धार्मिक सौहार्दाबद्दल मला काही बोलायचं आहे. काही वेळा धार्मिक श्रद्धांवरून संघर्ष होतात. उदाहरणार्थ, आधी उत्तर आयर्लंडमध्ये संघर्ष मूलतः राजकीय प्रश्नावरून असला, तरी तो लवकरच धार्मिक प्रश्न बनला. हे अत्यंत दुर्दैवी होतं. आज शिया व सुन्नी पंथांचे अनुयायी अशाच रितीने एकमेकांशी भांडत आहेत. हेदेखील अत्यंत दुर्दैवी आहे. श्रीलंकेमध्येही राजकीय संघर्ष असला, तरी काही वेळा हा संघर्ष हिंदू व बौद्ध यांच्यातील असल्यासारखं दिसतं. हे अतिशय भयंकर आहे. प्राचीन काळात विविध धर्मांचे अनुयायी बहुतांशाने एकमेकांपासून वेगवेगळे असत. पण आज ते एकमेकांच्या अत्यंत जवळून संपर्कात असतात, त्यामुळे आपण धार्मिक सौहार्दाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
११ सप्टेंबरच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रल इथे स्मृतिप्रार्थना समारंभाचं आयोजन करण्यात आलं. मी त्या सभेला उपस्थित होतो. दुर्दैवाने आजकाल काही लोक अशी प्रतिमा निर्माण करतात की, काही खोडसाळ मुस्लिमांमुळे सर्व मुस्लीम बंडखोर व हिंसक झाले आहेत. मग ते पाश्चात्त्य व इस्लाम या सभ्यतांच्या संघर्षाविषयी बोलतात. हे अवास्तव आहे, असं मी माझ्या भाषणात नमूद केलं.
मोजक्या खोडसाळ लोकांमुळे संपूर्ण धर्म वाईट असल्याचं चित्र रंगवणं अतिशय चुकीचं आहे. इस्लाम, यहुदी, ख्रिस्ती, हिंदू व बौद्ध या सर्व धर्मांच्या बाबतीत हे लागू आहे. उदाहरणार्थ, संरक्षक शुग्दनच्या काही अनुयायांनी माझ्या निवासस्थानाजवळ तीन लोकांना मारलं. त्यातील एक जण चांगला शिक्षक होता आणि तो शुग्देनचा टीकाकार होता, त्याच्यावर चाकूने सोळा वार करण्यात आले. इतर दोन त्याचे विद्यार्थी होते. ते मारेकरी खरोखरच खोडकर होते. पण त्यामुळे सर्व तिबेटी बौद्ध धर्म बंडखोर आहे, असं तुम्ही म्हणालात तर त्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. बुद्धाच्या काळातही काही खोडसाळ लोक होतेच- त्यात काही विशेष नाही.
मी बौद्ध असलो आणि इस्लामच्या बाहेरचा असलो, तरी ११ सप्टेंबरपासून थोर इस्लाम धर्माचा बचावकर्ता म्हणून मी स्वेच्छेने प्रयत्न करतो आहे. माझे अनेक मुस्लीम बंधू व काही थोड्या भगिनी मला स्पष्ट करून सांगत असतात की, कोणी रक्तपात करत असेल, तर ते इस्लामला धरून नसतं. सच्चा मुस्लीम, इस्लामचा सच्चा अनुयायी अल्लाहवर जितके प्रेम करतो तितकेच प्रेम संपूर्ण निर्मितीवर करत असतो, हे यामागचं कारण आहे. सर्व जीव अल्लाहने निर्माण केलेले आहेत. अल्लाहबद्दल आदर व प्रेम वाटत असेल, तर त्याने निर्माण केलेल्या सर्व जीवांवरही प्रेम करायला हवं.
माझ्या एका पत्रकार मित्राने अयातोल्लाह खोमेनी यांच्या काळात तेहरानमध्ये काही वेळ घालवला होता. तिथे मुल्ला मंडळी श्रीमंत कुटुंबांकडून पैसे गोळा करून गरीब लोकांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून व गरिबीतून बाहेर पडता यावं यासाठी या पैशांचं वाटप करत, असं तो मला सांगत होता. ही खरी समाजवादी प्रक्रिया आहे. मुस्लीम देशांमध्ये बँकेत व्याज देण्यापासून परावृत्त केलं जातं. तर, आपण इस्लाम जाणत असलो, तर इस्लामचे अनुयायी त्याचं प्रामाणिकपणे पालन कसं करतात हे आपल्याला दिसू शकतं, मग इतर सर्व धर्मांप्रमाणे तोही अचंबित करणारा धर्म ठरतो. एकंदरित आपल्याला दुसऱ्यांच्या धर्मांविषयी माहिती असेल, तर आपण परस्परांविषयी आदर, कौतुक व संपन्नता विकसित करू शकतो. त्यामुळे आपण आंतरधार्मिक समजूत वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे.
अलीकडे लिस्बनमध्ये एका मशिदीतील आंतरधर्मीय सभेला मी उपस्थित होतो. एखाद्या मशिदीत आंतरधर्मीय सभा आयोजित होण्याची ती पहिलीच वेळ होती. या सभेनंतर आम्ही सर्व मुख्य सभागृहात गेलो आणि मौन राखून ध्यानधारणा केली. ते खूपच विलक्षण होतं. तर, आंतरधर्मीय सौहार्दासाठी कायम प्रयत्न करा.
काही लोक असं म्हणतात की, ईश्वर आहे. काही म्हणतात की, ईश्वर नाही. ते महत्त्वाचं नाही. कार्यकारणभाव महत्त्वाचा आहे. सर्व धर्मांमध्ये हा सारखेपणा आहे- हत्या, चोरी, लैंगिक अत्याचार, खोटं बोलणं- हे करू नका. भिन्न धर्म भिन्न पद्धती वापरतील, पण त्या सर्वांचा उद्देश सारखाच आहे. परिणामांकडे पाहा, कारणांकडे पाहू नका. तुम्ही एखाद्या उपहारगृहात जाता, तेव्हा सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या, त्या पदार्थाचे घटक कशाकशातून आले त्यावर वाद घालू नका. केवळ अन्नपदार्थ खाऊन त्याचा आनंद घेणं जास्त चांगलं.
तर, भिन्न धर्मांच्याबाबतीतही तुमचं तत्त्वज्ञान वाईट किंवा चांगलं आहे असा युक्तिवाद करण्यापेक्षा सर्व धर्म करुणेचा उद्देश शिकवतात, सर्व धर्म चांगले आहेत, हे लक्षात घ्या. भिन्न लोकांसाठी भिन्न पद्धती वापरणं वास्तववादी असतं. आपण वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारायला हवा.
आंतरिक शांतता करुणेशी संबंधित आहे. सर्व मोठ्या धर्मांचा संदेश सारखाच आहे- प्रेम, करुणा, क्षमाशीलता. करुणेला चालना देण्यासाठी आपण इहवादी मार्ग पत्करणं गरजेचं आहे. धर्म असलेल्या आणि धर्माविषयी प्रामाणिक व गंभीर असलेल्या लोकांना आपल्या करुणेला चालना देण्यासाठी त्यांच्या धर्मातील प्रचंड सामर्थ्य वापरता येतं. अश्रद्ध असलेल्यांना- म्हणजे विशिष्ट धार्मिक रुची नसलेल्या लोकांना किंवा काही तर धर्माचा तिरस्कार करत असतील अशा लोकांनाही करुणेमध्ये रुची नसते, कारण त्यांना करुणा ही धार्मिक बाब वाटते. हे पूर्णतः चुकीचं आहे. तुम्हाला धर्माकडे नकारात्मकतेने पाहायचं असेल, तर तो तुमचा अधिकार आहे. पण करुणेविषयी नकारात्मक प्रवृत्ती बाळगण्यात अर्थ नाही.