बौद्ध-मुस्लीम सौहार्दासाठी शिक्षण कळीचं आहे

बौद्ध धर्म व इस्लाम या दोन्हींमध्ये प्रेम, करुणा, संयम व क्षमाशीलता ही वैश्विक मूल्यं शिकवली जातात. शिक्षणाद्वारे बौद्धांना व मुस्लिमांना त्यांच्यातील साम्य लक्षात येते व त्याची दखल घेता येते, तेव्हा तात्त्विक मतभेद असतानाही त्यांनी धार्मिक सौहार्दाचा पाया रचला आहे.

आंतरधर्मीय सौहार्दासाठी शिक्षण कळीचं आहे, असं परम पूजनीय दलाई लामा वारंवार सांगत आले आहेत. इतर धर्मांविषयीचा अविश्वास व वैरभाव अनेकदा त्या धर्मांच्या शिकवणुकींविषयीच्या अज्ञानावर आधारलेले असतात. सर्व धर्मांमध्ये प्रेम, करुणा, क्षमाशीलता व दयाळूपणा या वैश्विक मूल्यांवरील श्रद्धेचा समावेश होतो. व्यक्ती व समाज यांच्यासाठी जीवन सुखी करणं, हे उद्दिष्टही प्रत्येक धर्मामध्ये असतं. या धर्मांमध्ये तात्त्विक मतभेद असले, तरी ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वरील मूल्यांचे महत्त्व कमी होत नाही. ही एकसारखीच मूल्यं साध्य करण्यासाठी आचरणकर्त्यांना समान परिणामकारक असलेल्या विविध चौकटी व कारणं सूचित करण्याचं काम तेवढं हे धर्म करत असतात. त्यामुळे धार्मिक सौहार्द जोपासण्यासाठी भिन्न धर्माच्या अनुयायांनी हे समजून घेण्याची गरज आहे की, परस्परांच्या धर्मांनी एकसारख्या नैतिक मूल्यांची पाठराखण केलेली आहे. आपली भूमी सामायिक आहे या योग्य ज्ञानाच्या आधारावरच विश्वास, आदर व सौहार्द वृद्धिंगत होऊ शकतात.

बौद्ध व मुस्लीम संबंधांच्या संदर्भात आंतरधर्मीय शिक्षणाची गरज विशेष प्रस्तुत ठरणारी आहे. विशेषतः म्यानमार, थायलंड व श्रीलंका इथे सांप्रदायिक संघर्ष उद्भवलेले असल्यामुळे तिथे ही गरज जास्त आहे. सर्वसामान्य समुदायामध्ये होणारी सांप्रदायिक हिंसा घृणास्पदच असते, पण मठामधील समुदायाने अशा हिंसाचाराला प्रोत्साहन दिले तर ते जास्त असहनीय असते. ही परिस्थिती निवळवण्यासाठी कोणती पावले उचलता येतील याचा शोध घेऊया.

सातशे वर्षांहून अधिक काळ बौद्ध जगतामध्ये नालंदा विद्यापीठ हे ज्ञानाचे एक महत्त्वाचे स्थान होते. तिथे थोर बौद्ध गुरू त्यांचे ग्रंथ लिहीत व शिकवत असत, चार भारतीय बौद्ध तत्त्वव्यवस्था सादर करत असत, आणि तिथेच ते त्यांच्या काळातील इतर विचारप्रवाहांच्या गुरूंना भेटत व त्यांच्याशी वादचर्चा करत. या वादांमध्ये जो पक्ष हरायचा तो विजेत्याचं प्रतिपादन अंतिम सत्य म्हणून स्वीकारत असे. यात बरंच काही पणाला लागत होतं: या वादांमध्ये विजयी होणाऱ्यांना राजाश्रय मिळत होता.

नालंदा इथे भिक्खू विद्यार्थी वादांमध्ये प्रशिक्षण घेत असत आणि बौद्धेतर भारतीय तत्त्वव्यवस्थांच्या प्रतिपादनांचाही अभ्यास करत. त्यांच्या अभ्यासांचे उद्दिष्ट या तत्त्वव्यवस्थांची मतं खोडणं हे असायचं. तिबेटी मठसंस्थांनी नालंदा इथली वादचर्चेद्वारे अध्ययनाची परंपरा सुरू ठेवली आहे आणि प्राचीन भारतीय बौद्धेतर तत्त्वव्यवस्थांमधील प्रतिपादनांशी बौद्ध प्रतिपादनांची तुलनाही तिथे केली जाते.

बौद्धेतर विचारांचा बौद्ध दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची नालंदा परंपरा आता मठातून व इहवादी शिक्षणातून विस्तारण्याची वेळ आली आहे. या अभ्यासक्रमामध्ये इस्लामच्या अभ्यासाचा समावेश करणं गरजेचं आहे, पण त्यात काही महत्त्वाचे बदल व्हायला हवेत. दोन्ही धर्मांमधील वैश्विक मूल्यांच्या सामायिक भूमीचा शोध घेणं, हे या अभ्यासाचं उद्दिष्ट असायला हवं. वादामध्ये विरोधकाची भूमिका नाकारण्यासाठी तात्त्विक मतभेदांचं अध्ययन करू नये. उलट, प्रेम, करुणा, इत्यादी वैश्विक मूल्यांना पूर्णतः भिन्न विचारव्यवस्थांचा समसमान आधार कसा लाभलेला आहे, हे शोधण्यावर वादचर्चेने लक्ष केंद्रित करायला हवं.

परिणामी, बौद्धांना त्यांच्या अभ्यासादरम्यान इस्लामच्या शिकवणुकी समजतील, त्यांचा आस्वाद घेता येईल व आदर करता येईल, आणि इस्लाम आपल्या श्रद्धांना धोका निर्माण करणारा नाही हेसुद्धा बौद्धांच्या लक्षात येईल. यातून सौहार्दपूर्ण सांप्रादायिक संबंध प्रस्थापित होतील. विशेषतः असे संघर्ष ज्या ठिकाणी उद्भवलेले आहेत त्या दक्षिण व आग्नेय आशियामध्ये याची विशेष गरज आहे. अशा रितीने मठांना दाखला घालून देता येईल आणि त्यातून शांततेची जोपासना होईल.

इस्लाम व बौद्ध या दोन्ही धर्मांच्या शिकवणुकींमधून वैश्विक मूल्यांची पाठराखण कशी केली जाते, याची काही उदाहरणं थोडक्यात पाहू.

इस्लामच्या मते, ईश्वराने सर्व पुरुष व स्त्रिया यांची निर्मिती केली. ईश्वरावर श्रद्धा ठेवणं व त्याला शरण जाणं, त्याची इच्छा अनुसरणं, असा स्पष्ट कल व ओढा त्यांना निर्मितीपासूनच मिळाला. त्यांनी ईश्वराची इच्छा म्हणजे स्त्री-पुरुषांनी त्याने निर्माण केलेल्या नैतिक कायद्यांचं पालन करणं आणि उत्कृष्ट चारित्र्य राखून व सेवादायी कृती करून त्याची उपासना करणं. ईश्वाराप्रति उत्कृष्ट सेवादायी कृती करणं म्हणजे ईश्वाराच्या सर्व निर्मितीबाबत प्रेमाने कृती करणं. असं करणं ही एक प्रकारची उपासनाच आहे आणि त्यातून उपासक ईश्वराच्या इच्छेनुसार ईश्वराच्या जवळ येतो.

पण ईश्वराने मानवाची निर्मिती करताना बुद्धिमत्ता व संकल्प स्वातंत्र्यही दिलं. संकल्प स्वातंत्र्य अंमलात आणून व बुद्धिमत्ता वापरून लोक ईश्वराच्या इच्छेचं पालन करायचं की नाही हे ठरवू शकतात. त्यांनी ईश्वरेच्छेचं पालन न करण्याचं ठरवलं, तर ते विध्वंसक भावनांच्या प्रभावाखाली येतात आणि आत्मकेंद्री होतात. त्यातून ईश्वराने निषिद्ध मानलेलं नकारात्मक वर्तन घडतं.

इतरांशी प्रेमाने वागणं हीसुद्धा संकल्प स्वातंत्र्यातून घडणारीच कृती आहे आणि ही निवड करण्यासाठीही लोक त्यांची बुद्धिमत्ता वापरू शकतात. ते इतरांशी प्रेमाने व दयाळूपणे वागले, तर ईश्वराच्या जवळ जाण्याच्या आंतरिक ओढ्यानुसार वागत आहेत असं म्हणता येतं. इस्लाममध्ये लोकांच्यात निखळ रितीने विश्वाविषयीचं व मानवतेविषयीचं प्रेम विकसित होतं, तेव्हा ते प्रेम मूलतः विश्वाविषयी किंवा मानवतेविषयी नसतं, तर त्यांच्या उत्कृष्टता निर्माण करणाऱ्या ईश्वराविषयीचं ते प्रेम असतं.

बौद्ध धर्मानुसार, सर्व जीवांमध्ये निखळ बुद्ध-स्वरूप असतं, त्याला आरंभ नसतो: त्यामुळे या जीवांना स्वतः बुद्ध होणं शक्य असतं. इस्लाममध्ये लोकांना त्यांच्या आंतरिक निखळ स्वरूपामुळे ईश्वराजवळ येणं शक्य होतं आणि काही सुफी पंथांमध्ये ईश्वरामध्ये मिसळूनही जाता येतं, पण खुद्द ईश्वर कधीच होता येत नाही. लोकांमध्ये कोणीच बुद्ध-स्वरूप निर्माण केलेलं नाही, असं बौद्ध धर्म मानतो. केवळ वास्तवातील एक वस्तुस्थिती म्हणून ते तिथे आहे.

इस्लामप्रमाणे बौद्ध धर्मही असं प्रतिपादन करतो की, आंतरिक करुणेसारखे गुण लोकांमध्ये असतात आणि उपकारक व अपायकारक गोष्टींमध्ये भेद करण्याची बुद्धिमत्ताही त्यांच्यात असते. पण बौद्ध धर्मामध्ये, कोणत्या कृती दुःख देतात व कोणत्या सुख देतात या आकलनावर नैतिक शिस्त आधारलेली असते. लोकांना त्यांची बुद्धिमत्ता वापरून काय उपकारक आहे व काय अपायकारक आहे याचं विश्लेषण व भेद स्वतः करता येतो. इस्लाममध्ये ईश्वराच्या इच्छेचं पालन करायचं का हे ठरवण्यासाठी बुद्धिमत्तेचा वापर होतो. दोन्हींमध्ये लोकांना उपकारक किंवा अपायकारक रितीने कृती करण्याची निवड करायचं स्वातंत्र्य आहे आणि कोणता पर्याय स्वीकारायचा हे ठरवण्यासाठी बुद्धिमत्तेतील भेदक्षमतेचा वापर करू शकतात. ईश्वर व बुद्ध सर्वव्यापी असले, तरी त्यांच्यापैकी कोणीही लोकांच्या निवडींचे पूर्वनिर्धारण करत नाही.

इस्लामच्या मतानुसार, ईश्वराने नैतिक वर्तनाचे नियम केले आहेत आणि ईश्वर निवाडा करतो, बक्षिस अथवा शिक्षा देतो. पण ईश्वर दयाळू व करुणामय आहे, आणि स्वतःच्या दुष्कृत्यांचा पश्चात्ताप होणाऱ्यांना व ईश्वराच्या इच्छेला शरण जाणाऱ्यांना तो क्षमा करतो. बौद्ध धर्मानुसार, कर्माचे नियम व वर्तनविषयक कार्यकारणभाव कोणीही निर्माण केलेले नाहीत. हे केवळ वास्तवाचं स्वरूप आहे. अजाणपणाने केलेल्या विध्वंसक वर्तनातून स्वाभाविकपणे दुःख निर्माण होते, तर प्रज्ञा व करुणा यातून केलेल्या रचनात्मक वर्तनातून सुख उत्पन्न होतं. परंतु,  लोकांनी त्यांच्या दुष्कृत्यांची जाहीर कबुली दिली व प्रामाणिकपणे त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला, तर त्यांना नकारात्मक कृतीचे दुःखद परिणाम अनुभवणं टाळता येईल, असं इस्लामप्रमाणे बौद्ध धर्मातही म्हटलं आहे. पण शुद्धीकरणासोबत बुद्धाकडे क्षमायाचना करता येईल व क्षमा केलं जाईल असं मानता येत नाही.

इतर जण सुखी व्हावेत व त्यांना सुखाची कारणं लाभावीत, अशी इच्छा म्हणजे प्रेम, असं बौद्ध धर्म मानतो. प्रत्येक जण समान आहे, या जाणिवेवर ही धारणा आधारलेली आहे: प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं, कोणालाही दुःखी व्हायची इच्छा नसते. इस्लाममध्ये प्रत्येक जण समान आहे, म्हणजे सर्व जीवांना ईश्वराने समतेने निर्माण केले आहे. दोन्ही धर्मांमध्ये सर्व जीव समान मानलेले आहेत.

सर्व जीवांमध्ये बुद्ध-स्वरूप असतं, त्यामुळे त्यांच्यात सुखी होण्याची क्षमता असते व त्यांचा तो अधिकारही असतो, असं बौद्ध धर्म शिकवतो. त्यामुळे इतरांविषयी वाटणारं प्रेम हे त्यांनी सुखी व्हावं या विचारातून आलेलं असतं. प्रेम व इतरांची सेवा ही बुद्धाच्या उपासनेची कृती नसते. इतरांवर प्रेम करताना लोक स्वतः बुद्ध होण्यासाठी सकारात्मक शक्ती विकसित करतात. या अर्थी ते बुद्धत्वाजवळ येतात, पण इस्लामप्रमाणे ते खुद्द बुद्धाच्या जवळ येत नाहीत.

या उदाहरणांवरून हे स्पष्ट आहे की, तात्त्विक मतभेद असले, तरी बौद्ध व इस्लाम धर्मांच्या शिकवणुकीतून प्रेम, करुणा व क्षमाशीलता या प्राथमिक वैश्विक मूल्यांची एकसारखीच जोपासना होते. परंतु, धार्मिक सौहार्द राखण्यासाठी आंतरधर्मीय शिक्षण पुरेसं नाही. बौद्ध-मुस्लीम संघर्षाची कारणं बहुविध व गुंतागुंतीची आहेत. शिवाय, संघर्ष होत असलेल्या प्रत्येक ठिकाणी ही कारणं एकसारखी नाहीत. धार्मिक श्रद्धेमधील भेद हे सध्याच्या संघर्षाचं कारण बहुतांशाने नसतंच. बहुतेकदा आर्थिक, राजकीय, भाषिक, वांशिक व ऐतिहासिक प्रश्न वैरभाव निर्माण करण्यात मोठी भूमिका पार पाडत असतात. तरीही, प्रत्येक धर्माने परस्परांचा आदर करावा यासाठी आंतरधर्मीय शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. संघर्षांचा ठपका केवळ धार्मिक मतभेदांवर ठेवला जातो, ही दिशा बदलायची असेल आणि अंतःस्थ सामाजिक, ऐतिहासिक व आर्थिक कारणांवर तोडगा काढायचा असेल, तर अधिक विस्तृत शिक्षणानेच ते साध्य करता येईल. पण राजकारण किंवा अर्थकारण यांच्याशी संबंधित कोणताही धोरणात्मक बदल यशस्वी व्हायचा असेल, तर त्याला बौद्ध व मुस्लिमांमधील सामायिक वैश्विक मूल्यांचा आधार असायला हवा. यामध्ये शिक्षणाची भूमिका कळीची आहे आणि या क्षेत्रात नालंदा पुन्हा एकदा स्वतःचं अग्रगण्य स्थान प्राप्त करेल, अशी आशा करूया. धन्यवाद.

Top