बौद्ध धर्म आणि इस्लाम दरम्यान सुसंवादासाठीचे दृष्टिकोन कोणते आहेत?
मला वाटतं यासाठी अनेक चांगल्या शक्यता उपलब्ध आहेत. मी १९९७पासून जवळपास बारा वर्षं झाली याकामी गुंतलो आहे. इस्लामिक जगतातील परिसरात प्रवास करत असताना मला आढळून आलं की इथले लोक ज्ञानाचे भुकेले आहेत. अनेकदा ते मला सांगतात की, ‘कृपा करून सर्वांना सांगा की आम्ही दहशतवादी नाही.’
परमपूज्य दलाई लामा यांनी विशेषतः मुस्लिम जगतापर्यंत पोहचत, धार्मिक सुसंवाद घडवून आणण्यावर विशेष भर दिला आहे. एकमेकाच्या धर्मांतराचा हेतू न बाळगता, परस्परांच्या धार्मिक धारणा समजून घेण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला आहे. यात निश्चितच अशा धारणा असू शकतात, ज्याबाबत भिन्न दृष्टिकोन किंवा मतभेद असू शकतात, पण आपण त्यावर लक्ष केंद्रित करण्यात अर्थ नाही आणि त्याची गरजही नाही. आपण परस्परांच्या धर्मभावनांचा आदर करायला हवा. प्रत्येक धर्मातील धारणा त्या धर्माच्या अनुयायांच्या कल्याणासाठी कशा मदतगार ठरतात हे समजून घेऊन त्यांचा सन्मान ठेवायला हवा आणि आपल्यातील समान दुव्यांवर काम करण्यावर भर द्यायला हवा. हे विशेषतः परमपूज्य ज्याला “सार्वभौम मूल्ये” म्हणतात, अशा मूलभूत मूल्यांवर भर देण्याविषयी आहे.
आपण अशा रीतीने प्रत्येकाला हव्या असणाऱ्या शांतता आणि सुसंवादाच्या दिशेनं काम करायला हवं. याचा अर्थ आपल्या सर्व उपक्रमात मुस्लिमांचा समावेश करून घेणं आणि ‘आम्ही’ विरुद्ध ‘तुम्ही’ असा दृष्टिकोन न बाळगणं. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या संकेतस्थळाचा बौद्ध धर्म आणि इस्लामसंदर्भातील विभाग इस्लामिक भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आला आहे, कदाचित त्या भाषेतील फार लोक तो वाचणार नाहीत, पण तो मुस्लिमांप्रति आदराचा संकेत आहे. आदरभाव दाखवणं फार महत्त्वाचं आहे आणि परमपूज्य दलाई लामा त्यासाठीच सतत प्रोत्साहित करत असतात.
बौद्ध आणि इस्लामिक संस्कृतींमधील सबंधांच्या इतिहासविषयक कामात, मी अधिक वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि भारतातील बौद्ध संस्कृती मुस्लिमांनी नष्ट केली असल्याचा जुना प्रचार पुन्हा सांगत बसलो नाही. इतिहासाची अशी सादरीकरणं मुस्लिम जेत्यांना केवळ धार्मिक कट्टरतावादी म्हणून सादर करतात, पण त्यांची पैसा, सत्ता अशी इतर उद्दिष्टं आणि प्रेरणाही असतात. उलट आपण प्रत्येक संस्कृतीच्या परस्पराप्रतिच्या सकारात्मक योगदानावरही भर द्यायला हवाः जसे मुस्लिमांकडून आधुनिक विज्ञानाला मिळालेलं योगदान इ. मुस्लिम संस्कृतीच्या या सकारात्मक योगदानावर आपण जितका भर देऊ आणि आपल्या सर्व व्यवहारात त्यांच्याप्रति आदर बाळगू, तर मला वाटतं ते तितकंच परस्पर साहचर्यासाठी उपकारक असेल. माझा अनुभव आहे की, ज्या मुस्लिम नेत्यांना भेटण्याचा बहुमान मला लाभला, त्यांचा अशा चर्चांबाबतचा दृष्टिकोन फारच मनमोकळा होता.