करुणा विकसित करण्याचे फायदे

111111111111

बौद्ध धर्मात करुणा ही केवळ एक उदात्त कल्पना नसून, ती एक शक्तिशाली आणि रूपांतरकारी शक्ती आहे जी आपल्या आध्यात्मिक साधनेच्या केंद्रस्थानी आहे. करुणा विकसित करणे हे केवळ आपल्या वैयक्तिक विकासासाठीच नव्हे, तर अधिक शांततामय आणि सुसंगत जग निर्माण करण्यासाठीही अत्यावश्यक आहे – आणि जी काहीशी आपल्यातील बहुतांश लोकांचीच इच्छा असते. जेव्हा आपण आपल्या आत करुणेची व्यापक भावना जोपासतो, तेव्हा आपण इतरांच्या जीवनाला विलक्षण प्रकारे स्पर्श करू शकतो – जिथे अंधार आहे तिथे प्रकाश नेऊ शकतो आणि जिथे दुःख आहे तिथे आधार देऊ शकतो. हीच करुणेची खरी ताकद आहे. 

आपण करुणा का विकसित करावी?

आपल्यापैकी काही जण असा प्रश्न विचारू शकतात, “मी करुणा का विकसित करावी?” कदाचित आपल्याला आपले जीवन समाधानी आणि यशस्वी वाटत असेल आणि त्यामुळे करुणा ही आपल्या दृष्टीने फारसा उपयोगी गुण नाही असेही वाटू शकते. पण जर आपण खरोखरच आनंदी आणि यशस्वी आहोत, तर आपण थोडा विचार करू शकतो की या आनंद आणि यशामागे इतरांचे योगदान किती आहे — जसे की आपल्यासाठी अन्न पिकवणारे शेतकरी, आपण वापरत असलेल्या रस्त्यांची देखभाल करणारे कामगार, इतरांच्या मदतीशिवाय आपण कुठे असतो? 

जेव्हा आपल्याला ही जाणीव होते की प्रत्यक्षात आपण आपल्या आजूबाजूच्या जगाचे खूप ऋणी आहोत, तेव्हा आपल्या ध्यानी येईल की करुणा विकसित करणे हे आपल्या जवळच्या व दूरच्या लोकांसोबत अधिक खोल संबंध निर्माण करण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे. बुद्धांची शिकवण आहे की सर्व सजीव परस्परांशी जोडलेले आहेत, आणि म्हणूनच इतरांचे सुखदुःख आपल्या सुखदुःखाशी अतूटपणे जोडलेले आहे. 

जेव्हा आपण करुणा विकसित करतो, तेव्हा काहीतरी अत्यंत महत्त्वाचं घडतं: आपण स्वतःकडे आणि आपल्या वैयक्तिक गरजा, इच्छा आणि चिंतांपलीकडे पाहायला शिकतो. आपल्याला हळूहळू हे जाणवायला लागतं की इतरांचं सुख आणि कल्याण हेही आपल्या स्वतःच्या सुखाइतकंच महत्त्वाचं आहे. तिबेटी गुरूंनी शिकवलेला एक सुंदर अभ्यास म्हणजे असा: आपण एका बाजूला स्वतःची कल्पना करायचं — जिथे आपण फक्त आपल्या गरजा आणि इच्छा घेऊन एकटे आहोत — आणि दुसऱ्या बाजूला आहेत सगळे इतर जीव — प्रत्येकजण त्यांच्या आशा-आकांक्षा आणि संघर्षांसह. आणि मग आपण स्वतःला विचारतो: कोणाच्या गरजा मोठ्या आहेत — केवळ माझ्याच, की या असंख्य जीवांच्या? दृष्टीकोनातील हा बदल फक्त इतरांना मदत करण्यापुरता मर्यादित नाही — तर तो आपल्यालाही आपल्या स्वतःच्या स्वार्थी विचारांपासून मुक्त करतो, जिथे आपण फक्त स्वतःविषयीच विचार करण्यात अडकून गेलेलो असतो.

[उद्धरण] "जर तुम्हाला इतरांना आनंदित करायचं असेल, तर करुणेचा सराव करा. जर तुम्हाला स्वतःला आनंदी व्हायचं असेल, तर करुणेचा सराव करा."
— १४वे दलाई लामा

तसंच, बुद्धानुसार, करुणा ही खऱ्या आनंदाचा स्त्रोत आहे. केवळ तात्पुरत्या समाधानाचा अनुभव देणाऱ्या भौतिक गोष्टी किंवा आपल्या कारकीर्दीतील साध्यांमागे धावण्यासारखी ती नाही, तर करुणा दीर्घकालीन समाधान देते. ती आपल्याला दैनंदिन छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधायला शिकवते- जसे की काहीही अपेक्षा न करता दान करणे किंवा एखाद्या परक्या व्यक्तीलाही हसरा कटाक्ष देणे. हा आनंद बाह्य परिस्थितींवर अवलंबून नाही; तो इतरांची काळजी घेण्यातून आणि त्यांच्याशी मानवतेच्या दृष्टीने जोडले जाण्याने आपोआप निर्माण होतो, कारण ते देखील आपल्याप्रमाणे आनंदी होण्याची इच्छा करतात.

करुणा विकसित करण्याचे फायदे

सुरुवातीला असं वाटू शकतं की दुसऱ्यांच्या दुःखावर लक्ष केंद्रित करणं आणि त्यात काहीतरी बदल करण्याची इच्छा ठेवणं आपल्याला भावनिक ओझं वाटेल, पण आश्चर्यकारकपणे,आपण स्वतःत जितकी अधिक करुणा रुजवतो, तितकी आपल्याला मानसिक शांतता आणि जीवनाचा उद्देश मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं तर, करुणा वाढवणं आपल्यासाठी आणि आपल्या आजुबाजुच्या जगासाठी अनंत फायदे घेऊन येतं. 

वैयक्तिक पातळीवर, करुणा ही ताण, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. ही आपली भावनिक ताकद वाढवते. ज्यामुळे विविध आव्हानांना सामोरे जाणे सोपे होते. करुणा आपले वैयक्तिक नातेसंबंधही अधिक समृद्ध करते. आपल्याला अधिक समजूतदार, संयमी आणि आपल्या प्रिय व्यक्तींचा आधारस्तंभ होण्यास मदत करते. 

व्यापक स्तरावर पाहिल्यास, करुणेमध्ये समाज बदलण्याची ताकद आहे, जेव्हा आपण करुणेने वागतो, तेव्हा आपण दयाळूपणा आणि सहवेदनेची संस्कृती घडवण्यात योगदान देतो, यामुळे एक सकारात्मक वातावरण तयार होते, जिथे लोकांना आपलेपणा आणि पाठिंबा मिळतो, आणि परिणामी सामाजिक एकोपा व सलोखा वाढतो. 

कदाचित करुणेचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ती आपल्याला आपल्या खऱ्या स्वभावाशी जोडते. करुणा आपल्याला वेगळेपणाच्या भ्रांतीपलीकडे पाहायला शिकवते आणि सर्व जीवांचे परस्पर नातेसंबंध उलगडून दाखवते. या जाणिवेमध्ये आपण केवळ जीवनाचा उद्देशच शोधत नाही. तर दीर्घकालीन शांती आणि समाधानाचाही मार्ग सापडतो. 

करुणा विकसित करण्याचे मार्ग 

बुद्धांनी करुणा विकसित करण्यासाठी अनेक मार्ग शिकवले आहेत. आपण या मार्गांचा जितका अधिक सराव करू, तितकी आपली करुणा हळूहळू स्वाभाविक प्रतिसाद बनते आणि आपल्या कृतीतून आपोआपच दयाळूपणा प्रकट होतो. 

इतरांच्या दुःखावर चिंतन 

आपण अशा जगात राहतो आहोत जिथे अधिकाधिक लोक ‘करुणेचा थकवा’ जाणवत असल्याचे सांगतात. युद्धं, दुष्काळ आणि इतर आपत्तीच्या असंख्य प्रतिमा सतत बातम्यांत आणि सोशल मीडियातून आपल्यापर्यंत पोहोचतात. ज्यामुळे अनेकांना मानसिक थकवा येतो आणि अधिक दुःख पाहण्याची किंवा समजून घेण्याची तयारी उरत नाही. 

तथापि, करुणा विकसित करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे इतरांच्या दुःखावर मनपूर्वक चिंतन करणे. त्यामुळे जेव्हा आपण एखादी शोकांतिका बातम्यांमध्ये पाहतो, तेव्हा फक्त “अरे किती वाईट आहे हे” असं म्हणून लगेच पुढे जाता कामा नये. उदाहरणार्थ, निर्वासितांबाबतची एखादी बातमी घ्या. स्वतःचं घरदार, आयुष्य सगळं मागे टाकून अनोळखी ठिकाणी जायला लागणं किती भयंकर असू शकतं, यावर आपण मनापासून विचार करू शकतो. केवळ जीव वाचवण्यासाठी लोक धोकादायक प्रवास करतात आणि तरीही जेव्हा ते सुरक्षित स्थळी पोहचतात, तेव्हा त्यांच्याकडे शंका, भीती किंवा उपेक्षेने पाहिलं जातं. आपण किंवा आपल्या जिवलग व्यक्ती अशा परिस्थितीत असतो, तर किती दुःखद वाटलं असतं याचा विचार केला की स्वाभाविकपणे करुणेची भावना निर्माण होते: “कोणालाही असं दुःख अनुभवायला लागू नये.”

इथे आपण पाहू शकतो की दुःखावर चिंतन करणे म्हणजे वेदना किंवा दु:खात अडकून पडणे नव्हे, किंवा त्यामुळे गुदमरून जाणेही नव्हे, तर हे ओळखणे आहे की दुःख ही एक सार्वत्रिक मानवी अनुभूती आहे. आपल्या आसपासचे लोक आणि दूरदेशी असणाऱ्या व्यक्तींसमोरील आव्हाने समजून घेतल्यास, त्यांच्या दुःखाचे वास्तव जाणून घेतल्यावर त्यांच्या वेदना कमी करण्याची खरी आणि मनापासूनची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते.

करुणेच्या कृतीमध्ये सहभागी होणे

जसे पूर्वी नमूद केले, करुणा ही केवळ एक भावना नाही, तर ती कृतीतून व्यक्त होणारी गोष्ट आहे. अगदी छोट्या छोट्या दयाळू कृतींद्वारे, अगदी जसे की कुणाला मदतीचा हात देणे, एखाद्याचं मनपूर्वक ऐकून घेणे, किंवा अनोळखी व्यक्तीला एक साधं स्मितहास्य देणे – आपण आपल्या करुणेला कृतीत उतरवतो.

ही छोटी छोटी दयाळूपणाची कृती सुरुवातीला किरकोळ वाटू शकते, पण त्यांचा परिणाम मोठा असतो. त्या आपल्या कल्पनेपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्याला स्पर्श करतात. दयाळूपणा हा स्नायूसारखा असतो.   आपण केलेली प्रत्येक दयाळू कृती, कितीही लहान असो, आपली करुणा अधिक बळकट करते, ज्यामुळे भविष्यात सहवेदना आणि काळजीपूर्वक प्रतिसाद देणे अधिक सोपे होते. जेव्हा जग अधिकाधिक विभागलेलं वाटतं, अशा वेळी या छोट्या कृती खऱ्या अर्थानं आपल्याला इतरांजवळ आणतात आणि जगाला थोडंसं उजळ करून टाकतात.

निस्वार्थ प्रेमाचा सराव करणे 

निस्वार्थ प्रेम म्हणजेच इतरांनी आनंदी व्हावं ही मनापासूनची इच्छा. त्याचं करुणेशी जवळंच नातं आहे. ही एक शक्तिशाली साधना आहे, ज्याद्वारे आपण स्वकेंद्रित विचारांमधून बाहेर पडून सर्व जीवांसाठी व्यापक प्रेम निर्माण करण्याचा सराव करतो. असं केल्यामुळे आपण आपल्या अंतर्मनातील शांती आणि समाधानाच्या स्रोताशी जोडले जातो, जो पूर्णपणे आपल्यामध्येच असतो. 

बौद्ध भिक्षु आणि "जगातील सर्वात आनंदी माणूस" म्हणून ओळखले जाणारे मॅथ्यू रिकार्ड म्हणतात, “निस्वार्थता ही मनाची सर्वात उत्तम अवस्था आहे, कारण ती आपल्यासाठी आणि इतरांसाठीही सर्वोत्तम फायदे निर्माण करते.” जेव्हा आपण दररोज निस्वार्थ प्रेमाचा सराव करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनात नैसर्गिकरित्या अधिक करुणाशील आणि खुलेपणाने भरलेलं हृदय विकसित होतं.

ही साधना मोठ्या कृतींची मागणी करत नाही; ती अगदी साध्या गोष्टींपासून सुरू होऊ शकते — जसं की दिवसभर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मनापासून आनंदाची सदिच्छा व्यक्त करणं. रस्त्यावर भेटलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी मनातल्या मनात शुभेच्छा देणं, एखाद्या मित्रासाठी शांततेची प्रार्थना करणं किंवा जगभरातील दुःख अनुभवत असलेल्या लोकांसाठी प्रेमसंदेश पाठवणं, अशा लहान, पण जाणीवपूर्वक केलेल्या कृती आपली प्रेम आणि करुणा व्यक्त करण्याची क्षमता अधिक वाढवतात.

कधी कधी, जे लोक बाह्यतः दुःखी वाटतात, त्यांच्याविषयी निस्वार्थ प्रेम वाटणे आपल्याला सहज शक्य होते. रस्त्यावर एखादा भिकारी दिसला, की आपोआप आपल्या मनात भावना निर्माण होते – “देव करो, त्यांना सुख लाभो आणि त्यांच्या अडचणींमधून मुक्ती मिळो.” पण जेव्हा एखादा श्रीमंत, सर्व काही मिळाल्यासारखा दिसणारा माणूस दिसतो, तेव्हा आपल्याला वाटते, “यांच्यासाठी मी का शुभेच्छा द्याव्यात? यांच्याकडे तर सगळं आहेच!” मात्र, निस्वार्थ प्रेम हे केवळ बाह्य अनुभवांपुरते मर्यादित नसते. एखाद्याला दुःख होत असो किंवा तो यशस्वी जीवन जगत असो, प्रत्येकाला आनंद मिळावा, हेच आपण लक्षात ठेवायला हवे — कारण आनंद मिळवण्याचा हक्क सर्वांनाच आहे.

यासाठीच बुद्धांनी प्रेम आणि करुणेचे ध्यान  शिकवले. या साधनेत आपण सर्वप्रथम स्वतःसाठी प्रेम आणि दयाळूपणाच्या भावना निर्माण करतो, आणि नंतर त्या भावना इतरांकडे विस्तारतो — प्रथम आपल्या प्रिय व्यक्तींना, मग निरपेक्ष (तटस्थ) व्यक्तींना, आणि शेवटी अशा व्यक्तींना, ज्या आपल्याला कठीण किंवा आव्हानात्मक वाटतात. आपल्या प्रेम व करुणेचे वर्तुळ विस्तारत जावे, जे अखेर कोणत्याही अपवादाविना सर्व सजीव प्राणीमात्रांना सामावून घेईल, हा  या ध्यानाचा उद्देश आहे. कालांतराने, आपण भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मनापासून आनंदाच्या शुभेच्छा देणं हे आपल्यासाठी नैसर्गिक होतं.

साक्षीभाव आणि ध्यान 

साक्षीभाव म्हणजे आपल्या विचारांबद्दल, भावनांबद्दल आणि आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल कोणताही पूर्वग्रह आधारित निर्णय न करता पूर्णपणे जागरूक आणि उपस्थित राहण्याची साधना होय. जेव्हा आपण या क्षमतेला धार लावतो, जे आपल्या सर्वांनाच शक्य आहे, तेव्हा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाचे अधिक स्पष्ट भान प्राप्त होते. आपली जाणीव वाढल्या नंतर करुणाही नैसर्गिकपणे वाढते. कारण आपण पाहू लागतो की दुःख हे मानवी जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे – जे प्रत्येकजण कधी ना कधी अनुभवतो.

ज्येष्ठ बौद्ध भिक्षु आणि अध्यापक थिच न्यात हान यांनी अत्यंत मार्मिकपणे म्हटले आहे, “साक्षीभावातून करुणेचा जन्म होतो.” जेव्हा आपण अधिक सजग होतो, तेव्हा केवळ स्पष्ट स्वरूपातीलच नव्हे, तर सूक्ष्म पातळीवरील दुःख, भीती आणि अस्वस्थता देखील आपल्या आणि इतरांच्या अनुभवांत कशी व्यक्त होते, हे आपल्याला दिसू लागते. ही समज आपलं हृदय अधिक कोमल बनवते. ज्यामुळे त्रास किंवा चिडचिडीने प्रतिसाद देण्याऐवजी आपण करुणा आणि सौम्यतेने प्रतिसाद देऊ शकतो.

साक्षीभाव आणि ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला हे उमजते की कोणत्याही परिस्थितीत असलेला प्रत्येकजण काही ना काही संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जात असतो.  ही समज आपल्याला लगेच निष्कर्ष काढण्याच्या आणि इतरांविषयी झटपट मत बनवण्याच्या प्रवृत्तीपासून दूर नेत असते.  जेव्हा आपण हळूहळू सर्व प्राणिमात्रांप्रती करुणा वाढवण्याचा सराव करतो, तेव्हा आपण आपल्या मनातील वेगळेपणाची – आणि अनेक वेळा श्रेष्ठत्वाची – भावना कमी करतो, जी इतरांशी खरे आणि खोल संबंध निर्माण होण्यापासून आपल्याला अडवते. या प्रक्रियेमुळे आपण सामाजिक प्राणी म्हणून स्वतःच्या आनंदात भर घालतो. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्याही आनंदाला हातभार लावतो. 

निष्कर्षः खऱ्या करुणेचा मार्ग   

थिच न्यात हान यांनी म्हटले आहे, “करुणा एक क्रियापद आहे.” करुणा ही केवळ भावना नसून, ती आपल्याला कृतीतून सतत जोपासावी लागते — फक्त स्पष्टपणे दुःख भोगणाऱ्यांसाठीच नव्हे, तर प्रत्येकासाठी ज्यांच्याशी आपण संपर्कात येतो. दयाळूपणाच्या छोट्या कृतींद्वारे, इतरांच्या दुःखावर चिंतन करून, किंवा मैत्री ध्यानाच्या माध्यमातून — आपल्यामध्ये असलेले करुणेचे बीज सर्व प्राणिमात्रांप्रती खऱ्या काळजीच्या फुलात बदलू शकते.

माणूस म्हणून, आपल्याला स्वतःच्या गरजा आणि चिंतेमध्ये गुरफटणे फार सहज शक्य होते. पण कुणी असो, कुठूनही आलेला असो किंवा कसाही दिसत असो — प्रत्येकजण आनंद शोधत असतो आणि दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवतो. इथेच आपण बदल घडवून आणण्याची संधी घेऊ शकतो. आपल्याला कधी कधी वाटतं की आपण फारसे महत्त्वाचे नाही, पण बुद्धांनी शिकवलं आहे की या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक जीव एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणूनच आपण अनोळखी व्यक्तीला दिलेले स्मित, किंवा प्रेम व दयाळूपणाने भरलेला ध्यानासाठी दिलेला प्रत्येक क्षण — याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर निश्चितच होतो.

Top