इस्लाम व बौद्ध धर्मातील काही सामायिक वैशिष्ट्यं

डॉ. सन्जेझना अक्पिनार व डॉ. अलेक्झांडर बर्झिन यांच्यातील संवाद

अनेक पाश्चात्त्य लोक इस्लामविषयी अजाण आहेत किंवा त्यांना इस्लामबद्दल भय वाटतं. काही सर्रास आढळणाऱ्या गैरसमजुती दूर करून इस्लाम व बौद्ध धर्म यांच्यातील सामायिकता शोधण्यासाठी इन्क्वायरिंग माइंडने डॉ. अलेक्झांडर बर्झिन आणि डॉ. सन्जेझना अक्पिनार यांच्यातील संवादाचं आयोजन केलं आहे.

डॉ. बर्झिन २९ वर्षं भारतातील धर्मशाळा इथे राहिले. परम पूजनीय दलाई लामा यांच्यासाठी काही वेळा त्यांनी दुभाषा म्हणून काम केलं. सध्या ते जर्मनीत बर्लिनमध्ये राहत आहेत. तिथे ते तिबेटी बौद्ध ध्यानधारणा व तत्त्वज्ञान शिकवतात. त्यांच्या जगभरातील अगणित व्याख्यानदौऱ्यांमधून त्यांनी बौद्ध व मुस्लीम यांच्यातील ऐतिहासिक अन्योन्यक्रीडांचा शोध घेतला आहे. द हिस्टॉरिकल इंटरॅक्शन बिट्विनी द बुद्धिस्ट अँड इस्लामिक कल्चर्स बिफोर द मंगोल एम्पायर या त्यांच्या ऑनलाइन इतिहासग्रंथासाठी संशोधन करत असताना त्यांनी तुर्कस्थान, जॉर्डन व इजिप्त इथल्या विद्यापीठांमध्ये व्याख्यानं दिली आहेत, आणि उझबेकिस्तान, किर्गिझस्तान व कझाखस्तान इथल्या विद्वानांशी त्यांनी याबद्दल चर्चा केली आहे.

डॉ. अक्पिनार बौद्ध धर्माच्या अनुयायी आहेत, पण त्यांनी इस्लामचा अभ्यास केला आहे. त्या मूळच्या गतकालीन युगोस्लावियाचा भाग असणाऱ्या क्रोएशिया प्रजासत्ताकमधल्या आहेत. त्यांचे वडील विख्यात बौद्ध विद्वान होते, ते वृद्ध झाल्यानंततर श्रीलंकेत जाऊन भिक्खू झाले. डॉ. अक्पिनार आठवड्याचा अर्धा काळ नॉर्दर्न कॅलिफोर्नियातील सिटी ऑफ टेन थाउझंड बुद्धाज् या चिनी बौद्ध मठामध्ये घालवतात, तिथे त्या बौद्धांना पाश्चात्य संस्कृतीविषयी शिकवतात. उरलेला आठवडा त्या बर्कलेमधील ग्रॅज्युएट थिऑलॉजिकल युनियनमध्ये असतात, तिथे त्या इस्लाम व तुलनात्मक धर्म याबद्दलचा अभ्यासक्रम चालवतात, तिथे त्या ख्रिस्ती लोकांना पौर्वात्य संस्कृतीविषयी शिकवतात.

डॉ. बर्झिन, तुम्ही बहुतांशाने इस्लामी राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्माची मांडणी केली आहे. असं करताना तुम्ही कशावर भर देता आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतो?

डॉ. बर्झिन: मुस्लीम श्रोत्यांकडून शिकण्याची माझी भूमिका राहिली आहे. प्रमाणित इतिहासामध्ये इस्लामचं अत्यंत चुकीचं चित्रण झालेलं आहे- मुस्लीम बौद्ध संस्कृतीत आले आणि त्यांनी सगळ्याचं विध्वंस केलं असं इतिहासातून मूलतः सूचित केल्याचं दिसतं, असं मी त्यांना स्पष्ट करून सांगतो. वास्तविक बौद्ध धर्म व इस्लाम यांच्यात अत्यंत रचनात्मक अशी अन्योन्यक्रीडा दीर्घ काळ झाली होती. विध्वंसक बाजूकडे बघितलं की त्या घटना मूलतः धार्मिक कारणांपेक्षा आर्थिक व राजकीय कारणांमुळे झाल्याचं दिसतं. त्यामुळे या ऐतिहासिक अन्योन्यक्रीडेबद्दल मी स्पष्टीकरण मागतो.

स्वाभाविकपणे मग मुस्लीम श्रोते बौद्ध धर्माविषयी विचारतात. इस्लामी जगतामधील ज्या विविध धार्मिक संस्थांना मी भेटी दिल्या, तिथले मुस्लीम विद्वान ईश्वराविषयीच्या संपूर्ण चर्चेत अतिशय रस घेत होते. मुस्लीम देश असलेल्या इंडोनेशियातील अनुभवातून मला कळलं की, “बौद्ध धर्म ईश्वरावर विश्वास ठेवत नाही” असं मुस्लीम श्रोत्यांसमोर म्हणण्याचा काहीच मार्ग नाही. असं केल्याने संवादाचं दार लगेच बंद होईल. इंडोनेशियामध्ये हिंदू धर्म, इस्लाम, प्रोटेस्टंट, कॅथलिक व बौद्ध धर्म हे पाच धर्म धोरण म्हणून स्वीकारले जातात, कारण हे ईश्वर मानणारे धर्म आहेत. इंडोनेशियन बौद्धांनी आदिबुद्धाच्या संकल्पनेद्वारे ईश्वरावरील बौद्धांची श्रद्धा सूचित केली. हे कालचक्र शिकवणुकीचा भाग आहे. इंडोनेशियात एक हजारांहून काही वर्षांपूर्वीपासून ही शिकवण पसरली आहे. आदिबुद्ध म्हणजे, शब्दशः, प्रथम किंवा आदिम बुद्ध. इंडोनेशियन बौद्धांना स्वतःला आदिबुद्धाचं पूर्ण आकलन झालेलं नव्हतं. पण त्याचं स्पष्टीकरण न करता ते म्हणाले, “आमच्याकडेही ईश्वराला समकक्ष आहे.” स्वाभाविकपणे मी इंडोनेशियाला आलो तेव्हा इंडोनेशियन बौद्धांनी मला आदिबुद्धाचा खरा अर्थ काय असं विचारलं. स्वच्छ प्रकाशमान मनाच्या संदर्भात याबद्दल बोलता येईल, असं मी त्यांना सांगितलं. प्रत्येक व्यक्तीमध्ये, हा आपल्या दिसण्याचा, आपल्या आकलनाचा निर्मिक असतो; त्यामुळे या अर्थी ते निर्मिकासारखं असतं.

आदिबुद्धाचं हे सर्वसाधारण अर्थनिर्णयन वापरून मला इतर देशांमधील मुस्लीम विद्वानांशी संवाद साधणं शक्य झालं. याबाबतीत मुस्लीम विद्वान अतिशय मोकळे असल्याचं दिसलं, कारण इस्लाममध्ये अल्लाहला मूर्त रूप नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक मनामधील ही निर्मिकाची शक्तीसुद्धा- कोणी याकडे प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळणाऱ्या निर्मिक ईश्वराप्रमाणेही पाहू शकेल- मूर्त रूपात नाही.

तिबेटी बौद्ध धर्मातील न्यिंग्मा, काग्यू व शाक्य या पंथांमध्ये मांडणी केल्याप्रमाणे आदिबुद्ध शब्तातीत, संकल्पनातीत, अकल्पनीय आहे. मुस्लीम विद्वांना हे समजून घेणं अगदीच सहज शक्य झालं. शिवाय, या शिकवणुकींमध्ये अंगभूत असलेली प्रेम व करुणेची प्राथमिक तत्त्वे मुस्लीम विद्वांनांना बौद्ध धर्माबद्दल अधिक खुलं करणारी ठरली.

ऐतिहासिकदृष्ट्या मुस्लीम सत्ताधीश अफगाणिस्तान, मध्य आशिया व भारतीय उपखंड यांसारख्या प्रदेशांमधील बौद्धांना ‘पवित्र ग्रंथाशी बांधील लोक’ (People of the Book) मानत नसत. ख्रिस्ती व ज्यू यांना कुरणात ही संज्ञा वापरली आहे. तरीही, बौद्धांना ‘पवित्र ग्रंथाशी बांधील लोकां’सारखाच दर्जा व अधिकार मिळत होते. याचा अर्थ, त्यांना स्वतःचा धर्म पाळता येत होता. फक्त त्यासाठी त्यांना विशेष कर भरावा लागत असे. तर, मुस्लीम विद्वानांशी चर्चा करताना आम्ही एकत्रपणे ‘ग्रंथाशी बांधील लोक’ म्हणजे काय याचा शोध घ्यायचो. मी गयानामध्ये एका पश्चिम आफ्रिकी सुफी नेत्याला भेटलो. जगाची निर्मिती केलेल्या किंवा त्यासंबंधी आदेश देणाऱ्या एखाद्या उच्च अमूर्त नीतिमत्तेवर श्रद्धा ठेवणारे लोक म्हणजे ‘ग्रंथाशी बांधील लोक’ होत, असं स्पष्टीकरण त्याने मला दिलं. मोझेसचे पाच ग्रंथ (तोराह) स्वीकारणारेच हे लोक असतील असं नाही. शिवाय, मी नंतर केलेल्या तपासामध्ये माझ्या लक्षात आलं की, आत्ताच्या उझबेकिस्तान व उत्तर अफगाणिस्तान प्रदेशात बौद्ध संहितांची भाषांतरं जुन्या तुर्क व सोग्दिअन या प्राचीन भाषांमध्ये उपलब्ध आहेत, त्यात धर्म या शब्दाचं भाषांतर ग्रीकमधून उसन्या घेतलेल्या नोम या शब्दाप्रमाणे करण्यात आलं, पण मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ ‘कायदा’ असा होता. त्यानंतर बौद्ध संहितांचं भाषांतर करणाऱ्या इतर मध्य आशियाई भाषांनी धर्मासाठीचा नोम हा शब्द सोग्दिअनमधून उसना घेतला. या भाषांमध्ये उइघर (एक तुर्की भाषा) व मंगोलियन यांचा समावेश होत होता. आधुनिक मंगोलियनमध्ये ‘नोम’ हा शब्द केवळ ‘धर्मा’साठी वापरला जात नाही, तर लिखित स्वरूपात धर्म ज्यात असतो ते ग्रंथ या अर्थाने ‘ग्रंथ’ हा वाढीव अर्थही या शब्दाशी जोडला गेला आहे.

पण मुस्लीम, ख्रिस्ती व ज्यू यांच्यात मोझेसचे पाच ग्रंथ सामायिक आहेत, तसं काही पुस्तक खरं तर बौद्धांमध्ये नाहीये?

डॉ. बर्झिन: नाही, पण धार्मिक संवाद व सौहार्द यांचा आधार म्हणून नैतिक कायद्यांचं महत्त्व किती आहे, हे ‘ग्रंथा’च्या प्रश्नावरून लक्षात येतं. 

डॉ. अक्पिनार: माझ्याही विचारांची दिशा हीच आहे. तुर्की लोक मुस्लीम झाले त्याआधी त्यांच्या संस्कृतीच्या अनेक पैलूंचा जनक चंगीझ खान होता, त्याने यसाच्या, म्हणजे ‘कायद्या’च्या आधाराने त्यांच्यावर विजय मिळवून राज्य केलं. हा अर्थातच अधिक ऐहिक स्वरूपाचा कायदा होता, पण यसाची संकल्पना धर्म या संकल्पनेशी अत्यंत साधर्म्य राखणारी आहे. शाश्वत कायदा जगाला वळण देतो.

डॉ. बर्झिन: दोन धर्मांच्या अनुयायांना चर्चा करता येईल अशा सामायिक परिभाषेचा शोध घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.

डॉ. अक्पिनार: होय. शरियाविषयीची इस्लामी शिकवण एका अर्थी बरीचशी बौद्धविचाराच्या जवळची वाटू शकते. शरिया या अरबी शब्दाचा अर्थ, जगातील रहदारी सहजतेने व्हावी यासाठी लोकांनी पाळायचा कायदा, असा होतो. लोकांना सौहार्दाने जगण्यासाठीचे हे मापदंड आहेत. शरियानुसार तुम्ही स्वतःच्या अंतःप्रेरणांना, स्वतःच्या शंकांना व स्वतःच्या अंतःस्फूर्तीला कसं हाताळायचं ते जाणून घ्यायला हवं. शरिया म्हणजे काही प्राथमिक संकल्पना नव्हेत, तर सत्यापर्यंत पोचण्यासाठीच्या पद्धतींचा संच आहे. हे जवळपास ध्यानधारणेसारखंच असतं. 

तारिक किंवा ‘मार्ग’ हा शरियाचा मध्यबिंदू असल्याचं वर्णन अनेकदा केलं जातं. तुम्ही शरियाकडे वर्तुळाचा व्यास म्हणून पाहिलंत, तर तारिकद्वारे आपण मध्यापर्यंत पोचतो. तुम्ही शरियाचा विचार गोल म्हणून केलात, तर तारिक म्हणजे त्या गोलाचा केंद्रबिंदू असतो, त्यातून तुम्ही इतर गोलांशी जोडले जाता. अज्ञात व शून्यत्व असलेल्या ईश्वराकडे थेट जाण्याचा हा मार्ग आहे.

तर, इस्लाममधील काही संकल्पना बौद्ध संकल्पनांशी अत्यंत साधर्म्य राखणाऱ्या आहेत. त्यातील बहुतांश संकल्पना मध्य आशियातून आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा बहुधा बौद्ध धर्माशी ऐतिहासिक पातळीवरही काही संबंध असेल. बौद्ध धर्म, इस्लाम व ख्रिस्ती धर्म यांच्यातील आणखी दुवे नोंदवणंही रोचक ठरेल. इस्लामचा एक थोर धर्मवेत्ता अल-गझाली याच्या धर्मसंहितेमुळे थॉमस अॅक्विनाज श्रद्धा व विवेक या संकल्पनांभोवती स्वतःची धर्मसंहिता लिहिण्यासाठी उद्युक्त झाला. मध्य आशियातील बौद्ध व बौद्धेतर यांनी या प्रश्नांची अतिशय तपशिलात चर्चा केली आहे.

डॉ. बर्झिन: जिहाद, म्हणजे ‘योग्य प्रयत्न’, यासारख्या संकल्पनाही बौद्ध शिकवणुकीशी जवळीक राखणाऱ्या आहेत.

डॉ. अक्पिनार: तुमची विचारप्रक्रिया हा जिहाद असू शकतो. तुम्ही करता ते सर्व काही जिहाद असू शकतं.

डॉ. बर्झिन: जिहाद या संज्ञेतून सूचित होणारं लढाऊपणाचं वैशिष्ट्यही बौद्ध परिभाषेमध्ये सापडतं. हे आश्चर्यकारक नाही. शेवटी बुद्ध स्वतः लढवय्या, सत्ताधारी जातीमधील होता. योग्य प्रयत्न केल्यामुळे बुद्धाला जेता मानण्यात आलं. त्याने अस्वस्थकारक भावनांशी लढाई करून विजय मिळवला. ही लढाई कुठे होते? ही लढाई मनामध्ये होते. ही लढाई अजाणपणा, हाव, ओढ, संताप व तिरस्कार यांच्या विरोधातील असते.

शिवाय, मध्य आशिया व भारत इथली सुफी चळवळ व बौद्ध धर्म यांचाही परस्परांवर बराच प्रभाव पडला. सुफी पंथातील काही प्रथा मंत्रपठणासारख्या असल्याचं दिसतं. सुफी मंडळी ईश्वराचं नामपठण करतात, त्याप्रमाणे बौद्ध अनुयायी मंजुश्रीचा जयघोष करतात. काही प्रथा मुस्लीम व बौद्ध या दोघांनाही समजण्याजोग्या असतात. प्रदक्षिणा व यात्रा, यांचा यात समावेश होतो. दोन्ही धर्मांमध्ये औदार्यावर आणि प्रत्येक जण समान असण्यावर बराच भर दिलेला आहे. त्या-त्या धर्माच्या वैशिष्ट्यांचा विचार करता हा प्रभाव नक्की कोणत्या बाजूने आला, किंवा ही वैशिष्ट्यं परस्परांहून स्वतंत्रपणेच विकसित झाली का, हे सांगणं अवघड आहे.

डॉ. अक्पिनार: इतक्या शतकांमध्ये भारत व इराणी आखात यांच्यात बराच थेट संपर्क आलेला आहे. सुरुवातीच्या काळात बसरा हे वर्दळीचं बंदर होतं आणि इराणी आखातात कोणी गंभीर आजारी पडलं, तर त्यांना समुद्रप्रवासाद्वारे मुंबईला नेलं जाण्याची शक्यता अधिक असायची, कारण मान्सूनमुळे प्रवास वेगाने व्हायचा. आरंभापासूनच धार्मिक बाबींमध्येही देवाणघेवाण होत आलेली आहे.

डॉ. बर्झिन: आणि अर्थातच भारतीय वास्तुरचनाकारांनी नवीन अब्बासिद राजघराण्याची राजधानी म्हणून बगदाद उभं केलं. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात बगदाद हे ज्ञानाचं घर होतं. तिथे बौद्ध व हिंदू भाषांतरकार येत आणि विविध संहिता स्थानिक अरबी भाषेत भाषांतरित करत असत. तर, तिथे बराच आंतरसांस्कृतिक संपर्क होत असे. विज्ञानाबाबत, विशेषतः खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र व वैद्यकशास्त्र या विज्ञानाच्या प्रांतांबाबत देवाणघेवाण होत असे.

डॉ. अक्पिनार: शिवाय, तत्त्वज्ञानाबाबतदेखील देवाणघेवाण होत होती. मुस्लीम संदर्भामध्ये तत्त्वज्ञानाची चर्चा होते तेव्हा प्रत्येक वेळी त्याचा संबंध ग्रीसशी जोडला जातो, ही पाश्चात्त्यांची चूक आहे, असं मला वाटतं. यातील अनेक तात्त्विक संकल्पना प्रत्यक्षात ग्रीसहून आलेल्या नाहीत, तर भारतातून किंवा पूर्वेकडून आलेल्या आहेत.

डॉ. बर्झिन: या संदर्भात मुस्लीम आध्यात्मिक नेत्यांची इतर धर्मांच्या नेत्यांशी- विशेषतः परम पूजनीय दलाई लामा यांच्यासारख्या लोकांशी चर्चा सुरू आहे. एकदा परम पूजनीय दलाई लामांनी या दोन धर्मांबाबत चर्चा करण्यासाठी पश्चिम आफ्रिकी काळा सुफी नेता शोधण्याची सूचना मला केली. तर, असा नेता अचानकच माझ्या समोर अवतीर्ण झाला. पश्चिम आफ्रिकेतील गयानामधले वंशपरंपरागत सुफी पंथाचे नेते डॉ. तिरमिझिओऊ डिएल्लो यांचा उल्लेख मी आधी केलाच आहे,  राजनैतिक सेवेतील एका सामायिक जर्मन मित्राद्वारे मी त्यांना भेटलो. त्यांना घेऊन मी परम पूजनीय दलाई लामांच्या भेटीसाठी धर्मशाळा इथे गेलो. त्यांना मुख्यत्वे करुणा या विषयावर चर्चा करण्यात रस होता. सुफी पंथाच्या पश्चिम आफ्रिकी रूपामध्ये प्रेम व करुणा ही मुख्य तत्त्वं आहेत. परम पूजनीय दलाई लामांशी झालेल्या चर्चेच्या अनुभवाने हे सुफी नेते इतके भारावून गेले की, गेल्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रियातील ग्राझ इथे दलाई लामांनी आयोजित केलेल्या कालचक्र दीक्षा समारंभाला डॉ. डिएल्लो उपस्थित होते.

डॉ. अक्पिनार: कुराणातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दयाळू व करुणामय ईश्वराचा धावा केलेला आहे. कुराण हा मूलतः मोझेसच्या पाच ग्रंथांचं अर्थनिर्णयन करणारा ग्रंथ आहे, असं मी पाहतो. कारण, मुहम्मदाच्या काळात सर्वांनाच मोझेसच्या पाच ग्रंथांमधील कथा माहीत होत्या. पण मुहम्मदाने सिमाइट प्राचीन परंपरेमध्ये दैवी कायद्याच्या अंतर्गत करुणेची संकल्पना रुजवली. ‘जशास तसं’ अशी पारंपरिक उक्ती विकसित करून त्याने ईश्वर करुणामय आहे याकडे निर्देश केला, आणि तुम्हाला स्वतःमध्ये करुणा सापडली, तर उत्तम. पण स्वतःमध्ये करुणा सापडली नाही, तर फक्त जशास तसं करताना प्रमाण तेच ठेवा, वाढवू नका. तर, कुराणामध्ये सुडाचा कायदा मवाळ केलेला आहे.

इस्लाममधील एका सुंदर कथेत हा मोठा प्रश्न हाताळलेला आहे: मुस्लीम का लढतात? सुरुवातीला, ईश्वरापासून स्फूर्ती घेतलेल्या इतर प्रत्येक प्रेषिताप्रमाणे मुहम्मदसुद्धा अहिंसक होता. पण त्याच्या समुदायातील सदस्यांचा मृत्यू होत होता आणि त्यांच्यावर हल्ले होत होते. अखेरीस, आपल्या अनुयायांना लढण्यापासून थाबवणं शक्य नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेव्हा मुहम्मदाने ते विख्यात उद्गार काढले:

मला हे थांबवता येणार नाही हे कळतं आहे, त्यामुळे तुम्हाला लढायचं असेल, तर लढा. पण आजपासून तुमच्या कृत्यांचं ओझं तुम्हालाच बाळगावं लागेल, आणि तुम्ही स्वतःच्या कृत्यांचं ओझं उचलण्याइतके जबाबदार होत नाही, तोवर तुमचा धर्म शुद्ध होणार नाही, हे विसरू नका.

या शिकवणुकीमध्ये कर्माचा नियमच सांगितलेला आहे.

कद्र या शब्दाचा अर्थ आहे ताकद. सर्वसाधारणतः पश्चिमेत कद्र या शब्दाकडे नियती म्हणून पाहिलं जातं. परंतु, नियती या शब्दाकडे कर्म म्हणूनही पाहता येतं. मुहम्मद पुढे म्हणाला होता-

तुमची तलवार शत्रूच्या मानेवर असेल आणि तो गुडघे टेकून तुमच्याकडे दयेची याचना करत असेल, तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये करुणेची अभिव्यक्ती आढळली, तर त्याला क्षमा करणं हा सर्वोत्तम मार्ग असेल, आणि अशा रितीने तो शत्रू तुमचा मित्र होऊन जातो. तुम्हाला त्या व्यक्तीविषयी करुणा वाटली नाही, तर व्हा पुढे आणि त्याला मारून टाका. पण तुम्ही ईश्वराला उत्तरदायी आहात, त्यामुळे करुणा शोधायचा प्रयत्न करा.

आरंभीचे अनेक मुस्लीम युद्धभूमीवर धर्मांतरित झालेले होते. पण यात जीवदान मिळालेला नव्हे, तर जीवदान देणारा अधिक चांगला माणूस होतो, ही संकल्पना आहे.

तर, आत्ताच्या इस्लामी जिहादमध्ये ही करुणा कुठे दिसते?

डॉ. अक्पिनार: यात करुणा दिसत नाही. आज आपल्याकडे इस्लामची काही अत्यंत बंडखोर रूपं आहेत, त्यांनी पारंपरिक धारणेपासून फारकत घेतलेली आहे. हे नव-मुस्लीम अनेकदा असा दावा करतात की, कुराण हा इस्लामचा पाया असलेला पवित्र ग्रंथ असला तरी त्याचं अध्ययन करण्याची काहीही गरज नाही. त्यांच्या लेखी, पहिलं व दुसरं प्रकरण अभ्यासून बाकीचं विसरून जाणं पुरेसं आहे. एकदा का आपण असं करायला लागलो की, आपली श्रद्धा डळमळीत होते.

डॉ. बर्झिन: बंडखोर, धर्मवेडे व कट्टरतावादी असलेल्या मुस्लिमांचं प्रमाण कमी आहे, हे स्पष्टपणे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकच धर्मात- यात बौद्ध धर्मही आला- कट्टरतावादी धर्मवेडे आहेत.

आत्मघातकी बॉम्बहल्ल्याला कारणीभूत ठरणाऱ्या किंवा त्याचं समर्थन करणाऱ्या शिकवणी इस्लाममध्ये आहेत का?

डॉ. अक्पिनार: इस्लाममध्ये, ख्रिस्ती जगताप्रमाणे, हुतात्मे असतात. आत्मघातकी बॉम्बर स्वतःला  हुतात्मे म्हणवतात, पण ते स्वतःची हत्या करतात. ‘तुम्ही हत्या करू नये’, विशेषतः स्वतःची हत्या करू नये हा पहिला नियम आहे. हे लोक हुतात्मे नाहीत, तर निव्वळ ‘आत्मघातकी’ आहेत.

पश्चिमेतीलअनेक बौद्धांना मुख्यत्वे रूमी व हाफिझ यांच्यासारख्या सुफी कवींद्वारे माहिती झालेली असते. हे कवी ईश्वराबद्दलच्या भक्तीवर व प्रेमावर भर देतात किंवा सर्व गोष्टींमधून ईश्वराचा आविष्कार होतो असं सांगतात. लोकांना हे कवी प्रिय असले, आणि अशा प्रकारचा दृष्टिकोन प्रिय असला, तरी त्यात उल्लेख येणाऱ्या अत्यानंददायक प्रेमाला अनेक पाश्चात्त्य बौद्धांनी अंगीकारलेल्या बौद्ध धर्मात फारशी जागा नाही. यात मूक ध्यानधारणा व आंतरिक शोध यांचा समावेश होतो.

डॉ. अक्पिनार: अत्यानंदी नसलेलेही अनेक मुस्लीम असतात. ते काव्य अत्यंत सक्षम आहे आणि त्याची मुळं बहुधा हिंदू धर्मात, किंवा इतर भारतीय भक्ती परंपरांमध्ये असावीत. पण इस्लाम व बौद्ध धर्म यांना अतिशय रोचक रितीने सांधणारी आणखीही एक परंपरा मध्य आशियामध्ये आहे. याला चिनी लोक ‘चार चरणांची कडवी’ म्हणतील. तुर्की भाषांमध्ये याला कोश्मा असं संबोधलं जातं- त्याचा अर्थ होतो ‘तुमच्या मनात चाललेल्या घडामोडी’. एखादा विचार असा धावत असताना तुम्ही पकडता; वास्तविक हा विचार सोडून द्यायला हवा, पण तुम्ही त्याला पकडून ठेवता. तुम्ही दोन ओळी लिहिता, आणि अर्थ फिरवणारी शेवटची ओळ लिहिता, त्यात तुम्ही म्हटलेल्याचा काही अर्थ लागत नाही. त्याचं सार कोआनचं असतं. उमर खय्यामसारखे विख्यात कवी याचा आधार घेत असत, तसंच विशेषतः मध्य आशियातील अनेक सुफी कवींनीदेखील याचा आधार घेतला आहे. तुर्कस्तानातील एक विख्यात लोककवी युनूस एम्री हे सुफी व्यक्तिमत्त्व याचा उत्तम दाखला आहे. त्यांच्या अनेक कवितांच्या सुरुवातीला दफनभूमीमधील थडग्यासंबंधीचं चिंतन असतं. ध्यानधारणेचं हे एक सार्वत्रिक रूप आहे.

सुफी पंथामध्ये मूक ध्यानधारणा असते का?

डॉ. अक्पिनार: होय, ते संप्रदायावर अवलंबून असतं. काही संप्रदाय ओरडतात व नाचतात. इतर काही मौन राखतात.

डॉ. बर्झिन: दुसऱ्या बाजूला, अनेक सुफी परंपरांमध्ये आढळणारा भक्तीचा पैलू अनेक महायन बौद्ध केंद्रांवर उपासना करणाऱ्या पाश्चात्त्यांमध्ये आढळतो. अनेक पाश्चात्त्य उपासकांना एकत्र येऊन मंत्रपठण करायला व गायला आवडतं, आणि काही जण कथित ‘वाज्रा-नृत्या’तही सहभागी होतात.

अल्लाह आणि इतर धर्मांमधील ईश्वराच्या संकल्पना व बौद्ध धर्मातील संबंधित शिकवणी याबद्दल तुम्ही काही तुलनात्मक सांगू शकाल का?

डॉ. बर्झिन: बौद्ध धर्मातील काही पैलू अल्लाहशी किंवा एकंदरच ईश्वराशी निगडीत असू शकतात, पण त्यांना एकाच संज्ञेखाली आणता येणार नाही. परंतु, बौद्ध धर्मामध्ये आपल्या व आपल्या विश्वाच्या पूर्णतः पलीकडे किंवा आपल्याहून विभक्त अशा अलौकिक द्वैती रितीने काही तत्त्व किंवा वास्तव आहे, असं प्रतिपादन बौद्ध धर्म करत नाही. बौद्ध धर्मामध्ये सगळ्यांना एकत्र आणणारं सर्वोच्च तत्त्व आहे ‘शून्यत्व’. कोणतीही गोष्ट अशक्य, काल्पनिक, खऱ्या अर्थाने इतर प्रत्येक गोष्टींपासून स्वतंत्रपणे अस्तित्वात नसते. प्रत्येक जीव व गोष्टी परस्परावलंबी रितीने उदयाला येतात. तुम्ही शून्यत्वाच्या संदर्भात बोललात, तर ते आपल्यापासून किंवा आपल्या जगापासून विभक्त नाही, पण काही तिबेटी परंपरा हे शून्यत्व शब्दातीत व संकल्पनातीत असल्याचं म्हणतात. कारण, सर्व जीव व पर्यावरण परस्परावलंबी आहेत, त्यामुळे इतरांविषयी आपल्याला आस्था व करुणा वाटायला हवी. करुणेचा गुण विभक्त किंवा अतीतामध्ये नसतो, तर प्रत्येकाच्या आत असतो.

डॉ. अक्पिनार: अल्ला म्हणजे शून्यत्व असतं, असं मी म्हणेन. ‘ला इलाह इल् अल्-लाह’ (सौदी अरेबियाच्या ध्वजावर हे लिहिलं आहे) हा प्राथमिक इस्लामी मंत्र आपण म्हणतो तेव्हा त्यात ‘अल्लाहशिवाय दुसरा कोणताही ईश्वर नाही’ या ओळीची पुनरावृत्ती आपण करत असतो.’ यात एक व्यंजन किंवा एक ‘लाह’ कमी करत न्यायचा.

‘लाह’ म्हणजे ‘नाही’, अर्थातच त्यात नकार आहे. त्यामुळे अल्लाह म्हणजे मोठा ‘नकार’. तुम्हाला कल्पना करता येणं शक्य नाही, कारण ते सगळ्या पलीकडे आहे, आणि लाह शब्दाच्या शेवटी असणाऱ्या मोठ्या ‘अह’द्वारे शून्यत्व सूचित होतं. तुम्ही ‘ला इलाह इल्ल अल्-लाह’ या ओळीची पुनरावृत्ती करता तेव्हा अकल्पनीय सगळ्या गोष्टींचे स्तर उलगडत असता. तुम्ही त्याची पुनरावृत्ती करता करता अक्षरं वगळता, आणि शेवटी ईश्वराच्या शुद्ध श्वासाद्वारे ‘अह’ म्हणजे ‘करणं’ हा एकच पर्याय उरतो.

डॉ. बर्झिनः शून्यता म्हणजे नकार किंवा उच्चाटन- या संदर्भात गोष्टी कशा अस्तित्वात आहेत, त्याबद्दलच्या सर्व कल्पना पुसल्या जातात. अलिखित ‘अ’ या स्वराद्वारे त्याकडे निर्देश करता येतो. प्रत्येक संस्कृत पूर्ण व्यंजनामध्ये व भारतीय भाषांमध्ये हा स्वर अंगभूतरित्या असतो. आणि ‘अ’ हा नकाराचा संस्कृत प्रत्यय असतो. शिवाय, तंत्रामध्ये मानसिक कामकाजाचे ढोबळ पैलू व त्यासोबत येणारा गोंधळ हे सगळं पुसलं जातं. ‘हम’ या शब्दातून येणाऱ्या कल्पनाचित्रामध्ये या गोंधळाचं प्रतिनिधित्व होताना दिसतं. हे पुसत गेल्यावर शेवटी केवळ स्पष्ट हलकं मन उरतं, प्रत्येक गोष्टीच्या परस्परावलंबित्वाचा व दिसण्याचा हा आधार असतो. तर, सर्व काही ज्या अस्वाभाविक सखोल रितीने अस्तित्वात असतं त्याला शून्यत्व म्हणतात, यात अलौकिक काही येत नाही. इथेही इस्लामी शिकवणुकीशी अनेक बाबतीत साधर्म्य आहे. यातूनच जगातील या दोन महान धर्मांमध्ये संवाद व समजूत प्रस्थापित होते.

Top