणि सामुहिक कर्माने प्रभावित असते. याशिवाय निर्मळ तेजोमय चित्त हे ईश्वराच्या संकल्पनेप्रमाणेच शब्दांच्या पलीकडले आहे. कुराण सांगते:
अल्लाहचं वर्णन करणाऱ्या गोष्टींपासूनही अल्लाह उच्च आणि महान आहे.
शिवाय अल्लाहची नव्याण्णव नावे आहेत आणि ती अल्लाहच्या उपयुक्त गुणांशी संबंधित आहेत. याच प्रकारे, मंजुश्री नाम संगिती मध्ये मंजुश्रीचा उल्लेख निर्मळ तेजोमय चित्ताच्या मौलिक अवस्थेसंदर्भात केला जाते आणि कालचक्र ग्रंथातील छंदांमध्ये त्यांच्या गुणांचे वर्णन आढळते.
अल्लाहप्रमाणेच, निर्मळ तेजोमय चित्त ही असे आहे:
(५८) आदिम, सर्वोच्च आहे.
(१००) अनादि आणि अनंत आहे.
(९७) अप्रकट आहे, त्यांचा प्रकट अवतार नाही किंवा दृष्टिगोचर सांकेतिक अस्तित्वही नाही.
शिवाय अल्लाह एक आहे, आणि निर्मळ तेजोमय चित्तहीः
(४७) अद्वैत, अद्वैताचा प्रवक्ता आहे.
अल्लाहचा सर्वात उपयुक्त गुण म्हणजे तो अल हक - अर्थात खरा, सत्य, जो नैतिकार्थानेही योग्य आहे. याची धर्मता, अर्थात गहनतम सत्य, गहनतम जागृत धर्मकाय, ही धर्माच्या सांकल्पनिक दृढतेशी समान आहे.
निर्मळ तेजोमय चित्त मंजुश्री असे आहे:
(५५-५६) पवित्र धर्म आहे, धर्माचा शासक आहे. वास्तव, कांतीवान अविनाशी स्वर्ग आहे.
(४७) पूर्णतया वास्तविक आहे, अभिज्ञानाचे अभाव स्वरूप वास्तविक अवस्था आहे.
(१५७) गहनतम सत्याचे पावित्र्य आणि आभा आहे.
अल्लाह नेहमी अल-रहमान, अर्थात करुणामय आणि अल-रहिम अर्थात क्षमाशील म्हणून ओळखला जातो. निर्मितीच्या अनुषंगाने करुणामय आणि इतरांना वेदनेतून मुक्त करण्याच्या अर्थाने क्षमाशील. झोग्चेनमध्ये रिग्पाचा गुण हा निर्मल सचेतन चित्त, जे करुणेच्या संदर्भातून प्रक्षेपित होते, असा आहे. तर मंजुश्री, निर्मळ तेजोमय चित्त हेः
(३८) महान प्रेमाने घडलेले, महान करुणामय उन्नत चित्त
(८८) मर्यादित जिवांच्या उद्दिष्टांची पूर्ती करणारा मध्यस्थ, परम उपकारी शुभेच्छूक, मर्यादित जिवांप्रती पालकत्वाचा भाव असणारा.
अल्लाहप्रमाणे, मंजुश्री सुद्धा:
(१५२) समर्पित होण्यास योग्य, श्रेष्ठ आणि साष्टांग अधिकारी आहे. वंदनीय आणि श्रद्धाभाव बाळगण्यास पात्र आहे.
मूलभूत नैतिक तत्त्वांसोबतच अल्लाहचे हे सर्व गुण, निर्मळ तेजोमय चित्त, सत्त्याचे प्रकटीकरण, करुणा हे बौद्ध धर्म आणि इस्लाममधील समान दुवे दर्शवितात. इस्लाममधील जिक्र पाठ आणि बौद्ध धर्मातील मंत्र, धर्मादाय, अध्ययन आणि प्रामाणिक जगण्यावरील भर, अशा इतर वैशिष्ट्यांताही इथे उल्लेख करता येईल. जर आपण या सर्व समानतांना आदरपूर्वक बहुलतावादी दृष्टिकोनातून पाहिले, टीकात्मक मानसिकता टाळून आणि एकमेकांच्या धार्मिक शिकवणींना आपल्याच धर्माचे अन्य स्वरूप न समजल्यास, आपण धार्मिक सलोख्यासाठी एक भक्कम पाया निर्माण करू शकतो.