तिबेटी मुस्लिमांचा इतिहास

तिबेटी मुस्लिमांचे सर्वेक्षण 

१९५९ पूर्वी मध्य तिबेटमध्ये सुमारे ३००० तिबेटी मुस्लिम राहत होते. ते १४व्या आणि १७व्या शतकात काश्मीर, लडाख, नेपाळ आणि चीनद्वारे तिबेटमध्ये पोहचलेल्या आणि तिबेटी स्त्रियांशी विवाह करून तिथेच स्थायिक झालेल्या मुस्लिम व्यापाऱ्यांचे वंशज होते. ते तिबेटी भाषा बोलत आणि बहुतांश तिबेटी प्रथा पाळत असत. ल्हासा येथे तिबेटी स्थापत्यशास्त्रानुसार बांधण्यात आलेल्या त्यांच्या चार मशिदी होत्या, त्यातील दोन मशिदी शिगात्सेत, तर एक मशीद त्सेतांगला होती. शिवाय ल्हासा येथे दोन इस्लामिक शाळा होत्या. त्यातील शिगात्से येथील एका शाळेत कुराण आणि उर्दुचे अध्ययन होत असे. भारतातील विस्थापनानंतरही मुस्लिम आणि तिबेटी बौद्ध समुदाय धार्मिक सहिष्णुतेसह साहचर्याने राहिले.

काश्मिरी आणि लडाखी मूळ असलेले 

काश्मीर, लडाख आणि तिबेटमध्ये दीर्घकालीन व्यापारी इतिहास आहे, ज्या काळात पश्चिम आणि मध्य तिबेटमध्ये या परिसरातले व्यापारी स्थायिक झाले. १४व्या शतकाच्या उत्तरार्धात सुफी संतांकडून काश्मीर आणि लडाखमध्ये इस्लामची स्थापना करताना, तिथल्या संस्थापकांनी  मुस्लिमांचाही समावेश केला असता. पण तिबेटकडील काश्मिरी आणि लडाखी मुस्लिम विस्थापितांच्या स्थलांतराचा लोंढा १७व्या शतकाच्या मध्यात पाचव्या दलाई लामांच्या काळात अधिक होता. ते मुख्यतः काश्मीरमधील दुष्काळामुळे तिबेटला स्थलांतरित होत ल्हासाला स्थायिक झाले होते.      

पाचव्या दलाई लामांकडून देण्यात आलेले विशेषाधिकार

धार्मिक सहिष्णुतेच्या धोरणाचा भाग म्हणून पाचव्या दलाई लामांनी मुस्लिम समुदायाच्या सदस्यांना विशेषाधिकार दिले. त्यांच्या धर्मांअंतर्गत व्यवहाराच्या देखरेखीसाठी ते पाच सदस्यीय समिती स्थापित करू शकत होते, शरिया कायद्यानुसार ते त्यांचे अंतर्गत वाद मिटवू शकत होते, दुकाने उघडून तिबेटातील इतर शहरांमध्ये व्यापार करू शकत होते, आणि त्यांना करातूनही सवलत देण्यात आली होती. या शिवाय, बौद्धांच्या पवित्र सकादवा महिन्यात ते मांस खाऊ शकत होते आणि मोन्लाम प्रार्थना उत्सवावेळी त्यांना बौद्ध साधुंपुढे त्यांची टोपी काढण्याचीही आवश्यकता नव्हती. शिवाय पाचव्या दलाई लामांनी त्यांना ल्हासा येथे मशीद आणि दफनभुमीसाठी जमीनही दिली होती आणि ते मुस्लिम नेत्यांना सर्व महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमांना निमंत्रित करत असत. 

लडाखसोबतचे व्यापारी मिशन 

१६८४ च्या तिबेटी-लडाखी शांतता कराराचा भाग म्हणून तिबेटी सरकारने तीन वर्षातून एकदा लडाखी व्यापारी मिशनला ल्हासात प्रवेशाची परवानगी दिली. तिबेटमध्ये इतर परदेशींना प्रवेश बंदी असतानाही हा व्यापार सुरूच राहिला. या मिशनअंतर्गत तिबेटात आलेले अनेक काश्मिरी आणि लडाखी मुस्लिम इथेच राहिले, आणि आधीपासूनच तिबेटात असणाऱ्या मुस्लिम समुदायासोबत ते जोडले गेले. 

काश्मिरी मुस्लिम नेपाळमध्येही स्थायिक झाले. जिथे त्यांनी नेपाळ आणि तिबेटातील काश्मिरी मुस्लिमांसोबतचा व्यापार घडवून आणला. १७६९मध्ये पृथ्वी नारायण शहाने काठमांडू व्हॅलीवर विजय मिळवून काश्मिरी मुस्लिमांना हद्दपार केल्यानंतर अनेक विस्थापितांनी तिबेट गाठले. १८५६च्या तिबेट-नेपाळ करारानंतर त्यांचा नेपाळ आणि भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू झाला. 

१८४१ साली काश्मीरच्या डोग्रा आर्मीने तिबेटवर आक्रमण केले. त्यांच्या पराभवानंतरही कैद्येत असणाऱ्या अनेक काश्मिरी आणि लडाखी सैनिकांनी तिबेटातच राहणे पसंत केले. काही हिंदू डोग्रा कैद्यांनीही तिबेटात राहणे पसंत केले आणि त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. त्यांनी तिबेटला एप्रिकोट आणि सफरचंदाच्या शेतीची ओळख घडवली.

हुई मुस्लिम संस्थापक 

जवळपास १७व्या शतकात निंग्झियातील चिनी हुई मुस्लिम व्यापारी उत्तरपूर्वीय तिबेटातील आमदो प्रांतातील सिलिंग(चिन.झिनिंग) येथे स्थायिक झाले. त्यांनी तिबेटींशी विवाहबंध जोडले आणि चीन व मध्य तिबेट दरम्यान व्यापार सुरू केला. त्यातील अनेक जण नंतर ल्हासाला स्थायिक झाले, जिथे त्यांनी स्वतःच्या मशिदी आणि दफनभुमींसह स्वतंत्र मुस्लिम समुदाय स्थापन केला. 

पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या सत्तेनंतर परिस्थिती लक्षणीय बदलली आहे. बौद्धांप्रमाणेच तिबेटी मुस्लिमांनाही छळ सहन करावा लागला आहे. आमदो प्रांतातील बहुतांश शहरांमध्ये प्रामुख्याने चिनी हुई मुस्लिमांच्या वसाहती असून स्थानिक तिबेटींना उंच गवताळ डोंगरपठारांवरच्या दुर्लक्षित जागांवर स्थलांतरित व्हावे लागले आहे. शिवाय मध्य तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात हुई व्यापारी स्थायिक होत आहेत. पण ते तिबेटी मुस्लिमांप्रमाणे स्थानिक नागरिकांसोबत मिसळत नसून स्वतःच्या स्वतंत्र चिनी प्रथांची आणि भाषेची जोपासना करतात. 

Top