शाक्यमुनी बुद्धांचे जीवन

19:11
आपण ज्या परंपरा मानतो, त्यानुसार बुद्धांकडे एक असा सामान्य माणूस म्हणून पाहिले जाऊ शकते, ज्याने आपल्या असाधारण प्रयत्नांनी मुक्ती प्राप्त केली किंवा असा ज्ञानप्राप्त सिद्धी असलेला जीव, ज्याने २५०० वर्षांपूर्वी ज्ञानोद्याचा मार्ग दाखविण्यासाठी कार्य केले. इथे आपण बुद्धांच्या जीवनपटावर नजर टाकणार आहोत आणि त्यातून आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कशी प्रेरणा घेणे शक्य आहे, हे पाहणार आहोत.

ऐतिहासिक तिथीनुसार शाक्यमुनी बुद्ध, जे गौतम बुद्ध म्हणूनही ओळखले जातात, त्यांचा जीवनकाळ ख्रिस्तपूर्व ५६६ ते ४८५ वर्षांच्या दरम्यानचा मध्य-उत्तर भारतातील आहे. विविध बौद्ध सुत्रांत त्यांच्या जीवनविषयक विभिन्न संदर्भ मिळतात, जे कालांतराने अधिक विस्तारित होत गेले आहेत. पण बौद्ध साहित्य बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर तीन शतकांनंतर लिहिले गेल्याने या संदर्भांमध्ये दिले गेलेल्या माहितीची सत्यता निश्चित स्वरूपात स्पष्ट करणे कठीण आहे. पण काही वृतांत लिखित स्वरूपात कालांतराने प्रकाशात आले असले तरी त्यांच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह उभे करता येणार नाही, काही घटना लिखित स्वरूपात आल्यानंतरही काही अन्य गोष्टी मौखिक रूपातही सांगण्याची परंपरा कायम राहिलेली असू शकते.   

सामान्यतः महात्मा बुद्धांसहित अन्य महान बौद्ध गुरूंच्या पारंपारिक जीवनचरित्रांचे संकलन उपदेशाच्या कारणास्तव करण्यात आले होते, ते ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जतन करण्यात आले नव्हते. विशेषतः ही जीवनचरित्रे अशा स्वरूपात लिहिली जात होती, की जेणेकरून मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीच्या आध्यात्मिक मार्गावर बौद्ध अनुयायांना उपदेश आणि प्रेरणा मिळेल. त्यामुळे बुद्धांच्या कथेवरून प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला ती कथा त्या संदर्भातून समजून घ्यायला हवी आणि त्यातून मिळणाऱ्या शिकवणींचे विश्लेषण करायला हवे.  

Top